टर्बेलॅरिया : पृथुकृमी संघाच्या (चापट कृमींच्या संघाच्या, प्लॅटिहेल्मिंथिस संघाच्या) तीन वर्गांपैकी एक. या संघातील सर्व प्राणी सामान्यतः चापट कृमी या नावाने ओळखले जातात. टर्बेलॅरिया वर्गातील प्राणी बहुधा मुक्तजीवी असतात त्यांचे शरीर लांबट, चपटे व मृदू असून ते पक्ष्माभिकायुत (केसांसारख्या बारीक संरचनांनी युक्त) बाह्यत्वचेने आच्छादिलेले असते बाह्यत्वचेत स्त्रावी कोशिका (पेशी) आणि शलाकासदृश काय अथवा वेतसी (आखूड काडीसारख्या रचना) असतात मुख बहुधा अधर (खालील) पृष्ठावर असते कधीकधी ते शरीराच्या मध्य भागाजवळ असते देहगुहा (शरीरातील पोकळी) नसते पण मृदूतकामध्ये (पातळ भित्ती असलेल्या कोशिकांच्या बनलेल्या मऊ स्पंजासारख्या ऊतकामध्ये म्हणजे समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या समूहामध्ये) अंतराकोशिकी (कोशिकांच्या मधून मधून असलेल्या) रिक्तिका (द्रवाने भरलेल्या मोकळ्या जागा) असतात हे प्राणी बहुशः उभयलिंगी असतात पण काहींचे अलिंगी विखंडन (तुकडे पडणे) होते. या प्राण्यांचे जीवनवृत्त साधे आणि सरळ असून त्यात गुंतागुंत नसते.

या प्राण्यांची लांबी १ मिमी.पासून कित्येक सेंमी.पर्यंत असते काही भूचर (जमिनीवर राहणाऱ्या) टर्बेलॅरियांत (प्लॅनेरियांत) ती ५० सेंमी.पेक्षाही जास्त असते. मोठ्या कृमींचे रंग पुष्कळदा झगझगीत असतात पण लहान प्रकार काळे, तपकिरी अथवा करड्या रंगाचे असतात व हे रंग मृदूतकाच्या रंजकामुळे (रंगद्रव्यामुळे) उत्पन्न झालेले असतात किंवा ते पांढरे किंवा पारदर्शकही असू शकतात.

आ. १ गोड्या पाण्यातील टर्बेलॅरियन प्राणी, प्लॅनेरिया : (१) डोळा, (२) डोक्याची बाजू, (३) ग्रसनीचे आवरण, (४) शुंड, (५) जनन रंध्र.

आर्थिक दृष्ट्या टर्बेलॅरिया वर्गाला काही महत्त्व नसले तरी पुनरुत्पादन, चयापचय (शरीरात सतत होणाऱ्या भौतिक व रासायनिक घडामोडी), अक्षीय क्रमिकता (अक्षावरील अनुक्रम), क्रमविकास (उत्क्रांती) व परजीवितेकरिता झालेली अनुकूलने (दुसऱ्या प्राण्यात राहण्याची योग्यता ज्या प्रक्रियांनी येते त्या प्रक्रिया) अशांसारख्या मूलभूत जीववैज्ञानिक प्रश्नांच्या अभ्यासाच्या दृष्टीने त्याचे महत्त्व निर्विवाद सिद्ध झाले आहे. गोडे व खारे पाणी आणि ओलसर जमीन या ठिकाणी ते सगळीकडे आढळत असले, तरी त्यांचे लहान आकारमान लपूनछपून राहण्याची सवय व अस्पष्ट रंग यांच्यामुळे त्यांच्याकडे सामान्यतः दुर्लक्ष होते. इतर प्राणी यांना क्वचितच खातात, परंतु हे एकमेकांना नेहमी खातात. यांच्या शरीरात इतर काही प्राणी, विशेषतः आदिजीव आणि गोलकृमी सहभोजी (एकमेकांच्या फायद्यासाठी एकत्रित आलेले) किंवा परजीवी म्हणून राहतात. खुद्द यांच्या काही जाती इतर जलीय अपृष्ठवंशींच्या (पाठीचा कणा नसलेल्या प्राण्यांच्या) शरीरांवर किंवा शरीरांत परजीवी म्हणून राहतात. काही सहजीवी किंवा सहभोजी म्हणूनही राहतात.

सरपटणे, पोहणे किंवा देहभित्तीच्या स्नायूंचे आकुंचन-प्रसरण यांमुळे या प्राण्यांचे संचलन होते. श्वसनेंद्रिये नसल्यामुळे बाह्यत्वचेमधून ऑक्सिजन व कार्बन डाय-ऑक्साइड यांची अदलाबदल होते. बाह्यत्वचा कोशिकामय किंवा बहुकेंद्रकी [कोशिका भित्ती नसलेला पण पुष्कळ केंद्रके असलेला जीवद्रव्याचा पुंज → कोशिका] असून बहुधा तिच्यावर पक्ष्माभिका असतात, ग्रंथिकोशिका नेहमी असतात आणि त्यांच्या स्रावापासून एक प्रकारचा चिकट पदार्थ, श्लेष्मा (चिकट गिळगिळीत पदार्थ) आणि आखूड व लांबट अशा दोन प्रकारच्या वेतसी उत्पन्न होतात. बाह्यत्वचेखाली बहुधा एक आधार–कला (आकार देणारे पातळसर पटल) असते. हिच्या खाली वर्तुळाकार स्नायूंचा एक स्तर व त्याच्या खाली अनुदैर्घ्य (लांब) स्नांयूचा स्तर असतो कधकधी या स्तरांच्या मध्ये तिरकस स्नायूंचा एक स्तर असतो. या खेरीज ठिकठिकाणी मृदूतकातून जाणारे उत्तराधर (उभे) स्नायू असतात. देहभित्ती व आंतरेंद्रिये यांच्यामध्ये असणारी जागा मृदूतकाने व्यापिलेली असते. हे ऊतक म्हणजे स्पष्ट भित्ती नसलेल्या कोशिकांचे सुटसुटीत जाळे असते. या ऊतकामधील जागांत असलेली प्लाविका (रक्तातील द्रवासारखा द्रव पदार्थ) अभिसारी द्रवाचे (शरीरात फिरणाऱ्या द्रवाचे) कार्य करीत असणे शक्य आहे.

पचन तंत्र : पचन तंत्रात मुख, ग्रसनी (घशासारखा अवयव) व आंत्र (आतडे) यांचा समावेश होतो. मुख अधरपृष्ठाच्या मध्यरेषेवर असते. मुख ग्रसनीत उघडते ग्रसनीचे पुष्कळ प्रकार आढळतात साध्या ग्रसनीला सीमा-कला (ग्रसनीची मर्यादा दर्शविणारी पातळ भित्ती) नसते आणि ती किंचित उद्‌वर्त्य (आतली बाजू बाहेर करता येणारी) अथवा बहिःक्षेप्य (बाहेर काढता येणारी) असते वलित (वळ्या अथवा दुमडी असलेली) ग्रसनी एका खोल कोष्ठात असून तिला सीमा-कला असते आणि ती अतिशय़ बहिःक्षेप्य असते कंदाकार (कांद्याच्या आकाराची गोलसर) ग्रसनी एका उथळ कोष्ठात असून ती सीमा-कलेने वेढलेली असते. ह्या प्रकारची ग्रसनी पिपाच्या आकाराची किंवा वाटोळी असते. बहुधा ग्रसनीपासून एक आखूड ग्रसिका (ग्रसनी व जठर यांच्यामधील आहारनालाचा भाग) निघून आंत्रात उघडते. आंत्राला मुळीच शाखा नसतात किंवा दोन, तीन अथवा पुष्कळ असतात. आंत्राला स्तंभाकार (रुंदीपेक्षा लांबी जास्त असणाऱ्या अथवा खांबासारख्या कोशिकांच्या बनलेल्या ) उपकलेचे (एखाद्या मोकळ्या पृष्ठाला झाकणाऱ्या किंवा पोकळीत अस्तराप्रमाणे असणाऱ्या समान कोशिकांच्या स्तराचे) अस्तर असते. लहान कृमी, क्रस्टेशियन (कवचधारी) प्राणी, रोटिफर, गोलकृमी, कीटक इ. टर्बेलॅरियाचे भक्ष्य होय व ग्रसनीच्या बहिःक्षेपणाने ते भक्ष्य पकडतात. अन्नाचे पचन अंतराकोशिकी आणि अंतःकोशिकी (कोशिकांच्या आत होणारे) असे दोन्ही प्रकारांनी होते. आंत्रापासून निघालेले पार्श्विक प्रतान (विस्तार किंवा फाटे) शरीराच्या सगळ्या भागात पसरलेले असतात व त्यांच्यामधून पचलेल्या अन्नाचा सगळ्या शरीराला पुरवठा होतो. गुदद्वार नसते.

आ. २. डेंड्रोसिलियम या गोड्या पाण्यातील टर्बेलॅरियन प्राण्याची संरचना : (१) स्पर्शग्राही पाली, (२) डोळा, (३) वृषण, (४) पार्श्व तंत्रिका, (५) पीतक ग्रंथी, (६) पीतक रंध्रे, (७) रेतवाहिनी, (८) स्नायुमय पिशवी, (९) जननालिंद्, (१०) अनुदैर्घ्य तंत्रिका, (११) जननरंध्र, (१२) शिश्नावरण, (१३) शिश्न (१४) पार्श्व आंत्र, (१५) अग्रआंत्र, (१६) अंडवाहिनी, (१७) अंडाशय, (१८) मेंदू.

उत्सर्जन तंत्र : उत्सर्जन तंत्रामध्ये शरीराच्या प्रत्येक बाजूला एक याप्रमाणे दोन अनुदैर्घ्य (लांबीला समांतर) वाहिन्या असून त्या नलिकांच्या गुंतागुंतीच्या जाळ्यांना जोडलेल्या असतात. या नलिकांच्या शाखा सर्व शरीरात पसरलेल्या असून त्यांच्या शेवटावर ज्वाला-कोशिका असतात. ज्वाला–कोशिका पोकळ असून तिच्या आत सतत हालत असलेल्या पक्ष्माभिकांचा एक गुच्छ असतो. या कोशिका शरीरातील द्रवरूप क्षेप्यद्रव्य (निरुपयोगी पदार्थ) आणि जास्त असलेले पाणी गोळा करून नलिकांत सोडतात आणि अखेरीस हे दोन्ही पदार्थ मुख्य अनुदैर्घ्य वाहिन्यांच्या उत्सर्जन–रंध्रांमधून बाहेर पडतात. ही उत्सर्जन–रंध्रे शरीराच्या उत्तर (वरच्या ) पृष्ठावर असून एक किंवा एकाहून अधिक असतात.

तंत्रिका तंत्र : (मज्जासंस्था). शीर्षप्रदेशात दृक्‌बिंदूच्या (प्रकाशाला संवेदनशील असणाऱ्या रंगद्रव्यांच्या छोट्या पुंजक्याच्या) खाली दोन एकमेंकींना जोडलेल्या प्रमस्तिष्क -गुच्छिका (ज्यांच्यातून मज्जातंतू निघतात अशा मज्जा कोशिकांचा समूह, मेंदू) असतात. मेंदूपासून आखूड तंत्रिका (मज्जा) निघून पुढच्या भागाला व डोळ्यांना जातात आणि दोन अधर किंवा पार्श्व (बाजूच्या) अनुदैर्घ्य तंत्रिका रज्जू निघून शरीराच्या पश्च टोकापर्यंत जातात. या रज्जू आडव्या तंत्रिकांनी जोडलेल्या असतात. तंत्रिका रज्जूंपासून परिघीय (शरीराच्या पृष्ठभागाकडे जाणाऱ्या) तंत्रिका निघतात. संवेदी ग्राहक मुख्यत्वेकरून शीर्षप्रदेशात असतात, पण शरीरावर सगळीकडे पसरलेल्या संवेदी कोशिकांपासून स्पर्शरोम निघालेले असतात. रसायनग्राही (रसायनांमुळे उद्दीपित होणारी) ज्ञानेंद्रिये बाह्य त्वचेवरील खळग्यांच्या स्वरूपात असून त्यांत पक्ष्माभिका आणि विशिष्ट संवेदी कोशिका असतात. काही टर्बेलॅरियांत अग्र टोकाजवळ संस्पर्शक (स्पर्शज्ञानाकरिता उपयोगी पडणारी लांब, लवचिक इंद्रिये) असून त्यांच्यावर बऱ्याच लांब पक्ष्माभिका असतात. या ज्ञानेंद्रियांचा उपयोग अन्न शोधण्याकरिता होत असावा. काही टर्बेलॅरियात (विशेषतः आदिम समुद्री प्रकारात) संतुलन पुटी (शरीराचा तोल सांभाळण्यासाठी असलेली ज्ञानेंद्रिये) असतात. टर्बेलॅरियांच्या पुष्कळ जातीत दृक्‌-बिंदूंच्या अथवा डोळ्यांच्या एक किंवा दोन जोड्या असतात. डोळ्यात वाटीच्या आकाराचे दृक्‌-पटल (वस्तूंच्या प्रतिमा ज्यावर पडतात तो डोळ्यातला पडदा) असते पण भिंग (लेन्स) नसते. त्यामुळे वस्तूची प्रतिमा तयार होत नाही. प्रकाशाची दिशा आणि कमीअधिक तीव्रता समजण्याकरिताच डोळ्याचा उपयोग होतो.


जनन तंत्र : वस्तुतः सगळे टर्बेलॅरिया उभयलिंगी (नर व मादी यांची इंद्रिये एकाच व्यक्तीत असणारे) असतात नराचे जनन तंत्र आणि मादीचे जनन तंत्र ही दोन्ही संपूर्णपणे पृथक् असतात किंवा दोहोंचे कोटर (पोकळी) व रंध्र समाईक असते. जनन-रंध्रे सामान्यतः मध्याधर (खालच्या पृष्ठाच्या मध्यावर) पृष्ठावर असतात कधीकधी ती मुखाशी एकवटलेली असतात. पुं-जनन तंत्रात सर्वसाधारणपणे पुढील भाग आढळतात. शरीराच्या दोन्ही बाजूंना शेकडो लहान वाटोळे वृषण (पुं-जनन ग्रंथी) असून प्रत्येक एका सूक्ष्म शुक्रवाहिकेने रेतवाहिनीला जोडलेला असतो. शरीराच्या प्रत्येक बाजूला एक याप्रमाणे दोन अनुदैर्घ्य रेतवाहिन्या असून त्या शुक्राणू साठविण्याकरिता असलेल्या एका मध्य शुक्राशयात उघडतात. शुक्राशय एका स्नायुमय शिश्नाला जोडलेला असतो. शिश्न जनन-रंध्राच्या आत असणाऱ्या जननलिंदात (जननेंद्रियांशी संबंधित असणाऱ्या लहान पोकळीत) उघडते. स्त्री जनन तंत्रात साधारणतः पुढील संरचनांचा समावेश होतो. शरीराच्या अग्र टोकाकडे दोन अंडाशय असून ते तंत्रिका रज्जूंना समांतर असणाऱ्या दोन अंडवाहिन्यांना जोडलेले असतात. प्रत्येक अंडवाहिनीच्या बरोबर पीतक (अंड्यातील निर्जीव पोषक द्रव्य) ग्रंथी असतात अंडी उत्पन्न झाल्यावर या ग्रंथी त्यांना पीतक कोशिका पुरवितात. या दोन्ही अंडवाहिन्या एका मध्य योनिमार्गाला जोडलेल्या असतात. योनिमार्ग जननलिंदात उघडतो. योनिमार्ग एका गोलसर रेताधानाला (नराचे शुक्राणू साठविण्याकरिता असलेल्या आशयाला, ‘गर्भाशय’ला) जोडलेला असतो.

जनन लैंगिक किंवा अलिंगी रीतीने होते. बहुतेक टर्बेलॅरिया उभयलिंगी असले, तरी त्यांच्यांत स्वनिषेचन (एका व्यक्तीच्या अंड्यांचे त्याच व्यक्तींच्या शुक्राणूंमुळे फलन होणे) न होता परनिषेचन (एका व्यक्तीच्या अंड्यांचा त्याच जातीच्या दुसऱ्या व्यक्तीच्या शुक्राणूंशी संयोग होणे) होते. अलिंगी जनन अनुप्रस्थ (आडव्या) विखंडनाने होते. सामान्यतः ग्रसनीच्या मागे शरीराचे संकोचन होऊन दोन तुकडे होतात आणि प्रत्येक तुकड्यावर नसलेले भाग उत्पन्न होऊन तो स्वतंत्र कृमी होतो. पुष्कळ टर्बेलॅरियांच्या अंगी पुनरुत्पादनाची असामान्य शक्ती असते. इजा होऊन नाहीसा झालेला शरीराचा कोणताही भाग अथवा एखादा अवयव पुन्हा उत्पन्न होतो.

वर्गीकरण : टर्बेलॅरिया वर्गाचे एसीला, ऱ्हॅब्डोसीला, ॲलिओसीला, ट्रायक्लॅडिडा आणि पॉलिक्लॅडिडा असे पाच गण पाडलेले आहेत. एसीला गणातील सर्व प्राणी समुद्रात राहणारे असून लहान असतात. त्यांना मुख असते पण ग्रसनी असते किंवा नसते. आंत्र नसते. अन्न मुखातून आत असलेल्या तात्पुरत्या मोकळ्या जागांत जाते व तेथे भक्षिकोशिकांच्या (बाह्य कणांचे अंतर्ग्रहण करणाऱ्या रंगहीन कोशिकांच्या) योगाने त्याचे अंतःकोशिकी पचन होते. उत्सर्जन तंत्र नसते. बहुकेंद्रकी (पुष्कळ केंद्रके असणारी) बाह्यत्वचा आणि प्रसृत (पसरलेले) तंत्रिका तंत्र अंशांसारखी आदिम लक्षणे या प्राण्यांत आढळतात. ऱ्हेब्डोसीला गणातले प्राणी लहान असून समुद्रात त्याचप्रमाणे गोड्या पाण्यात आढळतात. त्यांची ग्रसनी साधी आणि आंत्र पिशवीसारखे असते. या गणातील मायक्रोस्टोमम हा प्राणी हायड्रावर उपजीविका करतो व त्यांच्या शरीरातील ⇨दंशकोशिका स्वतःच्या संरक्षणाकरिता वापरतो. ॲलिओसीला हा गण एसीला गणाला ट्रायक्लॅडिडा गणाशी जोडणारा आहे. या गणात मुख शरीराच्या पश्च भागात असून ग्रसनी साधी, कंदाकार किंवा वलित असते. ट्रायक्लॅडिडा गणातील प्राणी मोठे असून त्यांची ग्रसनी आयाम वलित (लांबीभर घड्या पडलेली) असते. आंत्राच्या तीन मुख्य शाखा असून त्यांपैकी एक पुढच्या बाजूला आणि दोन मागच्या बाजूकडे गेलेल्या असतात. या मुख्य शाखांपासून पुष्कळ पार्श्व शाखा निघालेल्या असतात. या गणातील काही प्राणी समुद्रात, काही गोड्या पाण्यात तर काही जमिनीवर राहणारे आहेत. या गणातील ब्डेलुरा हा प्राणी लिम्युलसाच्या क्लोमांवर (कल्ल्यांसारख्या अवयवांवर) बाह्यपरजीवी असतो. पॉलिक्लॅडिडा गणातील प्राणी साधारण मोठे असतात. मुख पश्च भागात असून ग्रसनी वलित असते. आंत्र मोठे असून त्याच्या सगळ्या बाजूंपासून शाखा निघून शरीराच्या सर्व भागांना गेलेल्या असतात. या गणातील काही प्राण्यांच्या जीवनवृत्तांत पक्ष्माभिकामय डिंभावस्था (अळीसारखी अवस्था) असते.

संदर्भ :

1. Chapman, G. Barker, W. B. Zoology, London, 1964.

2. Weiss, P. B. The Science of Zoology, New York, 1966.

 

कर्वे, ज. नी.