क्रमविकास : (उत्क्रांती). जीवविज्ञानातील हा एक महत्त्वाचा विषय आहे. आज आपल्याभोवती पसरलेली सजीव सृष्टी पृथ्वीवर आरंभी म्हणजे सु. दोनशे कोटी (काहींच्या मते चारशे कोटी) वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या प्रारंभिक सजीवांपासून क्रमाक्रमाने फरक पडून बनलेली आहे, याबद्दल जीववैज्ञानिकांत दुमत राहिलेले नाही इतकेच नव्हे, तर ज्या ग्रहगोलावर सजीव प्रथम निर्माण झाले, विस्तार पावले व त्यांमध्ये अनेक पिढ्यानुपिढ्या प्रागतिक बदल होत गेले, ती आपली पृथ्वीही पूर्वीपेक्षा इतर कित्येक बाबतींत (हवा, पाणी, तापमान, नद्या, डोंगर व समुद्राच्या आणि खंडांच्या मर्यादा इ. बाबतींत) बदलत आली आहे, हे सप्रमाण सिद्ध झाले आहे. प्रारंभिक सजीव अत्यंत साधे व सूक्ष्म असून ते क्रमाक्रमाने अधिक मोठे, जटिल (गुंतागुंतीचे) व प्रभेदित (कार्य विभागणीनुसार होणारे रूपांतर) होत जाऊन वर सांगितलेल्या दीर्घकाळात त्यांचा सर्वांगीण विकास झाला आहे, ही गोष्ट आता सर्वमान्य झाली आहे. या प्रक्रियेस ‘जैव क्रमविकास’ किंवा ‘जैव उत्क्रांती’ म्हणतात. ही प्रक्रिया संथ पण सतत चालू असल्याने पृथ्वीवर सजीवांची निर्मिती झाल्यापासून आजपर्यंतच्या व आजही होत असलेल्या  बदलांचा एक सुसूत्र इतिहास म्हणजेच क्रमविकास होय. अत्यंत साध्या सजीवांपासून जटिल संरचना असलेले वंशज निर्माण होणे, हा क्रमविकासाचा दृश्य परिणाम होय असे मानले जाते तसेच सजीवांमध्ये आढळणाऱ्या विविधतेत कमी अधिक प्रमाणात साम्याचे दर्शन घडून येते आणि ते समान पूर्वजपरंपरेचे द्योतक आहे, हे क्रमविकासातील महत्त्वाचे तत्त्व आहे. सजीवांतील काही असामान्य नैसर्गिक प्रवृत्ती व त्यांच्या भोवतालची परिस्थिती यांमुळे हा क्रमविकास झाला असावा असे बहुतेकांचे मत आहे.

पृथ्वीचा जन्म सु. ५००–६०० कोटी वर्षांपूर्वी झाला असावा असे मानतात त्यानंतर सु. दोनशे किंवा तीनशे कोटी वर्षे जीवनाचा व अन्नाचा लेशही नव्हता त्यानंतर पहिला सजीव पदार्थ (जीवद्रव्य) बनला असावा तो कोठून व कसा आला व कसा निर्माण झाला असावा हे अद्याप पूर्णपणे न उकललेले गूढच आहे. त्यावेळी अस्तित्वात असलेल्या निर्जीव (अकार्बनी) पदार्थांपासून विशिष्ट परिस्थितीत तो रासायनिक अपघातानेच एकदा किंवा त्यानंतर कदाचित अनेकदा निर्माण झाला असावा भविष्यकाळी एखादा जीवरसायनशास्त्रज्ञ कदाचित प्रयोगशाळेत अकार्बनी रासायनिक द्रव्यांपासून सजीव (कार्बनी) पदार्थ बनवीलही पण जीवनिर्मितीच्या आरंभी नेहमी तीच घटना घडली असावी याची खात्री देणे कठीण आहे [→ जीवोत्पत्ति नवजीवजनन].

शास्त्रीय दृष्टिकोनातून क्रमविकासाचा सांगोपांग अभ्यास हा जरी एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापासून होत असला, तरी ही कल्पना मात्र फार पुरातन आहे. तत्त्वज्ञानी व शास्त्रज्ञ यांचे या कल्पनेबद्दलचे दृष्टिकोनही वेगवेगळे आहेत. प्राच्य-भारतीय तत्त्वज्ञानानुसार ईश्वरी कार्यासाठी व त्याचाच अंश म्हणून अंतःक्रमविकासाने माणसाचा जन्म झाला उद्दिष्टापासून विचलित झाल्याने कर्मफलानुसार विविध प्रकारचे जन्म अस्तित्वात आले. पाश्चात्य तत्त्ववेत्त्यांचे मत याहून भिन्न होते. थेल्स, एंपेडोक्लीझ, ॲरिस्टॉटल वगैरे ग्रीक तत्त्ववेत्त्यांच्या मते जीवांची, विशेषतः प्राण्यांची उत्पत्ती काहीशा वेगळ्या पद्धतीने झाली. ती ‘विशिष्ट निर्मिती’ किंवा ‘स्वयंजनन’ यामुळे झाली असावी असे मांडले गेले. यांपैकी पहिल्या उपपत्तीप्रमाणे जीवांचा प्रत्येक प्रकार (जाती) स्वतंत्रपणे पूर्वी एकदाच निर्माण झाला असावा व आजपावेतो त्याच स्वरूपात (बदल न होता) तो आढळतो दुसऱ्या उपपत्तीप्रमाणे निर्जीव वस्तूंतून उस्फूर्तपणे नवीन जीवांची उत्पत्ती होत असावी, असे मानले जात होते. कालांतराने पृथ्वीच्या जुन्या खडकांच्या थरांत प्राणी व वनस्पती यांचे रूपांतरित अवशेष[→ जीवाश्म] सापडू लागले आणि त्यांचा अभ्यास होऊ लागला, तेव्हा वरील तत्त्वप्रणालीस बाध येऊ लागला, म्हणून ‘विपत्ती’ची उपपत्ती मांडली गेली तीमध्ये असे प्रतिपादन केले गेले की, पृथ्वीच्या इतिहासात हिमअवधाव (पर्वताच्या उतारावरून एकदम घसरणारी बर्फाची प्रचंड राशी), प्रलय ह्या व तत्सम इतर आपत्तींमुळे अनेकदा जीवांचा संपूर्ण नाश व त्यानंतर पुनर्निर्मिती झाली असावी या पुनर्निर्मितीत जीवाच्या आकार-प्रकारांत जे फरक पडले त्यामुळे विविधता आली. याउलट, शास्त्रीय दृष्टिकोनातून मांडलेल्या उपपत्तीत जीवांतील किमान लक्षणांचे सातत्य व त्यांचा क्रमशः विकास ही मूळ कल्पना आहे. हे घडून येण्यास (१) परिस्थितीचा प्रभाव, (२) संयोगी परिवर्तन (भेद), उत्परिवर्तन (आनुवंशिक लक्षणांत होणारा एकाएकी बदल), (३) नैसर्गिक निवड (ज्या नैसर्गिक प्रक्रियेने योग्यतम किंवा बलिष्ठ प्राणी टिकाव धरून राहतो आणि परिस्थितीशी ज्याचे योग्य प्रकारे अनुकूलन झालेले नसेल तो नाश पावतो ती प्रक्रिया) इ. कारणे जबाबदार असतात. ही सर्व क्रमविकास स्वतंत्रपणे घडवून आणतात की संयुक्तपणे, तसेच क्रमविकास ही प्रक्रिया संचयी आहे किंवा कशी यांबद्दल भिन्न मतप्रवाह आहेत. क्रमविकासाला जीवांतील नैसर्गिक शक्तीच कारणीभूत होते असे काही मानतात. असे विविध विचारप्रवाह असले, तरी जीवविज्ञानातील विविध पुरावे आणि सांख्यिकीय आधार यांवरून परिवर्तन, उत्परिवर्तन, परिस्थिती आणि नैसर्गिक निवड या तत्त्वांवर आधारलेला शास्त्रीय दृष्टिकोन क्रमविकासाच्या सिद्धांताला बळकटी आणतो.

क्रमविकासाचा खरेपणा जीवविज्ञानाच्या विविध शाखांमधून मिळणाऱ्या पुराव्यांवरून चांगला समजू शकतो त्यावरून समान पूर्वज, जीवांतील किमान लक्षणांचे सातत्य, विविधतेतील साम्याची बैठक व जीवात क्रमशः घडून येणारे बदल या गोष्टी शाबीत होत असल्याने क्रमविकासाच्या शास्त्रीय दृष्टिकोनास पुष्टी मिळते हे भिन्न पुरावे व त्यांची नमुन्यादाखल घेतलेली काही उदाहरणे खाली दिली आहेत.

(१) पुराजीवविज्ञान: प्राचीन काळी अस्तित्वात असलेल्या पण पुढे लुप्त (निर्वंश) झालेल्या वनस्पती अगर प्राणी यांचे अगर त्यांच्या शरीरांच्या भागांचे कमी जास्त रूपांतरित अवशेष, ठसे वगैरे उत्खननामध्ये खडकांत आढळतात त्यांना जीवाश्म म्हणतात. पृथ्वीवरील भिन्नभिन्न ठिकाणच्या गाळाच्या खडकांत आढळणाऱ्या जीवाश्मांच्या पाहणीत असे आढळते की, अतिप्राचीन जीवाश्म फार साध्या जीवांचे (वनस्पतींचे व प्राण्यांचे) असून जसजसे अर्वाचीन खडक पाहणीत येतात तसतसे त्यांतील जीवाश्म सापेक्षतः व क्रमाने अधिक जटिल  आणि संख्येने अधिक असल्याचे  आढळते.  प्राण्यांमध्ये प्रथम अपृष्ठवंशींपैकी (पाठीचा कणा नसलेल्यांपैकी) क्रमाने अधिक जटिल व त्यानंतर पृष्ठवंशींतील (पाठीचा कणा असलेल्यांतील) प्रथम मासे, उभयचर (जमिनीवर व पाण्यात राहणारे प्राणी) व सरीसृप (सरपटणारे प्राणी) व त्यानंतर पक्षी व सस्तन प्राणी यांचे जीवाश्म क्रमाने आढळतात. वनस्पतींच्या बाबतीतही असाच अनुभव येतो (‘वनस्पतीचा क्रमविकास’ हे उपशीर्षक पहावे). हा क्रमविकासाचा प्रत्यक्ष पुरावा मानला जातो. अशा जीवाश्मांच्या साहाय्याने घोडा, हत्ती व माणूस यांच्या पूर्वजांची संगती लावता येते. तसेच सर्व पृष्ठवंशी समान पूर्वजांपासून विकास पावले असावे या कल्पनेवर विश्वास बसतो. सर्व वाहिनीवंत (अन्नरसाची ने-आण करणारे घटक असलेल्या) वनस्पतींचा [→ नेचे बीजी नेचे वनस्पति, बीजी विभाग] उगम शेवटी फक्त अनेककोशिक (ज्यांचे शरीर अनेक पेशींचे बनले आहे अशा) शैवलांसारख्या वनस्पतींत असून पुन्हा त्या शैवलांची उत्पत्ती एककोशिकांपासून झाली असावी या अनुमानाची प्रचिती येते [→ पुराजीवविज्ञान].


(२) वर्गीकरणविज्ञान : प्राणी किंवा वनस्पती यांची सर्व लक्षणे (विशेषतः प्रजोत्पादक अवयव) विचारात घेऊन त्यांचे स्वतंत्रपणे वर्गीकरण केले जातेयाला नैसर्गिक वर्गीकरण म्हणतात. यामध्ये सर्व प्राण्यांच्या अथवा वनस्पतींच्या भिन्न गटांची मांडणी स्वतंत्र वृक्षाप्रमाणे करतातत्याला वंशवृक्ष म्हणतातएखाद्या गटातील लहान लहान उपगटांचीही अशीच मांडणी करता येते. ही मांडणी त्यांचे साम्य व भेद लक्षात घेऊन केली जातेत्यावरून त्यांचे परस्परांशी असलेले कमीअधिक नाते दिसून येते. क्रमविकासाच्या अभावी असे नाते व पूर्वजपरंपरा वंशवृक्षाप्रमाणे दर्शविणे शक्य नव्हते [→ वर्गीकरणविज्ञान उपशीर्षके—वनस्पतींचा क्रमविकास प्राण्यांचा क्रमविकास].

(३) जोडणारे दुवे : काही जीवाश्म किंवा विद्यमान वनस्पती व प्राणी (अथवा त्यांचे लहान मोठे गट) यांच्या शारीरिक लक्षणांतील काही लक्षणे अशी असतात की, त्यांवरून त्यांचा दुसऱ्‍या दोन भिन्न वनस्पतींशी, प्राण्यांशी (अथवा दोन भिन्न गटांशी) संबंध जोडता येतो व त्यावरून त्या वनस्पती, प्राणी किंवा गट यांना जोडणारे दुवे ठरतात. अशा दुव्यांमुळे भिन्न गटांचे संबंध प्रस्थापित करता येऊन वरचे (अधिक जटिल वा प्रगत) गट खालच्या (अधिक साध्या व अप्रभेदित) गटापासून क्रमाने विकास पावले असावे हे दिसून येते. उदा., हल्लीच्या बीजुकधारी (लाक्षणिक प्रजोत्पादक भाग असलेल्या) नेच्यांना बीजी वनस्पतींचे पूर्वज म्हणण्यास जीवाश्म स्थितीतच आढळणारे ⇨बीजी नेचे हा दुवा उपयुक्त ठरतो, कारण यांची पाने नेच्यांप्रमाणे असून बीजे  ⇨ सायकॅडेलीझ  या प्रारंभिक बीजी वनस्पतींशी साम्य दर्शवितात. ⇨ आर्किऑप्टेरिक्स हा लुप्त पक्षी सरीसृप व पक्षी या दोन गटांमधील दुवा समजला जातो व त्यावरून पक्षी सरीसृपासारख्या पूर्वजांपासून उत्क्रांत झाले असावे, असे म्हणण्यास पुरावा मिळतो. काही विद्यमान प्राणी[उदा., सीलॅकँथ, लॅटिमेरिया नावाचा मासा→ लॅटिमेरिया] अथवा वनस्पती [उदा., गिंको, → गिंकोएलीझ] प्राचीन काळापासून जवळजवळ बदललेले नसल्याने लाखो वर्षांपूर्वी तशा प्रकारचे प्राणी अथवा वनस्पती कसे होते याची कल्पना तर येतेच, शिवाय त्यांच्याच वर्गातील इतरांचा अभ्यास करून क्रमविकास कसा झाला असावा याचे अनुमान बांधता येते, म्हणून यांना ‘जिवंत जीवाश्म’ म्हणतात. दक्षिण भारतात आढळणारा] ⇨ पेरिपॅटस  हा प्राणी वलयी संघ (ॲनेलिडा) व संधिपाद संघ (आर्थ्रोपोडा) यांना जोडणारा दुवा मानतात [→ जोडणारे दुवे].

 (४) आकारविज्ञान : पृष्ठवंशी प्राण्यांत अवयवांच्या संरचनेचा आराखडा सर्वसामान्यपणे सारखाच असतो. अशा प्राण्यांत हात व पाय हे अवयव पोहणे, चालणे, पळणे, उड्या मारणे, हवेत उडणे अशा प्रकारची विविध कामे करीत असल्याने त्यांमध्ये बाह्यतः साम्य कमी दिसते, तथापि त्यांच्या अस्थीतंत्राचा (हाडांच्या सांगाड्याच्या रचनेचा) आराखडा सारखाच असतो. हे अवयव समजात [→ समजातता] असून सारख्याच पूर्वजांपासून क्रमविकास झाल्याचे द्योतक असतात. अशा प्राण्यांतील पचनादी तंत्रांच्या संरचनेतही किमान साम्य असलेला आराखडा आढळतो त्याचे समर्थन क्रमविकास गृहीत धरून करता येते. शारीरातील (शरीररचनेतील) उल्लेख करण्याजोगा आणखी महत्त्वाचा पुरावा म्हणजे  ⇨ अवशेषांगे  होत. प्राणी वा वनस्पती यांच्या शरीरात अविकसित वा ऱ्हसित व म्हणून अकार्यक्षम अशा काही संरचना आढळतात. त्या विद्यमान परिस्थितीत भारभूत असून अन्य पण संबंधित व्यक्तीत त्या पूर्ण विकसित व कार्यक्षम असतात त्यांच्या अस्तित्वाचे समर्थन क्रमविकासाच्या तत्त्वावर करता येते. पूर्वजांच्या शरीरात क्रमविकासाच्या तत्त्वावर विकसित झालेला अवयव काही वंशजांत परिस्थित्यनुरूप क्रमाने ऱ्हास पावत जाऊन अवशेषी रूपात शिल्लक राहतो. याची काही उदाहरणे : जंगली अवस्थेत केळीच्या पूर्वजांच्या बिया कार्यक्षम होत्या व आजही काहींत आहेत परंतु अनेक पिढ्यांपर्यंत त्यांच्या वंशजांची अभिवृद्धी (लागवड) खोडाच्या साहाय्याने होत गेल्याने बियांचा ऱ्हास होत जाऊन आता लागवडीत असलेल्या केळीच्या फळात बियांचे फक्त अवशेष आढळतात. कित्येक एकलिंगी फुलांत एकच लिंगाचे अवयव कार्यक्षम असून दुसऱ्याचे अवशेषी असतात उदा.,  ⇨पपई. मासे, बेडूक अशा जलीय प्राण्यांत व पक्ष्यांत डोळ्याचे संरक्षण निमेषक पटलाने (ज्याच्या हालचालीने डोळ्याचा पृष्ठभाग स्वच्छ राहतो अशा पटलाने) होते परंतु मनुष्याच्या डोळ्यात त्या कार्याच्या अभावी याचा फक्त अवशेष आढळतो. आवाजाच्या बाजूस किंवा उगमाकडे आपले कान (बाह्यकर्ण) वळविण्यास आवश्यक ते कार्यक्षम स्नायू गाई, घोडे, ससे वगैरे प्राण्यांच्या कानांजवळ आढळतात परंतु माणसांना त्याकरिता आपले कान तसे हालविता येत नाहीत, कारण संबंधित स्नायूंचा ऱ्हास झालेला आहे यावरून माणसाचे बाह्यकर्ण हे अवशेषांग ठरते. सशासारख्या तृणभक्षक प्राण्यात, सेल्युलोजाचे पचन करण्यास उपयुक्त असणारा बृहदांत्राचा (मोठ्या आतड्याचा) अंधनाल (एक टोकास बंद असलेली नळी किंवा पिशवी) हा भाग माणसात आंत्रपुच्छ (ॲपेंडिक्स) नावाने अवशेषी रूपात आढळतो तसेच माणसांना शेपूट नसून पुच्छास्थींच्या स्नायूंचे अवशेष असतात. माणसांच्या अंगावरील केस व अक्कलदाढा अवशेषी होण्याच्या मार्गावर आहे. प्राण्यांत अशी उदाहरणे अनेक असून त्यांवरून क्रमविकासाच्या सिद्धांताला आधार मिळतो.

(५) शरीरक्रियाविज्ञान: जीवांच्या शरीरातील रासायनिक विक्रिया आणि शरीरातील अंगोपांगांची रासायनिक संघटना यांच्या माहितीच्या आधारे क्रमविकासाच्या तत्त्वाला बळकटी येते. जीवांच्या जातीजातींमधील डीऑक्सिरिबोन्यूक्लिइक अम्लामध्ये (डीएनएमध्ये) काही फरक असला, तरी सर्वांच्या केंद्रकांत (पेशीतील कार्यांवर नियंत्रण ठेवणाऱ्या जटिल गोलसर पुंजांत) डीएनए असतेच तसेच पचन तंत्रात म्हणजे पचन संस्थेत (प्राण्यांच्या) काही फरक आढळले, तरी सर्वांमध्ये पचन तंत्राचे कार्य अन्नपचन व ऊर्जेची उत्पत्ती हे असून तेही विशिष्ट पद्धतीने केले जाते. भिन्न स्तनी प्राण्यांत अवक्षेपण (न विरघळणारा साका तयार करण्याच्या) पद्धतीचा वापर करून रक्तपरीक्षा केली, तर अवक्षेप जितका दाट (घन) तितके दोन जातींतील वा वंशांतील नाते अधिक, असा महत्त्वाचा निष्कर्ष त्यातून निघू शकतो. ह्याला क्रमविकासाच्या दृष्टीने महत्त्व आहे. यासंबंधी मनुष्य, कपी (एक प्रकारचे माकड) व घोडा यांवर केलेल्या प्रयोगांनी असे आढळून आले आहे की, स्तनी प्राण्यांत माणूस व कपी हे जवळचे आप्त असून क्रमविकासदृष्ट्या घोडा त्यांना काहीसा दूरचा आहे. प्राण्यांतील अन्योन्यसंबंध ओळखू येण्यास ही अवक्षेपण-परीक्षा उपयुक्त असून तिचा वापर करतात. यावरून असे दिसून येते की, क्रमविकासात प्राण्यांच्या रक्तात हळूहळू बदल होत आला असून अवक्षेपण-परीक्षा हा त्याचा प्रत्यक्ष पुरावा आहे. प्राण्यांच्या शरीरातील क्रिया योग्य रीतीने चालू राहण्यास अंतःस्रावी (वाहिनीहीन) ग्रंथी असून त्यांपासून निघालेली प्रवर्तके (हॉर्मोने म्हणजे रक्तात एकदम मिसळणारे उत्तेजक स्राव) शरीरात पसरवली जातात. यांचे कृत्रिम रीत्या दुसऱ्या प्राण्यांत अंतःक्षेपण केल्यास (शरीरात टोचल्यास) त्याची प्रतिक्रिया मूळच्या प्राण्यांतील शरीरक्रियेप्रमाणेच असते किंवा अनेकांच्या शरीरात सारखीच दिसते. उदा., पशूंमध्ये चयापचयाचे (शरीरात सतत होणाऱ्या भौतिक-रासायनिक बदलांचे) नियंत्रण करणारे अवटू ग्रंथीतील (घशाजवळील भागात असणाऱ्या ग्रंथीतील) प्रवर्तक इतर अनेक प्राण्यांना उपचारार्थ टोचले जाते आणि अपेक्षित परिणाम आढळतो. तसेच अनेक प्राण्यांतील पाचक एंझाइमे (जीवरासायनिक विक्रियांस मदत करणारे प्रथिनयुक्त पदार्थ) बहुतेकांच्या शरीरक्रियांमध्ये सारखीच परिणामकारक असतात.


(६) भ्रूणविज्ञान: (गर्भविज्ञान). प्राणी आणि वनस्पती यांच्या भ्रूणांच्या (किंवा गर्भांच्या) तुलनात्मक अभ्यासाने काढलेले निष्कर्ष क्रमविकासाच्या तत्त्वाला पोषक ठरले आहेत. ज्यांचा

 आ. १. पृष्ठवंशी प्राण्यांच्या भ्रूणविकासातील पूर्व व उत्तर अवस्थांची तुलना

क्रमविकास बराच अधिक झाला आहे, अशा जीवांच्या भ्रूणांच्या वाढीतील बहुतेक अवस्था सापेक्षतः कमी विकास झालेल्या जीवांच्या संरचनेशी तुल्य असतात, म्हणजेच अधिक विकास पावलेले जीव आपल्या भ्रूणावस्थेत अल्पविकसित जीवांसारख्या अवस्थेतून जातात हेकेल या शास्त्रज्ञांनी म्हटल्याप्रमाणे सामान्यतः‘व्यक्तिविकास हा जातिविकासाची संक्षिप्त आवृत्ती असते’, यालाच‘पुनरावर्तन सिद्धांत’ म्हणतात. उदा., ⇨ नेचाची वाढ होत असताना प्रथम एककोशिक बीजुक, त्यापासून अनेककोशिक शैवलासारखा तंतू, नंतर त्यापासून सपाट यकृतकाप्रमाणे (एका प्रकारच्या शेवाळ्याप्रमाणे, लिव्हरवर्टप्रमाणे) वाढलेला गंतुकधारी (बीजोत्पादक कोशिका असलेली वनस्पतीची पिढी) व पुढे एककोशिका रंदुकापासून (दोन प्रजोत्पादक कोशिकांच्या संयोगाने तयार झालेल्या भागापासून) अनेक कोशिक गर्भ इ. अवस्था आढळतात. यावरून अबीजी वनस्पतींच्या जातिविकासात एककोशिक,शैवले यांसारख्या साध्या अवस्था असाव्या म्हणजेच शैवालासारख्या पूर्वजांपासून क्रमाने शेवाळी, नेचे व तत्सम गट उगम पावले असावे [→ गर्भविज्ञान उपशीर्षक – वनस्पतींचा क्रमविकास] असे दिसते. प्राण्यांतही मासा, सॅलॅमँडर (उभयचर प्राणी), कासव, कोंबडी, डुक्कर, गाय, ससा व माणूस ह्यांचे भ्रूण प्रारंभिक अवस्थेत सारखे दिसतात (आ. १) [→ भ्रूणविज्ञान]. म्हणजेच माणसासारख्या विकसित प्राण्याचा भ्रूण त्याहून अविकसित अशा मत्स्यादी सर्व अवस्थांतून वाढत वाढत जातो किंवा त्याच्या वाढीचे उद्दिष्ट माणसाचा भ्रूण निर्माण करण्याचे असले, तरी त्यास मत्स्यादी कमी विकसित अवस्थांतून मार्गक्रमण करावे लागते, त्याचे कारण मनुष्य आपल्या जातीच्या क्रमविकासात त्याच्यापेक्षा कमी दर्जाच्या प्राण्यांच्या अवस्थेतून गेला असावा [→ पुनरावर्तन सिद्धांत].

(७) भौगोलिक प्रसार: काही वनस्पतींचा उगम व प्रसार विशिष्ट मर्यादित प्रदेशातच आढळतो. उदा., निलगिरी वृक्ष व त्यासारख्या जाती ऑस्ट्रेलियात तर बटाटा, तंबाखू व मका या जाती  अमेरिकेत तसेच कांगारू, किवी, प्लॅटिपस (बदकचोच्या) असे काही प्राणी ऑस्ट्रेलियात तर झिब्ऱ्यासारखे प्राणी आफ्रिकेत. याची कारणमीमांसा अशी की, फार प्राचीन काळी या आणि इतर जातींचे समान पूर्वज सर्वत्र सारखे पसरलेले होते परंतु पुढे केव्हा तरी सलग भूप्रदेश नवीन डोंगर, दऱ्या, समुद्र यांमुळे अलग पडले व खंड निर्माण झाले आणि कित्येक प्राणी व वनस्पती दुर्लंघ्य अडथळ्यांमुळे परस्परांपासून कायमचे दुरावले गेले. त्यानंतर प्रत्येक अलग भूप्रदेशावरचे जीव त्या त्या ठिकाणच्या बदलत्या हवामानादी परिस्थितीनुसार हळूहळू बदलत गेले व त्यांच्या नवीन जाती उद्‍भवल्या. क्रमविकासाभावी आज सर्वत्र सारखी पादपजात (वनस्पतींच्या जाती) व प्राणिजात आढळली असती परंतु तसे नसून भूपृष्ठावरच्या भिन्न प्रदेशांत निसर्गतः काही भिन्न प्राणी व वनस्पती आढळतात [→ प्राणिभूगोल]. गालॅपागस द्वीपावरील डार्विन फिंच हे पक्षी याचे चांगले उदाहरण आहे. तेथील सर्व फिंच पक्ष्यांचे पूर्वज बहुधा एकच असावे. यांपैकी काहींच्या चोची बिया फोडण्याकरिता मोठ्या असतात म्हणजे त्या पूर्वजांच्याप्रमाणे आहेत. काहींच्या चोची किडे खाण्यासाठी वॉर्बलराप्रमाणे तर इतर काहींच्या अळ्या खाण्यासाठी सुतार पक्ष्याच्या चोचीप्रमाणे रूपांतरित झालेल्या आढळतात म्हणजेच भौगोलिक विलगीकरणाने फिंचांत क्रमविकास झालेला दिसून येतो (आ. २).

आ.२. डार्विन फिंच पक्षी : (१) कीटकखाऊ, (२) दाणेखाऊ, (३) अळ्याखाऊ.(८) अनुकूली, समाभिरूपी व समांतर क्रमविकास: घोडा, गाय, वटवाघूळ, विविध पक्षी, देवमासा इ. पृष्ठवंशी प्राण्यांत मूलतः समान आराखडा असलेल्या अग्र पादांचे (पुढच्या पायांचे) कार्याच्या दृष्टीने रूपांतर झालेले दिसून येते (आ. ३) याला अनुकूली क्रमविकास म्हणतात [→ अनुकूलन]. परंतु पक्षी आणि पतंग यांचे पंख मूलतः भिन्न पण कार्याच्या दृष्टीने समानता दर्शवितात याला समाभिरूपी क्रमविकास म्हणतात कित्येक पृष्ठवंशी प्राण्यांत हा आढळतो (आ. ४) (वनस्पतींचा क्रमविकास हे उपशीर्षकही पहावे). खऱ्या अपरास्तनी (वार असलेल्या) छछुंदराप्रमाणे (मोलप्रमाणे) बिळे करण्यासाठी शिशुधानी (पिलाची वाढ जिच्यात पूर्ण होते अशी पिशवी मादीच्या उदरावर असलेल्या) प्राण्यांतील छछुंदरात झालेला पायातील बदल किंवा घोडा आणि हरीण यांत वेगाने पळण्यासाठी झालेले पायातील बदल यांना समांतर क्रमविकास म्हणतात.

वर दिलेल्या अनेक पुराव्यांचा साकल्याने विचार केल्यास क्रमविकास ही वस्तुस्थिती आहे. याबद्दल विचारवंतांत दुमत नाही तो प्रस्थापित सिद्धांत आहे. परंतु क्रमविकासाची पद्धत व यंत्रणा यांबद्दल मात्र काही जुन्या व काही नव्या उपपत्ती मांडल्या गेल्या आहेत त्यांसंबंधी पुढे विवरण केले आहे.


लामार्क या फ्रेंच शास्त्रज्ञांनी इ. स. १८०१ मध्ये पहिल्याने क्रमविकासासंबंधी आपली कल्पना पुढे मांडली तिला ‘संपादित लक्षणांचे अनुहरण’ असे म्हणता येईल. तीमध्ये त्यांनी जीवांभोवती असलेल्या परिस्थितीला प्राधान्य दिले होते. त्यांच्या मते प्राणी व वनस्पती परिस्थितिसापेक्ष गरजेनुसार आपल्या अवयवांचा कमीअधिक उपयोग करतात अगर कधी मुळीच करीत नाहीत. यामुळे त्या अवयवांत फरक घडून येतात इतकेच नव्हे, तर ⇨आनुवंशिकतेमुळे असे फरक संततीतही उतरतात व त्यामुळे क्रमविकास घडून येतो. काही अवयव खुरटत जाऊन त्यांचे अवशेष राहतात उदा., फार खोल पाण्यात सतत राहणाऱ्या काही प्राण्यांच्या नेत्रांचे अंशतः किंवा पूर्णतः ऱ्हसन झालेले आढळते कारण त्यांना डोळ्यांचा उपयोग करण्याची जरूरी भासली नाही तसेच सदैव (अनेक पिढ्या) रुक्ष प्रदेशातील जीवनाशी समरस होण्याकरिता प्राण्यांत आणि वनस्पतींत जे फरक घडून आले त्यांमुळेही क्रमविकास घडून आला व काही नवीन जाती उदयास आल्या. यामध्ये स्वसंपादित लक्षणांचे अनुहरण (एका पिढीतील आनुवंशिक लक्षणे पुढच्या पिढीत नेण्याचे कार्य) होते असे लामार्क यांनी गृहीत धरले. त्यांच्या विचारसरणीतील दोष अधिक विचार केल्याने व काही प्रयोगांनी दिसून आले. अपघाताने किंवा युद्धात ज्यांचे अवयव तुटून गेले आहेत त्यांच्या संततीत जन्मतः तेच दोष कधी आढळत नाहीत. चिनी स्त्रियांचे पाय लोखंडी बूट अनेक वर्षे वापरून लहान करण्याची प्रथा अनेक पिढ्या चालू आहे, म्हणून काही त्यांचे पाय कायमपणे (बुटाशिवाय) लहान झालेले नाहीत. हिंदू लोक शेकडो वर्षे आपल्या मुलांचे कान टोचतात, परंतु एकाही पिढीत कानाला भोक असलेले मूल जन्माला आलेले नाही. तीच गोष्ट मुसलमानांच्या सुंतेसंबंधी आहे. व्हाइसमान या शास्त्रज्ञांनी उंदरांच्या अनेक पिढ्यांमध्ये शेपूट तोडण्याचा प्रयत्न करून पाहिला, परंतु बिनशेपटीचा उंदीर कधीच जन्मास आला नाही. अशा उदाहरणांमुळे संपादित लक्षणांचे अनुहरण होत नाही हे सिद्ध झाले त्यामुळे लामार्क यांची उपपत्ती मागे पडली. तथापि अलीकडे ‘नवलामार्कवाद’ (नीओलामार्किझम) या नावाने त्यांच्या विचारसरणीतील ग्राह्य भाग (परिस्थितीचे महत्त्व) प्रस्थापित केला जात आहे. आनुवंशिकतेला जबाबदार असलेल्या कोशिकेच्या (पेशीच्या) केंद्रकातील घटकांवर (जनुकांवर म्हणजे आनुवंशिक लक्षणे निर्देशित करणाऱ्या एककांवर, जिनांवर) प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे बाह्य परिस्थितीचा जबर आघात झाला आणि त्यामुळे त्यात बदल घडून आला, तर अशा व्यक्तींच्या पुढील पिढीत काही भेद (परिवर्तने अगर उत्परिवर्तने) आढळतात, असा प्रायोगिक पुरावा असून हे भेद आनुवंशिकतेने पुढील पिढ्यांत उतरून नवीन जाती बनणे शक्य आहे पूर्वी काही झाल्या असतीलही. येथे भिन्न अर्थाने भेदांचे संपादन झाले असून त्यांचे अनुहरण होते असे म्हणण्यास हरकत नाही. लामार्क यांच्या उपपत्तीने अनुकूलनाचे समर्थन चांगले होते हे निर्विवाद.

प्रसिद्ध जीववैज्ञानिक चार्लस डार्विन यांनी १८५९ मध्ये क्रमविकासासंबंधीचा आपला ⇨नैसर्गिक निवडीचा सिद्धांत मांडला व त्याला आधारभूत असा विविध प्रकारचा भक्कम पुरावाही सादर केला. ‘नैसर्गिक निवड होऊन जातींची निर्मिती होते’ असे त्यांच्या सिद्धांताचे सूत्र असून काही निश्चित बाबींवर तो आधारलेला आहे. सृष्टीतील बहुतेक सर्व जातींत प्रजोत्पादन विपुलतेने आढळते व त्याचा परिणाम म्हणजे अमाप संख्यावाढ होते परंतु तितक्याच प्रमाणात जीवनावश्यक वस्तूंची वाढ होत नसल्याने जीवनार्थ स्पर्धा सुरू होते. एकाच जातीतील अनेक व्यक्तींत लहान मोठे भेद आढळतात. स्पर्धेमध्ये ज्या व्यक्तींत परिस्थितीनुसार उपयुक्त भेद असतात त्यांची सरशी होऊन इतर नाश पावतात व एकूण जीवांची संख्या सामान्यतः मर्यादेत राहते. यशस्वी स्पर्धकांच्या पुढील पिढीत काही व्यक्तींत तरी उपयुक्त भेद आनुवंशिकतेने उतरतात व त्या पिढीतही स्पर्धा व उपयुक्त भेदधारकांची सरशी होते असा प्रकार अनेक पिढ्या चालू राहिल्यानंतर त्या वंशजांत पूर्वजांशी तुलना करता नवीन उपयुक्त भेद प्रकर्षाने आढळल्याने नवजातींचा उदय झालेला आढळतो. या सर्व प्रक्रियेत योग्यतम किंवा लायक व्यक्तींची निसर्गाने निवड केलेली आढळते. मनुष्याने आपल्या फायद्याच्या दृष्टीने पाळीव प्राण्यांच्या जाती (उदा., घोडा, कुत्रा, दुभती जनावरे, शेळ्यामेंढ्या, कोंबड्या इ.) व पिकविण्यास योग्य अशा अनेक धान्यांच्या, फुलझाडांच्या, फळझाडांच्या व भाज्यांच्या जाती प्रजननाने (पैदाशीने), संकराने (दोन भिन्न जातींच्या संयोगाने) व निवडीने बनविल्या त्याप्रमाणे निसर्गातही याच प्रकारे नवीन जातींची निर्मिती झाली असावी, असे डार्विन यांनी मानले होते. सकृद्दर्शनी डार्विन यांचा सिद्धांत स्वीकरणीय वाटल्याने त्याचे स्वागत झाले कारण त्याला वस्तुस्थितीचा आधार होताच, शिवाय अनेक अनुभवसिद्ध बाबी आणि स्वतः निरीक्षण करून मांडलेल्या घटना यांचा पुरावा होता. या सिद्धांताचा ज्ञानाच्या इतर क्षेत्रांतही प्रभाव पडला. तथापि जीवविज्ञानाच्या क्षेत्रांत वनस्पती व प्राणी यांचा जसजसा अधिक अभ्यास होऊ लागला तसतसे डार्विन यांच्या सिद्धांतातील अपूर्णता व काही दोष दिसून येऊ लागले. विशेषतः त्यांनी गृहीत धरलेले लहान भेद (परिवर्तने) व त्यांचे अनुहरण यांबद्दल शंका उपस्थित केल्या गेल्या. लहान भेदांना जीवनकलहात अतिजीवितामूल्य (टिकून राहण्याची क्षमता) कितपत असते, सर्वच असे भेद आनुवंशिक असतात किंवा कसे, हे भेद कसे उत्पन्न झाले, लहान भेदांनी क्रमविकास झाला असल्यास असे असंख्य भेदधारक जीवाश्मांच्या रूपात का आढळत नाहीत, काही भेद स्वसंपादित असल्याने त्यांचे अनुहरण कसे गृहीत धरता येईल इ. अनेक प्रश्नांना उत्तरे देणे सोपे नव्हते, कारण भेदांचा उगम आणि आनुवंशिकता यांसंबंधीच्या कल्पना त्यावेळी स्पष्ट नव्हत्या.

डार्विननंतर बऱ्‍याच वर्षांनी म्हणजे १९०० साली  ग्रेगोर मेंडेल या ऑस्ट्रियन धर्मोपदेशकांनी सु. ३४ वर्षांपूर्वी प्रसिद्ध केलेल्या वाटाण्याच्या आनुवंशिकतेवरील प्रबंधाचा जणू पुन्हा शोध लागला. ऑस्ट्रियातील चेर्‌माक, जर्मनीतील कॉरेन्स व हॉलंडमधील ह्यूगो द व्ह्‌रीस या तिघांनी मेंडेल यांच्या शोधातील आनुवंशिकतेचे नियम स्वतंत्रपणे शोधून काढले व शास्त्रज्ञमंडळापुढे ठेवले. या शोधामुळे आ.३. अनुकूली क्रमविकास (प्राणी) : पंचांगुली रूपांतरआ.३. अनुकूली क्रमविकास (प्राणी) : पंचांगुली अग्रपादांचे रूपांतर

पितरांची लक्षणे संततीत कशी उतरतात, कधी एका पिढीत प्रसुप्त राहून दुसरीत प्रकट होतात, तर कधी ती अंशतः उतरलेली दिसतात इत्यादींसंबंधीची काहीशी निश्चित कल्पना येण्यास बरीच मदत झाली. डार्विन यांचा मुख्य भर लहान भेदांवर होता आणि त्यांचे जीवनकलहातील अतिजीवितामूल्य शंकास्पद ठरले होतेत्याचे निवारण आता झाले. १९०१ साली ह्यूगो द व्ह्‌रीस यांनी ईव्हिनिंग प्रिमरोज (इनोथेरा रोजिया) या फुलझाडासंबंधीच्या प्रयोगावरून असे सुचविले की, क्रमविकासात मोठ्या भेदांना अतिजीवितामूल्य असून त्यांचा नैसर्गिक निवडीत उपयोग केला जातो व त्यामुळे क्रमविकास घडून येतो. त्यानंतरच्या काळात मॉर्गन व इतर शास्त्रज्ञांनी ⇨ ड्रॉसोफिला  माश्यांवर व इतर काही प्राण्यांवर प्रयोग करून यातील सत्यता पटवून दिलीइतकेच नव्हे, तर सर्वच आनुवंशिक लक्षणांचे अधिष्ठान प्रजोत्पादक कोशिकांच्या केंद्रकातील गुणसूत्रे (आनुवंशिक लक्षणे एका पिढीतून पुढच्या पिढीत नेणारे सुतासारखे सूक्ष्म घटक) व त्यांतील जनुके यांमध्ये असते, म्हणजेच केंद्रक हा अनुहरणाचा भौतिक आधार असतो हे सिद्ध केले.

आ. ४. समाभिरूपी क्रमविकास (प्राणी) : भिन्न कुलांतील हे पृष्ठवंशी प्राणी सारख्या परिस्थितीत विकास पावल्याने त्यांच्या बाह्यस्वरूपात सारखेपणा बराच आढळतो.

या सर्व माहितीमुळे क्रमविकासाच्या यंत्रणेची स्पष्ट कल्पना येऊ लागली. क्रमविकास हा उत्परिवर्तने (विशेष प्रकारचे मोठे भेद) व नैसर्गिक निवड यांवर अवलंबून असतो, हे नवडार्विनवादाचे (नीओडार्विनिझमाचे) सूत्र मान्य झाले असून उत्परिवर्तनांचा उगम बहुतांशी प्रत्येक कोशिकेच्या केंद्रकातील जननिक सामग्रीत असतो व परिस्थितीसापेक्ष त्यांचा आविष्कार व्यक्तीत होत असतो [→ आनुवंशिकी], हेही सर्वमान्य झाले आहे. केंद्रकातील डीएनए व आरएनए (रिबोन्यूक्लिइक अम्ल) यांसारखी द्रव्ये, त्यांची जीवरासायनिक संघटना, त्यांत होणारे बदल व व्यक्तीतील लक्षणांवर त्यांचे होणारे परिणाम यांसंबंधी जसजसे संशोधन वाढेल तसतशी क्रमविकासाची यंत्रणाही सुस्पष्ट होईल. हरगोविंद खोराना या भारतीय-अमेरिकन शास्त्रज्ञांनी यासंबंधी महत्त्वाचे काही संशोधन केले आहे [→ उत्परिवर्तनजीवाश्मनियतविकास].

 परांजपे, स. य.


प्राण्यांचा क्रमविकास

पृथ्वीवरील सजीव सृष्टीत प्राणी आणि वनस्पती अशा सामान्यपणे ओळखल्या जाणाऱ्‍या जीवांचा अंतर्भाव होतो. पृथ्वीच्या निर्मितीनंतर अनेक वर्षांनी प्रथम अत्यंत अप्रभेदित असे जीवद्रव्य निर्माण झाले [→ जीवोत्पत्तिनवजीवजनन]व कालपरत्वे त्याचेच रूपांतर पुढे साध्या जीवघटकांत आणि त्यानंतर साध्या सूक्ष्म वनस्पती व सूक्ष्म प्राणी यांत झाले. त्यातून पुढे प्रभेदित व लहानमोठे प्राणी आणि तशाच प्रभेदित वनस्पती निर्माण झाल्या. हे सर्व जीव एककोशिक किंवा अनेककोशिक असतात. वनस्पतींना अन्ननिर्मिती करता येते, परंतु प्राण्यांना ती क्षमता नसतेहा या दोन्हींत मोठा फरक आहे. अशा सर्व जीवांचा क्रमाने विकास पावलेला असा एक मोठा गट (प्राणिकोटी) असून त्याचा उगम व विकास   ⇨ प्रोटोझोआ (आदिजीव संघ) या एककोशिक (काहींच्या मते अकोशिक) आणि अत्यंत साध्या व सूक्ष्म प्राण्यांपासून झाला आहेतसेच तो परस्परांसारख्या अनेक कोशिकांपासून बनलेल्या निवहावस्थेतून [वसाहत करून राहण्याच्या अवस्थेतून, → निवह प्राणि] मेटॅझोआ (अनुजीव संघ) या वरच्या दर्जाच्या अनेककोशिक आणि प्रभेदित प्राण्यांपर्यंत पोहोचला आहे. निवह प्राण्यांचा अंतर्भाव आदिजीवांत होतोमात्र त्यांच्या अनेककोशिकायुक्त शरीरात प्रभेदन नसते. प्राण्यांच्या क्रमविकासासंबंधीचे निष्कर्ष त्यांच्या जीवाश्मांच्या अभ्यासावरून काढले आहेतप्राणिविज्ञानाची ती एक स्वतंत्र शाखा आहे [→ पुराप्राणिविज्ञान].

 प्रोटोझोआंपैकी फ्लॅजेलेटा (कशाभिकायुक्त म्हणजे चाबकाच्या दोरीसारखी किंवा वादीसारखी संरचना असलेले सूक्ष्मजीव) हा जीवांचा एक मूलभूत संच असून इतर सर्व प्राणी व वनस्पती त्यापासून क्रमाने विकास पावले आहेत असे मानतात. यांपैकी प्रकाशसंश्लेषण (प्रकाशीय ऊर्जेचा उपयोग करून कार्बन डाय-ऑक्साइड व पाणी यांच्यापासून साध्या कार्बोहायड्रेटांची निर्मिती) करणारे रंगद्रव्ययुक्त आणि त्यांच्याशी निकटवर्ती असलेले रंगद्रव्यहीन असे काही ⇨ यूग्लीनासारखे जीव आणि डायनोफ्लॅजेलेटा असे सर्व कशाभिकायुक्त सूक्ष्मजीव वनस्पतींत गणले जातातपरंतु प्राणिवैज्ञानिकांच्या मते हे सर्व जीव व तत्सम पण जीवोपजीवी (दुसऱ्या जीवांवर जगणारे) आणि मोठे रंगद्रव्यहीन कोएनोफ्लॅजेलेटा यांचाही समावेश प्राण्यांत होतो. आदिजीवांत कशाभिकायुक्त असे ⇨ मॅस्टिगोफोरा, ⇨ अमीबासारखे सार्कोडिना, ⇨ ऱ्हायझोपोडा, जीवोपजीवी ⇨ स्पोरोझोआ, जटिला संरचनेचे ⇨ सिलिओफोरा  इत्यादींचा समावेश होतो परंतु शेवटच्या तिन्हींपैकी एकाचाही इतर कोणाशी प्रत्यक्ष आप्तसंबंध दिसत नाही. मॅस्टिगोफोरा ह्या संकीर्ण कशाभिकायुक्तांचे अन्न निर्मितीचे सामर्थ्य अलग अलगपणे नाहीसे झाले असावे. सार्कोडिनांचा उदय अनेकदा भिन्न वेळी कशाभिकायुक्तांपासून झाला असावा. ⇨ सिलिएटांचा उगम एकदाच झाला आहे. स्पोरोझोआ हा संकीर्ण गट असून काहींचे आप्तभाव कशाभिकायुक्तांशी व काहींचे सार्कोडिनांशी असावे ते   ⇨ कवकापासूनही (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित सूक्ष्म वनस्पतीपासूनही) आले असणे शक्य आहे. ⇨ पक्ष्माभिका (हालचाल करण्यास वा द्रव पदार्थात प्रवाह उत्पन्न करणास उपयुक्त असणाऱ्या केसासारख्या वाढी) व ⇨ कशाभिका  यांची संरचना बव्हंशी सारखीच असून कशाभिकांपासून पक्ष्माभिकांचा क्रमविकास झालेला आहे. इतर कित्येक सजीवांत आढळणाऱ्या पक्ष्माभिकायुक्त किंवा कशाभिकायुक्त प्रजोत्पादक कोशिका (पुं-गंतुक, शुक्राणू) हे त्यांच्या कशाभिकायुक्त पूर्वज परंपरेचे द्योतक गणले जाते. आदिजीवांपैकी ⇨ फोरॅमिनीफेरा  आणि  ⇨ रेडिओलॅरिया  कँब्रियन-पूर्व (सु. दोनशे कोटी वर्षांपूर्वी) काळापासून पृथ्वीवर असावे असा प्रत्यक्ष पुरावा आहे.

मेटॅझोआंचा (अनुजीवांचा) उगम : सर्व प्राणी आदिजीवांपासून क्रमाने विकास पावले आहेत, हे प्रथम सांगितले आहे. आदिजीवांपासून अनुजीव दोन मार्गांनी निर्माण झाले असावे अनेक केंद्रक असलेल्या कोशिकेत आडपडद्यांची निर्मिती होऊन किंवा अनेक नित्य कोशिकांच्या निवहापासून पुराव्याभावी पहिल्यापेक्षा दुसरा मार्ग अनेकांना मान्य आहे. या निवहाच्या अनेक प्रकारांपैकी गोळ्यासारखा वाटोळा प्रकार अधिक सूचक असून कशाभिकायुक्तांत तसे निवह प्राणी आढळतात त्यांपासून अनुजीव उगम पावले असणे शक्य आहे. लँकेस्टर यांच्या मते सिन्यूरा किंवा पँडोरीना यासारख्या भरीव निवह पूर्वजांपासून क्रमविकासास सुरुवात झाली असावी एर्न्स्ट हेकेल यांना व्हॉल्व्हॉक्सासारख्या पोकळ व कोशिकांच्या एकाच थराने बनलेल्या पूर्वजापासून आरंभ झाला असावा असे वाटले. दोघांनीही कशाभिकायुक्त पूर्वज मान्य करण्याचे कारण तो गट सर्वांत लवचिक असून त्यामध्ये आटोपशीर निवह निर्मितीची प्रवृत्ती आढळते. या निवहांचे अनुजीवांच्या भ्रूणविकासातील अवस्थांशी साम्य दिसते. काहींत तर या निवहांना अग्रध्रुव, अग्रपश्च अक्ष, जीवकांत (निवहातील व्यक्तिगत जीवांत) अक्षसंबंधित शारीरविषयक फरक आणि पश्चध्रुवीय भागातील कोशिकांद्वारे होणारे प्रजोत्पादन ही लक्षणे आढळतात. सर्वांत प्रारंभिक अशा ⇨ पोरिफेरात (छिद्री संघात) कशाभिकायुक्त डिंभ (भ्रूणानंतरची स्वतंत्रपणे अन्न मिळवून जगणारी व प्रौढाशी साम्य नसलेली सामान्यतः क्रियाशील पूर्व अवस्था) आणि ग्रैव (कशाभिकेच्या तळाभोवती नसराळ्याच्या आकाराचे कडे असलेल्या) कोशिका असतात : ⇨ सीलेंटेरेटात (आंतरगुही संघात) अंतःस्तरात कशाभिकांच्या निर्मितीची प्रवृत्ती असते. काही कशाभिकायुक्तांत अनुजीवांतल्याप्रमाणे सामान्य कशाभिकायुक्त आदिजीवात फरक पडून लैंगिक कोशिकांचे प्रभेदन होते. अशा रीतीने विकास पावलेला शुक्राणू सर्व अनुजीवांत आढळतो व तो अनुजीवांच्या पूर्वजपरंपरेचे द्योतक ठरतो.

 वर सांगितलेल्या अनुजीवांच्या समान पूर्वजांबद्दलचे हेकेल यांचे मत अनेकांना मान्य आहे. त्यांनी या गृहीत पूर्वजाला ‘ब्लास्टिया’ हे नाव दिले असून अनुजीवांच्या भ्रूण विकासातील ब्लास्टूलाशी (फलित अंड्याच्या विदलनाने उत्पन्न झालेल्या व सामान्यतः कोशिकांच्या एकाच थराची भित्ती असलेल्या पोकळ गोलाशी म्हणजे एक भित्तीकेशी किंवा कोरककंदुकाशी) त्याचे साम्य लक्षात घेतले आहे. अशा जीवांच्या प्रभेदनांतील पहिला टप्पा म्हणजे काही कोशिकांचे लैंगिक विशेषीकरण. हेकेल यांनी निश्चित केलेल्या व्हॉल्व्हॉक्सामध्ये व अनेक प्राण्यांत असे सत्वर प्रभेदन आजही आढळते. सर्वांत साधे अनुजीवसुद्धा दोन थरांचे (द्विस्तर) असल्याने कोरककंदुकाच्या पुढच्या विकासाचा टप्पा म्हणजे पचनकार्याकरिता अंतःस्तराची निर्मिती. हक्सली यांनी १८४९ साली प्रारंभिक अनुजीव दोन थरांचे असतात हे दाखविले व आल्मन यांनी १८५३ साली त्याला दुजोरा दिला आणि त्या थरांकरिता बाह्यस्तर आणि अंतःस्तर या अर्थाच्या संज्ञा प्रचारात आणल्या. ब्लास्टियाच्या कशाभिकायुक्त कोशिकांना गती देणे, अवगमन, अन्नसंपादन व अन्नपचन अशी कार्ये करणे आवश्यक होते. एका थराच्या अवस्थेतून द्विस्तर अवस्थेत होणाऱ्या बदलामध्ये गती देणे व पचन ही कार्ये विभागणे फायद्याचे होते. लँकेस्टर यांच्या मते घनरूप गोळ्याच्या (युक्तुताच्या, मोरुलाच्या) कोशिकांतून बाहेरून घेतलेले अन्न आत पोहोचते व पुढे त्यांच्या विभागणीने बनलेला अंतःस्तर पचनाला कार्यक्षम होतो. या गोळ्याला कालपरत्वे तोंड व पचनकोटर असे अवयव तयार होतील, अशी निर्मिती प्रत्यक्षपणे फारच क्वचित आढळते म्हणून ही कल्पना स्वीकृत झाली नाही. बहुतेकांच्या मते ब्लास्टियाच्या पश्च भागातील कोशिकांचे अन्नसंपादनाकरिता विशेषीकरण झाले कारण तो जीव जमिनीसरपट पोहून अन्नसंपादन करी किंवा कशाभिकांच्या माऱ्याने पश्च ध्रुवाकडे अन्न लोटून दिले जाई. पश्चध्रुवाकडील कोशिका पचनक्षम आहेत, असे गृहीत धरून हेकेल यांनी कोरककंदुकाचे रूपांतर द्विस्तर जीवांमध्ये झाले असावे असे प्रतिपादिले त्यामध्ये पश्चभागार्ध पुरोभागार्धात अंतर्वलनाने समाविष्ट झाला व परिणामी पेल्यासारखा प्राणी बनला. अंतःस्तराने वेढलेल्या पोकळीस प्रारंभिक आंत्र व त्याच्या बाहेरील द्वारास प्रारंभिक मुख अशी नावे देण्यात आली पुढे लँकेस्टर यांनी दिलेली आद्यांत्र व कोरकरंध्र या अर्थाची लॅटिन नावे रूढ झाली.


 हेकेल यांनी या गृहीत द्विस्तर जीवाला ‘गॅस्ट्रिया’ (स्यूतिभ्रूण) हे नाव दिले व आपला गॅस्ट्रिया सिद्धांत पुढे मांडला त्या अन्वये सर्व अनुजीवांचा उगम ह्या आद्य समान पूर्वजापासून झाला असून त्यांच्या भ्रूणविकासात तो गॅस्ट्रूला या नावे ओळखला जातो. याचे दोन्ही स्तर (बाह्यस्तर व अंतःस्तर) सर्व अनुजीवांत आढळतात व त्यांपैकी अंतःस्तर हा मूलतः अंतर्वलनाने बनतो इतर प्रकार त्याचेच दुय्यम रूपांतरित प्रकार होत. हेकेल यांच्या या कल्पनेला प्रथम बराच विरोध झाला. मेशनिकॉव्ह यांचे असे मत पडले की, खालच्या दर्जाच्या अनुजीवांत जर अंतःकोशिकीय किंवा भक्षिकोशिकीय (सूक्ष्मजीव व इतर कोशिका आणि बाह्य पदार्थ पचविण्याची क्षमता असलेल्या कोशिकांद्वारे होणारे) पोषण आढळते, तर त्यांच्या पूर्वजाला पोषणनलिका किंवा मुख आवश्यक नव्हते. ब्लास्टियाच्या काही कोशिका भक्षिकोशिकीय प्रवृत्तीमुळे त्याच्या पोकळीत मुक्त संचार करतील, ती आदिजीवसदृश कोशिका आणि पिच्छिलद्रव्य (बुळबुळीत द्रव्य) यांमुळे भरून जाईल, याप्रकारे तो अनुजीव पूर्वज घन गॅस्ट्रूला बनेल. लँकेस्टर व मेशनिकॉव्ह यांचे या घनरूप द्विस्तर पूर्वजाबद्दल एकमत झाले पुढे यात पोकळी निर्माण होऊन आंत्रकोटर बनणे व त्याला छिद्र पाडून कोरकरंध्र बनणे या दुय्यम प्रक्रिया होत. प्रोटेरोस्पाँजिया ह्या आदिजीवाच्या शोधामुळे मेशनिकॉव्ह यांच्या उपपत्तीस आधार मिळाला कारण या प्राण्यांत पिच्छिल निवहातील ग्रैव कोशिका अनेकदा अमीबासारख्या रूपाने त्या पिच्छिलद्रव्यात भ्रमण करतात. हेकेल यांच्या गॅस्ट्रिया सिद्धांताला मिळालेल्या मान्यतेमुळे त्याचा वापर अध्ययन-अध्यापनात सर्रास होऊ लागला, कारण त्यामुळे प्राण्यांचा व्यक्तिविकास व जातिविकास समजणे सोपे गेले तसेच अनुजीवांच्या जटिल संरचनेतील भिन्नभिन्न अवस्थांच्या विकासाचा उलगडा होऊ लागला, परंतु या सिद्धांतात एक प्रमुख दोषही आढळून आला. अनुजीवांच्या भ्रूणविकासात अंतःस्तराची निर्मिती फक्त अंतर्वलनानेच होते असे नसून इतर प्रकारेही होते गृहीत गॅस्ट्रियाच्या अगदी निकटवर्ती असलेल्या आंतरगुही संघातच तो अंतःस्तर अनेकदा बाह्यस्तरातील काही कोशिकांच्या अंतर्भ्रमणामुळे बनतो आणि त्यांचा डिंभ गॅस्ट्रूलासारखा नसून घन किंवा भरीव गोळा असतो. याप्रमाणे वस्तुस्थिती हेकेल यांच्या सिद्धांताविरुद्ध जाते, इतकेच नव्हे, तर हा गोळा बनण्याची प्रक्रिया अधिक नैसर्गिक व शक्य मानली जाते. या सर्व विवेचनावरून अनुजीवांचा उगम एका अक्षयुक्त पोकळ, गोलसर व कशाभिकायुक्त निवहापासून झाला असावा त्यामध्ये प्रथम शरीरकोशिका व प्रजोत्पादक कोशिका असे प्रभेदन झाले व नंतर गतिशील अवगामी आणि त्यात भ्रमण करणारे पोषक कोशिकाप्रकार असे झाले. ह्या घन व त्रिमितीय गॅस्ट्रूलाचे पोषण बाह्यस्तरातील कोशिकांनी आदिजीवांप्रमाणे घेतलेले अन्न आतील कोशिकांकडे पाठविल्यामुळे झाले तसेच कोटरात सोडून दिलेल्या प्रजोत्पादक कोशिकांनाही त्याच प्रकारे अन्न मिळाले. ही पोषणपद्धती आजही काही खालच्या पातळीतील अनुजीवांत आढळते. या काल्पनिक (गृहीतकीय) निवह-पूर्वजाच्या अग्रध्रुवावर बहुधा संवेदी (ज्यांच्या अंगी उत्तेजने ग्रहण करण्याची क्षमता असते अशा) कोशिका असाव्या किंवा संवेदी पक्ष्माभिकांचा झुपका असावा. आंतरगुही व पृथुकृमी (चपटे शरीर असलेले कृमी, प्लॅटिहेल्मिंथ) प्राण्यांचा आद्यपूर्वज असाच एक जीव असावा असे मानण्यास हरकत नाही. छिद्री संघ, आंतरगुही संघ (सीलेंटेरेटा, निडॅरिया) आणि कंकती संघ [→टिनोफोरा] हे सर्वांत खालच्या दर्जाचे अनुजीव संघ गॅस्ट्रूलासारख्या संरचनेच्या पातळीवरच राहिले असावे आणि ते द्विस्तर असावे असे म्हणतात, परंतु त्याबद्दल एकमत नाही. आंतरगुहींपैकी फक्त ⇨ हायड्रोझोआ  तसे आहेत.

पोरिफेरा : (छिद्री संघ). मागे उल्लेख केलेल्या कशाभिकायुक्त निवह प्राण्यांपासून प्रभेदित अनेककोशिक प्राण्यांचा उगम झाला. त्याचवेळी सापेक्षतः कमी प्रभेदन दर्शविणाऱ्या अनेककोशिक छिद्री प्राण्यांचा स्वतंत्रपणे उगम होऊन पुढे तो गट विकास पावला. इतर अनुजीवांचा क्रमविकास स्वतंत्र विकासमार्गाने झाला म्हणून स्पंजांना पॅराझोआ असे स्वतंत्र संघनाम दिले गेले आहे. त्यांचा उगम कोणत्याही प्रारूपिक (नमुनेदार) आदिजीवांशी संबंध नसलेल्या व एका विशिष्ट प्रकारच्या ग्रैव कशाभिकायुक्त प्राण्यांपासून [कोएनोफ्लॅजेलेट, → प्रोटोझोआ] झाला असावा. त्यांचे पोषण अंतःकोशिकी प्रकारचे (आदिजीवीप्रमाणे) असते. काही प्राणि वैज्ञानिकांच्या मते छिद्री प्राण्यांच्या डिंभाभोवती ग्रैव कोशिकांचा अभाव असून साध्या कशाभिकायुक्त कोशिका असतात त्यामुळे या प्राण्यांचे पूर्वज सामान्य कशाभिकायुक्त संचापैकी असावे. छिद्री संघ ही क्रमविकासी वृक्षाची एक कुंठित शाखा मानली जाते, कारण त्या प्राण्यांपासून पुढे कोणताही प्राणि-गट विकास पावलेला नाही. स्पंजांत आढळणाऱ्‍या कंटिकांच्या (लहान काट्यांच्या) अवशेषांवरून पृथ्वीवर त्यांचे अस्तित्व कँब्रियन कल्पापासून आजतागायत (म्हणजे सु. ५० कोटी वर्षे) आहे हे स्पष्ट दिसते.

मेसोझोआ : सर्वसाधारणतः अनुजीव प्राण्यांत गणल्या गेलेल्या परंतु प्रारंभिक आणि ज्यांचे स्थान काहीसे विवाद्य आहे असे प्राणी म्हणजे  ⇨ मेसोझोआ (मध्यजीव संघ) होत. यांचा समावेश काहींनी कृमीत केलेला आढळतो हे जीवोपजीवी व कृमीसारखे प्राणी काही अपृष्ठवंशींच्या देहगुहेत (शरीराच्या पोकळीत) आढळतात (उदा., ऑक्टोपसाच्या मूत्रपिंडात). अनुजीव संघातील प्राण्यांत सर्वांत साधी संरचना यांमध्ये आढळते. यांचा बाह्यस्तर पक्ष्माभिकायुक्त असून आतील प्रजोत्पादक कोशिकांभोवती अनेक केंद्रकयुक्त प्राकल असते. बाह्यस्तरातील कोशिकांत अंतःकोशिकीय पचन आढळते. या गटात लैंगिक व अलैंगिक प्रजोत्पादन आणि ⇨ पिढ्यांचे एकांतरण  आढळते व त्याची तुलना स्पोरोझोआ या आदिजीवांशी करता येते. संरचनेच्या दृष्टीने या प्राण्यांना खरा अंतःस्तर नसतो त्यामुळे त्यांचा समावेश गॅस्ट्रूलासारख्या द्विस्तर प्राण्यांच्या पातळीत करणे अशक्य आहे. आपल्या क्रमविकासात ते त्रिमितीय कोरककंदुकाच्या अवस्थेतच थांबले आहेत. यांचा उगम प्रत्यक्षपणे आदिजीवांपासून झाला असावा किंवा  ते अत्यंत ऱ्हसित असे पृथुकृमी असावे, असा अंदाज व्यक्त केला गेला आहे. आंतरगुही प्राण्यांपेक्षा त्यांची संरचना कमी दर्जाची असल्याने त्यांचे स्थान आदिजीव संघ व छिद्री संघ यांच्या मध्ये येते. तज्ञांच्या मते त्यांची लक्षणे मुख्यतः प्रारंभिक स्वरूपाची (ऱ्हसित नव्हे) आहेत. हार्टमान यांनी या गटाला वर्ग (मोरुलॉइडी) मानून दोन गणांत त्याची विभागणी केली आहे.

छिद्री संघाच्या स्वतंत्र विकासमार्गामुळे साहजिकच उरलेल्या अनुजीवांचा स्वतंत्रपणे दुसऱ्या विकास मार्गाने क्रमविकास झाला. या गटाला सत्य-अनुजीव संघ (यूमेटॅझोआ) असे म्हणतात. त्यातील प्राणी अनेककोशिक परंतु अधिक प्रभेदित संरचना असलेले आढळतात. हा मोठा गट खरे संघीय एकक असून त्याच्या उगमाजवळच आंतरगुही संघ या सापेक्षतः कमी दर्जाच्या प्राण्यांच्या गटाचे स्थान आहे. यामध्ये हायड्रोझोआ या लहान गटाचा समावेश आहे. कंकती संघ या संबंधित गटाचा उगम त्यांच्या जवळच असावा. आंतरगुहीतील विद्यमान प्राण्यांत दंशकोशिकायुक्त प्रभेदन आढळते, परंतु प्रारंभिक सत्य-अनुजीवांत बहुधा त्यांचा अभाव असावा.


सीलेंटेरेटा (आंतरगुही संघ) व टिनोफोरा (कंकती संघ) : सागरी प्राणिप्लवकांत (पाण्यात तरंगत राहणाऱ्या प्राण्यांत) सामान्यपणे वावरणारे हे प्राणी अनेक प्रकारचे, फारसे क्रियाशील नसलेले व तरंगणारे असून पाण्याच्या नैसर्गिक हालचालीने त्यांचे स्थानांतरण घडून येते. काही प्राणी गोड्या पाण्यात आढळतात. प्लवकात आढळणारे मोठे अनुजीव प्राणी म्हणजे ‘जेलीफीश’. यांचा अंतर्भाव आंतरगुही व कंकती या संघांत केला जातो. आंतरगुही जेलीफीश प्राण्यांना अनेक संस्पर्शक असून त्यांवर दंशकोशिका असतात व हे छत्रीसारखे प्राणी (छत्रिक) स्नायूंच्या आकुंचन-प्रसरणाने पोहतात. याशिवाय नळीसारखे शरीर (पॉलिप) असलेले प्राणीही यात अंतर्भूत आहेतते कधीकधी स्थानबद्ध राहतात (उदा., हायड्रा).  काही प्राण्यांत दोन्ही प्रकारचे शरीर असते. (उदा., फायसॅलिस). समुद्रपुष्प व प्रवाळ यांमध्ये पॉलिप प्रकारचे शरीर असते. प्रारंभिक शरीर छत्रिक की पॉलिप याबद्दल एकमत नाही. कंकती प्राण्यांचे शरीर पारदर्शक, वाटोळे किंवा लांबट असते या प्राण्यांना फक्त दोनच संस्पर्शक असून त्यांवर चिकटण्याकरिता आसंजक (चिकटणाऱ्‍या) कोशिका असतातहे प्राणी फण्यांसारख्या अवयवांच्या साहाय्याने हालचाल करतातप्रत्येक फणी (कंकती) अनेक संलग्न पक्ष्माभिकांची बनलेली असते त्यामुळे हे प्राणी वर-खाली मंदपणे हालतात. काही जाती समुद्रतळावर सरपटतात.

दोन्ही संघांतील प्राण्यांच्या शरीरावर एक बाह्यस्तर, आतील पोकळीभोवती (आद्यांत्र) अंतःस्तर आणि दोन्ही थरांमध्ये मध्यश्लेष्मतर (बुळबुळीत पदार्थयुक्त स्तर) असतो. यांना प्रारंभिक तंत्रिका तंत्र (मज्जासंस्था) असते (छिद्री प्राण्यांत ते नसते). हे प्राणी इतर लहान प्राण्यांवर (कृमी, कवचधारी प्राणी, डिंभ, मासे इत्यादींवर) उपजीविका करताततसेच शरीरावयवांची दुरुस्ती किंवा तुटून गेलेल्या भागांचे पुनर्जनन व आकारनियमन करतात. त्यांचे प्रजोत्पादन जनन ग्रंथीत बनलेल्या लैंगिक कोशिकांद्वारे होते. त्यांना मध्यस्तर व उत्सर्जक (निरुपयोगी द्रव्ये बाहेर टाकणारे) अवयव नसतात.

आंतरगुही व कंकती संघांतील प्राणी प्रारंभिक आहेत हे निर्विवादतसेच त्यांमध्ये अरीय सममिती (त्रिज्येच्या दिशेने शरीराचे सारखे भाग होणारी रचना) असते. सत्य-अनुजीव प्राण्यांच्या उगमाजवळच आंतरगुही व कंकती संघांचे स्थान आहे. म्हणजेच या तिन्हींचे पूर्वज समान होतेबहुधा ते पूर्वज द्विस्तर व साध्या कशाभिकायुक्त पण आदिजीवांच्या पातळीपेक्षा  बरेच प्रगत असावे. नीफ यांच्या मते हे पूर्वज (मेटॅगॅस्ट्रिया) लहान, गोलसर, तलनिर्वाही व पक्ष्माभिकायुक्त असून त्यांना तोंड, आद्यांत्र व अपमुख (तोंडाच्या खाली) संवेदी अवयव असावे. हायमान यांच्या मते कंकती प्राणी आंतरगुही प्राण्यांपेक्षा अधिक प्रगत व वरच्या दर्जाचे आहेत कारण त्यांना अधिक निश्चित पचन तंत्र, अपमुख संवेदी प्रदेश व मध्यश्लेष्मस्तरात स्नायुकोशिका असतात. आंतरगुही संघ व कंकती संघ समान पूर्वजांपासून उगम पावल्यानंतर पुढे त्यांचा क्रमविकास दोन स्वतंत्र, परामुख (एकमेकांपासून अलग) व कुंठित विकासमार्गांनी झाला असावा. कँब्रियन व ऑर्डोव्हिसियन कल्पांपासून (म्हणजे सु. ४७–४३ कोटी वर्षांपासून) आंतरगुही प्राण्यांचे अस्तित्व पृथ्वीवर असल्याबद्दलचा पुरावा उपलब्ध आहे.

प्रारंभिक अनुजीवांच्या वरच्या पातळीत जास्त विकिरण (विखुरणे) आढळते व त्यामध्ये सु. वीस किंवा अधिक संघांचा अंतर्भाव होतो. यांपैकी काहींत ऱ्हास झाल्यामुळे ते जीवोपजीवी बनले. बहुतेक सर्व अनेक बाबतींत प्रगत असून कित्येकांना मुख व गुदद्वार ही दोन्ही द्वारे असलेले आंत्र आहे. अनेकांच्या देहभित्तीत तिसरा मध्यस्तर असून त्यामध्ये ⇨देहगुहा आहे. देहाकृती आणि जीवनरीती या बाबतींत विपुल विविधता आढळते. अनेक संघांत काही प्राणी अवृंत (देठ नसलेले) असून त्यांना पसरट बाहू किंवा संस्पर्शक असतात व ते पक्ष्माभिकांद्वारे घडवून आणलेल्या प्रवाहाच्या साहाय्याने अन्न मिळवितात. अन्न मिळविण्याकरिता इतर काही क्रियाशील असतात आणि त्यांचे शरीर कृमीसारखे लांबट व द्विपार्श्व सममित (शरीराचे दोन सारखे भाग होणारे) असते.

सत्य-अनुजीवांमध्ये देहगुहायुक्तांना ‘यूसीलोमेटा’असेही म्हणतात. त्यांच्या विविध संघांतील परस्परसंबंध अस्पष्ट असून त्यांपैकी अनेकांचा समावेश दोन श्रेणींत (गणांत) करतात. एका श्रेणीत कृमीसारखे जीव समाविष्ट असून त्यांना प्रोटोस्टोमिया (प्रोटिरोस्टोमिया, एक्टेरोसीलिया) म्हणतात. ⇨ॲनेलिडा (वलयी संघ), ⇨ आर्थ्रोपोडा  (संधिपाद संघ) व ⇨ मॉलस्का (मृदुकाय संघ) यांच्याशी हे संबंधित आहेत. प्रोटोस्टोमियामध्ये अंड्याचे विदलन (अंड्याचे बहुकोशिक भ्रूणात रूपांतर करणारी सूत्री विभाजनाची श्रेणी) निर्धारित (निश्चित) असते व मूळचे आंत्रद्वार मुख बनतेगुदद्वार दुय्यम असते. मध्यस्तर म्हणून एक घन कोशिकासमूह असतो. ट्रोकोफोर हा वैशिष्ट्यपूर्ण ⇨ डिंभ  असतो. सर्व द्विपार्श्व सममित संघांचा यात अंतर्भाव होतो. याला ⇨एकायनोडर्माटा, ⇨ कीटोग्नॅथा (शरकृमी वर्ग), ⇨ हेमिकॉर्डेटा (अर्धमेरुक संघ), ⇨ पोगोनोफोरा (ब्रॅकियाटा) आणि ⇨कॉर्डेटा (रज्जुमान संघ) हे अपवाद असून त्यांचा समावेश दुसऱ्‍या श्रेणीत—ड्युटेरोस्टोमियात—करतात. यात अंड्याचे विदलन अनिर्धारित असून मुख हे नवीन आंत्रद्वारे असते. देहगुहा आणि मध्यस्तर यांचा विकास आंत्रभित्तीपासून निघणाऱ्‍या बाह्यकोष्ठापासून होतो. डिंभाच्या (प्लुटियसाच्या) शरीरावर पक्ष्माभिकांच्या उभ्या पट्ट्या असतात. स्थानबद्ध प्राण्यांत प्रारंभिक एकायनोडर्माटा ठळकपणे आढळतात आणि ते या दुसऱ्या श्रेणीत (एंटेरोसीलिया) प्रारूपिक गणले जातात.

कायनोडर्माटा : हा फार प्राचीन गट असून त्यांचा आद्यपूर्वज कँब्रियन कल्पातील होता. तो द्विपार्श्व सममित होता आणि त्याचे आंतरगुहीशी साम्य होते. रज्जुमान संघाचा व या संघात आढळणारा डिंभ समान असल्याने या दोन्ही संघांचे पूर्वज समान असावे असे मानतात. सध्याच्या एकायनोडर्माटांच्या व्यक्तिविकासात प्रथम द्विपार्श्व सममिती असते व अरीय सममिती नंतर येते. ऑर्डोव्हिसियन, सिल्युरियन (सु. ४२ कोटी वर्षांपूर्वी) इ. कल्पांत (पुराजीव महाकल्पात) या संघांतील अनेक लहान गटांचा उदय झाला, परंतु नंतर त्यांपैकी काही लुप्त झाले आज फक्त तीन गट ठळकपणे आढळतात.

पोगोनोफोरा : या गटाला काहींनी (हायमान, आयव्हानॉव्ह) संघाचा दर्जा दिला असून काही त्याचा अंतर्भाव ⇨ हेमिकॉर्डेटा  संघात वर्ग म्हणून करतात, कारण त्यांचे आप्तसंबंध घनिष्ठ आहेत गर्भविकास आणि देहसाचा यांत साम्य आहे. हे सागरतळाचे प्राणी सेल्युलोजाच्या नळीसारख्या आवरणात राहतात. त्यांना पचनमार्ग नसतो. मुक्तजीवी अनुजीवांत हे अद्वितीय लक्षण आहे. शुंडावरील संस्पर्शकांचा वापर बहुधा पचनाकरिता होत असावा. यांचे जीवाश्म आढळलेले नाहीत. ड्युटेरोस्टोमियात शरकृमींचा [→ कीटोग्नॅथा] अंतर्भाव करण्याबद्दल एकमत नाही. त्यांचा क्रमविकास त्या श्रेणीच्या आरंभीच स्वतंत्रपणे होत आला असून त्यांचे स्थान श्रेणीच्या विकासमार्गाच्या तळाशी आहे. त्यांनाही संघाचा दर्जा दिला जातो (हायमान), परंतु काहींनी हा वर्गच मानला आहे. हे प्राणी पारदर्शक व बाणासारखे असून सागरी प्लवकांत विपुल आढळतात त्यांना आंत्रगुहा असते पार्श्विक पर (हालचाल करण्यास व तोल सांभाळण्यास उपयोगी पडणाऱ्या बाजूच्या स्नायुमय घड्या) असतात भक्ष पकडणाऱ्या कायटिनयुक्त कंटकांचा (काट्यांचा) समूह डोक्याभोवती असतो. रज्जुमानांसारख्या वरच्या दर्जाच्या प्राण्यांचा उगम ज्या पूर्वज संचापासून झाला त्यातूनच या संघाची निर्मिती झाली असून त्याचा पुढील क्रमविकास स्वतंत्रपणे समांतर मार्गाने झाला असावा.


कृमी: प्रोटोस्टोमियात अंतर्भूत असे प्रारंभिक कृमी म्हणजे ⇨ प्लॅटिहेल्मिंथिस (पृथुकृमी संघ) हे सपाट कृमी होत. यांत मुक्तजीवी प्लॅनॅरियन, फ्ल्यूक व पट्टकृमी यांसारख्या जीवोपजीवी प्राण्यांचा समावेश होतो. काही जीवोपजीवींत पचननलिकेचा ऱ्हास झालेला असून इतरांच्या पचननलिकेला एकच द्वार असते मध्यस्तराचा विकास फार कमी असतो. भक्ष्य पकडण्याकरिता उद्वर्त्य शीर्षसंरचना (बाहेर वळणाऱ्या डोक्यावरील रचना) असणाऱ्या शुंडीकृमींचाही ⇨ नेमर्टिनांचाही येथे समावेश असून ⇨ ॲस्केलमिंथिस (कूटगुही), ⇨ मेसोझोआ  ⇨ सायपंक्युलिडा  (निनाली वर्ग) आणि प्रायाप्यूलॉयडिया इ. विविध प्राण्यांची कृमींतच गणना होते. कूटगृहीत ⇨ रोटिफेरा, व ⇨ नेमॅटोडा (गोलकृमी वर्ग) यांची व अंकुशकृमी (हूकवर्म), ट्रायकिना यांसारख्या जीवोपजीवींचा समावेश आहे.

अनुजीव प्राण्यांच्या क्रमविकासात आंतरगुही संघ व कंकती संघ यांनंतर पृथुकृमींची शाखा त्यांच्या विकास मार्गापासून उगम पावली असावी. यांत बाह्यस्तर, मध्यस्तर व अंतःस्तर असून मुख, गुदद्वार, देहगुहा व परिवहन तंत्र (रक्ताभिसरण संस्था) यांचा अभाव असतो, मात्र देहभित्तीत स्नायूंचे थर असतात तसेच आदिवृक्कक (निरुपयोगी द्रव्ये बाहेर टाकणारी आद्य प्रकारची नळीसारखी इंद्रिये) असतात. या प्रगत लक्षणांवरून पृथुकृमीनंतरच्या क्रमविकासात इतर शाखांचा उगम अनुजीव प्राण्यांच्या त्याच विकास मार्गापासून होत आला असावा, असे सूचित होते. शुंडीकृमीतील शुंडा आणि परिवहन तंत्र, मुख व गुदद्वार इ. संरचनात्मक बदल पृथुकृमीत झाल्याचे मान्य केल्यास त्यांचा विकास पृथुकृमीसारख्या पूर्वजांपासून झाला असणे शक्य आहे, कारण दोन्हींतील बाह्यस्तर व संवेदी संरचना यांत विलक्षण साम्य आढळते. कूटगुही प्राणीही पृथुकृमींपासून निघाले असावेत, असे काही तज्ञ मानतात. त्यामध्ये मुख आणि गुदद्वार अलग होऊन आभासी देहगुहेची भर पडली. त्यांना परिवहन तंत्र आणि पचननलिकेभोवती स्नायू नसतात. तथापि कोशिका सातत्य आणि कोशिकीय प्रभेदन यांमध्ये जटिलता आढळते.

ॲनेलिडा, आर्थ्रोपोडा व मॉलस्का : या संघांमध्ये अत्यंत नानाविध संरचनांचे व जीवनरीतींचे प्राणी आढळतात. वलयी संघात (उदा., जळू, गांडूळ इ.) समखंडन (शरीराचे समान भाग असणे) असते. संधिपाद संघाची (उदा., कोळी, विंचू, कीटक, गोम, खेकडा इ.) वैशिष्ट्ये म्हणजे त्यांना कायटिन या शृंगद्रव्यासारख्या पदार्थांचे बाह्यकंकाल (बाह्य सांगाडा) व संधियुक्त उपांगे (अवयव) असतात.

आ. ५. प्राणिकोटीतील सूचित जातिविकास (मेटॅझोआ)

संधिपाद संघ व ⇨पॉलिकीटा (बहुरोमी गण) यांचे पूर्वज एकच होते. वरवर पाहता यांसारखे न दिसणारे प्राणी म्हणजे मृदुकाय संघातील (उदा., कालवे, शंख, गोगलगाई इ.)यांपैकी बहुतेक सुस्त व खंडीभवन नसलेले, परंतु कवच (शिंपला) असलेले होत. खंडयुक्त आणि मृदुकाय प्राण्यांच्या डिंभांतील साम्यावरून यांचे आप्तसंबंध ओळखू येतात. पॅसिफिक महासागरातील खोल पाण्यात आढळणारा मृदुकाय निओपायलिना  हा खंडयुक्त प्राणी त्या दोन्ही संघांतील ⇨जोडणारा दुवा  असून त्यांच्या आप्तसंबंधांचा पुरावा आहे. मृदुकाय प्राण्यांपैकी काहींचे जीवाश्म कँब्रियन कल्पापासून तर काहींचे ऑर्डोव्हिसियन कल्पापासून पुढे सापडले आहेत, त्यावरून त्यांचे प्राचीनत्व दिसून येते.

वलयी संघातील प्राण्यांतील स्नायुयुक्त देहभित्तीत अखंडित स्नायू असतात, तर संधिपाद संघातील प्राण्यांत विशिष्ट खंडांच्या चलनवलनाकरिता खंडित व स्वतंत्रपणे विकसित स्नायू असतातह्या दोन्हींच्या समान पूर्वजांशी ⇨ ऑनिकोफोरा (नखरी वर्ग) वर्गातील प्राण्यांचे साम्य आहे. ह्या प्राण्यांमध्ये पातळ उपत्वचा, अखंडित स्नायुयुक्त देहभित्ती, संधीचा अभाव, जंभांची (जबड्यांची) एक जोडी, पहिल्या खंडावर उपांगे, देहगुहावाहिन्यांची माला व त्यांपैकी एक जोडी पक्ष्माभिकायुक्त अंडवाहिनी इ. महत्त्वाची लक्षणे आढळतात [→ पेरिपॅटस]. संधिपाद संघापैकी ⇨ ट्रायलोबाइट  कँब्रियन-पूर्व कल्पापासून पृथ्वीवर होते, परंतु पर्मियन कल्पाच्या मध्यास ते लुप्त झाले. कोळ्यांचे पूर्वज सिल्युरियनपासून पुढे आढळले आहेत. ⇨ क्रस्टेशिया (कवचधर प्राणी) ऑर्डोव्हिसियन कल्पात विकास पावले व तेथपासून पुढे टिकून आहेत. डेव्होनियन कल्पाच्या प्रारंभापासून (म्हणजे सु. ४० कोटी वर्षांपासून) कीटक पृथ्वीवर वावरत आहेत.


सवृंत बाहुपोषक : एकंदरीने ह्या फार कमी प्रगत संघांच्या श्रेणीतील काही प्राणी कायम स्थानबद्ध पण सवृंत (देठ असलेले) असतात. त्यांच्या शरीरावर काही पसरलेले बाहू असून त्यांवर पक्ष्माभिकांचे पट्टे असतातते अन्नाचे कण मुखाकडे लोटतात. ब्रायोझोआ हे लहान प्राणी त्यांपैकी होत. यामध्ये ⇨ एंटोप्रॉक्टा (अंतर्गुद वर्ग), ⇨ एक्टोप्रॉक्टा (बहिर्गुद वर्ग) व ⇨फोरोनिडा (नलिकाकृमी वर्ग) यांचा समावेश होतो. ⇨ ब्रॅकिओपोडा  हे फार प्राचीन (कँब्रियन) काळी विपुल होते. या संघाचे आप्तभावअनिश्चित असून कधीकधी ते प्रोटोस्टोमियांशी जोडले जाताततथापि एकायनोडर्माटा ह्या प्रारूपिक ड्युटेरोस्टोमियाशी जोडले जाणेही शक्य आहे. चूर्णीय चिलखत व जलवाहिका तंत्र (एकायनोडर्म प्राण्यांच्या शरीरात ज्या वाहिन्यांतून पाण्यासारख्या पातळ द्रवाचे अभिसरण होते त्या वाहिन्यांची बनलेली संस्था) हे त्यांचे वैशिष्ट्य असून बहुतेक अर्वाचीन एकायनोडर्म प्राणी मुक्तसंचारी पण मंद आहेत. विद्यमान ⇨ क्रिनॉयडिया (प्रदशभुज वर्ग) व पूर्वीचे जीवाश्म एकायनोडर्माटा यांचे वर सांगितलेल्या बाहुपोषक संघांच्या श्रेणीशी साम्य आहे. प्राण्यांचे सर्व प्रमुख गट त्यांच्या उगमाचा, विकासाचा व अस्ताचा काळ आणि त्यांचे परस्परसंबंध इ. दर्शविणारा तक्ता ‘पुराप्राणिविज्ञान’ या नोंदीत दिला आहे.

कॉर्डेटा : यांच्या उगमाविषयी निश्चित अशी माहिती अद्याप मिळालेली नाही, कारण इतर प्राणिसंघ आणि हा वैशिष्ट्यपूर्ण गट[→ कॉर्डेटा] यांमध्ये आकार विज्ञानाच्या (जीवाची संरचना व त्याचा आकार यांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राच्या) दृष्टीने रुंद खिंड आहे. ⇨ सेफॅलोकॉर्डेटा (शिरोमेरुक उपसंघ) आणि पृष्ठवंशी प्राणी यांमध्ये आढळलेल्या खंडीभवनामुळे रज्जुमान संघ व वलयी-संधिपाद संच यांतील क्रमविकासीय संबंधाकडे प्रथम लक्ष गेले. वलयी संघ व संधिपाद संघ यांतील प्राणी सखंड आहेत. परंतु त्यांच्या काही मूलभूत लक्षणांच्या वेगळेपणामुळे त्या संचापासून रज्जुमानांच्या उगमाची कल्पना सोडून द्यावी लागली उदा., त्यांची तंत्रिका रज्जू (उद्दीपन वाहून नेणाऱ्या आणि शरीराचे सर्व भाग मेंदूशी जोडणाऱ्या पुष्कळ तंत्रिकातंतूंनी बनलेली रज्जू) ही रज्जुमानांच्या पृष्ठीय पोकळ रज्जूप्रमाणे नसून ती भरीव, दुहेरी व पचनमार्गाखाली (अधर) असते. यामुळे वलयी-संधिपाद संचापासून रज्जुमानांचा क्रमविकास घडून येण्यास फारच क्रांतिकारक फरक पडावे लागतील. संरचना व कार्ये यांमध्ये सातत्य असणे ही बाब क्रमविकासातील संक्रमणात आवश्यक मानली जाते अशा संक्रमणातील अनेक जीवनक्षम मध्यावस्थांची कल्पना करणे कठीण आहे शिवाय रज्जुमानांपैकी सर्वांत प्रारंभिक अशा ⇨ यूरोकॉर्डेटांमध्ये खंडीभवन नसते. यामुळे सखंड पूर्वजांपासून रज्जुमानांचा क्रमविकास झाला असणे हे अशक्य दिसते. एकायनोडर्महेमिकॉर्डेट (अर्धमेरुक) या संचापासून रज्जुमानांचा क्रमविकास झाला असावा अशी दुसरी एक विचारसरणी आहे. काही अर्धमेरुकांत व रज्जुमानांत ग्रसनीय क्लोम दरणे (घशातील कल्ल्यांच्या फटी) व अनित्य जिव्हादंड आढळतात. या लक्षणांमुळे त्यांचे क्रमविकासीय संबंध सिद्ध होतात. इतकेच नव्हे, तर काहींनी अर्धमेरुकांचा समावेश रज्जुमानांत एक उपसंघ म्हणून केला आहे. काहींच्या मते एकायनोडर्माटातील अरीय सममिती व अर्धमेरुक आणि रज्जुमान संघांतील द्विपार्श्व सममिती हा फरक त्यांच्या आप्तसंबंधाला छेद देण्यास पुढे मांडला आहे. परंतु येथे विद्यमान एकायनोडर्माटातील प्रौढांची अरीय सममिती मूळच्या द्विपार्श्विक रचनेवर नंतर लादलेली आहे, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. प्रारंभिक लुप्त एकायनोडर्माटा आणि पूर्व एकायनोडर्म डिंभ यांमध्ये द्विपार्श्व सममिती आढळते. एकायनोडर्माटा, अर्धमेरुक आणि रज्जुमान या संघांच्या पूर्वविकासातील विदलन, मध्यस्तर व देहगुहा यांचा उगम आणि आंत्रद्वाराची परिणती ही लक्षणे सारखी असून त्यांवरून त्यांच्या क्रमविकासीय आप्तसंबंध दिसून येतो तसेच ह्या तीन गटांच्या देहद्रव प्रथिनांतील साम्य पहिल्याने विचारात घेतलेल्या तीन गटांतील (वलयी -संधिपाद-रज्जुमान) देहद्रव-प्रथिनांपेक्षा अधिक आहे हे लक्षण क्रमविकासीय संबंधात महत्त्वाचे असते.

मॅकगिल विद्यापीठातील प्राध्यापक बेरिल यांनी या विषयासंबंधी पुढे दिलेली उपपत्ती मांडली आहे : प्रारंभिक रज्जुमान अवृंत आणि निस्यंदक अशन करणारे (अन्न गाळून घेऊन खाणारे) सागरी प्राणी असून ते विद्यमान ॲसिडियनांसारखे [→ यूरोकॉर्डेटा] होते. अन्नसंहती (अन्नाचे प्रमाण) वाढविण्याचे साधन म्हणून त्यांमध्ये क्लोमदरणांचा क्रमविकास झाला असून त्यांचा श्वसनाकरिता वापर ही घटना दुय्यम आहे. ⇨ भैकेरासारख्या डिंभाचा क्रमविकास कायम वस्तीकरिता सुयोग्य स्थान शोधण्याचे साधन म्हणून झाला या डिंभाला संवेदी पुटक (पिशवीसारखा भाग) व पृष्ठरज्जूने आधारलेले गतिशील शेपूट असे. पुढे काल परत्वे या डिंभांपैकी काहींना ⇨ चिरडिंभता (डिंभात प्रौढाची लक्षणे असणे) प्राप्त झाली असावी कारण त्यामुळे त्यांना सागरी पृष्ठावरील पाण्याचा चराऊ कुरणासारखा वापर करता येऊ लागला. ही उपपत्ती स्वीकरणीय वाटण्याचे कारण समकालीन वेलापवर्ती (सागराच्या मध्यम खोलीवर व पृष्ठभागावर राहणारे) ट्युनिकेटा (चोलधारी प्राणी लार्व्हासिया वर्ग) हे निःसंशय चिरडिंभतेतूनच उदय पावले आहेत. यांपैकी काही चिरडिंभता पावलेले भैकेर नदीमुखाजवळील वाहून आलेल्या संपन्न गाळावर ताव मारण्यास आले. चलनसामर्थ्य व आकार यांची वाढ आणि विशेषतः सखंड स्नायुयुक्त तंत्राचा क्रमविकास यांच्या साहाय्याने प्रवाहावर मात करून नद्यांच्या दिशेने वर जाण्यास ते समर्थ बनले असावे. यावरून काही रज्जुमानांचे व वलयी आणि संधिपाद प्राण्यांचे खंडीभवन त्यांच्या वाढलेल्या क्रियाशीलतेच्या स्वतंत्र क्रमविकासामुळे घडून आले असावे असे दिसते. पृष्ठवंशींचा क्रमविकास याप्रमाणे हळूहळू चिरडिंभी चोलधारी प्राण्यांच्या डिंभांचा गोड्या पाण्याशी अनुकूलनार्थ झाला असावा, असा बेरिल यांचा भरवसा आहे. ⇨ अँफिऑक्सस हा प्राणी त्या अवस्थेचा एक अवशेष आहे. त्या अवस्थेत रज्जुमान अधिकाधिक क्रियाशील बनत होते व गोड्या पाण्यात प्रवेश करीत होते तथापि त्यानंतर ते सागरी निस्यंदक अशनाच्या जीवनाशी पुनरपी समरस झाले. स्कॉटलंडातील सिल्युरियन निक्षेपात (खडकांच्या साठ्यात) नव्याने आढळलेल्या अँफिऑक्ससासारख्या प्राण्यामुळे (जामोइटियस) वरील विचारसरणीस दुजोरा मिळतो. हा प्राणी प्रारंभिक पृष्ठवंशी असावा असे कोणी म्हणतात. परंतु पृष्ठवंशीचा उगम मृदू शरीराच्या चिरडिंभी चोलधारी प्राण्यांपासून झाला असे गृहीत धरले, तर या दोन गटांमधील अनेक प्राण्यांचे जीवाश्म मिळण्याची शक्यता मात्र फार कमी दिसते.

आ. ६. पृष्ठवंशी प्राण्यांचा जीवाश्म इतिहास

पहिले पृष्ठवंशी ऑर्डोव्हिसियन काळातील जंभहीन प्राणी असून त्यानंतर जंभयुक्त माशांचा उदय सिल्युरियन काळात झाला. पुढे उभयचर प्राणी (अँफिबिया) डेव्होनियनमध्ये (सु. ४०–३६·५ कोटी वर्षांपूर्वी), सरीसृप (रेप्टिलिया) पेनसिल्व्हेनियन (सु. ३१ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळात, पक्षी (एव्हीज) व स्तनी प्राण (मॅमॅलिया) जुरासिकमध्ये (सु. १८·५–१५·५ कोटी वर्षांपूर्वी) आणि शेवटी प्लाइस्टोसीनमध्ये  (सु. ६ लक्ष वर्षांपूर्वी) मनुष्य याप्रमाणे विकासाचा क्रम आढळतो. आ. ६ मध्ये पृष्ठवंशी प्राण्यांच्या प्रमुख वर्गांचा जातिविकास, त्यांचे परस्परसंबंध, त्यांचा उद्‍गम आणि विकासकाल इ. दर्शविणारी रेखाकृती दिलेली आहे. आकृतीत दाखविलेल्या प्रत्येक वर्गाच्या कमीजास्त रुंदीवरून त्या त्या वर्गातील प्राण्यांची वेळोवेळी कमीजास्त झालेली संख्या दिसून येते.


मासे : (पिसीझ मत्स्य वर्ग). यांच्या ॲग्नाथा [→ सायक्लोस्टोम = चक्रमुखी ]या वर्गातील सर्वांत प्राचीन जंभहीन माशांचे जीवन चोलधारी प्राणी आणि अँफिऑक्सस यांच्याप्रमाणेच असावे, असे जीवाश्मांवरून आढळते. हे ⇨ ऑस्ट्रॅकोडर्म प्राणी होत हे ऑर्डोव्हिसियन ते डेव्होनियनच्या शेवटापर्यंत राहून लुप्त झाले. प्लॅकोडर्मी या सिल्युरियन ते मिसिसिपियन कल्पातील चिलखती माशांमध्ये जबडा व पर यांची सुरुवात झाली होती, परंतु कालपरत्वे तोही सर्व वर्गच कार्‌बॉनिफेरसच्या मध्यानंतर लुप्त झाला आहे. यांशिवाय सिल्युरियन कल्पात जंभहीन मत्स्यापासून पुढे मत्स्यविकास दोन मार्गांनी झाला. एकाने अस्थींचा ऱ्हास व पूर्ण झालेला उपास्थिमय (कूर्चामय) कंकाल असलेल्या काँड्रिक्थीज माशांचा वर्ग बनला (उदा., शार्क, स्केट, रे इ.) दुसऱ्‍या मार्गाने उच्च प्रकारचे अस्थिमय मासे अंतर्भूत असलेला ऑस्टिक्थीज हा प्रगत वर्ग विकास पावला आजच्या जलजीवनात यांचा (उदा., हेरिंग, कॉड, पर्च, मिनोज इ. माशांचा) भरणा मोठा आहे. पुराजीव महाकल्पातील डेव्होनियन कल्पात गोड्या पाण्यात आढळणारे क्रॉसॉप्टेरिजाय हे उच्च मत्स्यपूर्वज होत. त्यांपैकी  ⇨ लॅटिमेरिया हा वैशिष्ट्यपूर्ण प्रकार (जिवंत जीवाश्म म्हणजे पूर्वी नामशेष झालेल्यांपैकी पण सध्या जिवंत असलेले) आज हयात आहे. हिंदी महासागरातील कॉमोरो बेटाच्या परिसरात, खोल पाण्यात याचा नुकताच शोध लागला आहे. क्रॉसॉप्टेरिजाय मासे व त्यांचे वंशज पहिले ⇨ उभयचर प्राणी या दोन्हींच्या जीवाश्मांत पाच कोटी वर्षांचे अंतर पडते. यावरून या क्रमविकासाला किती प्रचंड काळ लागला असावा याची कल्पना येते.  ⇨ सरीसृप वर्गातील प्राणी व त्यांचे पूर्वज मत्स्य या दोन अवस्थांतील पोकळी लॅबिरिंथोडोंशिया या मोठ्या उभयचर गटाने भरून काढली आहे. हा लुप्त गट डेव्होनियन कल्पाच्या शेवटी उदय पावला व ट्रायासिक कल्पापर्यंत (सु. २३ – २० कोटी वर्षांपूर्वीपर्यंत) टिकून राहिला. याच्याकरवी जलजीवनातून स्थलजीवनात पदार्पण झाले असे म्हणण्यास प्रत्यवाय नाही. विद्यमान उभयचर प्राण्यांच्या गणांचा आरंभीचा क्रमविकास अस्पष्टच आहे. वर सांगितलेला लुप्त गट व विद्यमान उभयचर प्राणी या दोन गटांत दातांवरील लुकणाच्या विशिष्ट प्रकारात साम्य आहे व त्यावरून त्यांचे लॅबिरिंथोडोंट्स हे नाव पडले आहे. ते बेडौल व  ⇨ सॅलॅमँडराप्रमाणे असून त्यांची नाममात्र मान व जाडजूड स्नायुयुक्त शेपटी मत्स्यपूर्वजांप्रमाणे असे ते इतर उभयचरांचे, सरीसृपांचे व सर्वच उच्च चतुष्पादांचे आद्यपूर्वज होते. यांच्या पृष्ठवंशातील कशेरुक काय (मणक्याचा पिंड) क्रॉसॉप्टेरिजाय ह्या माशातल्याप्रमाणे होता त्यामध्ये फरक पडत जाऊन सरीसृपांच्या पूर्वजात आढळणारा कशेरुक काय बनला असावा. लेपोस्पाँडिलाय हे लुप्त उभयचर प्राणी बहुधा लॅबिरिंथोडोंशियापासून (डेव्होनियनच्या शेवटी) उदय पावले असून त्यांच्या रिळासारख्या कशेरुक कायातील छिद्रांतून चिरस्थायी पृष्ठरज्जू (शरीराच्या वरच्या भागात असणारा आधार अक्ष किंवा कणा) ओवलेली असे. विद्यमान उभयचरांतील पृष्ठवंशाशी या संरचनेचे अधिक साम्य असून त्यांचेही पूर्वज लेपोस्पाँडिलाय असावे लिसाँफिबिया या आधुनिक उभयचरांचा (उदा., बेडूक, भेक, सॅलॅमँडर इ.) उदय यांच्यापासूनच पेनसिल्व्हेनियन काळात (सु. ३० कोटी वर्षांपूर्वी) झाला असावा.

सरपटणारे प्राणी: (सरीसृप वर्ग रेप्टिलिया). कार्‌बॉनिफेरस कल्पाच्या शेवटी या अनियततापी (ज्यांच्या शरीराचे तापमान परिसराच्या तापमानावर अवलंबून असते अशा) प्राण्यांचे विकिरण सुरू झाले व त्यातून अनेक गणांचा उगम होऊन ते पुढे सुस्थित झाले. त्यांपैकी आज चार गणांतील प्रतिनिधी हयात आहेत. लॅबिरिंथोडोंशिया या उभयचर गटातील पूर्वजांपासून त्यांचा उदय झाल्याचे मागे सांगितलेच आहे. सरीसृपांत विशेष ठळकपणे ज्यांचा उदय झाला असे म्हणजे मध्यजीव महाकल्पातील समुद्रवासी सरीसृप ⇨ प्लेसिओसॉर व  ⇨ इक्थिओसॉर आणि जमिनीवर आर्कोसॉरिया व ⇨डायनोसॉर (भीमसरट) हे होत. प्लेसिओसॉर हे मोठे कवचहीन कासवासारखे व इक्थिओसॉर ⇨ पॉरपाइजासारखे (शिंशुकासारखे) होते. आर्कोसॉरियांपैकी फक्त मगरांचा गट (क्रोकोडिलिया) आज हयात आहे. रिंकोसेफॅलिया ह्या त्याच महाकल्पात मोठा विस्तार पावलेल्या गणातील आजमितीस फारसा न बदलता राहिलेला प्रारंभिक प्रतिनिधी म्हणजे स्फीनोडॉन [→ट्युआटारा] नावाचा सरडा होयहा न्यूझीलंड जवळच्या बेटांवर आढळतोतो जिवंत जीवाश्म आहे. त्या गणातील सरड्यासारख्या पूर्वजांपासून विकास पावलेले व आज मोठ्या संख्येने आढळणारे सरीसृप प्राणी म्हणजे साप व सरडे (स्क्वॅमॅटा गण) असून यांपैकी सरडे (लॅसर्टिलिया) अधिक जुने व प्रारंभिक होत. ह्यांपैकी बिळात राहणाऱ्‍या पूर्वजांपासून सर्पांचा (ऑफिडिया) क्रमविकास झाला असावा. सरीसृपांच्या क्रमविकासात मुख्यतः भूमीवर चलन व पोषण यांचा प्रभाव पडलेला आढळतो. पोषणाच्या विविध प्रकारांमुळे त्यांच्या जबड्यांच्या स्नायूंत आणि त्यामुळे कवटीच्या शंख (कपाळाच्या दोन्ही बाजूंच्या) प्रदेशात रूपांतरे झालेली आढळतात. त्यांचा क्रमविकास ज्या भिन्न मार्गांनी घडून आला त्यांमध्ये कवटीत झालेले फरक ओळखू येतात. सर्वांत प्रारंभिक सरीसृपांच्या (कॉटिलोसॉरिया गण) व लॅबिरिंथोडोंशिया यांसारख्या पूर्वजांच्या कवटीच्या संरचनेत बरेच साम्य आढळते. या कॉटिलोसॉरिया प्रारंभिक गणातील पूर्वजांपासून किलोनिया या  ⇨ कासवांचा  समावेश असलेल्या गणाचा क्रमविकास झाला आहे व त्या प्रक्रियेत त्यांचे जलजीवनाशी अनुकूलन झालेले दिसते. तसेच त्यांना कवचाचाही लाभ झाला आहे.प्रारंभिक कासवांना आपले डोके हल्लीच्या कासवांप्रमाणे आत ओढून घेता येत नसे. पेलिकोसॉरिया हे कॉटिलोसॉरियासारखे व स्तनी प्राण्यांसारखे सरीसृप होतेपरंतु कवटीच्या बाबतीत ते भिन्नतादर्शक होते. तसेच ते मध्यम आकाराचे, जाडजूड, स्थलवासी चतुष्पाद असून त्यांचे पाय शरीराशी काटकोनात होते. आर्कोसॉरांच्या उदयापूर्वी लाखो वर्षे ते कॉटिलोसॉरियापासून स्वतंत्रपणे विकास पावू लागले व पुढे त्यांची परिणती स्तनी प्राण्यांत झाली. थेरॅप्सिडा हे ट्रायासिक कल्पातील प्रगत सरीसृप स्तनी प्राण्यांसारखे अधिक असून ते मध्यजीव महाकल्पानंतर लुप्त झाले. आर्कोसॉरियापासून जुरासिक कल्पात (सु. १८–१३ कोटी वर्षांपूर्वी)  ⇨ आर्किऑप्टेरिक्ससारख्या संक्रामक अवस्थेतून पक्ष्यांचा उदय झाला [→ पक्षि-वर्ग]. मध्यजीव महाकल्पातच आर्कोसॉरियांच्या गटात समाविष्ट असलेले काही डायनोसॉर (उदा., टिरॅनोसॉरस व ब्राँटोसॉरस) फार प्रचंड आकाराचे होतेते दलदलीत राहत व त्यांचा आकार हल्लीच्या देवमाशांशी तुलनात्मक होता. टेरोसॉरिया गणापैकी काही फार मोठे व सपक्ष होतेमात्र हे पसरट पक्ष (पंख) कातडीमुळे बनलेले होते.

पक्षी : (पक्षी वर्गएव्हीज). हे अंडी घालणारे व नियततापी (ज्यांच्या शरीराचे तापमान परिसराच्या तापमानापेक्षा सामान्यतः उच्च असून स्थिर असते असे) पृष्ठवंशी प्राणी असून हवेत उडण्याकरिता त्यांचे अनुकूलन झालेले आहे. पक्ष्यांपैकी काही लुप्त व विद्यमान प्राणी उडण्यास असमर्थ आहेत, तथापि त्यांचा क्रमविकास जुरासिक (मध्यजीव महाकल्पातील) काळातील आर्कोसॉरियन सरीसृपातील उडणाऱ्या पूर्वजांपासूनच झाला आहे. पक्ष्यांच्या शरीरावरील पिसे अधिचर्मापासून (सर्वांत बाहेरील कातडीपासून) वाढलेली असून वृक्षवासी व विसर्पी (हवेत घसरत जाणाऱ्या) सरीसृप पूर्वजांच्या अंगावरील खवल्यांचे रूपांतर प्रथम उड्डयन पिच्छांत (हवेत झेपावण्यास उपयुक्त पिसांत) आणि नंतर उष्णता नियंत्रक पिसाऱ्यात झाले असावे. रूपांतरित पिसे हल्ली पक्षिजीवनात विविधोपयोगी ठरली आहेत. पक्ष्यांच्या शरीरातही उडण्यास अनुकूल असे इतर अनेक फरक पडले आहेत इतकेच नव्हे, तर सामान्यपणे पक्ष्यात आढळणाऱ्या शारीरिक साच्यात विशिष्ट जीवनरीतीला व त्यातल्या त्यात पोषणरीतीला सोयीस्कर असेही फरक पडल्याचे आढळते. बव्हेरियातील जुरासिक निक्षेपातील चुनखडकात आढळलेल्या तीन जीवाश्म नमुन्यांवरून पक्ष्यांचे सरीसृपपूर्वज निश्चित करता आले आहेत. आर्किऑप्टेरिक्स या प्रारंभिक पक्ष्यांचा अंतर्भाव आर्किऑर्निथीज उपवर्गात केला जातो. यापेक्षा अधिक प्रगत पण जीवाश्म पक्षी नीऑर्निथीज उपवर्गात घातले आहेत. हेस्परॉर्निस व इक्थिऑर्निस ही त्यांची उदाहरणे असून ते क्रिटेशस (सु. १४–९ कोटी वर्षांपूर्वीच्या) कल्पातील आहेत त्यांना सरीसृपाप्रमाणे लांब शेपूट नव्हते. मात्र दात होते. यानंतरच्या सर्व पक्ष्यांत (पॅलिओग्नॅथी व नीओग्नॅथी) दातांचा ऱ्हास झाला असून त्यांऐवजी सरीसृपांसारखी किंवा विशिष्ट प्रकारची तालुसंरचना (टाळूची रचना) आढळते. विद्यमान पॅलिओग्नॅथीमध्ये भूसंचारी न उडणारे पक्षी असून उदा., शहामृग, ऱ्हीया, कॅसोवेरी आणि किवी. त्यांचे पाय मजबूत व सुविकसित आणि पंख अवशेषी प्रकारचे आहेत. यांतील काहींचे पूर्वज नवजीव (केनोझोइक) महाकल्पातील आहेत. काही नीओग्नॅथी भूसंचारी पक्षीही त्यावेळी होते. हे सर्व पक्षी व काही प्राथमिक स्तनी प्राणी यांची त्यावेळी गर्दी असून स्पर्धा तीव्र असावी मोठे सरीसृप संख्येने कमी झालेले होते. या स्पर्धेत शेवटी स्तनी प्राण्यांची सरशी झाली आणि फार थोडे भूसंचारी पक्षी वाचले. आजचे बहुतेक सर्व पक्षी नीओग्नॅथीमध्ये (सरीसृपासारखी तालू कमी असलेले) अंतर्भूत असून त्याच्या भिन्न जीवनरीती आणि अधिवास (राहण्याचे स्थान) यांच्याशी शारीरिक दृष्ट्या ते पूर्ण समरस झाले आहेत.


स्तनि वर्ग : (मॅमॅलिया). अंगावरील केस आणि स्तन तसेच अत्यंत मोठी क्रियाशीलता व अधिक शिशुसंगोपनक्षमता यांमुळे इतरांपासून हे प्राणी ओळखता येतात. जबडा व कान यांच्या संरचनेतील तपशिलात ते आपल्या लुप्त सरीसृप पूर्वजांच्या जीवाश्मांपासून अलग करता येतात. बहुतेक सर्व स्तनी प्राणी नियततापी असून स्वेदग्रंथीच्या साहाय्याने ते शरीरातील अधिकतर पाणी बाहेर टाकतात. त्यांच्या शरीरातील चयापचयाचा वेग बहुधा मोठा असतो. सरीसृपांच्या इतिहासाला जवळ जवळ आरंभ होतो तेथूनच स्तनी प्राण्यांचा विकासमार्ग सुरू होतो. उत्तर कार्‍बॉनिफेरस कल्पापासून ट्रायासिकच्या मध्यकाळापर्यंत स्तनी प्राण्यांसारखे सरीसृप प्रथम पेलिकोसॉरिया आणि नंतर प्रगत थेरॅप्सिडा यांसारखे प्राणी पृथ्वीवर प्रामुख्याने वावरत होते. ट्रायासिक कल्पान्तापूर्वी डायनोसॉरांच्या आगमनाबरोबर थेरॅप्सिड प्राणी लुप्त झाले, परंतु तत्पूर्वी त्यांचे जे वंशज राहिले तेच पहिले सत्य स्तनी प्राणी होत. अंडी घालणारे मोनोट्रिम प्राणी [→ काटेरी मुंगीखाऊ प्लॅटिपस] स्तनी प्राण्यांच्या विकासमार्गापासून अगदी प्रारंभीच स्वतंत्रपणे निघाले असावे. सरीसृपांप्रमाणे त्यांना अवस्करद्वार (ज्यात आतडे, युग्मक म्हणजे प्रजोत्पादक कोशिकावाहिन्या व मूत्रवाहिन्या उघडतात अशा शरीराच्या मागच्या टोकाकडे असणाऱ्या समाईक कोष्ठाचे द्वार) असते. सध्या त्यांचे वंशज ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड येथे आढळतात, परंतु त्यांचा इतिहास उपलब्ध नाही. जुरासिक व क्रिटेशस काळांतील स्तनी प्राण्यांचे जीवाश्म क्वचितच आढळले असून त्यांची संख्या फारच तोकडी असण्याचे कारण डायनोसॉरांचा प्रभाव होय. डायनोसॉरांच्या लोपानंतर स्तनी प्राण्यांची सरशी होत गेली. क्रिटेशसच्या उत्तर काळात मेटॅथेरिया (शिशुधान स्तनि-वर्ग) व यूथेरिया (अपरास्तनि-वर्ग) या स्तनींचा उदय झाला होता. ऑस्ट्रेलियात अपरास्तनी (वार असलेले स्तनी) प्राणी बराच काळ नव्हते. तेथे शिशुधानी प्राण्यांची चलती झाली इतर खंडांत अपरास्तनी प्राणी तृतीय कल्पाच्या (सु. ६·५ ते १·२ कोटी वर्षांपूर्वीच्या काळाच्या) प्रथम भागात संख्या व प्रकार या बाबतींत खूपच विस्तार पावले.

अंडी घालणाऱ्या मोनोट्रिमॅटा या स्तनी प्राण्यांची प्रारंभिक लक्षणे पाहून काहींना असा विश्वास वाटतो की, त्यांचा उदय पेलिकोसॉरियापासून पण इतर स्तनी प्राण्यांच्या विकासमार्गापूर्वी स्वतंत्रपणे झाला असावा याचा अर्थ स्तनी प्राण्यांचा विकास बहुस्त्रोतोद्‍भवी (अनेक मार्गांनी उद्‍भवलेला) असावा. यावरून केस व स्तन यांचा विकास पेलिकोसॉरियासारख्या समान पूर्वजात पूर्वी झाला असावा किंवा नंतर तो स्तनी प्राण्यांच्या दोन विकासमार्गांत स्वतंत्रपणे झाला असावा. मोनोट्रिमॅटांच्या अशा प्रारंभिकत्वामुळे त्यांचा अंतर्भाव प्रोटोथेरिया या स्वतंत्र उपवर्गातील एका गणात केला जातो. इतर विद्यमान  स्तनी प्राण्यांचा समावेश थेरिया उपवर्गात करतात. त्यांपैकी काहींचे जीवाश्म मध्यजीव महाकल्पाच्या उत्तर काळातील खडकांत आढळतात. नवजीव महाकल्पात (सु. ६ लाख ते ११ हजार वर्षांपूर्वीच्या काळात) त्यांचा विस्तार फार झाला त्यांचा अंतर्भाव अलोथेरिया उपवर्गात केला जातो. सर्व प्रारूपिक स्तनी प्राणी जरायुज (अपत्यास जन्म देणारे) असून त्यांपैकी काहींचे जीवाश्म मध्यजीव महाकल्पातील खडकांत आढळतात. त्यांचा समावेश थेरियातील ट्रायट्युबरक्युलेटा या अधोवर्गात करतात यांच्या दंतलक्षणांवरून ते उच्च स्तनी प्राण्यांचे पूर्वज असावेत, असे काहींचे मत आहे. मेटॅथेरिया या दुसऱ्या अधोवर्गात सर्व शिशुधानी प्राणी (उदा., कांगारू) व तिसऱ्या अधोवर्गात (यूथेरिया) सर्व अपरास्तनी प्राणी घातले आहेत. त्यांतील  ⇨ नरवानर गणात (प्रायमेट्स) मनुष्य, माकडे व कपी यांचा समावेश होतो.

यूथेरियात सर्वांत प्रारंभिक म्हणजे  ⇨ इन्सेक्टिव्होरा (कीटकभक्षक) हे असून त्यांच्यापासून इतरांचा विकास झाला आहे. (उदा., छछुंदर, जाहक, चिचुंद्री). यामध्ये सर्वांत लहान व लांबट तोंडाचे स्तनी प्राणी येतात एका जातीच्या चिचुंद्रीचे वजन फक्त दोन ग्रॅम असते.  ⇨वटवाघळांचा (कायरोप्टेरा) व यांचा निकट आप्तसंबंध आहे त्यांना उडते कीटकभक्षक म्हणतात. तसेच नरवानर गणातील प्राणीही प्रारंभिक कीटकभक्षकांशी निकटवर्ती आहेत. त्यांपैकी प्रारंभिक अर्धवृक्षवासींपासून नरवानरांचा (माकडे, लेमूर व मोठे कपी आणि मनुष्य यांचा) क्रमविकास झाला असून पुढे त्यांचे वृक्षवासी जीवनाकरिता विशिष्टीकरण झाले. यानंतर ज्यांनी स्थलजीवनात प्रवेश केला त्यांमध्ये पूर्वीच्या जीवनातील काही लक्षणांचे अवशेष दिसतात. उदा., मनुष्याचे लवचिक अवयव व पकड घेणारे हात मूलतः वृक्षीय जीवनाशी अनुकूल दर्शवितात त्यांचा विकास होत असताना नखरांचे रूपांतर बोटांच्या नखांत झाले. घ्राणेंद्रिये व मेंदूतील घ्राणग्राही भाग यांचा ऱ्हास आणि त्रिमितीय दृष्टीचा विकास ही लक्षणे तेच सांगतात. नरवानर गणात स्नायूंचा समन्वय, मेंदूतील अनुमस्तिष्क (लहान मेंदूचे) आणि प्रमस्तिष्क (मोठ्या मेंदूचे) गोलार्ध यांचा विकास चांगला आढळतो. या सर्व शारीरिक फरकांमुळे क्रमविकासाचा हा मार्ग अत्यंत यशस्वी झाला आहे. नरवानर गणांपैकी लेमुरांत (लेमूर, लोरिस, गॅलॅगॉस इ. लेमुरॉइडी) प्रारंभिकता दिसते, म्हणजे त्यांमध्ये फारसा बदल झालेला नाही. यांच्यापेक्षा पूर्वेकडील टार्सियसमध्ये (टार्सिऑइडी) माकडाच्या पातळीवर येण्याइतपत काही प्रगत लक्षणे आढळतात उदा., सपाट चेहरा व पुढे आलेले मोठे डोळे. अँथ्रॉपॉइडी या उच्च दर्जाच्या नरवानरांच्या पूर्वजांमध्ये टार्सियसची प्रगत लक्षणे अपेक्षिणे चुकीचे ठरणार नाही. त्यांमध्ये माकडे, कपी व मनुष्य यांचा अंतर्भाव होतो त्यांना सापेक्षतः अधिक सपाट चेहरा, त्रिमितीय दृष्टी, फार मोठा मेंदू, उकिडवे बसून वस्तू हाताळणे इ. वैशिष्ट्यपूर्ण प्रगत लक्षणे असतात. माकडांचा क्रमविकास दोन मार्गांनी स्वतंत्रपणे झाला आहे यांपैकी एका मार्गाने (प्लॅटिऱ्हिनी) दक्षिण अमेरिकेत आणि दुसऱ्याने (कॅटाऱ्हिनी) इतर खंडांत झाला. दुसऱ्या मार्गावरच्या क्रमविकासात माकडे मोठ्या कपींच्या पूर्वजांशी संबंधित आहेत. मायोसीन काळाच्या (सु. दोन कोटी वर्षांपूर्वी) आसपास यूरेशिया व आफ्रिका येथे असे कपी होते त्यापासून विद्यमान ⇨ चिंपँझी, ⇨ गिबन, ⇨ ओरँगउटान, ⇨ गोरिला  आणि बहुधा मनुष्य हे विकास पावले असावे. दक्षिण आफ्रिकेच्या प्लाइस्टोसीन काळातील (सु. १०–५ लक्ष वर्षांपूर्वीचा काळ काहींच्या मते १७·५ लक्ष वर्षे) ऑस्ट्रॅलोपिथेकस  हा कपिकुल आणि मानवकुल यांमधील दुवा मानतात हा त्यापुढील मानवांना दंतपंक्ती व सरळ देहाची ढब या बाबतींत संक्रमक होता. पिथेकँथ्रोपस (जावा मॅन) आणि सिनँथ्रोपस (पेकिंग मॅन) हे आदिमानवाचे निश्चित प्रकार प्लाइस्टोसीनच्या मध्यास (५ लक्ष वर्षांपूर्वी) उदयाला आले. त्यापुढील काळातील  नीअँडरथल (१ लक्ष ते ७५ हजार वर्षांपूर्वीचे) व इतर मानव यांचे आधुनिक मानवाशी अधिक साम्य आहे. प्लाइस्टोसीनच्या शेवटी (सु. ५० हजार वर्षांपूर्वीपासून) आढळणारे मानव प्रकार मात्र निश्चितपणे आपल्या जातीचे (होमो सॅपिएन्स ) आहेत. यूरोपातील क्रोमॅग्नॉन मानववंश सु. ४० – ३० हजार वर्षांपूर्वीच्या काळातील असून आधुनिक मानवाचा तो फार जवळचा पूर्वज मानला जातो [→ मानवप्राणि].


स्तनी प्राण्यांच्या क्रमविकासात संख्यावाढ होत गेली तशी परस्परावर उजीविका करण्याची संधी प्राप्त झाली त्यामुळे त्यात वैशिष्ट्य पावलेले प्राणी विकास पावले यांना कार्निव्होरा (मांसाहारी गण) म्हणतात (उदा., कुत्री, वीझल, रॅकून, अस्वले व मांजरे इ.). भक्ष्य पकडण्याकरिता जलद पळणे व त्याचा फडशा पाडणे यांकरिता आवश्यक ते बदल पाय, बोटे व दात यांमध्ये घडून आले. प्रारंभिक स्तनी प्राणी संपूर्ण पावले टेकीत परंतु जलद पळणाऱ्यांची फक्त बोटेच टेकली जातात त्यामुळे तसे बदल त्यांच्या पायांत झाले. मांसाहारींपैकी जे जलजीवनाशी समरस झाले (उदा., सील, वॉलरस इ.) त्यांच्या शरीरात पोहणे, तरंगणे इत्यादींकरिता जरूर ते फरक झाले. त्याचप्रमाणे वनस्पतिभक्षक (शाकाहारी) प्राण्यांचा (गाय, बैल, म्हैस, घोडा, हरीण, मेंढ्या, हत्ती व उंट) असा एक गट (अंग्युलेटा खुरी प्राणी) विशेषीकरण पावला आहे [→ अँग्युलेटा]. यांचे वैशिष्ट्य दात, दाढा व शत्रूपासून दूर पळून जाण्याकरिता पाय यांमध्ये पडलेले फरक होय. गती मिळण्याकरिता बोटांच्या टोकावर चालणे व पळणे उपयुक्त ठरल्याने प्रारंभिक नखरांचा खुरांमध्ये विकास झाला आणि पायाच्या जवळचा भाग अधिक आखूड व लांबचा भाग (खुराजवळचा) अधिक लांब होत गेला व त्यांवरून त्यांना अँग्युलेटा नाव पडले. त्यांची काही बोटे कमी झाली तर काही नाहीशीच झाली. हत्तीसारख्या शुंडायुक्त प्राण्यांत (प्रोबॉसिडिया) काही आरंभीची खुरी प्राण्यांची लक्षणे आढळतात. यांमध्ये पायाची बोटे, खुरासारखी नखे, शुंडा, दातांची रचना, मांडणी व संख्या आणि त्यांचा मर्यादित पुनरुद्‍भव इ. लक्षणे येतात. प्लाइस्टोसीन कल्पात उ. अमेरिकेत अनेक शुंडायुक्त प्राणी होतेहल्ली फक्त आशियातील उष्ण भाग आणि आफ्रिका येथे हत्ती आढळतात. परंतु एकवेळ जगभर त्यांचे विविध प्रकार होते. हत्तीशी आप्तसंबंधी असे साधारणतः सशासारखे प्राणी मध्यपूर्वेत आढळतात. त्यांना ‘कोनी’(हायरॅकॉयडिया) म्हणतात. शुंडायुक्तांप्रमाणे त्यांचे समकालीन प्राणी म्हणजे पाण्यात राहणारे मॅनॅटी (सी-काऊ करिमकर) असून त्यांचा समावेश सायरेनिया गणात करतात. हे प्राणी समुद्रकिनाऱ्याच्या गरम पाण्यात राहून सागरी शैवलांवर उपजीविका करतात. कुरतडून खाणाऱ्या स्तनी प्राण्यांना (रोडेन्शिया गण) रोडंटस् (कृंतक प्राणी) म्हणतातते शाकाहारी असून त्यांची दंतपंक्ती वैशिष्ट्यपूर्ण असतेघुशी, खारी, बीव्हर ही त्यांची उदाहरणे आहेत. ससे व तत्सम प्राणी लॅगोमॉर्फा या गणात घातले आहेत. कारण त्यांना कृंतक प्राण्यांप्रमाणे कृंतक दातांच्या दोन जोड्या असतात. शिवाय वरच्या बाजूस एक अधिक लहान जोडी असते. त्यांचा विकास कृंतक प्राण्यांशी समांतर रेषेत झाला असल्याने त्यांच्या कृंतक दातांत साम्य आढळते. सेटॅशिया गणात व्हेल (देवमासा), डॉल्फिन (शिरस) व शिंशुक यांचा समावेश असून ते समुद्री जीवनास अनुकूलन दर्शवितात, तथापि त्यांचा विकास प्रारंभिक स्थलवासी मांसाहारींपासून झाला असावा. त्यांची काही लक्षणे माशांसारखी असून ते हवेत श्वसन करतात व जरायुज असल्याने पिलांना पाजतात. काहींना चांगले दात असतात पण हे देवमासे दातांच्या अभावी प्लवकावर उपजीविका करतात.

तात्पर्य, स्तनी प्राण्यांच्या क्रमविकासात विशेषेकरून अवयवांच्या कंकालातील स्थलांतर-चापल्य, बौद्धिक क्रियाशीलता आणि तापमान-नियंत्रण ही आढळताततसेच मेंदूचा विकास फार ठळकपणे आढळतो. व्यक्तीच्या विकासाला लागलेल्या विलंबामुळे या अवयवांची पूर्ण वाढ होण्यास आवश्यक तो अवसर मिळतो. शिशुसंगोपनाची गरज व सवय यांमुळे कौटुंबिक जीवन प्राप्त होते आणि त्यामध्ये मानसिक प्रशिक्षणाला वेळ मिळतो.

वनस्पतींचा क्रमविकास 

पृथ्वीच्या उदरात असलेल्या प्राचीन वनस्पतींच्या अवशेषांवरून [→ जीवाश्म] अत्यंत साधी शैवले व सूक्ष्मजंतू पहिल्या अप्रभेदित जीवद्रव्यापासून (सु. तीनशे किंवा दोनशे कोटी वर्षांपूर्वी) विकास पावले असावेत असे दिसते, कारण नंतरच्या खडकांच्या थरांत जटिल वनस्पतींचा वाढता क्रम आढळतोतसेच ते सजीव सध्या असलेल्या प्रारंभिक शैवलांपेक्षा व सूक्ष्मजंतूंपेक्षा साधे किंवा निदान त्यांच्याइतके साधे असावे [→ शैवले]. ह्यांची शरीरे अत्यंत मऊ (नरम) असून मृत्यूनंतर ती सहज कुजून जात असल्याने त्यांचे जीवाश्म बनणे कठीण असतेत्यांच्या अस्तित्वाचा जीवाश्मरूप पुरावा खडकात फार थोडा आढळतो. सूर्यप्रकाशातील किंवा रासायनिक प्रक्रियेतून मिळणारी ऊर्जा, खनिजे व नैसर्गिक वायू यांच्या साहाय्याने अन्नपदार्थ बनविण्याचे व त्यांचे रूपांतर जीवद्रव्यात करण्याचे सामर्थ्य फक्त वनस्पतीत असतेयावरून पहिले सजीव वनस्पतिस्वरूप असावे हे उघड आहे. तसेच उपलब्ध असलेल्या सर्वांत पुरातन वनस्पति-जीवाश्मांवरून ते पाण्यातील वनस्पतींचे असावे असे दिसते, कारण जलजीवनाला साजेशी संरचना त्यात आढळतेम्हणजेच प्रारंभिक वनस्पतींची निर्मिती पाण्यात झाली असावी. तसेच या वनस्पती स्वोपजीवी (अन्ननिर्मितीकरिता कार्बन डाय-ऑक्साइड व अकार्बनी संयुगे यांचा उपयोग करू शकणाऱ्या) सूक्ष्मजंतूच्या स्वरूपाच्या असाव्यात असे मानतातकारण अशा प्रकारचे पाण्यातील सूक्ष्मजंतू प्रचंड राशीने पुरातन खडकांत आढळणाऱ्या चुनखडक, लोहनिक्षेप (कच्च्या लोखंडाचे साठे) व ग्रॅफाईट यांचे उत्पादक असतात, ही गोष्ट आता परिचित आहे. त्यांनी त्यावेळच्या मंद प्रकाशयुक्त धूसर वातावरणात प्रकाश संश्लेषणाऐवजी (प्रकाशीय ऊर्जेच्या साहाय्याने पाणी व कार्बन डाय-ऑक्साइड यांच्यापासून साधी कार्बोहायड्रेटे बनविण्याऐवजी) रासायनिक प्रक्रियेने मिळालेल्या ऊर्जेचा वापर करून व कार्बनी अन्न बनवून आपल्या जीवनाचे रक्षण केले असावे.

क्रमविकासातील यापुढची पायरी म्हणजेच हरितद्रव्ययुक्त वनस्पतींचा उगम आणि विकास. ह्या फक्त प्रकाशसंश्लेषणाने अन्ननिर्मिती करतात. वनस्पतींचे पुरातनत्व, साधेपणा, जीवाश्मरूप पुरावा इत्यादींवरून असे दिसून येते की, हरितद्रव्ययुक्त वनस्पतींत सर्वांत प्रथम विकास पावलेल्या वनस्पती शैवलस्वरूपाच्या असाव्यात. इतकेच नव्हे, तर त्यांमध्ये नील-हरित शैवलांना पहिला क्रमांक द्यावा लागेल, कारण सूक्ष्मजंतूशी त्यांचे साम्य अधिक आहे. त्यासारखे काही सूक्ष्मप्राणीही त्याच्याबरोबर निर्माण झाले असणे शक्य आहे. ह्यानंतरच्या क्रमविकासात जटिल शैवले बनली असावी. हरिद्रव्ययुक्त वनस्पतींची ही पहिली निर्मिती सर्व वनस्पतिसृष्टींच्या क्रमविकासातील फार महत्त्वाचा टप्पा होय. कारण यावेळी त्यांची जी पोषणपद्धती निश्चित झाली त्यामुळे पुढे या वनस्पतींपासून क्रमविकासाच्या प्रक्रियेने अनेक दिशांनी प्रगती होऊन विविध आणि असंख्य वनस्पतींची निर्मिती शक्य झाली [→ शैवले].


सध्या उपलब्ध असलेल्या वनस्पतींच्या जीवाश्मांचा आणि ते ज्या गाळाच्या खडकांच्या थरांत आढळतात, त्यांचा उपयोग करून पृथ्वीवर वेळोवेळी निर्माण झालेल्या वनस्पतींच्या गटांचा, वंशांचा किंवा जातींचा क्रम लावणे शक्य झाले आहे. पृथ्वीच्या कवचात सर्वांत खाली जुने खडक व त्यांवर क्रमाने नंतर बसलेले नवीन खडकांचे थर असा क्रम आढळतो अशा थरांत आढळलेल्या वनस्पती जीवाश्मांपैकी कोणते पुरातन व कोणते अलीकडचे याची शहानिशा करणे सुलभ आहे. त्यावरून त्या त्या वनस्पतींपैकी कोणत्या प्राचीन व कोणत्या सापेक्षतः अर्वाचीन हे समजणे शक्य होते. याशिवाय अलीकडे काही भौतिक व रासायनिक तंत्रांचा उपयोग करून भूवैज्ञानिकांनी पृथ्वीचे वय व तीतील खडकांचे वय ठोकळमानाने ठरविले आहे. सु. तीनशे ते दोनशे कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील (आर्किओझोइक महाकल्प) सर्वांत जुन्या खडकात वनस्पति जीवाश्मांचा अभाव असून त्यानंतर (प्रोटिरोझोइक महाकल्प) आणि पुराजीव महाकल्प यांत समाविष्ट होणाऱ्या सु. चाळीस कोटी वर्षांपूर्वीच्या काळात (सिल्युरियन काळात) शैवलांचे आणि पहिल्या खऱ्या स्थलवासी वनस्पतींचे [→सायलोफायटेलीझ] जीवाश्म आढळतात तसेच विद्यमान वनस्पतींपैकी काही वाहिनीवंत अबीजी वनस्पतींच्या [→ एक्विसीटेलीझ लेपिडोडेंड्रेलीझ कॅलॅमाइटेलीझ स्फेनोफायलेलीझ लायकोपोडिएलीझ नेचे] पूर्वजांचे जीवाश्म डेव्होनियन काळात आढळतात. या महाकल्पातील नंतरच्या कार्‌बॉनिफेरस काळात तर ह्यांच्या अवशेषांपासून बनलेल्या दगडी कोळशाचे प्रचंड थर आहेत. या काळाच्या शेवटी बनलेल्या खडकांत तर आजच्या प्रकटबीज वनस्पतींसारख्या कित्येक वनस्पतींचा [→ कॉर्डाइटेलीझ सायकॅडेलीझ कॉनिफेरेलीझ बीजी नेचे] भरणा आढळतो.

यानंतरच्या काळात (मध्यजीव महाकल्पात) प्रकटबीज वनस्पतींचा बराच विकास झाला, त्यांच्यातील काही वनस्पतींपासून कित्येक आधुनिक गट उदयास आले व काही अधिक विकास पावले [→ सायकॅडेलीझ कॉनिफेरेलीझ गिंकोएलीझ बेनेटाइटेलीझ इ.] तसेच मोठे नेचे, एक्विसीटेलीझ व लायकोपोडिएलीझ इत्यादींचा ऱ्हास सुरू झाला. या महाकल्पातील जुरासिक काळात (सु. १८·५–१५·५ कोटी वर्षांपूर्वीच्या काळात) आवृतबीज वनस्पतींचा (फुलझाडांचा) उदय झाला आणि शेवटच्या काळात (उत्तरक्रिटेशस कल्पात म्हणजे १३–७ कोटी वर्षांपूर्वीच्या काळात) त्यांचा बराच विकास होऊन प्रकटबीजींची संख्या व विस्तार कमी झाला [→ पुरावनस्पतिविज्ञान]. मध्यजीव महाकल्प संपून नवजीव महाकल्प सुरू झाल्यानंतर (म्हणजे गेल्या सात – सहा कोटी वर्षांच्या काळात) फुलझाडांचा क्रमविकास अनेक दिशांनी (संरचना, संख्या, प्रसार, आकारमान इत्यादींत) झाला व आज त्यांचेच प्राबल्य सर्वत्र आढळते [→ वनस्पति, प्रकटबीज उपविभाग वनस्पति, आवृतबीज उपविभाग]. या कालखंडात (ऑलिगोसीन काळात) प्रथम उष्णकटिबंधीय वने जगभर वाढली, पण पुढे (मायोसीन काळात म्हणजे दोन कोटी वर्षांपूर्वी) त्यावर मर्यादा पडल्या. त्यानंतर प्लायोसीन काळात वनस्पतिप्रसार व वनांचा विस्तार कमी झाला,  ⇨ ओषधींची संख्या वाढत चालली व कित्येक वृक्ष लुप्त झाले. सर्वांत आधुनिक काळात ओषधींचे प्राबल्य आढळते.

वरील सर्व माहितीवरून पृथ्वीवर वनस्पति-जीवन एकसारखे बदलत आले असून काही वनस्पति- गटांचा उदय, विस्तार व अस्तही झाला आहे बहुतेक गटांचे काही वारस आज बदललेल्या स्थितीत टिकून आहेत व एकंदरीने वनस्पति-शरीरात जटिलता वाढत आली आहे वगैरे गोष्टी कळून येतात.

आ. ७. वनस्पतींच्या भिन्न गटांतील परस्परसंबंध दर्शविणारा वंशवृक्ष : स्फेनोप्सिडा (हेनिएलीझ, स्फेनोफायलेलीझ, कॅलॅमइटेलीझ, एक्विसीटेलीझ) लायकोप्सिडा (लायकोपोडिएलीझ, सिलाजिनेलेलीझ, लेपिडोंड्रेलीझ, आयसॉएटेलीझ, प्ल्यूरोमिएलीझ) टेरोप्सिडा (नेचे, प्रकटबीज आवृत्तबीज) स्किझोमायकोफायटा-सूक्ष्मजंतू यूमायकोफायटा- खरे कवक मिक्सोमायकोफायटा-श्लेष्मकवक क्लोरोफायटा-हरित शैवले फेओफायटा-पिंगल शैवले ऱ्होडोफायटा-लाल शैवले स्यानोफायटा-नील-हरित शैवले शेवाळी (ब्रायोफायटा) – हरिता, शृंगका, यकृतका इतर शैवले-यूग्लिनोफायटा, पायरोफायटा, क्रायसोफायटा.जातिविकास : विद्यमान व अश्मीभूत वनस्पतींच्या भिन्न गटांत आढळणारी संरचना, प्रजोत्पादन इत्यादींच्या सूक्ष्म अभ्यासाने वनस्पतिशास्त्रज्ञांना त्यांचे नैसर्गिक आप्तभाव बव्हंशी कळून आले आहेत. त्या आधारावर सध्या सर्व गटांची मांडणी संबंधनिदर्शक अशा वंशवृक्षाच्या स्वरूपात दर्शविली जाते याला ‘क्रमविकासी वृक्ष’ असेही म्हणतात. कारण त्यावरून वनस्पतींच्या क्रमविकासात त्या गटांची स्थाने, परस्परसंबंध प्रगतीच्या उच्चतेतील पातळी व जटिलतेतील दर्जा यांचा बोध होतो. अनेक वनस्पतिशास्त्रज्ञांत भिन्न गटांतील परस्परसंबंधाबद्दल एकमत नसल्याने वंशवृक्ष सुचविण्यात आले आहेत त्यांपैकी बहुतेकांनी मान्य केलेला आ. ७ मध्ये दिला आहे. त्यातील प्रत्येक गटातील लहान गटांचे परस्परसंबंध (म्हणजेच ह्या वंशवृक्षाच्या लहान लहान फांद्या) मोठ्या गटांच्या स्वतंत्र वर्णनात चर्चिले आहेत. या आकृतीच्या खाली काही गटांचे उपगट व काहींचे मराठी पर्यायी शब्द दिले आहेत.

आ. ७ मध्ये फक्त मुख्य गटांचा समावेश असून सूक्ष्मजंतू सर्वांत प्राचीन व त्यांच्या किंवा तत्सम पूर्वजांपासून शैवले व कवके यांच्या भिन्न गटांचा उगम झाला असावा असे दर्शविले आहे. कायक (ज्यांच्या शरीराचे मूळ व खोड असे प्रभेदन झालेले नाही अशा) वनस्पतींपैकी फक्त हरित शैवालासारख्या पूर्वजांपासून निघणाऱ्या वनस्पतींचा (सायलोफायटेलीझ) क्रमविकास उच्च वनस्पतींत झाला आहे. तसेच काहींचा क्रमविकास स्वतंत्र रीत्या शेवाळ्यांत झाला आहे. त्यापासून पुढे कोणताही नवीन गट निर्माण झालेला नाही. नेच्यांपैकी काही प्राचीन व लुप्त गटांपासून पुढे बीजी नेचे या वनस्पती अवतरल्या असाव्यात. प्रकटबीज व आवृत्तबीज हे गट समान पूर्वजांपासून स्वतंत्र रीत्या अवतरले असून फुलझाडांपैकी द्विदलिकितांचा उगम एकदलिकितांपूर्वी झाला असावा, तसेच द्विदलिकितांपैकी रॅनेलीझ गणातून एकदलिकित वनस्पती उगम पावल्या असाव्या. या वंशवृक्षाच्या तळाशी स्वतंत्रपणे अनेक लहान फांद्यांचा गट असून त्यांपैकी फक्त एकच फांदी पुढे वाढत जाऊन पुन्हा अनियमितपणे शाखायुक्त बनली आहे. कित्येक विद्यमान गट फक्त फांद्यांची टोके असून त्यांपासून पुढे नवीन गट उद्‍भवलेले नाहीत.


क्रमविकास : वनस्पतींच्या क्रमविकासाचा अधिक तपशीलवार विचार करता एकंदरीने असे आढळते की, आरंभी असलेल्या सूक्ष्म व एककोशिक वनस्पतींपासून अनेककोशिक, मोठ्या, अंतर्बाह्य जटिल व प्रभेदित संरचनायुक्त वनस्पती विकास पावल्या कोणत्यातरी प्रारंभिक अलिंग पद्धतीपासून सलिंग प्रजोत्पादन झाले असून सर्व स्थलवासींचा उगम मूळच्या जलवासींपासून झाला. स्थलवासींत स्थलकालपरत्वे पडलेल्या संरचनेतील फरकांमुळे स्थलजीवन यशस्वी झाले. हे फरक म्हणजे अधिक बाष्पीभवनाला विरोध करणारी ⇨उपत्वचा, ⇨अपित्वचा  व ⇨त्वग्रंध्रे, विशेषत्व पावलेले शोषक अवयव व वाऱ्याने पसरविली जाणारी बीजुके यांशिवाय वाहक व आधार देणाऱ्या कोशिकांमुळे सरळ वाढ आणि मोठे आकारमान साध्य झाले. परागण (पराग सिंचन) व बीजप्रसार हे वायवी (हवाई) साधनांमुळे बरेच वाढल्याने वनस्पतींच्या प्रसारास मोठी चालना मिळाली. प्रमुख अवयवांत शाकीय (वाढ व पोषण या कार्यांशी संबंधित) व प्रजोत्पादक असे प्रागतिक प्रभेद होऊन शंकू (सूचिपर्णी वृक्षाचे काहीशा लांबट अक्षावरील पराग व बीजकधारक खवले) व फुले अस्तित्वात आली. बीजांचा उगम व विकास होण्यामध्ये जे फरक पडले त्यात मूळच्या बीजुककोशात (बीजुके धारण करणाऱ्या पिशवी सारख्या भागात) सूक्ष्म बीजुकधारी (लाक्षणिक प्रजोत्पादक भाग असलेल्या) पिढीचा व संक्षिप्त गंतुकधारी (प्रजोत्पादक कोशिका असलेल्या) पिढीचा समावेश होतो. जीवनचक्रात गंतुकधारींचा ऱ्हास व बीजुकधारी पिढीचा विकास झाला. बीजी वनस्पतीतींल  परागनलिकेच्या विकासामुळे फलनक्रियेत तत्पूर्वी आवश्यक ठरलेले पाण्याचे अवलंबन राहिले नाही, म्हणजे स्वावलंबन साधले. क्रमविकासात नेहमीच सर्वदृष्ट्या प्रगती आढळते असे नाही. अपवादस्वरूप परागती (उच्च श्रेणीतून नीच श्रेणीत जाणे) कधीकधी आढळते. गवतांची फुले, कवकांतील सलिंग प्रजोत्पादन, जीवोपजीवी फुलझाडे (उदा., अमरवेल, बंबाखू, टारफुला इ.) ही उदाहरणे यांपैकी होत. परंतु यामुळे प्रगतीच्या मुख्य धोरणाला धक्का पोहोचलेला नाही. भिन्न गटांच्या क्रमविकासात कधीकधी समान बदल घडून येऊन काही शारीरिक लक्षणांत साम्य येते, याला समांतरित क्रमविकास म्हणतात (उदा., द्विदलिकित आणि एकदलिकित). कधीकधी अशा क्रमविकासातून गेलेल्या जातींचे किंवा वंशांचे अंतिम स्वरूप इतके सारखे बनते की, सकृत्‍दर्शनी यांचे खरे स्वरूप (नैसर्गिक स्थान) ओळखणे कठीण पडते (उदा., घायपात व कोरफड कॅक्टेसी व यूफोर्बिएसी कुलातील काही वंश किंवा जाती) याला समाभिरूपी क्रमविकास म्हणतात (आ. ८).

आ.८. समाभिरूपी क्रमविकास (वनस्पती) : रुक्ष हवा व कमी पाऊस यांमुळे घडून आलेला खोडातील मांसलपणा हे समाभिरूपी क्रमविकासाचे एक उदाहरण असू ते दर्शविणाऱ्या भिन्न कुलांतील पाच जाती : (१) सिसस क्वाड्रँग्युलॅरिस (व्हायटेसी) (२) सेनेशिओ स्टॅपेलिफॉर्मिस (कंपॉझिटी) (३) सेरियस एक्विक्वेंसिस (कॅक्टेसी) (४) ह्यूर्निया वेरेकेरी (ॲस्क्लेपीएडेसी) (५) यूफोर्बिया फिंब्रिॲटा (यूफोर्बिएसी).

क्रमविकासाच्या सत्यतेबद्दल आज शास्त्रज्ञांत दुमत नाही, परंतु त्या प्रक्रियेच्या यंत्रणेबद्दल भिन्न मतप्रवाह आहेत. तथापि बहुसंख्य विद्वानांच्या मते ‘उत्परिवर्तनासारख्या’प्रभेदांचा [→आनुवंशिकी]क्रमविकासात फार मोठा वाटा आहे व नैसर्गिक निवडीमुळे विशिष्ट परिस्थितीत हितकारक ठरलेल्या उत्परिवर्तन असलेल्या व्यक्ती जीवनात यशस्वी ठरून नवीन जातींची उत्पत्ती होते, असे मानण्यात येते. मात्र बाह्य परिस्थितीचे कार्य फक्त निर्देशनाचे असते, उत्परिवर्तनाला ती कारणीभूत नसते. वनस्पती आपल्या परिस्थितीची निवड करू शकत नाहीत. त्यांच्या शरीरातील जनुकांत किंवा गुणसूत्रांत घडून आलेल्या बदलांमुळे [→ बहुगुणनवनस्पति-प्रजनन]जे शारीरिक फरक संततीत दिसतात त्यांवर परिस्थिती आपल्या प्रभावाने पसंतीचा (किंवा नापसंतीचा) शिक्का मारते आणि व्यक्तीची कार्यक्षमता किंवा अकार्यक्षमता ठरविते. परिस्थितीमुळे काही प्रभेद निर्माण होतात, परंतु क्रमविकासातील त्यांच्या मूल्याबद्दल  मतैक्य नाही. याशिवाय नैसर्गिक व समुद्र, नद्या, पर्वत इ. न ओलांडता येण्यासारख्या अडथळ्यांमुळे पृथक् (अलग) झालेल्या संबंधित जातींच्या समूहात उद्‍भवणाऱ्या भिन्न उत्परिवर्तनांची व अन्य प्रभेदांची भिन्न परिस्थितींत वाढणाऱ्या जातींत भिन्न प्रकारे निवड होऊन नवीन जातींचा क्रमविकास झाला असण्याची शक्यता बरीच आढळते क्रमविकासास पोषक अशा या परिस्थितीच्या घटकास एकलन म्हणतात.

पहा : उत्परिवर्तन कवक जीवोत्पत्ति पुराजीवविज्ञान पुराप्राणिविज्ञान पुरावनस्पतिविज्ञान प्राणिसृष्टीचे संघ व वर्ग प्राण्यांचे वर्गीकरण वनस्पति, अबीजी विभाग वनस्पति, बीजी विभाग वनस्पतींचे वर्गीकरण संकरज ओज.

परांडेकर, शं. आ.

संदर्भ : 1. Dadson, E. O. Evolution – Process and Product, New York, 1960.

          2. Dittmer, H. J. Phylogeny and Plant Form in the Plant Kingdom, New York, 1964.

          3. Fuller,  H. J. The Plant World, New York, 1955.

          4. Hegner, R. W. Invertebrate Zoology, New York, 1960.

          5. Hyckman, C. P. Integrated Principles of Zoology, Tokyo, 1966.

          6. Hyman, H. L. The Invertebrates, 6 Vols., New York, 1959.

          7. Taylor, W. T. Weber, R. J. General Biology, New York, 1961.

          8. Villee, C. A. Walker, W. F. Smith, F. E. General Zoology, Tokyo, 1968.

          9. Whaley, W. G. etal, Principles of Biology, New York, 1964.

        10. Wilson, C. L. Loomis, W. E. Botany, New York, 1957.