बटाटा : (हिं. आलू गु. बटाटा क. आलु-गिठ्ठे इं. पोटॅटो लॅ.सोलॅनम ट्यूबरोजम कुल-सोलॅनेसी). ही वर्षायू (एका हंगामात जीवनक्रम पूर्ण होणारी) वनस्पती मूळची दक्षिण अमेरिकेतील पेरू−बोलिव्हियाच्या सीमेवर तितकाका सरोवराजवळील ३,००० ते ४,५०० मी. उंचीपर्यंतच्या प्रदेशातील असून सु. २,००० वर्षापूर्वीपासून तेथे ती लागवडीत आहे, असे मानण्यात येते. स्पॅनिश दर्यावर्दी लोकांनी ही वनस्पती यूरोपात १५८७ च्या सुमारास आणली व पुढे ४० वर्षांनी तिची भारतात आयात झाली. पोर्तुगीज लोकांनी तिची भारताच्या पश्चिम किनाऱ्याजवळच्या प्रदेशात लागवड सुरू केली व तेथे तो पोर्तुगीज भाषेतील बटाटा या नावाने ओळखली जाऊ लागली. ब्रिटिश व्यापाऱ्यांनी ती बंगालमध्ये नेली व तेथे ती आलू या नावाने ओळखली जाऊ लागली.

ही वनस्पती ०.३ ते १.२५ मी. उंच वाढणारी असून तिचे जमिनीवर वाढणारे खोड ओषधीय [⟶ओषधि], मऊ, हिरव्या अथवा जांभळट रंगाचे, शाखायुक्त, त्रिकोणाकृती, पोकळ अथवा भरीव असून त्रिकोणाच्या दोन बाजूंना पंखासारखी ठळक वाढ दिसून येते. खोडात काष्ठमय भाग थोडा असतो. पाने संयुक्त ,कमीअधिक प्रमाणात लोमश (लवदार) पिसासारखी असून टोकाला एक मोठे दल असते. समोरासमोरच्या दलांच्या जोड्यामध्ये दलके असतात. मुळ आगंतुक मुख्य खोडाच्या पेऱ्‍यांवर व सामान्यतः जमिनीच्या वरच्या थरात वाढणारी असतात. फुले पांढरी किंवा निळी असून वल्लरीत [⟶ पुष्पबंध ] येतात. संवर्त लहान व पुष्पमुकुट चक्राकृती असतो. मृदुफळे गोलसर,१.२५ ते २.५० सेंमी. व्यासाची असून त्यांत सु. १.५ मिमी. आकारमानाच्या चपट्या, अंडाकृती १०० ते ३०० विषारी बिया असतात.

या वनस्पतीच्या भूमिगत खोडाच्या फांदीला तिरश्वर अशी संज्ञा असून त्याचे फुगीर टोक म्हणजेच बटाटा (ग्रंथिक्षोड) होय. बटाट्याच्या सालीचा रंग पांढरा (फिकट पिवळा) ते तपकिरी अथवा फिकट लाल अथवा जांभळा असतो. बटाटे गोल, अंडाकृती ,दंड गोलाकृती, लांबट दंडगोलाकृती असे निरनिराळ्या आकाराचे आणि निरनिराळ्या आकारमानाचे असतात. तळाकडील बाजूपेक्षा शेंड्याकडील बाजूवर डोळ्यांची संख्या जास्त असते. डोळे खोल, मध्यम खोल अथवा उथळ असतात.गर पांढरा, फिकट पिवळा अथवा पिवळा असतो. काही प्रकारांत तो कडेच्या बाजूला तांबूस असतो. [⟶सोलॅनेसी].

आ.२. बटाटा : फुलाचा उभा छेद : (१) संवर्त, (२) पुष्पमुकुट, (३) केसरमंडल, (४) किंजमंडल.

आ. १. बटाटा : खोड, पान व फुलोरा : (१) खोड, (२) उपपर्ण, (३) संयुक्त पान, (४) दले, (५) दलक, (६) पुष्पबंधाक्ष, (७) कळी, (८) देठ, (९) फूल.

आ. ३. बटाटा : फळ : (१)मृदुफळ, (२) उभा छेद, (३) बिया. आ. ४. बटाटा :झाडाचा जमिनीखालील भाग : (१) बेण्याची फोड, (२) मुख्य खोड, (३) तिरच्श्रर, (४) बटाटा, बट्याटाचा तळ, (६) शेंडा, (७) कोंबासहित डोळा, (८) मुळे.

लागवडीखालील क्षेत्र व उत्पादन : बटाटा हे जगातील आठ प्रमुख अन्न-पिकांपैकी एक असून भाजीपाल्याचे ते सर्वात महत्त्वाचे पीक आहे. सारख्याच क्षेत्रात तृणधान्यापेक्षा बटाट्याच्या उत्पादनापासून थोड्या मुदतीत जास्त कॅलरी मिळतात.

हे पीक मुख्यत्वेकरून उत्तर गोलार्धातील समशीतोष्ण प्रदेशात होते. उत्तर ध्रुवीय प्रदेशातही परस बागांतून त्याची लागवड केली जाते.


 इ. स. १९७८ मध्ये जगात बटाट्याची लागवड १.८२ कोटी हेक्टर क्षेत्रात करण्यात आलेली होती आणि ती प्रामुख्याने रशिया (७०.४२ लक्ष हेक्टर) ,पोलंड (२२.७८) ,चीन (१४.०४), भारत (६.६४), पूर्व जर्मनी (५.६०) व अमेरिकेची संयुक्त संस्थाने (५.५४) या देशांत करण्यात आली होती. त्या वर्षी जगातील बटाट्याचे एकूण उत्पादन सु. २७.३० कोटी टन झाले. उत्पादनाचे प्रमुख देश आणि त्यांचे उत्पादन (कोटी टन) पुढीलप्रमाणे होते: रशिया ८.६,पोलंड, ४.६६, अमेरिकेची संयुक्त संस्थाने १.६३, चीन १.२, पश्चिम जर्मनी १.०५, आणि पूर्व जर्मनी १.०१, रशियासह यूरोपातील सर्व देशांत मिळून एकूण उत्पादनाच्या सु. ७१% उत्पादन झाले. दर हेक्टरी ३०० क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन नेदर्लेंड्स (३८६) स्वित्झर्लंड (३७२), बेल्जियम (३४४), इझ्राएल (३३९), ब्रिटिश बेटे (३३३) आणि स्वीडन (३०७) या देशांत झाले. भारतात ते फक्त १२३ क्किंटल होते.

भारतातील १९७७-७८ सालातील बटाट्याखालील राज्यवार क्षेत्र, एकूण उत्पादन आणि दर हेक्टरी उत्पादन. 

राज्य 

क्षेत्र (हजार हेक्टर) 

एकूण उत्पादन (हजार टन) 

हेक्टरी उत्पादन (किग्रॅ.) 

आंध्र प्रदेश

०.३

०.३

आसाम 

३३.३ 

१३५.६ 

४,०७२ 

उत्तर प्रदेश 

२१३.४ 

३,२०४.८ 

१५,०१८ 

ओरिसा 

६.६ 

४६.२ 

७,००० 

कर्नाटक 

११.५ 

१०७.० 

९,३०४ 

गुजरात 

७.५ 

१८३.८ 

२४,५१० 

जम्मू काश्मीर 

२.५ 

६.८ 

२,७२०  

तमिळनाडू 

११.८ 

१५३.८ 

१३.०३३ 

त्रिपुरा 

२.१ 

२६.० 

१२,३८१ 

नागालँड 

३.७ 

२०.० 

५,४०५ 

पंजाब 

२७.० 

५८०.० 

२१,४८१ 

प.बंगाल 

१२५.८ 

१,९०८.३ 

१५,१६९ 

बिहार 

१४२.२ 

१,१५३.५ 

८,१२३ 

मणिपूर 

१.५ 

६.४ 

४,२६७ 

मध्य प्रदेश 

२०.२ 

२३२.० 

११,४८४ 

महाराष्ट्र 

१०.९ 

५०.२ 

४,६०६ 

मेघालय 

१७.६ 

८०.८ 

४,५९१  

राजस्थान 

२.४ 

४.० 

१,६६७ 

हरियाणा 

९.९ 

१७९.२ 

१८,१०१ 

हिमाचल प्रदेश 

१३.७ 

७२.४ 

५,२८५ 

एकूण 

६६४.४ 

८,१५३.२ 

१२,२७२ 

भारतात बटाट्याची लागवड सतराव्या शतकाच्या सुरूवातीला सुरू होऊन हलकेहलके वाढत एकोणिसाव्या शतकाच्या सुरूवातीला ती मोठ्या प्रमाणावर होऊ लागली. लागवडीला चालना देण्यासाठी त्या वेळचे गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्ज यांचे प्रयत्न पुष्कळ अंशी कारणीभूत झाले. १९५०-५१ मध्ये देशात बटाट्यासारखी २.४० लक्ष हेक्टर क्षेत्र होते ते १९७७-७८ सालात ६.६४ लक्ष हेक्टरपर्यंत आणि उत्पादन १६.६० लक्ष टनांवरून ८१.५३ लक्ष टनांपर्यंत वाढले. दर हेक्टरी उत्पादन त्याच काळात ६९.२ क्किंटलवरून १२३ क्किंटलपर्यंत वाढले. केरळखेरीज सर्व राज्यांत व केंद्रशासित प्रदेशांत बटाट्यांची लागवड होते. १९७७-७८ सालात देशातील निरनिराळ्या राज्यांतील बटाट्याखालील क्षेत्र, एकूण उत्पादन आणि दर हेक्टरी उत्पादन मागील कोष्टकामध्ये दिली आहेत.


महाराष्ट्रातील क्षेत्रांपैकी ८०% क्षेत्र पुणे व सातारा या दोन जिल्ह्यात आहे. अहमदनगर व नासिक या दोन जिल्ह्यांत १०% आणि बाकीचे मराठवाडा आणि विदर्भात विभागून आहे. पुणे व नासिक जिल्ह्यांत ते मुख्यत्वेकरून रबी हंगामात आणि सातारा व अहमदनगर जिल्ह्यांत ते मुख्यत्वेकरून खरीप हंगामात घेतात.

प्रकार : भारतात लागवडीत असलेल्या बटाट्याच्या प्रकारांचे तीन गट पडतात.

(१) देशी प्रकार : बटाट्याच्या लागवडीच्या सुरूवातीच्या काळापासून लोक अनेक प्रकारची  यूरोपातून भारतात आयात करण्यात आली. त्यांपैकी जे प्रकार अद्याप लागवडीत आहेत परंतु ज्यांचा निश्चित इतिहास माहीत नाही, असे हे प्रकार असून त्यांपैकी  महत्त्वाचे प्रकार म्हणजे फुलवा, साठा, गोला, साठ आणि दार्जिंलिंग गोल लाल हे आहेत. फुलवा हा प्रकार विशेषेकरून उत्तर प्रदेश व बिहार या राज्यांत आणि त्या खालोखाल ओरिसा, पं. बंगाल, पंजाब आणि मध्य प्रदेशात मोठ्या प्रमाणावर लागवडीत आहे.‘पाने वळणे’ या व्हायरसजन्य रोगाला तो बळी पडतो. परंतु बटाटे साठविण्याच्या स्थानिक पध्दतीत उष्णतेमुळे हा रोग नाहीसा होतो व बेणे रोगमुक्त होते. साठा हा प्रकार बिहार राज्यात (बिहारशरीफ भागात) विशेष लागवडीत आहे. गोला हा हळवा प्रकार उत्तर प्रदेशात आणि साठ हिमाचल प्रदेशातील डोंगराळ भागात लागवडीत आहे.

(२) विदेशी प्रकार : परदेशातून आयात केलेल्या प्रकारांपैकी ज्यांचा इतिहास माहीत आहे असे प्रकार. यांपैकी अप-टु-डेट (नंबरी) व ग्रेट स्कॉट हे प्रकार विशेष लागवडीत आहेत. अप-टु-डेट हा प्रकार सिमल्याच्या डोंगराळ भागात फार वर्षापासून लागवडीत असून बेण्यासाठी महाराष्ट्रात त्याची रवी हंगामात फार मोठ्या प्रमाणावर आयात केली जाते. पंजाब,उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, राजस्थान व मध्य प्रदेश  या राज्यांतील सपाटीच्या प्रदेशात लागवडीसाठी हा प्रकार योग्य असून उत्पन्न फार चांगले मिळते. बटाटे गुळगुळीत सालीचे पांढरे, मध्यम ते मोठ्या आकारमानाचे, दंडगोलाकृती व काहीसे चपटे व आकर्षक असून डोळे उथळ असतात. आतील गर पांढरा असतो. फार वेळ शिजू दिल्यास ते फुटतात व गर रवाळ बनतो. लागण केल्यापासून ९०–९५ दिवसांत हा प्रकार तयार होतो तो रोगांना लवकर बळी पडतो. महाराष्ट्रात त्याचे हेक्टरी उत्पन्न १४१ क्किंटल मिळते. ग्रेट स्कॉट (मेट्टूपलायम) हा हळवा प्रकार निलगिरी भागात असून दोन तृतीयांशापेक्षा जास्त क्षेत्रात त्याची लागवड केली जाते. बटाटे पांढरे, गोल व आकर्षक असतात. क्रेग्ज् डिफायन्स हा प्रकार पंजाबात मोठ्या प्रमाणावर लागवडीत आहे.

(३) भारतातील संशोधनातून निर्माण झालेले प्रकार : सिमला येथील मध्यवर्ती संशोधन केंद्राने प्रजननाने निर्माण केलेले काही लोकप्रिय प्रकार पुढीलप्रमाणे आहेत.

कुफरी चंद्रमुखी हा हळवा (७५–८० दिवसांत तयार होणारा) प्रकार सखल प्रदेशात खरीप व रबी हंगामांसाठी योग्य असून बटाटे आकारमानाने मोठे, चपटे, मलईच्या रंगाचे असून पृष्ठभाग गुळगुळीत असतो. उत्पन्नाच्या चांगला असून साठवणीमध्ये चांगला टिकतो. मात्र तो गरवा करपा या रोगाला विशेष बळी पडणारा असल्यामुळे डोंगराळ भागात विशेषतः पावसाळी हंगामात लागवडीस योग्य नाही. कुफरी सिंधुरी हा ९० ते १२० दिवसांत तयार होणारा गरवा प्रकार असून बटाटे लाल अथवा शेंदरी रंगाचे ,गोल व मध्यम आकारमानाचे असून डोळे मध्यम खोल असतात. गर फिकट पिवळा, चवीला चांगला व शिजल्यावर घट्ट राहतो. हा प्रकार फक्त रबीसाठी योग्य आहे. कुफरी लवकर हा प्रकार दक्षिणेच्या पठारी भागात फक्त सु. ६५ दिवसांत तयार होतो. बटाटे वाटोळे, मलईच्या  रंगाचे असून डोळे मध्यम खोल असतात. गर पांढरा व चवीला चांगला .रबी व खरीप हंगामात हा प्रकार लागवडीस योग्य आहे. कुफरी अलंकार हा सु. ७५ दिवसांत तयार होणारा गरवा करपा रोगाला प्रतिकारक प्रकार आहे. बटाटे अंडाकृती व पांढरे असून गर पांढरा असतो.

आ. ५. बटाट्याचे लागवडीतील काही प्रसिद्ध प्रकार : (१) अप-टु-डेट, (२) कुफरी चंद्रमुखी, (३) कुफरी सिंधूरी, (४) कुफरी अलंकार.

कुफरी ज्योती आणि कुफरी मोती हेही प्रकार गरवा करपा रोगाला प्रतिकारक असून पहिला पं. बंगाल,कर्नाटक व गुजरात या राज्यांत व दुसरा निलगिरी टेकड्यांत लागवडीस योग्य आहे. 


हवामान : भारतात हे पीक निरनिराळ्या हवामानांत व समुद्र सपाटीपासून हिमालयात ३,३०० मी. उंचीवरील प्रदेशात घेतात परंतु ते मूलतः समशीतोष्ण प्रदेशात वाढणारे पीक असून पिकाच्या हंगामात हवेचे सरासरी तापमान २१से. पेक्षा कमी असल्यास सर्वात जास्त पीक येते. हिमतुषार या पिकाला मानवत नाहीत. जमिनीतील तापमान १७–२० से. बटाट्याच्या वाढीला पोषक असते. त्यापेक्षा ते जास्त झाल्यास झाडाची वाढ खुरटते व उत्पन्न कमी येते. जमिनीतील तपमान ३२ से.पेक्षा जास्त असल्यास बटाट्याची वाढ होत नाही. हिमालयाच्या डोंगराळ  भागात बटाट्याची लागण जानेवारीपासून मेपर्यंत  व काढणी  जुलैपासून ऑक्टोबरपर्यंत करतात. उत्तर भारत, मध्य भारत आणि प. बंगालमधील सखल प्रदेशात लागण सप्टेंबर ते नोव्हेंबर आणि काढणी डिसेंबर ते मार्चपर्यंत करतात. दक्षिणेकडील पठारी भागात हिवाळी हंगामात ऑक्टोबर -नोव्हेंबरमध्ये लागण करून काढणी फेब्रुवारी-मार्चमध्ये आणि पावसाळी हंगामातील लागण जूनमध्ये व काढणी ऑक्टोबरमध्ये होते. निलगिरी भागात मार्च ते जुलै, सप्टेंबर ते डिसेंबर आणि जानेवारी ते एप्रिल अशी वर्षातून तीन पीके घेतात.

जमीन : पाण्याचा चांगला निचरा असलेली तसेच जैव पदार्थ भरपूर प्रमाणात असलेली, नदीकाठच्या पोयट्याची अथवा मध्यम काळी अथवा जांभा दगडापासून तयार झालेली तांबडी जमीन या पिकाला चांगली असते. मातीचे pH मूल्य [⟶पीएच मूल्य] ५.२ ते ७.० पर्यंत असावे. भारी काळी, पाणथळ, लवणीय अथवा अल्कधर्मी  (pHमूल्य ७.० पेक्षा जास्त असलेली) जमीन या पिकाला मानवत नाही.

मशागत : जमीन लोखंडी नांगराने १८–२० सेंमी . खोल, उभी व आडवी नांगरून भुसभुशीत करतात. हेक्टरी २५ ते ३५ गाड्या शेणखत अगर कंपोस्ट घालून कुळवाच्या २-३ उभ्या-आडव्या पाळ्या देतात. बटाटे जमिनीत पोसत असल्यामुळे जमिनीचा वरचा थर चांगला भुसभुसीत असणे आवश्यक असते.

बेणे : प्रमाणित व रोगमुक्त बटाटे बेण्यासाठी वापरतात. बटाटे पूर्ण वाढलेले व त्यावर फुगलेले ठेंगणे, जाड व चांगले पोसलेले कोंब असावेत. अंधाऱ्‍या जागी वाढलेले लांब व बारीक कोंब लागणीनंतर वाळतात. बेणे शीतगृहात ठेवलेले असल्यास ते लागणीपूर्वी  ७–१० दिवस पसरट टोपल्यांतून हवेशीर जागी अभिसारित (मंद) प्रकाशात ठेवणे आवश्यक असते. बेण्याचे बटाटे ५ सेंमी. पेक्षा जास्त व्यासाचे असल्यास त्यांच्या फोडी करून बेण्यासाठी वापरतात. प्रत्येक फोड २० ते ३० ग्रॅम. वजनाची असावी व तिच्यावर कमीत कमी दोन डोळे (फुगलेले कोंब असलेले) असावे. कापतेवेळी रोगट बटाट आढळून आल्यास तो काढून टाकतात व कापण्याचे हत्यार मोरचुदाच्या सौम्य विद्रावात अथवा स्पिरीटमध्ये निर्जंतुक करून घेतात. सर्व कापलेल्या फोडी डायथेन एम–४५ या कवकनाशकाच्या (बुरशीसारख्या हरित द्रव्यरहित वनस्पतींच्या नाशासाठी वापरण्यात येणाऱ्या रसायनाच्या) १: ४५० या प्रमाणातील पाण्यातील विद्रावात बुडवून काढून थंड व हवेशीर जागी टोपल्यांत ठेवून त्या ओलसर गोणपाटाने झाकून ठेवतात व दुसऱ्या दिवशी लावण्यासाठी  वापरतात.

लागवड : तयार करून ठेवलेल्या जमिनीत लाकडी नांगराने पाडलेल्या ३५ ते ४५ सेंमी रूंदीच्या तासाच्या तळाशी १८ ते २२ सेंमी. अंतरावर प्रत्येक जागी एक बेण्याची फोड टाकतात. दुसरा तास उघडताना पडलेल्या मातीने पहिल्या तासातील फोडी झाकल्या जातात. हेक्टरी  १,४०० ते २,००० किग्रॅ. बेणे लागते. कमाल तापमान ३०–३२से. आणि किमान तापमान १८–२० सें. असताना लागवड करणे फायदेशीर असते.

वरखत : वरखताची मात्रा मातीच्या परीक्षणावर अवलंबून असते. स्थानिक परिस्थितीवर अवलंबून हेक्टरी  ७५ पासून ३००किग्रॅ. नायट्रोजन देण्याची शिफारस करण्यात येते. तसेच खत देण्याच्या पध्दतीतही स्थानिक परिस्थिती विचारात घेतली जाते. सर्वसाधारणपणे सपाटीच्या प्रदेशात हेक्टरी १२० किग्रॅ. नायट्रोजन (अमोनियम सल्फेटाच्या स्वरूपात), ८० किग्रॅ. फॉस्फोरिक अम्ल आणि १०० किग्रॅ. पोटॅश देण्याची शिफारस करण्यात येते. (यांपैकी निम्मा नायट्रोजन आणि सर्व फॉस्फोरिक अम्ल आणि पोटॅश लागणीच्या वेळी आणि निम्मा नायट्रोजन झाडांना मातीची भर देते वेळी). लागणीच्या वेळी सऱ्‍यांमध्ये हेक्टरी ३० टन शेणखत आणि १२० किग्रॅ. नायट्रोजन वरखत दिल्याने सर्वांत जास्त उत्पन्न मिळते, असे आढळून आले आहे. या पध्दतीमध्ये फॉस्फोरिक अम्ल व पोटॅश देण्याची जरूरी नसते. डोंगराळ भागात नायट्रोजन, फॉस्फोरिक अम्ल व पोटॅश प्रत्येकी १०० किग्रॅ. देण्याची शिफारस करण्यात येते. जमिनीत सूक्ष्म पोषक द्रव्यांची कमतरता असल्यास त्यांची आवश्यकतेप्रमाणे फवारणी करतात.

आंतर मशागत : लागणीनंतर सु. ५-६ आठवड्यांनी अखंड फासेच्या कोळप्याने कोळपणी देतात. पिकाला फुले येण्यास सुरूवात झाल्यावर झाडांच्या बुंध्याशी मातीची भर देतात. याचा हेतू बटाटे उघडे पडू न देणे हा असतो. मातीने न झाकलेले बटाटे हिरवे पडतात व ते खाण्यास योग्य नसतात.

पाणीपुरवठा : खरीपातील पिकाला पाणी देण्याची सहसा गरज पडत नाही. रबी पिकाला पहिले पाणी लागण संपल्याबरोबर माफक प्रमाणात देऊन दुसरे १५-२० दिवसांनी आणि त्यानंतच्या पाण्याच्या पाळ्या ८-१० दिवसांच्या अंतराने नियमितपणे देतात. विशेषतः बटाटे पोसण्याच्या सुमारास पाण्याची पाळी लांबू न देणे महत्त्वाचे असते. पाण्याअभावी जमीन वाळल्यास व नंतर पुन्हा पाणी दिल्यास लागलेले बटाटे सडकतात व नवीन बटाटे चांगले पोसत नाहीत. वाजवीपेक्षा जास्त प्रमाणात नायट्रोजन आणि वारंवार पाणी दिल्याने बटाटे प्रमाणाबाहेर मोठे होतात व त्यांची प्रतही कमी होते. हा दुष्परिणाम टाळण्यासाठी झाडांवर ए बी ए अथवा एलिथीन यासारख्या वृध्दिनियंत्रक द्रव्यांची फवारणी करतात.


रोग : बटाट्याच्या पिकावर कवकांमुळे, सूक्ष्मजंतूमुळे, व्हायरसांमुळे आणि वातावरणीय परिस्थितीमुळे अनेक रोग पडतात. फक्त महत्त्वाच्या रोगांचा येथे निर्देश केला आहे.

कवकजन्य रोग :  (अ) करपा : या रोगात हळवा करपा आणि गरवा असे भेद आहेत. हळवा करपा रोग आल्टर्नेरिया सोलॅनी या कवकामुळे होतो. पानावर विखुरलेले फिकट तपकिरी रंगाचे गोल अगर अनियमित आकाराचे ठिपके आढळून येतात. ठिपके पडलेला पानाचा भाग कोरडा व ठिसूळ असतो. ठिपके मोठ्या संख्येने असल्यास पाने वाळतात व गळून पडतात. खोडावर व बटाट्यांवरही रोगांचे ठिपके दिसून येतात. १०-४५० से. एवढ्या मर्यादेत हा रोग वाढू शकतो परंतु २६-२८ से. तापमानात तो झपाट्याने वाढतो. उपाय : रोगाची सुरूवात होण्याच्या नेहमीच्या वेळेपूर्वी एक आठवडा बोर्डो मिश्रण (०.३%) अथवा कोणत्याही ५०% ताम्रयुक्त कवकनाशकाची फवारणी करतात आणि नंतर जरूरीप्रमाणे फवारणी करतात.

गरवा करपा रोग हा फायटोप्थोरा इन्फेस्टॅन्स या कवकामुळे होतो. शीतगृहात साठवून ठेवलेल्या बेण्याच्या बटाट्यांतून रोगाचा प्रादुर्भाव होतो. पानावर प्रथम काळपट तपकिरी रंगाचे ठिपके आढळून येतात व दमट हवेत त्यांचे आकारमान मोठे होते. पानाच्या खालच्या बाजूला पांढरट रंगाची कवकाची वाढ दिसून येते. १५-२०से. पर्यंतचे थंड हवामान आणि ९०% पेक्षा जास्त सापेक्ष आर्द्रता असल्यास हा रोग झपाट्याने फैलावतो व झाडे कुजतात. पानाच्या देठावर, मध्यशिरेवर आणि खोडावरही वेग आढळून येतो. बटाटे लागल्यावर त्यांवर रोग पसरतो व त्यांचा सालीखालील भाग कुजतो. मागाहून त्यात सूक्ष्मजंतूंचा प्रवेश होऊन बटाटे अल्प काळात कुजतात. उपाय : रोगाची सुरूवात दिसून येताच बोर्डो मिश्रण (१%) अथवा ताम्रयुक्त कवकनाशकाची फवारणी करतात. या रोगाला प्रतिकारक असे प्रकार (उदा. कुफरी, अलंकार, कुफरी ज्योती इ.) उपलब्ध आहेत. त्यांची लागवड करणे हा सर्वात उत्तम उपाय आहे.

(आ) जलाश्म (स्क्लेरोशियम) रोग : स्क्लेरोशियम रोल्फसाय या कवकामुळे खरीपाच्या पिकावर गरम व कोरड्या हवामानात पडणाऱ्या रोगामुळे काही वेळा फार नुकसान होते. कवकाचे वास्तव्य जमिनीत असते. अनुकूल परिस्थतीत झाडाचा जमिनीलगतचा भाग, मुळे आणि त्याभोवतालची माती यांवर कवकाची पांढऱ्या रंगाच्या जाड तंतूसारखी वाढ झालेली आढळून येते व त्यावर मोहरीच्या आकाराचे कवकाचे जालाश्म (गुठळ्या) दिसून येतात. लागणीपूर्वी बेण्याला पारायुक्त औषध लावल्यामुळे यारोगाचे प्रमाण कमी राहते.

(इ) मॅक्रोफोमिना फॅसिओलाय : या कवकामुळे काढणीच्या वेळी बटाटे कुजतात. जमिनीचे तापमान २२सें.पर्यंत जाण्यापूर्वी बटाट्याची काढणी केल्यास रोगाची लागण होत नाही व साठवणीमध्ये बटाटे कुजण्याचे प्रमाण कमी राहते. रोगाचे वास्तव्य जमिनीतच असते व अनुकूल परिस्थितीत बटाटे कुजतात. या कवकामुळे अनेक पिकांवर रोग पडतो.

सूक्ष्मजंतूजन्य रोग : (अ) बांगडी :स्यूडोमोनस सोलॅनेसिॲरम या सूक्ष्मजंतूमुळे होणाऱ्या रोगाचा प्रादुर्भाव रोगग्रस्त बेण्यामधून अथवा रोगग्रस्त शेतामधून होतो. खोड, मुळे, भूमिगत खोड आणि बटाटे यांमधील वाहक ऊतकांमध्ये (द्रव पदार्थ वाहून नेणाऱ्या पेशींच्या समूहांमध्ये) जंतूची वाढ होते. झाडे कोमेजून मरतात. रोगट बटाटे कापल्यास आत बांगडीच्या आकाराचा काळसर कडा असलेला भाग दिसून येतो व तो दाबल्यावर त्यातून पांढरा चिकट पदार्थ बाहेर पडतो. त्यात रोगांचे जंतू फार मोठ्या संख्येने असतात. या रोगाला संपूर्णपणे प्रतिकारक असा बटाट्याचा प्रकार उपलब्ध नाही. उपाय :  रोगमुक्त बेणे वापरणे रोगग्रस्त शेतात २ ते ४ वर्षे बटाटे अगर वांगी, टोमॅटो, मिरची यांसारखे सोलॅनेसी कुलातील कोणतेही पीक न घेणे शेतात पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होईल अशी तजवीज करणे.

(आ) कूज : एर्वीनिया कॅरोटोव्होरा या जमिनीतील सूक्ष्मजंतू मुळे होणारा रोग. उभी झाडे वाळतात आणि जमिनीलगतच्या खोडाचा रंग काळा पडतो. रोगाचे जंतू खरचटलेल्या जागेतून बटाट्यात प्रवेश करतात. या जंतूमुळे साठवणीमध्ये बटाट्याचे फार नुकसान होते. उपाय : बटाट्याची काढणी, वाहतूक व साठवणी यांमध्ये बटाटे एकमेकांना घासले न जातील अशी काळजी घेणे व लागणीच्या वेळी बेणे निर्जंतुक करणे.

(इ) खवड्या : स्ट्रेप्टोमायसीज स्कॅबीज या सूक्ष्मजंतूमुळे बटाट्यावर १ सेंमी. व्यासाचे व ३ मिमी. खोलीचे खड्डे पडतात व त्यामुळे अशा बटाट्यांना बाजारात कमी भाव येतो. उपाय : लागणीसाठी रोगमुक्त बेणे वापरतात. अल्कधर्मी जमिनीत या रोगाचे प्रमाण जास्त असल्यामुळे जमीन अल्कधर्मी बनेल अशी वरखते वापरत नाही.


व्हायरजन्य रोग : या प्रकारातील रोगांमुळे भारतात बटाट्याच्या उत्पन्नात बरीच घट येते. सुमारे दहा निरनिराळे व्हायरसजन्य रोग बटाट्याच्या पिकावर आढळून येतात.

(अ) ‘व्हायरस वायू’ हा रोग विशेष नुकसानकारक आहे. पाने वेडीवाकडी होतात अथवा ती लहान आकारमानाची असतात. झाडांची वाढ खुरटते व रोगट झाडे लवकर काढणीसाठी तयार होतात. पानांवर जागोजाग हरितद्रव्याचा अभाव दिसून येतो व त्यावर काही जागी फोडासारखी वाढ दिसून येते. झाडांची वाढ खुरटल्यामुळे उत्पन्नात घट येते. या रोगाचा प्रसार माव्यांमार्फत होतो.

(आ) पाने वळणे : हा बटाट्याचा फार विस्तृत प्रमाणावर आढळून येणारा दुसरा व्हायरसजन्य रोग आहे. या रोगात पाने मध्यशिरेच्या दोन्ही बाजूंना आतील बाजूला वळतात. वाढलेल्या (वयात आलेल्या) झाडात वळलेल्या पानांचे प्रमाण विशेष आढळून येते. झाडे खुरटलेली राहतात. आणि उत्पन्नात २५ ते ७५% घट येते. रोगाचा प्रसार माव्यांमार्फत होतो. सपाटीच्या प्रदेशातील स्थानिक बटाटे साठविण्याच्या पध्दतीमध्ये तापमान पुष्कळ असते. त्या तापमानात हा रोग क्रियाशील राहत नाही व साठविलेले बटाटे या रोगापासून मुक्त होतात. शीतगृहात मात्र तो क्रियाशील राहतो.

व्हायरसजन्य रोगांमुळे होणारे नुकसान वाचविण्याचे दोन प्रमुख उपाय आहेत : (१) रोगमुक्त बेणे वापरणे व  (२) कीटकांद्वारे होणाऱ्यां रोगप्रसाराला आळा घालण्यासाठी कीटकनाशकांची पिकावर वारंवार फवारणी करणे. (इतरही उपाय आहेत तथापि त्यांचा येथे उल्लेख केलेला नाही). सपाटीच्या प्रदेशात प्रमाणित रोगमुक्त बेणे तयार करण्यासाठी सिमला येथील सेंट्रल पोटॅटो रिसर्च इन्स्टिट्यूटने एक पध्दत शोधून काढली आहे. या पध्दतीत उत्पन्न कमी येते. परंतु बटाटे रोगमुक्त असतात.

वातावरणीय परिस्थितिजन्य रोग : काळा गाभा : बटाट्याच्या साठवणीमध्ये हवा खेळती नसल्यास व तापमान ४से.पेक्षा जास्त असल्यास बाहेरून चांगल्या दिसणाऱ्या बटाट्यांच्या आतील भागात मध्यावर काळा भाग दिसून येतो व रोगाच्या पुढील अवस्थेत मध्यभागी पोकळ जागा आढळून येते. उपाय : बटाटे ४से.पेक्षा कमी तापमानात आणि खेळत्या हवेत साठविणे लागणीच्या वेळी पोटॅश आणि फॉस्फोरिक अम्ल शेतात घालणे.

कीड : मावा : भारतात सर्वत्र आढळून येणारी पानातील अन्नरस शोषून घेणारी ही फार महत्त्वाची कीड आहे. हिच्यामुळे पाने पिवळी  पडून वाळतात. [⟶मावा] .

तुटवडे : माव्याप्रमाणेच ही पानातील अन्नरस शोषून घेणारी कीड आहे. शोषणांमुळे पाने वळतात. फिकट ब्राँझ रंगाची होतात व कडांपासून वाळू लागतात. पिकाची वाढ खुंटते व ते जळाल्यासारखे दिसते. उपाय : पाण्यात मिसळणारे ५०% डीडीटी २.५ किग्रॅ. घेऊन ते ७५० लिटर पाण्यात मिसळून एक हेक्टरवर फवारतात .१० दिवसांच्या अंतराने ४ वेळा फवारणी करणे आवश्यक असते [⟶तुडवडे].

देठ कुरसडणारी अळी : या अळ्या रात्रीच्या वेळी कार्यक्षम असतात व त्या रोपे जमिनीलगत कुरतडतात आणि कोवळी पाने वदेठ खातात. उपाय : बटाट्याची लागवड करतेवेळी ५%आल्ड्रीन अथवा हेप्टॅक्लोर हेक्टरी २४ किग्रॅ. या प्रमाणात जमिनीत मिसळतात. झाडांभोवती ५%डीडीटी भुकटी पसरतात. [⟶देठ कुरतडणाऱ्या अळ्या].

बटाट्यावरील अळी : ही कीड उभ्या पिकाचे आणि साठवणीतील बटाट्याचे फार नुकसान करते. शेतामध्ये अळी पानामध्ये पातळ पापुद्रा करून राहते व पानातील हरितद्रव्य खाऊन जगते. अळी १२ मिमी. लांब असून पानाची मध्यशीर व खोड पोखरते. शेतात उघड्या पडलेल्या अगर साठविलेल्या बटाट्यांवरील डोळ्यांतून ही अळी आत शिरकाव करते व आतील गरावर उपजीविका करते. अळी ज्या डोळ्यांतून आत शिरते त्या डोळ्याजवळ काळसर विष्ठा एकत्रित झालेली असते. सर्वांत जास्त नुकसान साठवणीतील बटाट्यांमध्ये आढळून येते. उपाय : शेतातील अळीच्या नियंत्रणासाठी ५% कार्बारिल भुकटी झाडांवर पिस्कारतात. साठवणीतील बटाट्यांवर किडीचे पतंग रात्रीच्या वेळी अंडी घालत असल्यामुळे बटाटे शेतातून काढल्यावर ते रात्री झाकून ठेवतात. तसेच साठवणीतील बटाट्याच्या ढिगावर (अरणीवर) २.५-५.० सेंमी. जाडीचा कोरड्या वाळूचा थर घालतात व त्यावर ५% डीडीटी अथवा बीएचसी भुकटी पिस्करतात.


माइट (लाल कोळी) : ही कीड पानातील रस शोषून घेते. त्यामुळे पाने तपकिरी लाल पडतात. यावरून या उपद्रवाला ‘तांबेरा’ असेही नाव आहे. किडीचे प्रमाण फार वाढल्यास पाने लवकर गळून पडतात. झाडाची वाढ खुंटल्याने उत्पन्नात बरीच घट येते. उपाय : पाण्यात मिसळणाऱ्या  अतिसूक्ष्म गंधकाच्या फवारणीमुळे कीड मरते. [⟶माइट].

सूत्रकृमी : या कृमींमुळे मुळांवर गाठी उद्भवतात व बटाट्यांवर पुटकुळ्यांसारख्या लहान आकारमानाच्या गाठी दिसून येतात उपाय : डीडी, इडीबी अथवा डीबीसीपी या द्रव्याची जमिनीत धुरी देऊन सूत्रकृमींचा नाश करतात.

काढणी : झाडे पिवळी पडून पाने गळू लागतात त्या वेळी पीक तयार झाल्याचे ओळखून पिकाला पाणी देणे थांबवितात. यामुळे बटाटे टणक बनतात व जास्त दिवस टिकतात. काढणीपूर्वी १०-१२ दिवस हलके पाणी दिल्यास जमीन भुसभुशीत राहून बटाटे काढण्याचे काम सोपे होते. काढणीपूर्वी ८-१०दिवस झाडे जमिनीलगत कापल्यास बटाट्याच्या उत्पन्नात वाढ होऊन ते लवकर तयार होतात, असे आढळून आले आहे. काढणीपूर्वी मॅलिक हायड्राझाइयुक्त द्रवाची झाडांवर फवारणी केल्यास साठवणीच्या स्थानिक पध्दतीत बटाटे जास्त काळ टिकतात, असे आढळून आले आहे.

बटाटे कुदळीने खणून किंवा लाकडी नांगराने अगर बटाटे काढण्याच्या लोखंडी औताने जमीन नांगरून उघडे पडलेले बटाटे हाताने वेचतात. त्यांवर चिकटलेली माती व देठ काढून ते स्वच्छ करतात. काढणीच्या वेळी जमिनीचे तापमान २७सें.च्या वर असल्यास स्थानिक पध्तीच्या साठवणीत नासलेल्या बटाट्यांचे प्रमाण वाढते.

उत्पन्न : खरीप पिकाचे सरासरी हेक्टरी उत्पन्न ७०-८० क्विंटल आणि रबी पिकाचे ११५-१२० क्विंटल येते. १९७७-७८ साली महाराष्ट्रातील सरासरी हेक्टरी उत्पन्न ४६ क्विंटल होते. सुधारलेल्या पध्दतीने लागवड केल्यास सखल प्रदेशात २५०-४०० क्विंटल आणि डोंगराळ प्रदेशात १५०-३०० क्विंटल मिळते.

साठवण : खरीप पिकांचे बटाटे साठवून ठेवण्याची जरूरी सहसा भासत नाही. रबी पिकाचे बटाटे मात्र साठविणे फायद्याचे असते कारण उन्हाळ्यात त्यांना चांगला भाव मिळतो व पुढे खरीप पिकाच्या लागवडीसाठी बियाणे म्हणूनही बटाटे चांगल्या भावाने विकले जातात. ‘अरण’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्थानिक पध्दतीत बटाटे पुढीलप्रमाणे साठवितात. सावलीच्या जागी ३ ते ४ मी. × ०.८० मी. × ०.४५ मी. मापाचा खड्डा खणून त्याच्या बाजू व तळ सपाट व गुळगुळीत करतात. निरोगी बटाटे वेचून ते खड्ड्यात आणि जमिनीच्या वर ४५-६० सेंमी पर्यंत भरतात. ढिगावर वाळलेले गवत व लिंबाचा पाला ३० सेंमी. पर्यंत घालतात. अरणीमध्ये तापमान वाढू नये यासाठी ढिगाभोवती लहान पाट खणून त्यात वरचेवर पाणी सोडतात आणि आवश्यक वाटल्यास ढिगावर मधून मधून पाणी मारतात. बेण्यासाठी साठविलेल्या बटाट्यांवर अळीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी साठविण्यापूर्वी ५% डीडीटी पूड दर क्विंटलला ९०ते १५० ग्रॅम. या प्रमाणात पिस्कारतात. शिवाय ढिगावर पाणी मारताना २० लि. पाण्यात ३० ते ६० ग्रॅ. ५% डीडीटी पूड मिसळतात. या पध्दतीने बटाटे ३-५ महिने साठवून ठेवता येतात. या पध्दतीत काळजी घेऊनही बटाटे नासण्याचे प्रमाण केव्हा केव्हा २५% पर्यंत असते. मोठ्या आकारमानाच्या बटाट्यांपेक्षा लहान आकारमानाचे बटाटे सर्वसाधारण पणे जास्त काळ टिकतात.

शीतगृहात १.५-५से. तापमान आणि ८५% सापेक्ष आर्द्रता असल्यास ६ ते १२ महिनेपर्यंत बटाटे साठवून ठेवता येतात. १.५ से. तापमानात बटाट्याचे कोंब १ वर्षाहूनही जास्त काळ आणि ५से. तापमानात ३० आठवडे सुप्तावस्थेत राहू शकतात. शीतगृहातून बाहेर काढल्यावर थोड्या अवधीमध्ये चांगल्या रीतीने फुटून येतात. या पध्दतीत ५% पेक्षा जास्त बटाटे वाया जात नाहीत. बटाटे टणक राहतात व ते पोखरणारी अळी त्यातील तापमानात जिवंत राहत नाही. बटाट्यांची उगवणक्षमता चांगली टिकून राहते. बटाट्यांचा पुरवठा विभागून व जास्त काळपर्यंत होऊ शकतो. जसे फायदे आहेत तसे या पध्दतीने काही तोटेही आहेत. पाने वळणे या रोगाचा व्हायरस आणि गरवा करपा या रोगाचे कवक शीतगृहातील तापमानात क्रियाशील राहतात. परंतु स्थानिक पध्दतीत जास्त तापमानामुळे ते निष्क्रिय होतात.

रासायनिक संघटन : भारतात लागवडीत असलेल्या बटाट्यांत सर्वसाधारणपणे पुढील प्रमुख घटक आढळून येतात : जलांश ७६.६% कार्बोहायड्रेट १८-२०% प्रथिने, १.९% स्निग्ध पदार्थ ०.१%. लवणामध्ये पोटॅशियमाचे प्रमाण सर्वांत जास्त आढळून येते (१०० ग्रॅममध्ये २४७ मिग्रॅ.). प्रथिनांत बहुतेक सर्व ॲमिनो अम्ले असतात व त्यांतही लायसिनाचे प्रमाण जास्त असते. बटाट्यात प्रामुख्याने व आणि क जीवनसत्त्वे आढळून येतात. साल काढून बटाटे शिजवल्याने अगर तळल्यामुळे क जीवनसत्त्व पुष्कळ प्रमाणात नाहीसे होते. साल न काढताही ते पाण्यात उकळल्यास सु. एक चतुर्थांश क जीवनसत्त्व वाया जाते. तसेच साठवणीमध्ये तीन महिन्यांनंतर ते निम्म्याने घटते व सहा महिन्यांनी ते १/३ पर्यंतच राहते. बटाट्याची पाने, खोड, बी आणि बटाटे यांत सोलॅनीन नावाचा पदार्था असतो. बटाट्यात त्याचे प्रमाण ०.०१% पेक्षा जास्त नसते व त्यातील बहुतेक भाग शिजविण्याच्या क्रियेत नष्ट होतो. डोळ्यांच्या आसपासच्या भागात त्याचे प्रमाण जास्त असते. चांगल्या पोसलेल्या आणि मोठ्या बटाट्यापेक्षा अपक्व आणि लहान बटाट्यात सोलॅनीनाचे प्रमाण जास्त असते. फुटून आलेल्या कोंबात बटाट्याच्या इतर भागांपेक्षा सोलॅनिनाचे प्रमाण ०.५% अगर त्याहूनही जास्त असते आणि त्यात आरोग्याला हानिकारक असे इतरही घटक असतात. ०.०१% पेक्षा जास्त प्रमाणात सोलॅनीन असलेले बटाटे खाणे प्रकृतीला हानिकारक असते. कोंब फुटून आलेले बटाटे खाण्यासाठी वापरावयाचे असल्यास कोंब आणि त्याबरोबरच कोंबाभोवतालचा १० मिमी. जाडीचा भाग कापणे आवश्यक असते. सोलॅनिनाच्या विषबाधेमुळे घशाची आग, मळमळ, ओकारी, डोकेदुखी, जुलाब, पोटदुखी, चेहरा लाल होणे व ओठ निळे पडणे ही लक्षणे होतात. 


उपयोग : भारतात एकूण उत्पादनाच्या ७५-८०% बटाटे खाण्यासाठी अथवा उन्हात वाळविलेले पदार्थ तयार करण्यासाठी आणि सु. १५% बेण्यासाठी वापरले जातात. सु. ८% बटाटे वाया जातात. उद्योगधंद्यामध्ये बटाट्याचा वापर भारतात विशेष प्रमाणावर केला जात नाही. १०० ग्रॅ. बटाट्यापासून सु. ७० कॅलरी ऊर्जा मिळते. पातळ चकत्या (वेफर्स) सारख्या पदार्थाच्या निर्मितीसाठी कुफरी चंद्रमुखी हा प्रकार उपयुक्त असल्याचे आढळून आले आहे.

ज्या देशात बटाट्याचे उत्पादन मुबलक प्रमाणात होते तेथे खाण्याच्या गरजेपेक्षा जास्त असलेले अथवा कमी प्रतीचे बटाटे जनावरांना खाऊ घालतात अथवा स्टार्च, एथिल अल्कोहॉल आणि इतर औद्योगिक उत्पादनात कच्चा माल म्हणून वापरतात.

सूक्ष्मजंतूची प्रयोगशाळेत वाढ करण्यासाठी आणि पेनिसिलिनाच्या निर्मितीमध्ये बटाट्याचा वापर करतात.

खेरेदी-विक्री व व्यापार : बाजारात बटाट्यासाठी मागणी वर्षभर सारखी नसते. मालाचा पुरवठा व किंमत यांवर ती अवलंबून असते. उत्तर भारतात हिवाळ्याच्या महिन्यांत सर्वांत जास्त मागणी असते. मार्चनंतर वाढत्या किंमतीमुळे मागणी कमी होते परंतु मे महिन्यात इतर भाज्यांचा तुटवडा असल्यामुळे किंमत जास्त असूनही बटाट्याला पुन्हा मागणी वाढते. या वेळी पुरवठा कमी असल्यामुळे किमती वाढतात. आणि खपावर आपोआप नियंत्रण येते.

कलकत्ता आणि मुंबई या बटाट्यांच्या प्रमुख बाजारपेठा आहेत. इतर पेठा पुढीलप्रमाणे : दिल्ली, आग्रा, फरूखाबाद, लखनौ, जलंदर, मेट्टुपलायम(तमिळनाडू), बंगलोर, मद्रास, अहमदाबाद आणि पुणे.

संशोधन : सिमला व तेथून जवळच असलेल्या कुफरी येथे बटाट्यावरील संशोधनाची मध्यवर्ती संस्था (सेंट्रल पोटॅटो रिसर्च इन्स्टिट्यूट) आहे तेथे प्रजननाने जास्त उत्पन्न देणाऱ्या व रोगप्रतिकारक बटाट्याच्या प्रकारांची निर्मिती होते. शिवाय देशात सहा प्रादेशिक संशोधन केंद्र असून त्यांतील एक महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात राजगुरूनगर (खेड) येथे आहे.

संदर्भ :  1. Cox, A.E. The Potato : A Practical and Scientific Guide, London, 1967. 

           2. C.S.I.R. The Wealth of India, Raw Materials, Vol,IX New Delhi, 1972. 

           3. PushKarnath, Potate in India: Varieties ,New Delhi, 1969. 

           4. Vaidya,V.G. Sahasrabuddhe, K.R.Khuspe, V.S.Crop Production and Field Experimentation, Poona, 1972.

जोशी, रा. ना भोसले, रा. जि. गोखले, वा. पु. रूईकर, स. के.