मोती : मॉलस्का (मृदुकाय) संघातील द्विपुटी (दोन कवच असणाऱ्या) प्राण्यांच्या [→ कालव] शरीरातील कॅल्शियमी स्त्रावापासून तयार झालेल्या गोलाकार रचनेस मोती असे म्हणतात. मॉलस्काच्या कवचात असलेले मुक्ताद्रव्य मोत्यात असते. मोत्याची किंमत त्याची रंगदीप्ती [अतिशय पातळ पटलाच्या पुढील व मागील पृष्ठभागांवरून परावर्तित होणाऱ्या प्रकाशाच्या व्यतिकरणामुळे मनोहर रंग निर्माण होणे → प्रकाशकी], पारभासिकता (अर्धअपारदर्शकता), रंग, आकार व आकारमान यांवर अवलंबून असते. रत्नशास्त्रानुसार मोती हे एक प्राणिज रत्न आहे.

इतिहास : मोत्याचा इतिहास फार जुना आहे. प्राचीन भारतीय व चिनी वाङ्‌मयात मोत्याचा उल्लेख आढळतो. देवांच्या अस्थिपासून मोती होतात, असे अथर्ववेदात म्हटले आहे. भारतात आर्यांचा प्रवेश होण्यापूर्वी म्हणजे ख्रिस्तपूर्व १५०० वर्षांपूर्वी व ग्रीक संस्कृतीत ख्रिस्तपूर्व ४०० वर्षांपूर्वी मोत्याचा उल्लेख आढळतो. मॅसिडोनियाची सत्ता असताना इराणच्या आखातातून उत्तम मोती काढले जात असत. रोमच्या साम्राज्यातही मोत्यास पुष्कळ महत्त्व होते. या साम्राज्यात काही उच्च पदस्थ अधिकारीच मोती वापरू शकत असत. राजघराण्यातील व्यक्तींचे अलंकार व राजचिन्हे यांसाठी मोत्यांचा सर्रास वापर होत असे. पौर्वात्य देशांशी व्यापारी संबंध जोडून इटलीने तेथील मोती यूरोपात आणले. यूरोपात प्रबोधन कालात मोत्याचे निरनिराळे दागिने वापरात होते. त्या काळात बरोक (ओबडधोबड) मोत्यास जास्त मागणी होती. आधुनिक काळात पूर्ण गोल, आकर्षक रंगाचा, चमकदार व जड मोती जास्त वापरात आहे. ‘ल रेनीडेस पर्ल’ हा २७·५ कॅरट वजनाचा मोती फ्रान्सच्या राजघराण्यात होता. तो १७०२ साली चोरीस गेला. ल रिजेंटी हा ३४ कॅरट वजनाचा मोतीही फ्रान्सकडे होता. कालवे पकडून खाणाऱ्या आदिमानवाला मोत्याचा शोध लागला असावा. मोत्याची चमक व तेज यांमुळे याची गणना मौल्यवान वस्तूंत झाली असावा. ऋग्वेदात सूर्याचा रथ व त्या रथाचे घोडे मोत्यांनी शृंगारले होते असे वर्णन आहे. हिंदू संस्कृतीत मोती हे चंद्राचे रत्न मानले आहे. चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारी असलेल्या मीगॅस्थीनीझ या ग्रीक वकीलांच्या मते भारतात त्या काळात सोन्यापेक्षाही मोत्यास जास्त किंमत होती. वराहमिहिर या विक्रम राजांच्या दरबारी असलेल्या पंडितांनी आपल्या बृहत्संहिता या संस्कृत ग्रंथात ‘मुक्ताफल’ परिक्षा या प्रकरणात मोत्याविषयी बरेच लिहिले आहे. आयुर्वेदीय व युनानी औषध पद्धतींत मोत्यास विशेष महत्त्वाचे स्थान आहे. आयुर्वेदात मोती हा थंड, सारक, वीर्यकर, बल व पुष्टीकारक, पित्तनाशक, खोकला, श्वास इत्यादींवर उपयुक्त व आयुष्यवर्धक आहे, असे सांगितले आहे.

मोत्याचा शिंपला व मोती तयार होण्याची प्रक्रिया : मोत्याचा शिंपला ८ ते ११ सेंमी. लांब व साधारण वोटोळा असतो. दोन शिंपा ज्या काठाशी जोडलेल्या असतात तो काठ सरळ असतो. शिंपांची उघडझाक होऊ शकते. शिंपांच्या आत कालव (प्राणी) असते. त्याला संचलनाकरिता एक कोशिकामय (पेशीमय) पाय असून पाहिजे तेव्हा तो बाहेर काढता येतो. पायापासून मजबूत सूत्रगुच्छ (मजबूत तंतूंचा पुंजका) निघालेला असून त्याच्या योगायोगाने हा प्राणी एखाद्या कठीण वस्तूस घट्ट चिकटतो. कालवाचे शरीर मृदुस्तराने झाकलेले असते. यास प्रावर म्हणतात. शिंपेत तीन वेगवेगळे स्तर असतात. बाहेरचा स्तर जैव पदार्थाचा असून त्याला काँकिओलिन असे म्हणतात. याच्या आत समपार्श्वीय स्तर आणि शेवटी मुक्ताद्रव्याचा स्तर असतो. आतील दोन्ही स्तर कॅल्शियम कार्बोनेटाचे असतात व हे प्रावाराच्या उपस्तराच्या (जेथे कोशिका एकमेकींना चिकटलेल्या आहेत अशा कोशिकांच्या समूहाच्या) कोशिकांपासून तयार होतात.

ज्यापासून मोती बनतो त्या मुक्ताद्रव्याच्या मुख्य घटकास ⇨ ॲरॅगोनाइट म्हणतात. हा पदार्थ कॅल्शियम कार्बोनेट या द्रव्याचा असून याचे स्फटिक समचतुर्भुजी असतात. हे स्फटिक अत्यंत कठीण व चमकदार असतात. याच द्रव्याचा पण निराळे गुणधर्म असलेला कॅल्साइट हा पदार्थही मुक्ताद्रव्यात आढळतो. मुक्ताद्रव्यात काही वेळा अल्प प्रमाणात शंखद्रव्यही आढळते.

आ. १. मोती तयार होण्याच्या प्रक्रियेतील अवस्था : (अ) प्रावार व शिंपला यांत घुसलेला वाळूचा कण : (१) वाळूचा कण, (२) कोशिका, (३) आतिल मुक्ताद्रव्याचा थर, (४) प्रचिनाकार थर (५) शिंपल्याचा बाह्य थर (आ) प्रावार वाढून मुक्ताद्रव्याने वाळूचा कण वेढला जातो : (१) मुक्ताद्रव्याचे थर (इ) पूर्ण वाढलेली मोती.

कवचाचे स्तर स्त्रवणाऱ्या प्रावारस्तरात असतात. या कोशिकांचा एक अधिस्तर (मोकळ्या पृष्ठाला झाकणारा किंवा पोकळीच्या आत अस्तराप्रमाणे असणारा समान कोशिकांचा थर) असतो. जेव्हा एखादा कण बाहेरून प्रावार गुहेत शिरतो तेव्हा तो या अधिस्तरास चिकटतो व त्यावर या कोशिकांचे वेष्टन होऊन मुक्ताद्रव्याचे थर तयार होऊ लागतात. जर हा कण खोलवर प्रावारस्तरात शिरला, तर अगोदर त्याभोवती एक पिशवी तयार होते व नंतर या पिशवीत अडकलेल्या कणाभोवती मुक्ताद्रव्याचे थर बसू लागतात. मोत्याची वाढ होत असताना या पिशवीवर जर इतर इंद्रियांचा किंवा इतर कशाचा दाब आला नाही, तर आत तयार होणारा मोती गोल आकाराचा होतो, कारण कणाभोवती होणारे मुक्ताद्रव्याचे थर समकेंद्री असतात.

ओबडधोबड आकाराच्या मोत्यांना ‘बरोक’ म्हणतात. काही वेळा आत घुसलेला कण प्रावारस्तराच्या पिशवीत न स्थिरावता शिंपेच्या आतल्या स्तरास चिकटतो. यापासून तयार होणारे मोती अर्थगोलाकृती असतात.


मोत्याची कालवे व मोत्यांचे उत्पादन : मोती तयार करणारी कालवे खाऱ्या तसेच गोड्या पाण्यातही आढळतात. खाद्य कालवाप्रमाणे हा प्राणी शिंपल्यात राहतो पण याचा शिंपला खडकास चिकटलेला नसतो. समुद्रातील पाण्याखालच्या खडकाळ किंवा रेताड भागात हा स्थिर अवस्थेत राहतो. याचा डिंभ (भ्रूणानंतरची स्वतंत्रपणे अन्न मिळवणारी व प्रौढाशी साम्य नसलेली क्रियाशील पूर्वावस्था) अल्पकाळ स्वतंत्रपणे राहतो व थोड्या अवधीत खडकावर स्थिर होतो.

मोती उत्पादनाच्या दृष्टीने खाऱ्या पाण्यात राहमारी आणि नैसर्गिक मोती उत्पादन करणारी कालवे मेलिॲग्रिना (पिंक्टाडा) या प्रजातीचे आहेत. पूर्वी हे मार्गारिटीफेरा या नावानेही ओळखले जात. मेलिॲग्रिना प्रजातीची कालवे सर्वांत मौल्यवान व सुंदर मोती उत्पादन करतात. इराणच्या आखातात सापडणाऱ्या मे. व्हल्गॅरीस या जातीच्या ‘मोहर’ प्रकारच्या कालवाने उत्पादन केलेले मोती उत्कृष्ठ समजले जातात.

मोती काढणारे पामबुडे जोडीजोडीने काम करतात. समुद्रात दोन दोर सोडले जातात त्यांपैकी एका दोरास सु. १८ किग्रॅ. वजनाचा दगड बांधलेला असतो. एकजण या दगड बांधलेल्या दोरास धरून बुडी मारतो. त्याच्या हातात पकडलेली कालवे भरण्यासाठी एक टोपली असते. दुसऱ्या दोरीचा उपयोग तो वर उभ्या असलेल्या मच्छिमारास संदेश देण्याकरिता करतो. पाणबुड्या पाण्याखाली १ ते १·५ मिनिट राहू शकतो. संदेश दिल्याबरोबर त्यास वर काढले जाते.

ओमानच्या द्वीपकल्पापासून कॉटारच्या किनाऱ्यापर्यंत १६ मी. ते ४० मी. खोलीवर खूप मोत्याची कालवे मिळतात. बहारीन बेटांच्या किनाऱ्यावरही पुष्कळ मोत्याची कालवे मिळतात. मे ते सप्टेंबर या काळात ही कालवे पकडली जातात. लिंगे हे बऱ्याच काळापासून इराणच्या आखातावरचे मोत्याच्या व्यापाराबद्दल प्रसिद्ध असलेले शहर आहे.

श्रीलंकेजवळ, बंगालच्या उपसागरात, मानारच्या आखातात मे. व्हल्गॅरीस ही मोत्याची कालवे मुबलक प्रमाणात आढळतात. तेथून काढलेले मोती मद्रासच्या बाजारात येतात. पूर्व अफ्रिकेच्या झांजिबार बेटापासून ते मोझँबीक पर्यंतच्या समुद्रातील मोत्याच्या कालवांतील मोतीही मद्रासच्या बाजारपेठेत विक्रीस येतात. पूर्वी तांबड्या समुद्रातही मोत्याची कालवे पकडली जात असत पण अलिकडे तेथे हा व्यवसाय बंद झाला आहे.

आग्नेय आशियातील सेलेबीझ बेटाजवळ मिळणारे मोती त्यांच्या रंगाबद्दल प्रसिद्ध आहेत. ऑस्ट्रेलियाजवळ मे. मार्गारिटीफेरा वे मे. मॅक्झीमा या जातींची मोत्याची कालवे आढळतात. यांचे मोती सुंदर, रुपेरी पांढऱ्या रंगाचे असतात. दक्षिण पॅसिफिक महासागरातील काही बेटांवरही मोत्याच्या कालवांची मासेमारी केली जाते व हे मोतीही चांगले असतात. तेथील मच्छीमार पाणबुडे धाडसी आहेत. पाण्यात बुडी मारताना ते दोरीस दगड बांधीत नाहीत. अमेरिकेजवळच्या कॅरिबियन समुद्रात मिळणारे मोती पौर्वात्य भागात मिळणाऱ्या मोत्यांपेक्षा आकारमानाने मोठे असले, तरी तितके चांगले नसतात. कॅलिफोर्नियाचे आखात, मेक्सिकोचे आखात व मेक्सिकोचा पॅसिफिक महासागराचा किनारा येथे मिळणाऱ्या मोत्यांचा रंग गडद असतो व त्यांवर धातूसारखी चमक दिसते. यांपैकी काही मोती पांढरे व चांगले गुणधर्म असलेले असतात.

मेलिअग्रिना (पिंक्टाडा) प्रजातीखेरीज मॉलस्का संघात इतरही काही खाऱ्या व गोड्या पाण्यात राहणारे व मोती किंवा तत्सम पदार्थ उत्पादन करणारे प्राणी आहेत. खाऱ्या पाण्यातील गॅस्ट्रोपोडा वर्गातील हॅलिओटिस व बायव्हाल्व्हिया वर्गातील मिटीलसप्लॅकुना तसेच गोड्या पाण्यातील युनिओॲनोडोंटा यांपासून मोती मिळतात. भारतात मात्र गोड्या पाण्यातील कालवांपासून मोती मिळाल्याचे आढळत नाही. अमेरिकेतील मिसिसिपी नदीत राहणाऱ्या कालवांपासून चांगले मोती मिळाले आहेत. अमेरिकेचा गुलाबी रंगाचा प्रख्यात मोती ‘क्विन पर्ल’ हा न्यू जर्सी राज्यात नॉचब्रुक येथे १८५७ साली सापडला. याचे वजन २३·२५ कॅरट आहे. ग्रेट ब्रिटनमध्ये प्राचीन काळी गोड्या पाण्यातील मोत्यांचा व्यापार मोठ्या प्रमाणात चालत असे पण सध्या तो भरभराटीस नाही. यूरोपात गोड्या पाण्यातील मोत्यांचा व्यवसाय अजूनही थोड्या फार प्रमाणात अस्तित्वात आहे. चीनमध्ये हा व्यवसाय ख्रिस्तपूर्व २००० वर्षांपासून अस्तित्वात आहे, असे दिसते.

जपानमधील आकोया कालव्यात तयार होणारे मोती आकारमानाने २ ते ३ मिमी. व्यासापासून १० मिमी. व्यासापर्यंत असू शकतात. २ ते ५ मिमी. व्यासाचे मोती विपुल संख्येत आढळतात. ऑस्ट्रेलियातील पांढऱ्या बटरफ्लाय कालव्यात तयार होणाऱ्या मोत्यास ‘साऊथ सी पर्ल’ म्हणतात. यांचा व्यास १० मिमी. पासून १७ मिमी पर्यंत असू शकतो पण आकोया मोत्यांच्या तुलनेत हे फार दुर्मिळ व मौल्यवान मोती आहेत.

जपानच्या लेक बीवा या गोड्या पाण्याच्या तळ्यात पाँड बटरफ्लाय कालवाकडूनही मोत्यांची निर्मिती होते. हे मोती तांदळासारखे लांबट असतात व ते ‘राईस पर्ल’ या नावाने ओळखले जातात.

काळे मोती ब्लॅक बटरफ्लाय कालवात सापडतात. हे दुर्मिळ असून फार किंमती आहेत.

खऱ्या मोत्यांचे उत्पादन भारतात पुरातन काळापासून चालू आहे. मोत्याची कालवे साधारणपणे समुद्रातील साध्या व प्रवाळ खडकांच्या कंगोऱ्यांवर समुद्रकिनाऱ्यापासून १९ किमी. अंतरावर व सु. १८ ते २२ मी. खोलीवर आढळतात. भारताच्या पूर्व किनाऱ्यावरचे मोत्याच्या कालव्यांचे क्षेत्र जास्त विस्तृत आहे. कन्याकुमारी ते किलाकराईपर्यंत हे पसरले आहे. त्यातल्या त्यात तुतिकोरिनजवळ मोत्याची कालवे मुबलक आहेत. यांत सिंधा मोती या जातीचे चांगले मोती मिळतात. पश्चिम किनाऱ्यावर सौराष्ट्रात जामनगरजवळही मोत्याची कालवे आढळतात. भारतातील मोत्याच्या कालवांची मुख्य केंद्रे मानारचे आखात, कच्छचे आखात, पाल्कची सामुद्रधुनी व बडोदे येथे आहेत. चार-पाच वर्षांत मोत्याचे कालव ९० ते १०० मिमी. वाढते व पकडण्यास योग्य समजले जाते. लहान कालवे पकडण्यावर कायद्याने बंदी घालण्यात आली आहे. दक्षिण भारतात पाणबुड्यांच्या मदतीने कालवे पकडली जातात. याउलट कच्छ आणि सौराष्ट्रात ओहटीच्या वेळी ती हाताने गोळा केली जातात. कालवांची मच्छीमारी त्या त्या राज्य शासनाच्या कक्षेत येते व यासंबंधीचे कायदे, उद्योग, निर्यात वगैरे त्या शासनामार्फत होते.


गुजरात राज्यातील केंद्रात मोती काढण्याचे काम दरवर्षी किंवा एकवर्षाआड होत असे. या कालवांपासून पूर्वीच्या नवानगर संस्थानला दरवर्षी रु. ६,००० ते २३,००० पर्यंत लाभ होत असे. १९४० नंतर कालवांची संख्या कमी झाल्यामुळे त्यांची मच्छीमारी तीन-चार वर्षांआड होऊ लागली. १९६७ पासून ती संपूर्णतया बंद झाली.

मानारच्या आखातातील मोत्याच्या कालवांची संख्या मोठी आहे. गेल्या ३०० वर्षांत तेथे ३८ वेळा मोती मच्छीमारी करण्यात आली. १९५५–६१ या काळात ही मच्छीमारी ७ वेळा झाली व त्यापासून एकंदर रु. २२ लक्ष फायदा झाला. ही मच्छीमारी सध्या तमिळनाडू शासनाच्या ताब्यात आहे.

महाराष्ट्रात मोत्याची कालवे मिळत नव्हती. अलीकडेच रत्नागिरीजवळ ती थोडी आढळली आहेत. ठाण्याजवळ काही प्रमाणात प्लॅकुना प्लॅसेंटा ही कालवे मिळतात. यांत आढळणारे मोती अगदी निकृष्ट दर्जाचे असतात व ते आयुर्वेदीय औषधांकरिता वापरले जातात.

संवर्धित (कल्चर्ड) मोती :मोत्यांचे सौंदर्य व त्यांना असलेली वाढती मागणी लक्षात घेऊन मोत्याच्या कालवांचे संवर्धन व त्यांत मोत्यांची कृत्रिम निर्मिती यांकडे लोकांचे लक्ष वेधले. या दृष्टीने सर्वप्रथम प्रयत्न चीनमध्ये झाले. तेराव्या शतकात ये-जीन-यांग या चिनी मनुष्यास असे आढळले की, गोड्या पाण्यात राहणाऱ्या मोत्याच्या कालवाच्या प्रावारात जर बारीक कण घुसविला, तर त्यावर प्रावाराच्या स्त्रावाचे वेष्ठन होऊन थर तयार होतो आणि असे थरावर थर बसून त्याचे पुढे मोत्यात रूपांतर होते. हे मोती आकाराने अर्धगोल व शिंपेत चिकटलेले असत. हे तंत्र चीनमध्ये पुढे पुष्कळ वर्षे वापरात होते. लहान कण, बारीक खडे, लाकडाचे किंवा धातूचे सूक्ष्म तुकडे यांचा वापर कालव्यांच्या प्रावारात घुसविण्यास होत असे. कधीकधी बुद्धाची अगदी सूक्ष्म प्रतिमाही प्रावारात घुसविली जात असे. यावर स्त्रावाचे वेष्टन होऊन मोती तयार होण्यास तीन ते चार वर्षे लागत असत. अशा अर्धगोल मोत्यास पुळीदार मोती म्हणत असत. यापासून पूर्ण गोलाकार मोती करण्यास दुसरा अर्धगोल मोती त्यास जुळवावा लागत असे. अठराव्या शतकात स्वीडीश शास्त्रज्ञ कार्ल लिनीअस यांनी मोत्याच्या कालवामध्ये लाकडाचा कण किंवा बारीक वाळूचा कण घालून कृत्रिम मोती मिळविले. पण हे मोती नैसर्गिक मोत्याप्रमाणे पूर्ण गोलाकार नव्हते. त्यांच्या आकारावरून त्यांनाही पुळीदार मोती म्हणत असत.

कोकिची मिकीमोटो या जपानी गृहस्थांनी १८९० साली संवर्धित मोत्याच्या कालवांपासून मोत्यांची निर्मिती करण्यात यश मिळविले. त्यांच्या प्रयोगात त्यांनी कालवाच्या प्रावरात मुक्ताद्रव्याचा बारीक कण घातला. यामुळे संपुर्णपणे मुक्ताद्रव्याचा बनलेला व पूर्ण गोलाकार मोती मिळू शकला. यालाच संवर्धित (कल्चर्ड) मोती असे म्हणतात. आवश्यक त्या सुधारणा करून संवर्धित मोती उत्पादनात हीच पद्धत अवलंबिली जाते. संवर्धित मोती नैसर्गिक मोत्यांसारखेच असतात. त्यावरील मुक्ताद्रव्याचा थर पातळ असेल, तर मानवाच्या शरीरावरील कातडीशी सतत संपर्क आल्याने त्याचा नाश होतो व आतील आधारद्रव्य उघडे पडते. जपानमध्ये ३०० पेक्षा अधिक मोत्याच्या कालवांची संवर्धन क्षेत्रे आहेत. यांपैकी आगो उपसागरातील सर्वांत मोठे क्षेत्र सु. ३७ किमी. इतक्या लांबीचे आहे.

पूर्ण वाढ झालेली (सु. ३ वर्षे वयाची) समुद्रभागातील मोत्याची कालवे गोळा करून किनाऱ्यावर आणतात. कालव्यांनी शिंपले उघडावेत यासाठी ती काही वेळ पाण्याबाहेर काढून ठेवतात. मुक्ताद्रव्याचा सूक्ष्म कण प्रावाराच्या थरामध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत उघड्या शिंपल्यातून कालवाच्या प्रावारगुहेत पिचकारीसारख्या बोथट उपकरणाच्या साहाय्याने ठेवतात. यानंतर ही कालवे भक्कम पिंजऱ्यात नाजूक तारेने टांगून ठेवली जातात. हे पिंजरे समुद्रात ठराविक उंचीवर टांगून ठेवले जातात. या पिंजऱ्यांभोवती विद्युत् प्रवाह सोडलेला असतो. यामुळे कालवांचे समुद्रातील शत्रूंपासून व मानवापासूनही संरक्षण होते. कालवात मोती तयार होण्यास सु. ७ ते ८ वर्षे लागतात. यानंतर पिंजरे बाहेर काढून घेऊन त्यांतून मोती काढून घेतात. सुमारे ८५% कालवांत मोती मिळतात. हे मोती नंतर थंड पाण्याने धुवून त्यांना यंत्राने तकाकी आणली जाते. आकारमानाप्रमाणे त्यांची विभागणी करून त्यांना भोके पाडली जातात आणि सुटे किंवा माळा करून बाजारात पाठविले जातात. नैसर्गिक मोत्यांच्या व्यापारात असणारी अनिश्चितता संवर्धित कालवांतील मोत्यांच्या निर्मितीमुळे नाहीशी झाली. परिणामी संवर्धित मोत्यांची निर्मिती व व्यापार पद्धतशीरपणे वाढविण्यात आले.

मोत्यांची पारख : मोत्याची परीक्षा निरनिराळ्या शास्त्रीय पद्धतींनी केली जाते. मुक्ताद्रव्यदर्शक (नॅक्रेस्कोप) या उपकरणाच्या साह्याने मोत्याचा आतील गाभा तपासता येतो. एन्डोस्कोप या उपकरणाच्या साह्याने मोत्यास पाडलेल्या छिद्राची (वेजाची) तपासणी करता येते. अस्सल नैसर्गिक मोत्यातील मुक्ताद्रव्याचे थर एककेंद्री असतात, तर संवर्धित मोत्यात ते समांतर असतात. मोत्यास छिद्र पाडण्यापूर्वी क्ष-किरणांच्या साह्याने हे थर कसे आहेत, हे समजू शकते. मोती खरे व चांगले आहेत की नाहीत हे ओळखण्यासाठी ढोबळ पद्धत म्हणजे ते आपल्या पुढच्या दातावर घासले असता खडबडीत लागले, तर खरे व गुळगुळीत लागले, तर खोटे असेही मानले जाते.

गुणधर्म व उपयोग : मोत्याचा रंग कालवाच्या जातीवर व आजूबाजूच्या परिस्थितीवर अवलंबून असतो. रंगाच्या छटा काळ्यापासून पांढऱ्यापर्यंत असू शकतात. गुलाबी रंगाचा भारतीय मोती सर्वोत्कृष्ट समजला जातो. या रंगास मोतीया रंग असेही म्हणतात. पूर्ण गोल पांढरा शुभ्र किंवा मोतीया रंगाचा, निर्मल, गुळगुळीत पृष्ठभाग असलेला, चमकदार व जड मोती सर्वोत्कृष्ट समजला जातो. यांखेरीज काळा, निळा, राखी, हिरवट वगैरे रंगांचेही मोती आढळतात. दर्जा व रंगावरून मोत्याच्या जाती ठरविल्या जातात. बसराई, ढबदार, नूर, मजीट, शुक्री व हरमुजी या काही प्रसिद्ध जाती आहेत. यांपैकी बसराई मोती अत्यंत खूपच मौल्यवान समजला जातो.

मोत्यांच्या आकारमानातही खूपच वैचित्र्य आढळते. ज्या मोत्याचे वजन पाव ग्रेन (०·०१६२ ग्रॅ) पेक्षा कमी असेल, तर त्याला ‘बीजमोती’ म्हणतात. एक ग्रॅम वजनात असे ३०० मोती बसू शकतात. बरोक मोती सर्वांत जास्त वजनदार असतो. हेन्री टॉमस होप या गृहस्थांकडे असलेल्या बरोक मोत्याचे वजन १,८६० ग्रेन इतके होते. संगजिऱ्याचा कठीणपणा एक व हिऱ्याचा दहा असतो. या मापक्रमात मोत्याचा कठीणपणा साडेतीन ते चार असतो.

मोत्यांचा उपयोग मुख्यत्वेकरून दागिने करण्यासाठी होतो. मोती विशेष कठीण नसल्यामुळे त्यावर कठीण पदार्थांचे चरे पडू शकतात. म्हणून मोत्याचे दागिने शरीरावर सुरक्षित राहतील अशा ठिकाणी घातले जातात. कर्णभूषणे, गळ्यातील सर (मोती हार), बांगड्या, नथ इ. मोत्यांच्या दागिन्यांचे साधारण आढळणारे प्रकार आहेत. मोत्यास पाडलेली भोके मोठी होऊ नयेत म्हणून माळ वारंवार गाठवून घेणे व माळेतील दोन मोती एकमेकांजवळ येऊ नयेत म्हणून दोन्हीमध्ये गाठ देणे आवश्यक असते. घामाचा मोत्यावर परिणाम होतो म्हणून गळ्यातून माळ काढल्यावर ती पुसून ठेवणे आवश्यक असते. उष्णतेचाही मोत्यावर परिणाम होतो. मोती कॅल्शियम कार्बोनेटाचे बनलेले असल्यामुळे त्यांवर अम्लाचा परिमाम होतो. मोत्यास हवेतील आद्रतेची जरूर असते म्हणून फार दिवस मोती हवाबंद पेटीत ठेवू नयेत. मोत्यास हवेतील आर्द्रता मिळाली नाही, तर मुक्ताद्रव्याचा ऱ्हास होतो.

पुळीदार मोती व भोक पाडाताना फुटलेले मोती यांचा उपयोग बटने करण्याकरिता किंवा पदकावर जडविण्याकरिता केला जातो. मोत्याच्या कालवांच्या आतील चमकदार थरांचा उपयोग बटने, सुऱ्यांच्या मुठी इत्यादींसाठी होतो. काचेच्या किंवा प्लॅस्टिकच्या मण्यावर माशांच्या खवल्यापासून तयार केलेल्या रुपेरी द्रव्याचा पातळ थर देऊन नकली मोती तयार करतात. हे मोती किंमतीत अगदी स्वस्त असतात पण त्यांचा दर्जा चटकन ओळखता येतो. असले मोती प्रथम सतराव्या शतकात फ्रान्समध्ये तयार केले गेले.

मोत्याचे औषधी गुण आणि उपयोग आयुर्वेदात वर्णिले आहेत. त्यानुसार मोती प्रकृतीने थंड, बल्य, पुष्टिकर, पित्तघ्न आहे. दृष्टिरोग, विषदाह, राजयक्ष्मा (क्षय), मुखरोग इत्यादींवरील औषधांत मोत्यांचा उपयोग करतात. मोती त्वचेच्या कांतीवर उपयुक्त आहे, तसेच तो विषनाश करतो व वीर्यप्रद आहे. कफ, खोकला, श्वास, अग्निमांद्य यांवर उपयुक्त, शरीराचा दाह कमी करणारा व आयुष्य वाढविणारा असेही त्याचे गुणधर्म सांगितले आहेत. मौत्तिकभस्म हे सर्वसाधारण लोकांस माहित असलेले आयुर्वेदीय औषध आहे.

इ. स. १९६० मध्ये जपानने मोत्यांची निर्यात करून सु. ५ कोटी १५ लक्ष डॉलर मिळविले. जपाननंतर मोत्याच्या व्यापारात ऑस्ट्रेलियाचा व फिलिपीन्सचा क्रमांक लागतो. १९८४-८५ मध्ये भारताने ४·८१ कोटी रुपयांच्या मोत्यांची निर्यात केली, तर त्याच साली ५·३१ कोटी रुपयांच्या मोत्यांची आयात केली. भारतात संवर्धित मोती उत्पादनास बराच वाव आहे आणि त्या दृष्टीने शासनाचे व संशोधकांचे प्रयत्न चालू आहेत.

पहा : अलंकार कालव जडजवाहीर बायव्हाल्व्हिया.

संदर्भ : 1. Algarswamy, K. Pearl Culture in Japan and Its Lessons for India, 1968.

2. Algarswamy, K. Quasim, S. Z. What Are Pearls and How They Are Produced.

3. Dickinson, J. The Book of Pearls, New York, 1968.

4. Shirai, S. Pearls, New York, 1981.

इनामदार, ना. भा. जोशी, लीना

जोशी, मा. वि. दुर्वे, वि. स.


 

शिंपल्यामध्ये तयार झालेला मोतीमोत्यांचे विविध आकारमोत्यांचे विविध अलंकारविविध आकारांचे गोड्या पाण्यातील संवर्धित मोती.