चहा : (हिं.चा, चाय इं.टी लॅ.कॅमेलिया सायनेन्सिस कुलथीएसी). केवळ पानांच्या उत्पादनासाठी ज्यांची लागवड केली जाते अशा काही थोड्या वनस्पतींपैकी चहाच्या वनस्पतीला विशिष्ट स्थान आहे. भारतातील खाजगी उद्योगांत चहाच्या उद्योगाला पहिले स्थान आहे. तसेच भारतात रेल्वेच्या खालोखाल चहा उद्योगातील कामगारांची संख्या आहे. ताग उद्योगानंतर भारताला सर्वांत अधिक परदेशी चलन मिळवून देणारा हा उद्योग आहे. भारताला मिळणाऱ्या एकूण परदेशी चलनाच्या पंधरा टक्के चलन चहा उद्योगातून मिळते.

चहाची वनस्पती झुडूप या प्रकारातील असून त्याच्या प्रक्रिया केलेल्या पानांपासून (अगर पानांच्या चुऱ्यापासून) उत्तेजक पेय तयार करतात. त्या पेयालाही चहा हेच नाव आहे. हे जगातील सर्वांत लोकप्रिय पेय आहे. जगातील जवळजवळ निम्मे लोक हे पेय पितात. समाजाच्या सर्व थरांतील लोकांच्या घरांत दैनंदिन आहारात आणि आदरातिथ्यात चहाला महत्त्वाचे स्थान आहे.

वनस्पती वर्णन : चहाचे झुडूप मूळचे आसाम व चीनमधील आहे. दर वर्षी छाटणी केल्यामुळे झुडपाची उंची ०·७ ते १·७ मी. पेक्षा जास्त नसते परंतु छाटणी न केल्यास त्याची उंची १० ते१७ मी.पर्यंत वाढते. या झुडपाला पुष्कळ फांद्या असतात. पाने पुष्कळ, साधी, एकांतरित (एकाआड एक), कुंतसम (भाल्यासारखी) अगर आयतकुंतसम, दंतुर, केशहीन वा खालच्या बाजूला लव असलेली, आखूड देठाची आणि सदाहरित असतात. कोवळी पाने लवदार असतात. पक्व पाने जाड, चकचकीत, हिरवी, चिवट, गुळगुळीत आणि सु. पाच ते तीस सेंमी. लांब व अडीच ते चार सेंमी. रुंद असतात. पानांत तैलप्रपिंड (ग्रंथी) विपुल असतात. फुले पांढरी व सुवासिक असून पानांच्या बगलेत एकेकटी किंवा दोन ते चारांच्या झुपक्यांत येतात. पाकळ्या पाच से सात, पिवळ्या केसरदलांभोवती असतात. फळ (बोंड) कठीण असून त्यात एक ते तीन कठीण बिया असतात.

इतिहास : चहा हा शब्द चिनी भाषेतील ‘चा’ या शब्दापासून रूढ झाला आहे. चिनी भाषेतून जपान, भारत, इराण आणि रशिया या देशांत हा अथवा तशा प्रकारचे शब्द रूढ झाले आहेत. इंग्रजी भाषेतील टी या शब्दाचा उगम चीनमधील ॲमॉय प्रांतातील बोली भाषेतील ‘टे ’ या शब्दात आहे. डच लोकांनी जावामार्गे हा शब्द यूरोपात नेला. इंग्रजी भाषेत सु. अठराव्या शतकाच्या मध्यापर्यंत चहाला ‘टे’ हा शब्द रूढ होता. त्यानंतर त्याचा उच्चार ‘टी’ असा करण्यात येऊ लागला.

आ. १. चहा : (१) फुलासह फांदी, (२) फुलाचा छेद, (३) पाकळी व केसलमंडल, (४) तडकलेले फळ, (५) बीज.

चहाच्या मूलस्थानाविषयी पुष्कळ दंतकथा आहेत. एका जपानी पौराणिक कथेप्रमाणे चहाची उत्पत्ती चीनमध्ये बोधिधर्म नावाच्या (बौद्ध भिक्षूच्या) पापण्यांपासून झाली. चिनी दंतकथेप्रमाणे इ.स.पू. २७३७ च्या सुमारास शेन नुंग नावाच्या सम्राटाच्या कारकीर्दीत चहाचा उत्तेजक पेय म्हणून वापर सुरू झाला. परंतु चहाचा अधिकृत उल्लेख ‘एर या’ (Erh Ya) या चिनी शब्दकोशात (इ. स. पू. ३५०च्या सुमारास) आढळतो. उत्तेजक पेय म्हणून नव्हे, तर औषधी गुणधर्म असलेली वनस्पती म्हणून तत्कालीन लोकांना ती परिचित होती. पुढे हलके हलके चहाच्या पानांचा उत्तेजक पेयासाठी वापर करण्यात येऊ लागला आणि सातव्या व आठव्या शतकांत त्याला एवढी लोकप्रियता मिळाली की, चिनी सरकारने त्यावर कर बसविला. आठव्या शतकात लू यू (Lu Yu) या चिनी विद्वानांनी चा चिंग (Ch’a Ching = चहाचे पुस्तक) हा माहितीपूर्ण ग्रंथ लिहिला. त्यात चहाच्या झाडाचे निरनिराळे प्रकार, खुडण्यासाठी पानांची निवड, पाने खुडण्यासाठी योग्य समय, चांगल्या प्रतीचा चहा (पत्ती) तयार करण्याची पद्धत, चहा (पेय) करण्याची पद्धत आणि चहा पिण्यापासून फायदे यांसंबंधी विवेचन आहे. तहान भागविण्यासाठी उकळलेले पाणी, दु:ख विसरण्यासाठी मद्य व झोप घालविण्यासाठी चहा घ्यावा असे त्यांनी नमूद केले आहे. चहाच्या चीनमधील इतिहासावरून पुढील तीन गोष्टी स्पष्ट होतात. (१)चहाची वनस्पती मूळची त्या देशातील आहे, (२)या वनस्पतीचा शोध चिनी लोकांना फार वर्षांपूर्वी लागला आणितिचा वापरही फार वर्षांपासून होत होता, (३)पानांपासून चहा (पत्ती) तयार करण्याची कृती सोपी असल्यामुळे सर्वसाधारण लोकांचे पेय म्हणून चिनी लोकांमध्ये चहाचा वापर यूरोपातील लोकांपेक्षा कित्येक शतके अगोदर सुरू झाला.

जपानमध्ये सहाव्या ते आठव्या शतकांत चीनमधून बौद्ध भिक्षूंमार्फत चहाचा प्रथम प्रसार झाला. प्रथम प्रथम याचा वापर एक औषधी वनस्पती म्हणून होत असे व तेराव्या शतकापर्यंत तो उत्तेजक पेय म्हणून लोकप्रिय झाला नव्हता. आता त्या देशात प्रत्येक घरात चहापानविधी फार महत्त्वाचा समजला जातो. जपानी चहात दूध नसते. 

चहा पिण्याची सवय चीनमधून मध्य आशियातील देशांत पसरली आणि अठराव्या शतकापर्यंत ती त्या देशांत चांगलीच रूढ झाली होती.

तिबेटमध्ये चहाचा प्रसार चीनमधून सातव्या अगर आठव्या शतकात राजघराण्यामार्फत झाला आणि थोड्याच कालावधीत तेथे राष्ट्रीय पेय म्हणून चहाला मान्यता मिळाली. धार्मिक मठांत त्याचा सर्रास उपयोग होऊ लागला. सुखवस्तू तिबेटी लोक दिवसाकाठी ३०ते ७० कप चहा पितात असे म्हणतात.

इराणमध्ये सतराव्या शतकात चहा पिण्याची पद्धत रूढ झाली. 

चीन व अतिपूर्वेकडील देशांशी भारताचे इसवी सनाच्या पहिल्या दहा शतकांत भूमार्गाने आणि जलमार्गाने दळणवळण होते. यावरून भारतात चहाचा वापर फार पूर्वीपासून प्रचलित असावा असे अनुमान काढल्यास ते चुकीचे होणार नाही. परंतु भारतात मोगलकालामध्ये आलेल्या जगप्रसिद्ध प्रवाशांच्या वर्णनामध्ये चहा पिण्याच्या प्रथेचा उल्लेख नाही. तसेच भारताविषयीच्या सतराव्या व अठराव्या शतकांतील इतर लिखाणांमध्येही याचा उल्लेख नाही. ईस्ट इंडिया कंपनीच्या मोगल दरबारी असलेल्या इंग्रजांच्या लिखाणात कोठे कोठे चहापानाचा उल्लेख आहे. यावरून चहा पिण्याचा प्रघात भारतात त्या काळात थोडाफार होता, परंतु त्याचा सर्रास वापर होत नव्हता असे अनुमान निघते. कर्नल लॅटर यांना १८१५ मध्ये आसामी टोळ्यांत चहा पिण्याचा प्रघात असल्याचे आढळून आले.


जावामध्ये जपानी चहाची लागवड १६८४ मध्ये सुरू झाली.

चहाचा यूरोपात प्रसार : सतराव्या शतकाच्या सुरुवातीला डच लोकांनी जावामार्गे यूरोपात प्रथम चहा नेला. त्यानंतर यूरोपात चहाचा खप वाढू लागला. इंग्लंडमध्ये १६५७ मध्ये प्रथम चहा विकला गेला. त्यावेळी हा देश सर्व जगात प्रथम क्रमांकाचा कॉफी पिणारा देश होता.

चहानिर्यातीच्या व्यापारात प्रथम फक्त डच लोक होते. पुढे फ्रेंच, पोर्तुगीज आणि इंग्रज या व्यापारात पडले. १६६९ पासून १८३३ पर्यंत चहाची इंग्लंडमध्ये आयात करण्याची मक्तेदारी ईस्ट इंडिया कंपनीकडे होती. चीन आणि भारत या देशांतून चहा निर्यात करून तो इंग्लंड आणि अमेरिकेतील वसाहतींमध्ये लोकप्रिय करण्यात इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीचा फार मोठा वाटा आहे.

चहाचा इंग्लंड आणि अमेरिकेच्या वसाहतीमधील संबंधांवर परिणाम : अमेरिकेत वसाहत करून राहिलेल्या लोकांवर इंग्लंडने आपल्या गरजेसाठी इतर वस्तूंबरोबर चहावर कर बसविला. तेव्हा तेथील लोकांत असंतोष निर्माण झाला. परिणामी इतर वस्तूंवरील कर रद्द झाले. परंतु चहावरील कर कायम राहिला. याचा निषेध म्हणून बॉस्टन येथील लोकांनी बंदरातील चहाच्या पेट्या समुद्रात फेकून दिल्या. ही घटना ‘बॉस्टन टी पार्टी’ या नावाने प्रसिद्ध आहे. अमेरिकेतील क्रांतीच्या अनेक तत्कालीन कारणांपैकी हे एक कारण आहे. इंग्लंडची अमेरिकेतील हुकुमत संपुष्टात आली व त्याचबरोबर अमेरिकेच्या लोकांनी चहावर बहिष्कार घातला. चहाऐवजी कॉफीचा वापर जास्त प्रमाणात होऊ लागला व अद्यापही अमेरिकेत कॉफीचा खप चहाच्या सु. पंचवीसपट आहे. याउलट इंग्लंडमध्ये चहाचा खप कॉफीच्या पाचपट आहे.

भारतातील चहाच्या लागवडीचा इतिहास : भारतात चहाच्या लागवडीसंबंधीच्या दिशेने पहिले पाऊल १७७८ मध्ये उचलण्यात आले. त्यावर्षी सर जोसेफ बॅंक्स यांना भारतात चहाची लागवड सुरू करावी अशी ईस्ट इंडिया कंपनीला शिफारस केली. १७९३ मध्ये बॅंक्स यांना चहाच्या लागवडीसंबंधी आणि पानांपासून चहा तयार करण्यासंबंधी तपशीलवार माहिती मिळविण्यासाठी चीनला पाठविण्यात आले. त्यांनी चिनी चहाची झाडे व बिया कलकत्त्याला पाठविली. १८२३ मध्ये रॉबर्ट ब्रूस नावाच्या सैन्यातील अधिकाऱ्यांना आसाममधील सादियानजीकच्या जंगलात चहाची झाडे नैसर्गिक अवस्थेत वाढत असल्याचे आढळून आले. ही झाडे ईस्ट इंडिया कंपनीच्या वनस्पतिशास्त्रज्ञाकडे पाठविण्यात आली. परंतु ती खरी चहाची झाडे नसल्याबद्दलचे मत त्यांनी दिले. सैन्यातील चार्ल्‌टन नावाच्या दुसऱ्या एका अधिकाऱ्यांना १८३१ साली आसाममध्ये चहाची झाडे आढळून आली ती त्यांनी कलकत्त्याला पाठविली, परंतु तज्ञांनी ती खरी चहाची झाडे नसल्याचा निर्वाळा दिला. दरम्यान १८२८ मध्ये लॉर्ड बेंटिंक यांची भारताचे गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक झाल्यावर त्यांना वॉकर नावाच्या एका सद्‌गृहस्थांनी लंडन मुक्कामी एक निवेदन सादर केले. त्यात त्यांनी नेपाळच्या टेकड्यांत चहाची लागवड करण्यासंबंधी शिफारस केली आणि त्याची कारणेही त्यात नमूद केली. व्यापारी संबंध बिघडल्यामुळे चीनमधून चहाची आयात बंद होण्याची शक्यता आणि इंग्लिश लोकांच्या जीवनातील चहाला वाढते महत्त्व या गोष्टी लक्षात घेता चहाच्या बाबतीत केवळ चीनवर अवलंबून न राहता ईस्ट इंडिया कंपनीच्या अंमलाखालील प्रदेशातच चहाची लागवड करणे कसे फायद्याचे आहे, हे त्यांनी विशद केले. भारतात कमी रोजावर मजूर मिळण्याची शक्यता आणि मॅंचेस्टर येथील गिरण्यांत यंत्रमागांवर तयार होणाऱ्या कापडाच्या आणि मलमलीच्या आयातीमुळे भारतातील हजारो बेकार विणकरांना कामधंदा मिळवून देण्याचा चहा उद्योग हा एक पर्याय याही गोष्टी भारतात चहाची लागवड सुरू करण्यासाठी अनुकूल असल्याचे त्यांनी नमूद केले. बेंटिंक यांनी यावर पूर्ण विचार करून एक समिती नियुक्त केली. आसामच्या जंगलात आढळून आलेली चहाची झाडे ही चिनी चहाच्या जातीची नसल्याचा समितीतील तज्ञांचा अभिप्राय पडला आणि चीनमधून चहाची झाडे व त्याचबरोबर चहाची लागवड करणे आणि पानांपासून चहा तयार करणे या बाबींतील वाकबगार लोक आणून हिमालयाच्या पायथ्याचा प्रदेश, उत्तर आसाम आणि दक्षिण भारत या ठिकाणी चहाची लागवड करावी, असे ठरविण्यात आले. १८३५ च्या सुमारास चिनी चहाच्या बियांपासून भारतात वरील भागांत चहाच्या लागवडीला सुरुवात झाली. नंतर आसाममध्ये पूर्वीपासून जंगलात वाढत आलेली चहाच्या जातीची झाडे ही खरी चहाचीच झाडे असल्याचा निर्णय तज्ञांच्या समितीने दिला. १८३९ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या मळ्यांत तयार झालेला चहा लंडन येथील बाजारात प्रथमच लिलावाने विकला गेला. यावेळेपर्यंत चीनमधून आणविलेल्या बियांपासून पुष्कळ ठिकाणी लागवड करण्यात आली होती व उत्तर आसाममध्ये कित्येक भागांत देशी जातीची झाडे मोठ्या संख्येने उपलब्ध असल्याचेही आढळून आले. १८४० मध्ये आसाम टी कंपनीची स्थापना झाली आणि यावर्षी ईस्ट इंडिया कंपनीच्या बहुतेक सर्व चहाच्या मळ्यांचे या कंपनीकडे दहा वर्षांच्या कराराने हस्तांतर झाले. १८५५ मध्ये काचार (दक्षिण आसाम) भागात पुष्कळ ठिकाणी देशी चहाची झाडे आढळून आली. देशी चहाच्या झाडांपासून चांगल्या प्रकारचा चहा तयार होतो असे आढळून आल्यावर चिनी आणि देशी अशा दोन्ही प्रकारांची लागवड करण्यात येऊ लागली.

थोड्याच काळात आसाममधील ब्रह्मपुत्रेचे खोरे व काचार, हिमालयाच्या पायथ्याचा दुआर व तराई हा डोंगराळ भाग, दार्जिलिंग, रांची, उत्तर प्रदेशातील डेहराडून खोरे आणि पंजाबमधील कांग्रा खोरे या ठिकाणी चहाची लागवड होऊ लागली. १८५३ नंतर दक्षिण भारतातील तमिळनाडू, केरळ व कमी प्रमाणात कर्नाटकात लागवडीस सुरुवात झाली. १८५९ मध्ये जोरहाट कंपनी ही चहाची दुसरी कंपनी स्थापन झाली व त्यानंतर अनेक ब्रिटिश भांडवलदारांनी मुख्यत्वे त्यांच्या देशातील ग्राहकांना चहा पुरविण्याकरिता या व्यवसायात पाऊल टाकले. भारतातील चहाचा उद्योग १८७० च्या सुमारास चांगल्या प्रकारे विकासाच्या मार्गास लागला. १८८१ मध्ये इंडियन टी असोसिएशन आणि १९१८ मध्ये इंडियन टी प्लॅंटर्स असोसिएशन या संस्था स्थापन झाल्या.

एकोणिसाव्या शतकाच्या शेवटीशेवटी अनेक नवीन मळे स्थापन करण्यात आले. १८९० च्या सुमारास चहाच्या लागवडीखाली १,५२,००० हे. क्षेत्र होते व त्यापासून ५·७ कोटी किग्रॅ. चहा (दर हेक्टरी सरासरी ३७३ किग्रॅ.) तयार होत होता. यानंतर ४० वर्षे चहाच्या लागवडीखालील क्षेत्र झपाट्याने वाढले. तथापि १९३२ मध्ये चहाच्या किंमती अतिशय घसरल्यामुळे लागवडीखालील क्षेत्र वाढण्याचा वेग कमी झाला. १९४० ते १९६० च्या दरम्यान भारतातील लागवडीखालील क्षेत्र ३,३७,०३५ हेक्टरांपासून ३,३०,७५८ हे. इतके कमी झाले कारण चहाचे काही मळे पूर्व पाकिस्तानात गेले. तथापि त्याच काळात उत्पादन २,१०,४१५ टनांवरून ३,२१,००७ टनांपर्यंत वाढले आणि हेक्टरी सरासरी उत्पन्न ६२४ किग्रॅ.वरून ९७१ किग्रॅ.वर गेले. १९७१ मध्ये हेक्टरी सरासरी उत्पन्न १,२१५ किग्रॅ.पर्यंत वाढले.


लागवड करणारे देश : जगातील एकूण सव्वीस देशांत चहाची लागवड करण्यात येते. त्यांतील महत्त्वाचे देश पुढीलप्रमाणे आहेत : चीन, जपान, भारत, बांगला देश, श्रीलंका, तैवान, इंडोनेशिया, मलेशिया, पूर्व आफ्रिका (केनिया, मालावी, युगांडा आणि मोझॅंबिक), तुर्कस्तान, ब्राझील, अर्जेंटिना आणि रशिया.

चीन आणि जपानमध्ये मुख्यत: छोटे शेतकरी चहाची लागवड करतात. याउलट भारत, पाकिस्तान, इंडोनेशिया, श्रीलंका, रशिया आणि पू. आफ्रिकेतील देश या देशांत ती मोठ्या मळ्यांत करण्यात येते. अर्थात यांतील काही देशांत चहाची लागवड करणाऱ्या लहान जमीनधारकांचे क्षेत्रही मोठे आहे.

भारतातील लागवडीचे प्रदेश : भारतातील चहाची लागवड मुख्यत्वेकरून उ. व द. भारतातील डोंगराळ भागांत आहे. आसाम हा चहाच्या लागवडीमध्ये प्रथमपासून अग्रेसर प्रदेश आहे. त्या राज्यातील ब्रह्मपुत्रा आणि सुरमा या नद्यांच्या खोऱ्यांतील प्रदेश आणि प. बंगालमधील दार्जिलिंग, जलपैगुरी, कुचबिहार आणि तराई हे उ. भारतातील चहाच्या लागवडीचे प्रमुख प्रदेश आहेत. कांग्रा, कुमाऊँ आणि डेहराडून जिल्ह्यांतही चहाची लागवड लहान प्रमाणात होते. आसाममधील चहाचे क्षेत्र सर्वांत जास्त असले, तरी त्याची विभागणी फक्त ७५० मळ्यांत आहे. याउलट तमिळनाडूमध्ये फक्त ३४,६४६ हे. क्षेत्रात ६,४५० मळे आहेत. केरळमधील मळ्यांची संख्या ३,०३२ आहे. आसाममधील ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यात (याला ‘आसाम व्हॅली’ असेही नाव आहे) चहाच्या लागवडीसाठी सर्वांत अनुकूल परिस्थिती असल्यामुळे जगातील सर्वांत मोठे सलग चहाचे क्षेत्र या भागात आहे. चहाच्या लागवडीसाठी सुरमा खोऱ्यांतील हवामान ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्याइतके चांगले नाही. भारताच्या ईशान्य भागात तयार होणाऱ्या चहामध्ये दार्जिलिंग चहा विशेष स्वादयुक्त असतो.

कोष्टक क्र. १. भारतातील निरनिराळ्या राज्यांतील चहाच्या लागवडीखालील क्षेत्र (१९७१)

राज्य

क्षेत्र (हेक्टरमध्ये)

आसाम

१,८२,३२५

प. बंगाल

८८,४९९

बिहार

४६०

त्रिपुरा

५,४४४

उत्तर प्रदेश

१,८१८

हिमाचल प्रदेश

४,१८३

एकूण उत्तर भारत

२,८२,७२९

तमिळनाडू

३४,६४६

कर्नाटक

१,८७०

केरळ

३७,२७१

एकूण दक्षिण भारत

७३,७८७

एकूण

३,५६,५१६

भारतातील लागवडीखालील चहाचे प्रकार : (१)चिनी प्रकार : (कॅमेलिया सायनेन्सिसस  प्रकार सायनेन्सिस). झुडूप अथवा (छाटणी न केल्यास) सु. ६ मी.पर्यंत उंच वाढणारा काटक वृक्ष पाने तुलनेने लहान, चिवट, गर्द हिरवी, अडीच ते पाच सेंमी. लांब या प्रकाराला आसामी प्रकारापेक्षा लवकर आणि विपुल प्रमाणात फुले येतात. (२) आसामी प्रकार : (कॅमेलिया सायनेन्सिस  प्रकार असामिका). छाटणी न केल्यास या प्रकारातील झाड १५ मी.पर्यंत उंच वाढते. पाने चकचकीत, लोंबणारी आणि चिनी प्रकारापेक्षा पुष्कळ मोठी असतात. चिनी प्रकारापेक्षा हा प्रकार कमी काटक असला, तरी या प्रकारातील झाडे जास्त जोमाने वाढतात आणि पानांचे उत्पन्न चिनी प्रकारापेक्षा जास्त मिळते. आसामी प्रकारामध्ये दोन उपप्रकार आहेत. एकाची पाने फिक्कट हिरवी व दुसऱ्याची  गडद हिरवी असतात. फिकट हिरवी पाने असलेल्या उपप्रकाराला आसामी आणि गडद हिरव्या पानाच्या उपप्रकाराला मणिपुरी अशी प्रचारातील नावे आहेत. आसामी प्रकार कमी काटक असल्यामुळे त्याची लागवड ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यांतील सौम्य हवामानात केली जाते. मणिपुरी प्रकाराची लागवड आसाममधील सुरमा नदीच्या खोऱ्यात आणि बंगालमधील दुआर भागात केली जाते. मणिपुरी प्रकारापेक्षा आसामी प्रकारचे उत्पन्न जास्त येते आणि तयार चहाची प्रतही जास्त चांगली असते.

चिनी आणि आसामी हे दोन्ही प्रकार भारतात लागवडीखाली असल्यामुळे आणि चहाचे झाड निसर्गतः परपरागित [⟶ परागण] असल्यामुळे दोन प्रकारांत मोठ्या प्रमाणावर संकर झाले. त्यांतून निर्माण झालेल्या काही प्रकारांत दोन्ही प्रकारांतील चांगले गुणधर्म उतरले. परंतु व्यापारी प्रमाणावर शुद्ध वाणाचे बी उपलब्ध नाही.

हवामान : चहाची वनस्पती काटक असून वर्षभर आर्द्र आणि उबदार हवामान असलेल्या उष्ण आणि उपोष्ण कटिबंधीय हवामानात या वनस्पतीची चांगली वाढ होते आणि उत्पन्नही भरपूर येते. चहाच्या लागवडीसाठी पुढील गोष्टी फार अनुकूल असतात. (१) तापमानातील फरक मर्यादित स्वरूपाचा असावा. मासिक कमाल तापमान २०°  ते ३२° से. च्या दरम्यान असावे. सावलीतील तापमान २४° से.च्या खाली आल्यास अथवा सरासरी किमान तापमान १८° से.च्या खाली आल्यास झाडाची वाढ फार मंद गतीने होते. भरपूर पावसामध्ये तापमान जास्त असल्यास त्याचा चहाच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होत नाही. जोराने वाहणारे कोरडे वारे आणि ०° से. इतके खाली जाणारे तापमाप चहाच्या झाडांना मानवत नाही. (२) पाऊस सबंध वर्षामध्ये विभागून पडणारा आणि भरपूर असावा. वार्षिक पर्जन्यमान कमीतकमी १५० सेंमी. असावे. जास्तीत जास्त पर्जन्यमान किती असावे याबद्दल निश्चित माहिती उपलब्ध नाही. आसाममधील चहाच्या मळ्यांत १२५ ते ३७५ सेंमी. पाऊस पडतो. दार्जिलिंग जिल्ह्यांत तो २५० ते ५०० सेंमी. पडतो आणि दक्षिण भारतातील चहा पिकविणाऱ्या प्रदेशात तो २५० ते ७५० सेंमी. पडतो. रांची आणि डेहराडून या जिल्ह्यांतील पर्जन्यमान चहाच्या लागवडीसाठी योग्य नाही.

फार दाट छाया नसलेल्या आणि आर्द्र हवामानातील चहाची झाडे सावली नसलेल्या आणि कोरड्या हवामानातील झाडांपेक्षा चांगली वाढतात.

भारतात सुरुवातीला चहाची लागवड ईशान्य आणि दक्षिणेतील डोंगराळ भागातच झाली. पाण्याचा निचरा चांगला असलेल्या सपाट प्रदेशातील जमिनीतही चहाची झाडे चांगल्या प्रकारे वाढतात असे मागाहून आढळून आले. आसाममधील काही चांगल्या दर्जाच्या चहाचे मळे समुद्रसपाटीपासून १५ ते १३५ मी. उंचीवर सपाट प्रदेशात आहेत. पश्चिम बंगालमधील दुआर भागात ते १७०–३३० मी. पर्यंतच्या डोंगराच्या उतारावरील जमिनीत आहेत. उत्तर भागातील दार्जिलिंग, कुमाऊँ आणि कांग्रा जिल्ह्यांत आणि दक्षिण भारतात चहाची लागवड मुख्यतः १,००० ते १,३३० मी.पर्यंत उंचीवरील प्रदेशात असली, तरी ती २,३०० मी. पर्यंत उंची असलेल्या भागातही आढळून येते. फार उंचीवर वाढणाऱ्या झाडांचे उत्पन्न कमी येते परंतु त्यांपासून तयार होणारी चहा जास्त चांगल्या प्रतीचा असतो.

जमीन : चहाच्या लागवडीसाठी खोल, मोकळी, चांगल्या निचऱ्याची आणि अम्लीय [pH मूल्य ५·२ ते ५·६ असलेली ⟶ पीएच मूल्य] असावी. वालुकामय माती १५%, चांगला पोयटा १८ ते २०% आणि चिकण माती २५% अगर जास्त या प्रमाणात असलेली जमीन चहाच्या लागवडीसाठी चांगली असते. जमिनीत चुना नसावा आणि सेंद्रिय (जैव) पदार्थ व नायट्रोजन योग्य प्रमाणात असावेत. ईशान्य भारतातील चहाच्या मळ्यांच्या जमिनी हलक्या वालुकामय जमिनी पासून ते घट्ट चिकणमाती असलेल्या अशा निरनिराळ्या प्रकारच्या आहेत. काचार भागात पीटयुक्त (मृत वनस्पतींच्या थरांनी युक्त) जमिनीत चहाची लागवड होते. दक्षिण भारतातील चहाच्या मळ्यांतील जमिनीमध्येही असे फरक आढळून येतात.


अभिवृद्धी : चहाची अभिवृद्धी सर्वसाधारणपणे बियांपासून करण्यात येते. भारतात चहाच्या चिनी व आसामी प्रकारांत संकर घडून आल्यामुळे निरनिराळे संकरज प्रकार अस्तित्वात आले आहेत. त्यांना देशी भाषेत ‘जात’ म्हणतात. कोणत्याही एका जातीचे शुद्ध बी मिळणे दुरापास्त झाले आहे. यासाठी शाकीय अभिवृद्धीचे (कलमे लावून) प्रयोग करण्यात आले व त्यात यश आल्यामुळे हल्ली ही पद्धत वाढत्या प्रमाणावर (विशेषतः वठलेल्या झाडांच्या जागी नवी झाडे लावण्यासाठी) रूढ होत आहे. तसेच इंडियन टी ॲसोसिएशनच्या वनस्पती विभागातर्फे चहाच्या शुद्ध प्रकारचे बी मळेवाल्यांना मोठ्या प्रमाणावर मिळवून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. चहाच्या मळ्यांतील झाडांची निरनिराळ्या गुणधर्मांसाठी परीक्षा करणे, परीक्षेत निवड केलेल्या झाडापासून शाकीय अभिवृद्धीने रोपे (कलमे) तयार करणे व अशा तऱ्हेने तयार केलेली रोपे चहाच्या मळ्यापासून दूर अशा ठिकाणी लावून त्यांचे मोठ्या प्रमाणावर बी गोळा करणे ही या पद्धतीची थोडक्यात वैशिष्ट्ये आहेत.

सध्या चहाचे मळेवाले आपल्याच मळ्यातील चांगली झाडे निवडून त्यांचे बी नवीन लागणीसाठी वापरतात अगर व्यापारी प्रमाणावर बीज उत्पादनासाठी राखून ठेवलेल्या मळ्यांतील झाडांचे बी वापरतात. हे बी सर्वसाधारणपणे संकरज झाडांचेच असते.

पेरणी : खास तयार केलेल्या वाफ्यात दहा ते वीस सेंमी. अंतरावर आणि एक ते दोन सेंमी. खोलीवर बी पेरतात. वाफ्यावर सावलीसाठी मांडव करतात. रोपे दीड ते दोन वर्षे वाफ्यातच वाढू देतात. रोपांनी किडींचा उपद्रव होऊ नये म्हणून काळजी घ्यावी लागते.

लागणीपूर्वी जमिनीची मशागत : जंगलातील झाडे तोडून साफ केलेली अगर चराऊ कुरणांची जमीन चहाच्या लागवडीसाठी सर्वांत योग्य असते. जंगलांतील झाडे तोडल्यावर त्यांचे बुंधे जाळून काढल्यास राखेमुळे जमीन क्षारधर्मी (अम्लांशी विक्रिया झाल्यास लवण देणाऱ्या पदार्थाचे गुणधर्म असणारी, अल्कलाइन) बनते आणि अशा जागेत चहाची झाडे चांगली वाढत नाहीत. यासाठी तोडलेल्या झाडांचे बुंधे खणून काढतात. कुरणांच्या जमिनीत चहाची लागवड करण्यापूर्वी गवताची खोल मुळे खणून काढावी लागतात. जमीन उताराची असेल, तर धूप थांबविण्यासाठी आडवे समप्रतली बांध घालतात. पाण्याचा निचरा चांगला व्हावा यासाठी सु. २३ सेंमी. रुंद आणि १ मी. खोल असे चर खणून ते सर्व चर एका मोठ्या चराला जोडतात.

रोपे लावणे : जमिनीच्या स्वरूपाप्रमाणे रोपे लावण्याच्या पद्धतीत फरक केले जातात. सपाट जमिनीवर अथवा थोड्याशा उताराच्या जमिनीवर १/ X १/ मी. अंतरावर व जास्त उताराच्या जमिनीवर समपातळी रेषेवर रोपे लावतात. एका हेक्टरमधील झाडांची संख्या ५,००० ते ५,५०० असते.

वाफ्यात दीड ते दोन वर्षे वाढलेली रोपे मुळांना इजा न पोहोचेल अशा तऱ्हेने मातीसह वाफ्यातून काढतात. रोप लावण्याच्या जागी ०·७ मी. रुंद व रोपाच्या प्रधान मुळाच्या (सोटमुळाच्या) उंचीएवढे खोल खड्डे खणून त्यांत रोपे मुळावरील मातीच्या गोळ्यासकट लावतात. रोप लावताना प्रधान मूळ खालील टोकापर्यंत जमिनीत सरळ राहील याची काळजी घेणे जरूर असते. वाकडे राहिल्यास झाडाची वाढ चांगली होत नाही. खड्डा भरताना मातीत चार ते पाच किग्रॅ. शेणखत वा कंपोस्ट खत घालतात. रोपे मे-जून महिन्यांत वाफ्यातून काढून लावतात. लावल्यापासून सहा आठवड्यांनी रोपे पक्की होतात.

सावली : चहाची झाडे सावलीत चांगल्या प्रकार वाढतात. यासाठी पुढील शिंबावंत (शेंगा येणारी) झाडे लावण्यात येतात : उदल (अल्बिझिया स्टिप्युलाटा) या झाडाची सर्वांत जास्त प्रमाणावर लागवड करण्यात येते. याला स्थानिक भाषेत ‘सौ’ वा ‘काला सिरिस’ असेही म्हणतात. त्याच्या खालोखाल अल्बिझिया प्रोसेरा (पांढरा शिरीष सफेद सिरिस किन्हई),अल्बिझिया लेब्बेक (चिंचोळा शिरीष) आणि अल्बिझिया मोलुकाना अल्बिझिया  वंशातील इतर झाडे लावण्यात येतात. यांशिवायडालबर्जिया असामिका, डेरिस रोबस्टा, ल्युसीना ग्लॉका, ग्रेव्हिलिया रोबस्टा, ग्लिरानीडिया मॅक्युलाटा, ॲकेशिया (बाभूळ) व एरिथिना (पांगारा) वंशांतील जातींची झाडेही लावण्यात येतात. सावलीसाठी लावण्यात येणारी झाडे सु. १७ मी. अंतरावर लावतात.

तण काढणे : जमिनीचा फक्त वरचा थर औताच्या साहाय्याने खरडून किंवा हाताने खुरप्याच्या साहाय्याने तण काढण्यात येते. तसेच तणांची वाढ होऊ नये म्हणून झुडपांची छाटणी करण्याच्या वेळी झुडपांच्या फांद्यांचा विस्तार समोरासमोर होऊन त्यामुळे झुडपांची सावली संपूर्ण जमिनीवर पडेल अशी काळजी घेण्यात येते. खोलवर मुळे असणारी तणे खोल आंतर मशागती करूनच काढावी लागतात. उतारावरील जमिनीत मांसल तणे तशीच वाढू देतात कारण अशा तणांमुळे पावसाच्या पाण्याने होणारी जमिनीची धूप थांबते. झुडपांच्या जमिनीवर पडणाऱ्या सावलीमुळे आणि जमिनीवर पडणारी पाने व छाटणीच्या वेळी तोडून टाकलेल्या फांद्या या सर्वांमुळे कोरड्या हवेपासून चहाच्या झाडांचे संरक्षण होते. पाने आणि फांद्या हिवाळ्यात जमिनीत थोड्या खोल गाडतात. खोल आंतर मशागत करून पाने आणि फांद्या जमिनीत खोलवर गाडल्यामुळे फायदा होत नाहीच, परंतु मुळे तुटल्यामुळे नुकसानच होण्याचा संभव असतो.

खत देणे : चहाच्या वारंवार खुडणीमुळे ज्या प्रमाणात जमिनीतून मुळावाटे नायट्रोजन झाडांत घेतला जातो त्या प्रमाणात पुन्हा जमिनीस त्याचा पुरवठा न झाल्यास झाडापासून पानांचे पुरेसे उत्पन्न मिळत नाही. यासाठी चहाला नायट्रोजनयुक्त खते देणे जरूरीचे असते. हा पुरवठा अमोनियम सल्फेटच्या रूपात केला असता उत्तम पीक येते असा वीस वर्षांच्या संशोधनाचा निष्कर्ष आहे. कारण अमोनियम सल्फेटामुळे जमीन अम्लीय बनते व चहाची झाडे अम्लीय जमिनीतच चांगली वाढतात. दोन ते तीन वर्षांच्या झाडांना दर हेक्टरी २३ किग्रॅ. आणि ४ वर्षांच्या झाडांना दर हेक्टरी त्याच्या दुप्पट नायट्रोजन देतात. यापेक्षा जास्त वयाच्या झाडांना नायट्रोजनाचा पुरवठा वाढवावा लागतो. नायट्रोजनयुक्त खतांमुळे केवळ झाडांची वाढ फक्त चांगली होते असे नाही, तर शैवलामुळे होणाऱ्या लाल तांबेरा नावाच्या रोगाविरुद्ध प्रतिकारशक्ती यते. तीन ते चार वर्षांपर्यंतच्या झाडांना संपूर्ण खतमिश्रण देण्याची शिफारस केली जाते. जोरहाट येथील टोक्लाई संशोधन केंद्रातील संशोधनात असे आढळून आले की, नायट्रोजनामुळे उत्पन्नात होणारी वाढ हेक्टरी १८२ किग्रॅ. पर्यंतच असते. त्याचबरोबर नायट्रोजनाची मात्रा प्रमाणाबाहेर वाढविल्यास चहाच्या दर्जावर त्याचा प्रतिकूल परिणाम होतो.

जमिनीवर पडणारी पाने व छाटणीच्या वेळी तोडून टाकलेल्या फांद्यांमार्फत चहाच्या झाडांना सेंद्रिय पदार्थांचा पुरेसा पुरवठा होतो. शिवाय तूर, ⇨उन्हाळीच्या वंशातीलटेफ्रोसिया कॅंडिडा  यांसारखी झाडे वर्षभर वाढू देऊन ती जमिनीत गाडल्यास फायदा होतो.


छाटणी : नवीन पालवी विपुल प्रमाणात व जोमाने फुटावी आणि त्यामुळे कोवळ्या पानांचा कारखान्याला सतत भरपूर पुरवठा व्हावा हा चहाच्या झुडपांची वेळोवेळी छाटणी करण्याचा उद्देश असतो. चहाची पाने हाताने खुडणे सुलभ होईल एवढीच झुडपांची उंची छाटणी करून ठेवणे फायद्याचे असते. यासाठी झाड अगदी लहान असताना जमिनीपासून थोड्या सेंमी. वर छाटतात. त्यामुळे नवीन फांद्या बाजूला पसरून झाडाला झुडपाचा आकार येतो आणि फांद्यांची वाढ अशा रीतीने होते की, पाने खुडणे त्यामुळे सोपे जाते. साधारण मानाने झुडपाची उंची १ ते १·३ मी. ठेवतात. झुडपे या उंचीची झाल्यावर हवामानाप्रमाणे दर वर्षी अगर दोन वर्षांनी झाडांची छाटणी करतात. ईशान्य भारतात छाटणी दर वर्षी हिवाळ्यात करतात. दक्षिण भारतात ती दोन ते तीन वर्षांनी करतात (जास्त उंचीवरील मळ्यांत दोन छाटण्यांतील कालावधी यापेक्षा जास्त असतो). नवीन छाटणी करण्याच्या वेळी ती मागील छाटणीच्या वर ०·५ ते ५·० सेंमी. उंचीवर करतात. ज्या वेळी झुडपे खुडणीच्या दृष्टीने फार उंच वाढतात त्या वेळी झुडपांची जमिनीपासून ०·५ ते ०·७ मी. उंचीवर मोठ्या प्रमाणावर हिवाळ्यात छाटणी करून त्यानंतर दर वर्षी थोड्या प्रमाणावर छाटणी करतात. झुडपावर रोग पडल्यास झुडपाची छाटणी जमिनीलगत करतात अथवा रोगट फांद्या छाटतात.

आ. २. चहाची खुडणी : (१) मुख्य फांदी, (२), (३) पहिल्या क्रमांकाच्या फुटी, (४), (५) दुसऱ्या क्रमांकाच्या फुटी, (अ - अ) येथे खुडणी करतात.

खुडणी : चहाची झाडे सु. तीन वर्षांची झाल्यावर खुडणीला सुरुवात होते. फांदीच्या टोकाकडील पानाचा कोंब (पर्णांकुर), त्याखालील दोन अगर तीन पाने आणि कोंब व पाने यांच्यामधील देठ मिळून होणारा प्ररोह (धुमारा) तोडणे याला ‘खुडणी’ असे म्हणतात. फक्त कोंब आणि त्याखालील दोन पाने तोडल्यास त्याला ‘पूर्ण खुडणी’ म्हणतात. खुडणी यापेक्षा कमी असल्यास ‘नाजूक खुडणी’ आणि जास्त असल्यास (म्हणजेच खुडणीमध्ये जास्त पाने असल्यास) ‘भरड खुडणी’ म्हणतात. तयार चहाची प्रत खुडणीच्या प्रकारावर अवलंबून असते. कारण पानांतील टॅनिनाच्या प्रमाणावर चहाची प्रत अवलंबून असते. निरनिराळ्या ताज्या पानांतील टॅनिनाचे शेकडा प्रमाण (शुष्क स्थितीत) पुढीलप्रमाणे असते. कोंब २८, पहिले पान २८, दुसरे पान २१, तिसरे पान १८, चौथे पान १४, कोंब व दुसरे पान १२, दुसरे आणि चौथे पान यांमधील देठ ६. तीन पानांच्या प्ररोहात कोंबाचे वजन ६·५५% असते, पहिल्या पानाचे १०·३५%, दुसऱ्या पानाचे २०·८६%, तिसऱ्या पानाचे ३०·९८% व देठाचे वजन ३१·२३% असते.

झुडपाचे तोडण्यायोग्य सर्वच प्ररोह एकाच वेळी न खुडता विरळ खुडणी केल्याने झुडपाचा जोम कायम राहतो.

चहाची खुडणी ७ ते १० दिवसांच्या अंतराने व थंड हवामानात १४ दिवसांच्या अंतराने करतात. ईशान्य भारतात चहाच्या झुडपांना एका हंगामात पाच ते सहा वेळा नवीन पालवी फुटते व खुडणी दर आठवड्याने करण्यात येते. निरनिराळ्या पालव्यांमधील पानांपासून कारखान्यात तयार केलेला चहा वेगवेगळ्या प्रतीचा असतो. दुसऱ्या आणि चौथ्या पालवीतील पानांपासून तयार केलेल्या चहाची प्रत चांगली असते. भर पावसाळ्यात खुडलेल्या पानांपासून तयार केलेला चहा निकृष्ट प्रतीचा असतो.

चहाच्या खुडणीचे काम भारतात स्त्रिया हाताने करतात. खुडलेली पाने पाठीवरील पिशवीत टाकतात व नंतर कारखान्यात पाठवितात. टोक्लाई संशोधन केंद्राच्या यांत्रिक विभागात खुडणीचे यंत्र तयार करण्यात आले परंतु ते फारसे उपयुक्त ठरले नाही. सपाट आणि सावलीसाठी उंच झाडे नसलेल्या मळ्यात यंत्राच्या साहाय्याने खुडणी यशस्वी होते असे आढळून आले. परंतु प्रत्यक्षात अशा प्रकारचे चहाचे मळे भारतात फारच थोडे आहेत. रशियात चहाच्या खुडणीसाठी यंत्रे वापरतात.

उत्पन्न : जगातील चहा पिकविणाऱ्या काही देशांत दर हेक्टरी सु. ३,६०० किग्रॅ. तयार चहाचे उत्पन्न मिळाले आहे. भारतात पुष्कळशा मळ्यांत दर हेक्टरी १,७०० ते १,८०० किग्रॅ. चहाचे उत्पादन होते. १९७१ मध्ये भारतात सरासरी दर हेक्टरी उत्पन्न १,२१५ किग्रॅ. होते. (इ.स. १९०० मध्ये ते ४३१ किग्रॅ. आणि १९५० साली ८८१ किग्रॅ. होते) व निरनिराळ्या राज्यांतील दर हेक्टरी सरासरी उत्पन्न पुढील प्रमाणे होते : (आकडे किग्रॅ.मध्ये) आसाम १,२२९ पश्चिम बंगाल १,१६२ बिहार ९१ त्रिपुरा ५०३ उत्तर प्रदेश ३३८ हिमाचल प्रदेश २१२ (उत्तर भारत सरासरी १,१७१) तमिळनाडू १,६२५ कर्नाटक १,५०६ केरळ १,१५४ (दक्षिण भारत सरासरी १,३८४).

हेक्टरी उत्पन्नाबरोबरच तयार चहाची प्रत विचारात घेणे जरूर आहे. आर्द्र व उष्ण हवामानातील चहापेक्षा उंच प्रदेशातील चहा चांगल्या प्रकारचा असतो आणि त्याला बाजारात भावही चांगला मिळतो (उदा., दार्जिलिंग चहा) तसेच सारख्याच परिस्थितीत वाढणाऱ्या निरनिराळ्या झुडपांपासून तयार केलेल्या चहाच्या प्रतींमध्येही फरक असतो, असे आढळून आले आहे. चांगल्या प्रतीचा चहा देणाऱ्या झुडपाला नायट्रोजनयुक्त खत देऊन उत्पन्न वाढविल्यास चहाच्या प्रतीवर प्रतिकूल परिणाम होतो. सर्वसाधारणपणे सु. चाळीस वर्षांनंतर चहाच्या झुडपांचे उत्पन्न कमी होते, परंतु याला अपवाद आढळून आले आहेत. सातत्याने चांगले उत्पन्न देणारी १५० वर्षांची झुडपेही आढळून आली आहेत.

रोग आणि किडी : विसाव्या शतकाच्या सुरुवातीला कवकांमुळे (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतींमुळे) होणारे फक्त १०–१२ रोग आढळून आले होते. सध्या त्यांची संख्या सु. २०० असून त्यांतील निम्मे रोग भारतात आढळून येतात. ज्यांमुळे चहाचे विशेष नुकसान होते असे फारच थोडे रोग आहेत. फोड्या करपा (ब्लिस्टर ब्लाइट) व पानांची कूज (ब्लॅक रॉट) हे चहाच्या पानांवरील प्रामुख्याने आढळून येणारे रोग आहेत. फोड्या करपा हा एक्झोबॅसिडियम व्हेक्सानस  या कवकामुळे होणारा रोग आहे. भारतातील चहाच्या बहुतेक मळ्यांत छाटणी केलेल्या झुडपांच्या आणि लहान वयाच्या झुडपांच्या पानांवर पांढऱ्या अगर गुलाबी वाटोळ्या ठिपक्यांच्या स्वरूपात हा आढळून येतो. हे ठिपके मागाहून काळे पडतात आणि रोगट भाग गळून पडतो. त्यामुळे पानांना किडीने खाल्ल्याप्रमाणे छिद्रे पडतात. जास्त प्रमाणावर रोग पडल्यास तो खोडावरही आढळून येतो. छाटणीच्या वेळेत बदल करून आणि लहान झुडपांवर ताम्रयुक्त कवकनाशके फवारून या रोगाचे नियंत्रण करता येते. हा रोग उत्तर भारतात चहाच्या लागवडीच्या सुरुवातीपासून अस्तित्वात आहे. तो दक्षिण भारतात आणि श्रीलंकेत १९४६ च्या सुमारास पोहोचला आणि तेथून तो इंडोनेशिया आणि मलेशिया येथे पसरला. पानांची कूज हा रोग कॉर्टिसियम  वंशातील कवकामुळे होतो. या रोगावरही ताम्रयुक्त कवकनाशके फवारणे हा उपाय आहे. लाल तांबेरा आणि करडा करपा (ग्रे ब्लाइट) हे विस्तृत प्रमाणावर आढळून येणारे रोग आहेत. तथापि या दोन्ही रोगांमुळे विशेष नुकसान होत नाही. लाल तांबेरा परजीवी (दुसऱ्या जीवावर उपजीविका करणाऱ्या) शैवलामुळे होतो. खोडावर नारिंगी अगर काळे डाग पडतात. कोणत्याही कारणामुळे चहाचे झुडूप कमजोर झाल्यास ह्या रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. ह्या आणि करडा करपा या कवकामुळे होणाऱ्या रोगांचे नियंत्रण ताम्रयुक्त कवकनाशके फवारून करता येते. झुडपांची छाटणी केल्यावर खोडांना रोगाचा प्रादुर्भाव होऊन मुळे कुजतात. अशा प्रकारच्या काही रोगांचे कारण जमिनीच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आढळून येते. कुजणारे खोड उपटून काढणे हा एकच उपाय अशा प्रकारच्या रोगांवर आहे.


चहाच्या पिकावर अनेक प्रकारच्या किडी पडतात. त्यांच्या जीवनक्रमाचा अभ्यास करून त्यावर आधारित अशा मशागतीच्या पद्धती अमलात आणून त्यांतील पुष्कळ किडींचे नियंत्रण करता येते. अधूनमधून काही किडींचा मोठ्या प्रमाणावर फैलाव झाला, तरी त्यांचे नियंत्रण करणे फार कष्टाचे नसते. चहाच्या झुडपावरील डास ही ढेकूण वर्गातील चहाची सर्वांत जास्त नुकसानकारक कीड आहे. मशागतीच्या सुधारलेल्या पद्धती आणि योग्य अशा जातीची लागवड केल्याने या किडीला आळा बसतो. ईशान्य भारतात थंडीमुळे आपोआपच या किडीचे नियंत्रण होते. दक्षिण भारतात या किडीचे प्रमाण जास्त आहे. परंतु तेथे इतर परजीवी किडींमुळे या किडीचे नियंत्रण होण्यास मदत होते. लाल कोळी (रेड माइट) ही सर्वत्र आढळून येणारी कीड आहे. ही कीड वर्षभर आढळून येते, परंतु छाटणीनंतर फुटणाऱ्या कोवळ्या प्ररोहावर ती विशेष प्रमाणात नुकसानकारक आहे. कमजोर झुडपांचे या किडीमुळे विशेष नुकसान होते. लहान वयाच्या वा मोठ्या प्रमाणावर छाटणी केलेल्या झुडपांवर गंधक-चुन्याचे मिश्रण फवारून अथवा गंधकाची भुकटी उडवून या किडीचे नियंत्रण करता येते.

चहाच्या पानांवरील प्रक्रिया : (तयार चहाची निर्मिती). चहाच्या पानांची खुडणी केल्यावर ती काळजीपूर्वक आणि शक्य तितक्या लवकर कारखान्यात पाठविली जातात. कारखान्यात या पानांवर विविध प्रक्रिया करून तयार करण्यात येणारे चहाचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत : (१) काळा चहा (ब्लॅक टी), (२) हिरवा चहा (ग्रीन टी), (३) उलाँग टी, (४) ब्रिक टी, (५) लेप्पेट टी, (६) झटपट चहा (इन्स्टंट टी), (७) सुवासिक चहा. भारतातील बहुसंख्य मळ्यांतील कारखान्यांत काळा चहा बनविण्यात येतो. हिरवा चहा व झटपट चहा यांचे थोड्या प्रमाणात उत्पादन होते.

(१) काळा चहा : या चहाच्या निर्मितीमध्ये पाच प्रकारच्या क्रिया आहेत. (अ) खुडलेली पाने कोमेजविणे, (आ) वळविणे, (इ) किण्वन (सूक्ष्मजीवांनी तयार केलेल्या एंझाइमांमुळे, म्हणजे जीवरासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करणाऱ्या प्रथिनयुक्त पदार्थांमुळे, सेंद्रिय पदार्थाचे साध्या पदार्थात रूपांतर होण्याची क्रिया), (ई) वाळविणे आणि (उ) प्रतवार प्रकारीकरण.

(अ) कोमेजविणे : नुकत्याच तोडलेल्या चहाच्या पानामध्ये सर्वसाधारणपणे पाण्याचा अंश ७५% असतो. कोमेजविण्याच्या क्रियेत हे प्रमाण ६५% पर्यंत आणतात. वळविण्याच्या क्रियेमध्ये ताजी पाने वापरल्यास ती तुटतात. कोमेजलेली पाने वापरल्यास ही क्रिया सुलभ होते. शिवाय कोमेजविण्याच्या क्रियेत पानात होणाऱ्या काही रासायनिक विक्रियांमुळे तयार चहाची प्रत सुधारते. कोमेजविण्याची क्रिया १८ ते २० तासांत पुरी होणे आवश्यक असते. तसेच खोलीचे तापमान २६° से. च्या वर न जाईल अशी खबरदारी घेणेही आवश्यक असते. ईशान्य भारतात चहाची पाने कोमेजविण्यासाठी ती उघड्या खोल्यांतून कप्पे असलेल्या मांडण्यांवर पसरतात. यांत फळ्यांच्या ऐवजी बांबू जोडून त्यांचे कप्पे केलेले असतात. अशा कप्प्यांवर तागाचे कापड पसरून त्यांवर चहाची पाने पसरून ठेवतात. दोन कप्प्यांतील अंतर १ मी. असते आणि मांडणीची उंची ८ मी.पर्यंत असते. बांबूऐवजी लोखंडी तारेच्या जाळीचा वापरही करतात. खेळत्या हवेमुळे पानांतील पाण्याचा अंश कमी होतो.

चहाची पाने कोमेजविण्याच्या क्रियेसाठी यंत्रसामग्री शोधून काढण्यात आली असून त्यामुळे जागा आणि वेळ यांची बचत होते. परंतु नैसर्गिक रीत्या पाने कोमेजविण्याची क्रिया कृत्रिम रीत्या कोमेजविण्याच्या क्रियेपेक्षा जास्त चांगली असे मानण्यात येते कारण नैसर्गिक रीत्या कोमेजविलेल्या पानांमध्ये ॲमिनो अम्लांचे प्रमाण जास्त असते. कृत्रिम रीतीने कोमेजविण्याची क्रिया बोगदा, माळा, पिंप आणि कुंड अशा चार पद्धतींनी करतात. बोगदा पद्धतीत गरम हवा पानांवरून सोडतात. पाने तबकांवर ठेवून ती बोगद्यात बसविता येतात. चार किंवा सहा बोगद्यांची मालिका असून पहिल्या बोगद्यातील पानांवरील क्रिया संपल्यावर तबके दुसऱ्या बोगद्यात सरकवितात. तेथे उलट दिशेने हवेचा प्रवाह सोडतात तेथून ती तिसऱ्या व पुढच्या उलट सुलट दिशांनी हवेचा प्रवाह सोडलेल्या बोगद्यांतून सरकवितात. प्रत्येक बोगद्यात सारखाच वेळ पाने राहतात त्यामुळे सर्व तबकांतील पानांवर सारख्याच प्रमाणात कोमेजविण्याची क्रिया होते. या क्रियेला तीन ते चार तास लागतात. दार्जिलिंगमध्ये व दक्षिण भारतात कारखान्यांच्या वरती बंद माळे बांधून त्यांत गरम हवा उलट सुलट दिशांनी सोडून पानांवर कोमेजविण्याची क्रिया करतात. पिंप पद्धतीत एका फिरत्या पिंपात गरम हवा मध्यभागी असणाऱ्या एका शंकूमधून सोडून पिंपातील पानांतून जाऊ देतात व ती पिंपाच्या बाह्य भागावर असलेल्या छिद्रांतून बाहेर पडते. हे पिंप दर तीन मिनिटांनी एकदा फिरते व सामान्यतः तीन ते चार तासांत कोमेजविण्याची क्रिया पूर्ण होते. कुंड पद्धत ही आफ्रिकेत प्रथम प्रचारात आली व ती आता ईशान्य भारतात पुष्कळच लोकप्रिय झाली आहे. हीत लाकडाच्या वा विटकामाच्या सु. १२ ते २६ मी. लांब व १·८३ मी. रुंद कुंडात तारेच्या आधाराने बसविलेल्या तागाच्या वा इतर तत्सम कापडावर पानांचा सु. २० सेंमी. जाड थर केलेला असतो. या कुंडातून गरम हवेचा प्रवाह उलट सुलट दिशांनी सोडतात. तापलेली पाने निवण्यासाठी काही काळ थंड हवेचा प्रवाह सोडतात. या एकूण क्रियेला सु. सहा तास लागतात.

(आ) वळविणे : ही क्रिया यंत्राच्या साहाय्याने केली जाते. या क्रियेत पानांना पीळ पडतो व ती पिळवटली जात असताना खरचटली गेल्यामुळे पानांतील रस बाहेर पडून तो पृष्ठभागावर पसरतो व त्याचा हवेतील ऑक्सिजनाशी संबंध येतो. पानांना पीळ पडल्यामुळे विशिष्ट प्रतीचा चहा (ऑरेंज पिको आणि पिको) तयार करणे शक्य होते. आसाममध्ये ही क्रिया तीन वेळा केली जाते. पहिल्या आणि दुसऱ्या वळवणीनंतर लहान आकाराची पाने व तुकडे चाळणीतून चाळण्यात येतात. वळविण्याची क्रिया किण्वनाच्या क्रियेसाठी आवश्यक आहे.

(इ) किण्वन : वळविण्याच्या यंत्रातून बाहेर पडलेली पाने आणि तुकडे किण्वनासाठी खास तयार केलेल्या खोल्यांत स्वच्छ आणि भेगा नसलेल्या सिमेंटच्या फरशीवर किंवा जमिनीपासून उंच अशा कोणत्याही स्वच्छ आणि सपाट पृष्ठभागावर पसरतात. अंगज पोलाद, ॲल्युमिनियम अथवा प्लॅस्टिकचा या कामी उपयोग करतात. थराची उंची हवामानाप्रमाणे २·५ ते १० सेंमी. असते. चांगल्या किण्वनासाठी खोलीतील तापमान २४°  ते २७° से. आणि हवेतील आर्द्रता शक्य तेवढी जास्त (९५% पर्यंत) ठेवण्यात येते. पानाच्या प्रकाराप्रमाणे किण्वनाची क्रिया दोन ते सहा तासांत (सर्वसाधारणपणे तीन तासांत) पूर्ण होते. किण्वनामुळे पानांचा रंग चकचकीत तांब्यासारखा लालसर होतो व त्यांना मूळचा हिरव्या पानांचा वास येत नाही. योग्य मात्रेपर्यंत किण्वनाची क्रिया झाल्यावर ताबडतोब वाळविण्याची क्रिया सुरू होते. त्यामुळे किण्वनाची क्रिया बंद पडते. चांगल्या प्रतीचा चहा तयार होण्यासाठी कोमेजविणे, वळविणे आणि किण्वन या क्रिया योग्यप्रकारे झाल्या पाहिजेत.


(ई) वाळविणे : किण्वनाची क्रिया केलेली चहाची पाने यंत्रामध्ये गरम हवेच्या झोतामध्ये वाळवितात. सुरुवातीला गरम हवेच्या झोताचे तापमान ५५° से.पेक्षा कमी नसते आणि जसजशी पाने यंत्रातून पुढे सरकतात तसतसे गरम हवेचे तापमान वाढते. यंत्रामधून पाने बाहेर पडण्याच्या वेळेस आतील गरम हवेचे तापमान ८७·५°  ते ९३° से. असते. वाळविण्याच्या क्रियेला तीस ते चाळीस मिनिटे लागतात आणि वाळलेल्या चहामध्ये तीन ते चार टक्के पाण्याचा अंश असतो.

कोमेजविण्याच्या क्रियेशिवाय तयार केलेला काळा चहा : भारताच्या काही भागांत, तसेच मालावी (आफ्रिका) आणि श्रीलंकेमध्ये या प्रकारचा चहा तयार केला जातो. चहाची ताजी पाने लेग कटर नावाच्या यंत्रात घालून सु. ०·४ मिमी. मापाचे तुकडे करतात. हे तुकडे वळविण्याच्या यंत्रात घालून हलकेच वळवितात. नंतर हा माल थंड होऊ देतात, आणखी एकदा वळवितात आणि थंड झाल्यावर किण्वनाच्या खोलीत ठेवतात (किण्वनाची क्रिया वर वर्णन केल्याप्रमाणेच असते). किण्वनानंतर प्रथम जास्त तापमानात १०% पाण्याचा अंश राहीपर्यंत आणि नंतर कमी तापमानात पाण्याचा सर्व अंश निघून जाईपर्यंत वाळवितात.

ही पद्धत पश्चिम बंगालमधील दुआर भागात सु. १९३० नंतर फार लोकप्रिय झाली आहे कारण त्या भागात खुडणीच्या भर हंगामात सतत पाऊस पडतो. त्यामुळे पाने योग्य रीतीने कोमेजविणे फार त्रासाचे असते. पाने कोमेजविण्यामुळे तयार झालेला चहा दिसावयास आकर्षक असतो व त्याची गुणवत्ताही सुधारते हे खरे असले, तरी काळा चहा तयार करण्यासाठी पाने कोमेजविण्याची क्रिया आवश्यकच आहे असे नाही, असे आढळून आले आहे.

या पद्धतीच्या तपशीलात निरनिराळ्या कारखान्यांत फरक आढळून येतात. या पद्धतीने तयार केलेल्या चहाला ‘लेग कट’ असेही नाव आहे.

सी. टी. सी. पद्धत : काळा चहा तयार करण्यासाठी कोमेजविलेली पाने रुळांमध्ये खरचटविण्यासाठी ही सुधारलेली पद्धत आहे. मॅक्कर्चर यांनी यासाठी सी. टी. सी. (क्रशिंग, टिअरिंग अँड कर्लिंग) नावाचे नवीन यंत्र १९३० च्या सुमारास शोधून काढले. या यंत्रात पाने खरचटविण्याचे कार्य जुन्या पद्धतीपेक्षा चांगले होते आणि पानांचा आकारही कमी करण्यात येतो. यंत्रात दोन अगंज पोलादाचे समांतर रूळ वेगवेगळ्या गतींनी आतील बाजूस फिरतात. एका रुळाची गती मिनिटाला ५० ते १५० फेरे असते, तर दुसऱ्याची त्याच्या चौपट असते. कोमेजविलेली पाने या यंत्रात कमी दाबाखाली अगर दाबाशिवाय चाळीस मिनिटे वळविली जातात. नंतर चाळणीतून लहान आकाराचे पानांचे तुकडे चाळण्यात येतात. मोठ्या आकाराचे तुकडे पुन्हा सी.टी.सी. यंत्रात दोन, तीन अगर चार वेळा घालून प्रत्येक वेळी लहान आकाराचे तुकडे चाळण्यात येतात. चाळलेला माल नंतर किण्वन क्रियेच्या खोलीत ठेवून किण्वनाची क्रिया पूर्ण झाल्यावर वाळविण्यात येतो (किण्वन क्रिया आणि वाळविण्याची क्रिया सर्वसाधारणपणे जुन्या पद्धतीप्रमाणे असतात. मात्र या पद्धतीत किण्वनाची क्रिया दीड ते दोन तासांत पूर्ण होते).

दुसऱ्या महायुद्धानंतर सी.टी.सी. पद्धतीने उत्तर भारतातील मळ्यांत फार मोठ्या प्रमाणावर चहा तयार होऊ लागला आहे. या भागात जवळजवळ पन्नास टक्के चहा या पद्धतीने होतो असा अंदाज आहे. दक्षिण भारतात ही पद्धत फारशी उपयोगात आणली जात नाही. अलीकडे या यंत्रात आणखी सुधारणा करण्यात आल्या आहेत. या पद्धतीने तयार केलेला चहा सी. टी. सी. चहा या नावाने बाजारात विकला जातो व तो काळ्या चहाचाच प्रकार आहे. 

(उ) प्रतवार प्रकारीकरण : वाळविलेला चहा स्वच्छ करून तो यंत्राच्या साहाय्याने निरनिराळ्या प्रतींमध्ये वेगवेगळा केला जातो. यावेळी पानाचे लांब देठ अगर जाड आणि न वळविली गेलेली पाने काढून टाकण्यात येतात. व्यापारातील सर्वसाधारण वापरातील काळ्या चहाच्या प्रती पुढीलप्रमाणे आहेत. पत्ती चहा : (१) ऑरेंज पिको (ओ.पी.), (२) पिको आणि (३) पिको सुचांग. तुटका चहा (ब्रोकन टी) : (१) ब्रोकन ऑरेंज पिको (बी. ओ. पी.), (२) ब्रोकन पिको (बी. पी.), (३) ब्रोकन पिको सुचांग (बी. पी. एस.), (४) उफणलेला (फॅनिंग्ज) आणि (५) भुकटी. उफणलेल्या चहाच्या प्रतीमध्ये ऑरेंज फॅनिंग्ज आणि पिको फॅनिंग्ज हे दोन प्रकार आहेत. ऑरेंज पिको हा सर्वांत उत्तम प्रतीचा चहा मानला जातो. वरील प्रती जुन्या पद्धतीने तयार केलेल्या काळ्या चहाच्या आहेत. सी. टी. सी. पद्धतीने तयार केलेल्या चहाच्या प्रतीमध्ये ऑरेंज पिको, पिको आणि पिको सुचांग या पत्ती चहाच्या प्रती नसतात. उच्च दर्जाचा चहा बनविण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या जिल्ह्यांतील काही मळ्यांमध्ये फ्लॉवरी ऑरेंज पिको आणि नं. १ ब्रोकन ऑरेंज पिको या खास प्रतींचा चहा वेगळा काढला जातो. चहाच्या पुष्कळशा मळ्यांतून हल्ली ‘पत्ती’ चहा तयार करीत नाहीत. पाने कोमेजविल्याशिवाय तयार केलेल्या चहाच्या प्रती वेगळ्या असतात. 

भुकटी या प्रकाराला पूर्वी फारशी मागणी नसे कारण चहापात्रांत चहा (पेय) तयार करण्यासाठी भुकटी सोईस्कर नाही. परंतु भारतात स्थानिक उपयोगासाठी या चहाला चांगली मागणी असते. कलकत्ता बाजारात बी. पी. आणि बी. पी. एस. प्रतीच्या चहापेक्षा भुकटी चहा जास्त प्रमाणात विकला जातो. यामुळे पुष्कळ मळ्यांमध्ये शक्य असेल तेवढे भुकटी चहाचेच उत्पादन केले जाते. या प्रकारच्या चहापासून चांगल्या प्रकारचा चहा (पेय) तयार होतो. सरासरीने १०० किग्रॅ. हिरव्या पानांपासून २२·५ किग्रॅ. तयार काळा चहा मिळतो.

(२) हिरवा चहा : या चहाचे वैशिष्ट्य म्हणजे तो तयार करताना किण्वनाची क्रिया केली जात नाही. प्रथम चहाची खुडलेली ताजी पाने वाफारतात. त्यामुळे किण्वनाची क्रिया बंद पडते आणि पानांचा हिरवा रंग कायम राहतो. केंद्रोत्सारी (फिरत्या पात्रातील पदार्थ केंद्रापासून दूर ढकलणाऱ्या प्रेरणेचा उपयोग करणाऱ्या) पद्धतीने वाफारलेल्या पानांतील जास्त असलेले पाणी काढून टाकतात. मागाहून ती वळवितात आणि ९३° से. तापमानात वाळवितात. पाने खुडल्यापासून हा चहा तयार करण्यासाठी फक्त २ तास लागतात (काळा चहा तयार करण्यासाठी २४ तास लागतात). हा चहा जपानमध्ये मोठ्या प्रमाणावर तयार करतात. त्या देशातून निर्यात होणाऱ्या एकूण चहापैकी ८० टक्के चहा या प्रकारचा असतो आणि त्यातील पुष्कळसा भाग उत्तर आफ्रिकेतील अल्जेरिया आणि मोरोक्को या देशांत जातो. श्रीलंका, भारत आणि जावा येथेही या चहाचे उत्पादन होते. 

(३) उलाँग चहा : हा चहा तयार करताना कोमेजविण्याची आणि किण्वनाची अशा दोन्ही क्रिया काळ्या चहाच्या कृतीपेक्षा थोड्या प्रमाणावर केल्या जातात. इतर कृती काळ्या चहाप्रमाणेच असते. या चहाला अमेरिकेत विशेष मागणी आहे व याचे उत्पादन जवळजवळ संपूर्णपणे तैवानमध्ये होते. या चहाला विशिष्ट स्वाद असतो आणि तो तैवानमधील चहाचा विशिष्ट प्रकार, तेथील जमीन व हवामान यांचा परिणाम आहे असे मानले जाते. 


(४) ब्रिक टी : (चहाच्या विटा). काळ्या आणि हिरव्या अशा दोन्ही प्रकारच्या चहापासून हा चहा तयार केला जातो. तिबेट आणि मध्य आशियातील देशांत तो वापरला जातो. काळ्या चहाच्या कृतीमध्ये मिळणाऱ्या हलक्या प्रतीच्या चहापासून (चाळलेला माल, भुकटी, देठ वगैरे) विटा बनविल्या जातात. हिरव्या चहापासून विटा तयार करताना फक्त ‘पत्ती’ वापरतात. हा चहा चीनमध्ये तयार करतात व यासाठी १·३ मी. X २३ सेंमी. X १० सेंमी. मापाचे साचे वापरतात. प्रत्येक साच्यात सु. दोन किग्रॅ. वजनाच्या चार विटा तयार होतात. 

(५) लेप्पेट टी : या प्रकारचा चहा ब्रह्मदेशातील शान संस्थाने व आसामातील डोंगराळ भागात वापरला जातो. चहाची हिरवी पाने प्रथम उकळून अगर वाफारून नंतर ती खड्‌ड्यात पुरून ठेवतात. (गवतापासून मुरघास तयार करतात त्याप्रमाणे). अशा प्रकारे पुरून ठेवलेल्या चहाचा वापर मुख्यत्वे लोणचे अगर भाजीसाठी करतात. 

(६) झटपट चहा : हा तयार करण्यासाठी कारखान्यात तयार केलेल्या चहाचा पाण्यात अर्क तयार करून कमी तापमानात आणि निर्वात स्थितीत अर्कातून पाण्याचा अंश काढून घेण्यात येतो. यामुळे चहाचा स्वाद कायम राहतो. नंतर वाळलेल्या अर्काची ऑक्सिजन विरहित जागेत पूड करण्यात येते व ती डब्यांत बंद करण्यात येते. ही पूड गरम पाण्यात टाकून अगदी थोड्या वेळात पेय चहा करता येतो. या पेयाला योग्य रंग, स्वाद व तजेला येण्यासाठी निर्मितीच्या प्रक्रियेत प्रत्येक टप्प्याचे तापमान अतिशय काटेकोरपणे नियंत्रित करणे आवश्यक असते. अशा तऱ्हेचा चहा विशेषकरून प्रवासात उपयोगी पडतो. झटपट कॉफीशी तुलना करता झटपट चहाला फार कमी मागणी असते. १९७१ मध्ये भारतात २·५५ लक्ष किग्रॅ. झटपट चहाचे उत्पादन झाले आणि त्यापैकी २·३२ लक्ष किग्रॅ. चहा निर्यात करण्यात आला. 

(७) सुवासिक चहा : या प्रकारामध्ये गुलाब, मोगरा, जाई, जुई या फुलांचा उपयोग करण्यात येतो. कारखान्यात तयार झालेल्या चहाच्या दोन ते तीन सेंमी. थरावर वाळलेली फुले (पन्नास किग्रॅ. चहासाठी दीड किग्रॅ. वाळलेली फुले या प्रमाणात) पसरतात. त्यावर दुसरा चहाचा थर आणि वाळलेली फुले अशा रीतीने एकावर एक थर लावून त्यांना दोन तास शेक देऊन एक दिवस मुरत ठेवतात. नंतर वाळलेली फुले वेगळी काढण्यात येतात. अशा रीतीने तयार केलेला सुवासिक चहा बिनवासाच्या चहात मिसळून पंधरा ते वीस पट सुवासिक चहा तयार करतात आणि खोक्यांत भरतात. अशा तऱ्हेचा चहा चीनमध्ये जास्त प्रमाणात तयार करण्यात येतो. 

गुणवत्ता ठरविणे : चहाची गुणवत्ता ठरविताना निरनिराळ्या बाबी विचारात घेणे आवश्यक असते. उदा., चहाचा प्रकार (काळा चहा, हिरवा चहा, उलाँग चहा वगैरे), तो कोणत्या देशात तयार करण्यात आला आणि पेय तयार करण्याच्या कृती. चहाच्या गुणवत्तेचे मोजमापन करणे अवघड काम आहे कारण चहा पिणाऱ्या लोकांच्या आवडी भिन्न असतात. असे असले, तरी धंदेवाईक चहापरीक्षक चहाच्या गुणवत्तेचे मोजमापन फार वर्षांपासून करीत आले आहेत. चहा दिसण्यात कितपत आकर्षक आहे, पानाला पीळ कितपत देण्यात आला आहे, त्याचा वास कोणत्या प्रकारचा आहे याची परीक्षा प्रथम केली जाते. नंतर ठराविक वजनाच्या चहाचा ठराविक परिमाणाच्या पाण्यात ठराविक वेळात (सर्वसाधारणपणे पाच मिनिटे) काढा तयार करून त्याची चव घेतली जाते. या आणि इतर कसोट्या लावून चहाची गुणवत्ता ठरविली जाते. 

वेगवेगळ्या चहाच्या प्रतींचे मिश्रण : वेगवेगळ्या चहाच्या मळ्यांत तयार झालेला एकाच प्रकारचा चहा सारख्याच गुणवत्तेचा नसतो. प्रत्येकात विशिष्ट गुणधर्म असतात. तसेच एकाच मळ्यात वेगवेगळ्या ऋतूंत तयार झालेला चहा एकसारखा नसतो. ग्राहकाला बंद पाकिटातून एकाच गुणवत्तेचा चहा वर्षभर मिळावा यासाठी वेगवेगळ्या चहाच्या मळ्यांतील (पंधरापासून तीसपर्यंत) चहाचे विशिष्ट प्रमाणात मिश्रण केले जाते. याला ब्लेंडिंग असे म्हणतात. हे काम अनुभवी आणि त्या कामात निष्णात असलेल्या चहापरीक्षकांकडून केले जाते. यांना ब्लेंडर असेही म्हणतात. कलकत्त्यासारख्या व्यापारी केंद्रात ब्लेंडिंगचे काम केले जाते. 

चहाच्या पेट्या भरणे : यासाठी प्लायवुडच्या पेट्यांचा वापर केला जातो. ह्या पेट्यांना आतून ॲल्युमिनियमचा पातळ पत्रा आणि त्यावर पार्चमेंट (पाणी व स्निग्ध पदार्थ यांचा परिणाम न होणारा) कागद लावण्यात येतो. बाहेरील हवा आत जाऊन चहा खराब होऊ नये यासाठी ही खबरदारी घेण्यात येते. ६० सेंमी. X ४८ सेंमी. X ४८ सेंमी. मापाच्या पेटीत ४५ ते ६० किग्रॅ. पत्ती चहा आणि ५७ आणि ७५ किग्रॅ. तुटका चहा मावतो. भुकटी चहासाठी लहान पेट्या वापरतात.

 उपउत्पादने : पानांवर प्रक्रिया करताना आणि नंतर तयार चहा हाताळताना वेगळे करण्यात येणारे पानांचे देठ व पानांतील वाया जाणारे इतर भाग एवढेच उपउत्पादन चहा उद्योगात मिळते. एकूण चहा उत्पादनापैकी फक्त तीन टक्के हा अपशिष्ट भाग असतो. भारतात दर वर्षी सु. १·२ कोटी किग्रॅ. असे अपशिष्ट पदार्थ तयार होतात. या पदार्थाची चहात मुद्दाम भेसळ करण्याची शक्यता असल्यामुळे त्यातील बराचसा भाग नष्ट करण्यात येतो. थोड्या प्रमाणात अपशिष्ट पदार्थांचा खत म्हणून उपयोग करण्यात येतो. या पदार्थांचा मुख्यत्वे कॅफीन तयार करण्यासाठी कच्चा माल म्हणून उपयोग करण्यात येतो. भारतात चार कारखान्यांत अशा प्रकारे कॅफिनसाठी चहा अपशिष्टाचा उपयोग करण्यात येतो. १९७१ साली या कारखान्यांत ३३,८०० किग्रॅ. कॅफीन तयार करण्यात आले.

प्रक्रिया करण्याची यंत्रसामग्री : चहा उद्योगात वापरण्यात येणाऱ्या यंत्रसामग्रीचे उत्पादन भारतात पहिल्या महायुद्धाच्या वेळी झाले. १९५६ नंतर या उद्योगात मोठी सुधारणा होऊन भारत या यंत्रसामग्रीच्या बाबतीत आता स्वयंपूर्ण झालेला आहे. १९६१ पासून अशी यंत्रसामग्री परदेशांत निर्यातही होऊ लागली आहे. सी. टी. सी. प्रक्रिया करणारी, देठ काढून वेगळे करणारी, प्रतवारीने वेगळी करणारी, आवेष्टन करणारी, पाने कोमेजविणारी, पान वळविणारी इ. विविध क्रिया करणारी यंत्रसामग्री व त्यांना लागणारे सुटे भाग तयार करणारे १९ कारखाने भारतात असून त्यांतील भांडवल गुंतवणूक १९७२ मध्ये सु. २६ कोटी रु. होती. १९७२ साली ८८ लक्ष रु. ची यंत्रसामग्री तयार करण्यात आली. १९७१-७२ मध्ये २४ लक्ष रु. ची यंत्रसामग्री निर्यात करण्यात आली.

भेसळ : चहात खालील पदार्थांची भेसळ करण्यात येते असे आढळून आले आहे. (१) वापरलेला चहा (२) बारीक वाळू, (३) चुना, (४) अगस्ता अथवा इतर झाडांची तुरट पाने (तशीच अगर रंगवून), (५) चहाच्या पानांचे मोठे देठ (बारीक करून), (६) उडदाची सालपटे, वापरलेल्या चहाला कात, हळद अगर कृत्रिम रंग यांच्या साहाय्याने रंग दिला जातो. चुन्यामुळे हलक्या प्रतीच्या चहापासून तयार केलेल्या काढ्याचा रंग सुधारतो.

अमेरिकेत १८८३ पूर्वी भेसळ केलेला चहा मोठ्या प्रमाणावर पाठविला जात असे. त्यानंतर अमेरिकन सरकारने कायदे करून आयात केलेल्या चहाची तपासणी करण्यासंबंधीची तत्त्वे निश्चित केली. हा कायदा अद्यापही अस्तित्वात आहे. 

इंग्लंडमध्येही १७२५ च्या अगोदर चहामध्ये झाडांच्या सालीची भेसळ होत असे परंतु कायद्याने भेसळीला प्रतिबंध करण्यात आला. तरीही पन्नास वर्षांनंतर देखील भेसळ थांबली नाही असे आढळून आल्यावर या गुन्ह्याला दंडाऐवजी एक वर्ष कैदेची शिक्षा लागू करण्यात आली. भारतातही अशा भेसळीला प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने कायदा करण्यात आलेला आहे. [⟶ भेसळ]. 


चहातील घटक : चहा तयार करण्यासाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या प्ररोहामध्ये ७५ ते ७९% पाण्याचा अंश असतो. पाण्याचा अंश काढून टाकल्यावर राहिलेल्या भागात पुढील प्रमुख घटक असतात. (आकडे शेकडा प्रमाणाचे) : कॅटेचीन व कॅटेचीन टॅनीन २६, प्रथिने १५·७, कॅफीन २·७, इतर नायट्रोजनयुक्त पदार्थ ८·७, शर्करा ४·१, स्टार्च १·९, पेक्टीन १२·७, सेल्युलोज ७·३, लिग्निन ६ व राख ४·९. कारखान्यांत तयार केलेल्या काळ्या चहात कॅटेचीन व कॅटेचीन टॅनिनाचे प्रमाण १८·९% असते व बाकीच्या घटकांचे प्रमाण थोड्या फार फरकाने वर दिल्याप्रमाणेच असते. तयार चहात पाण्याचा अंश ८% पेक्षा जास्त नसावा (कमी असल्यास उत्तम). याशिवाय चहात बाष्पनशील तेल (ज्यामुळे चहाला सुगंध येतो), एंझाइमे, लेश (अत्यल्प प्रमाणात आढळणारी) मूलद्रव्ये व जीवनसत्त्व व साहाय्यक वृद्धिघटक असतात. 

उकळत्या पाण्यात पाच मिनिटे चहा ठेवल्यास त्यात ५०% टॅनीन आणि सु. ७५% कॅफीन विरघळते. तसेच चहातील एकूण पाण्यात विद्राव्य (विरघळणाऱ्या) पदार्थांपैकी निम्मे पदार्थ या पाच मिनिटांत उतरतात. चहातील टॅनीन पदार्थ बाभूळ अथवा त्यासारख्या झाडांच्या सालीतील टॅनीन पदार्थाहून वेगळे असतात. कॅफीन हा चहातील फार महत्त्वाचा घटक आहे. शरीराला आणि मेंदूला आलेला थकवा काही प्रमाणात नाहीसा करण्याच्या कॅफिनाच्या गुणधर्मामुळे चहा हे जगातील महत्त्वाचे उत्तेजक पेय ठरले आहे. प्ररोहातील निरनिराळ्या पानांत कॅफिनाचे शेकडा प्रमाण पुढीलप्रमाणे असते : कोंब व पहिले पान ४·७, दुसरे पान ४·५, तिसरे पान ३·७, चौथे पान ३·३, देठ १·९ (हे प्रमाण पानातील वा देठातील पाण्याचा अंश काढल्यावर राहिलेल्या भागाचे आहे.) चांगल्या प्रकारच्या चहात कॅफिनाचे प्रमाण जास्त असते.

उपयोग : चहा हे शरीराला हितकारक आणि उत्साहवर्धक पेय आहे, याबद्दल दुमत नाही. मेंदूपेक्षाही स्नायूंना हे पेय जास्त उत्साहवर्धक आहे. माफक प्रमाणात चहाचे सेवन केल्यास शारीरिक थकवा कमी होतो. चहा स्तंभक (आतड्याचे आकुंचन करणारा) आणि मूत्रल (लघवी साफ करणारा) आहे. त्यातील टॅनीन पदार्थामुळे जास्त प्रमाणात चहा प्याल्यास अन्नपचन बिघडते, असे काही तज्ञांचे मत आहे. पोषणाच्या दृष्टीने चहाला जवळजवळ काहीच महत्त्व नाही, असे काही तज्ञांचे मत आहे. याउलट काही रशियन शास्त्रज्ञांच्या मते चहापासून पोषणात्मक आणि शरीरक्रियावैज्ञानिक फायदे आहेत. चहात कार्बोहायड्रेटे आणि स्निग्ध पदार्थ जवळजवळ नसतात. कारखान्यात तयार झालेल्या काळ्या चहातील प्रथिने पाण्यात अविद्राव्य स्थितीत असतात. परंतु चहात लेश मूलद्रव्ये, ब जीवनसत्त्व आणि साहाय्यक वृद्धिघटक थोड्या प्रमाणात असतात, ही गोष्ट दृष्टिआड करून चालणार नाही. दूध व साखर न मिसळलेल्या एक कप चहातून (१७० मिली.) फक्त चार पोषण कॅलरी मिळतात. दूध व साखर घातल्याने आणखी ३६ कॅलरी मिळतात. ५०० ग्रॅ. चहापासून सु. १६० कप चहा पेय तयार होते. यूरोप, जपान व चीन येथे सर्वसाधारणपणे दूध न वापरता किंवा कमी दुधाचा चहा घेण्याची पद्धत आहे. रशियात दुधाऐवजी लिंबाच्या रसाचा उपयोग करतात. तिबेटमध्ये चहात लोणी घालण्याचीही पद्धत आहे. सर्वसाधारणपणे गरम पेय म्हणून चहा पिण्याची पद्धत असली, तरी बर्फाच्या साहाय्याने थंड केलेला चहा घेण्याचीही पद्धत अमेरिकेत रूढ आहे. उकळलेल्या पाण्यात चहा टाकून तो चांगला मुरविल्यास पेयाला चांगला स्वाद येतो व त्यात कॅफिनाचे प्रमाण कमी असते आणि त्यामुळे पेय सौम्य होते. पाणी व चहा एकत्र उकळल्यास पेयात कॅफिनाचे प्रमाण जास्त उतरते व त्यामुळे ते कडक बनते.

निर्मिती आणि व्यापार : भारतासह जगात २६ देश चहा पिकवितात आणि भारत त्यात अग्रेसर आहे. १९७१ साली जगात १२९·४ कोटी किग्रॅ. चहाचे उत्पादन झाले. त्यातील प्रमुख देशांचे उत्पन्न पुढील प्रमाणे होते (आकडे कोटी किग्रॅ.) : भारत ४३·३३, श्रीलंका २१·७८, इंडोनेशिया ४·८१, केन्या ३·६२, पाकिस्तान १·२४, युगांडा १·८०, मालावी १·८३, मोझँबिक १·६५, जपान ९·२९, तुर्कस्थान ३·२२,तैवान २·६३, रशिया ६·८०, अर्जेंटिना २·५०, चीनच्या उत्पादनासंबंधी १९७१ चे आकडे उपलब्ध नाहीत, परंतु १९६९ साली तेथील उत्पादन १५·८८ कोटी किग्रॅ. होते. भारत जरी चहा उत्पादनात अग्रेसर असला, तरी जागतिक उत्पन्नात भारताचा वाटा पूर्वी इतका राहिला नाही. १९५१ साली भारताचे उत्पादन जगाच्या उत्पादनाच्या ४८·५% होते (जगाचे उत्पादन ५८·८ कोटी किग्रॅ., भारत २८·५ कोटी किग्रॅ.) १९७२ साली भारताचे उत्पादन जगाच्या उत्पादनाच्या ३८·४% इतके खाली आले. (जगाचे उत्पादन ११८·७ कोटी किग्रॅ., भारत ४५·५ कोटी किग्रॅ.). 

भारतात निरनिराळ्या राज्यांतील १९७१ मध्ये चहाचे एकूण उत्पादन पुढीलप्रमाणे होते (आकडे हजार किग्रॅ. मध्ये) : आसाम २,२४,०५३, पश्चिम बंगाल १,०२,८५९, बिहार ४२, त्रिपुरा २,७३६, उत्तर प्रदेश ६१४, हिमाचल प्रदेश ८८८, तमिळनाडू ५६,३०१, कर्नाटक २,८१७, केरळ ४३,०१२, एकूण भारत ४,३३,३२२.

भारत जगात चहा पिकविणाऱ्या राष्ट्रांत अग्रेसर असला, तरी खुद्द भारतात दर माणशी चहाचा खप इतर राष्ट्रांच्या तुलनेने बराच कमी आहे. प्रमुख राष्ट्रांतील १९६९ ते १९७१ या काळातील दर माणशी वार्षिक चहाचा खप पुढीलप्रमाणे आहे (आकडे किग्रॅ.मध्ये) : आयरिश प्रजासत्ताक ३·८८, ब्रिटन ३·८७, न्यूझीलंड २·६१, इराक २·१६, ऑस्ट्रेलिया २·१५, श्रीलंका १·५१, जॉर्डन १·२५, जपान १·००, मोरोक्को ०·९६, कॅनडा ०·९४, ट्युनिशिया ०·८९, भारत ०·४०, रशिया ०·३६, अमेरिका ०·३३, जर्मनी ०·१४, फ्रान्स ०·०७. भारतात १९५५-५६ सालात दर माणशी वार्षिक चहाचा खप २५७ ग्रॅ. होता आणि १९६९ ते ७१ या काळात ४०० ग्रॅ. होता. यावरून भारतात १५ वर्षांत दर माणशी चहाचा खप सु. ५० टक्क्यांनी वाढला आहे, हे दिसून येईल. याउलट ब्रिटनमधील दर माणशी चहाचा खप १९६५ नंतर कमी झाला आहे. १९६६ साली तो ४·०१ किग्रॅ. होता, तर १९७३ साली ३·५२ किग्रॅ. होता.

भारतात तयार होणाऱ्या चहापैकी जवळजवळ निम्मा चहा निर्यात होतो. यापैकी सर्वांत जास्त ब्रिटनला निर्यात होतो. त्या खालोखाल रशियाचा नंबर लागतो. सूदान, इराण, संयुक्त अरब प्रजासत्ताक, अफगाणिस्तान, अमेरिका (संयुक्त संस्थाने), आयरिश प्रजासत्ताक, ऑस्ट्रेलिया, प. जर्मनी, इटली, फ्रान्स, कॅनडा हे भारतातून चहा आयात करणारे इतर प्रमुख देश आहेत. अलीकडे मोरोक्को आणि जपान हे देश भारतातील हिरवा चहा आयात करतात. एकूण वीस पेक्षा जास्त देशांत भारतातील चहा निर्यात होतो. १९७१ मध्ये भारतात एकूण ४३·३३ कोटी किग्रॅ. चहाचे उत्पादन झाले. त्यापैकी २०·७३ कोटी किग्रॅ. चहा निर्यात झाला व त्यापासून १५५·३४ कोटी रुपयांचे परकी चलन मिळाले. भारतातून १९७१ मध्ये निर्यात झालेल्या चहाची आकडेवारी कोष्टक क्र. २ मध्ये दिली आहे.

कोष्टक क्र.२. १९७१ मध्ये भारतातून काही प्रमुख देशांना निर्यातझालेला चहा आणि त्याची किंमत

देशाचे नाव

भारतातून निर्यात झालेला चहा

(हजार किग्रॅ.)

किंमत (कोटी रुपये)

ब्रिटन

७१,४३४

५४·४५

रशिया

४१,२७३

५३·८३

सूदान

१२,९४०

७·८६

संयुक्त अरब प्रजासत्ताक

९,१७३

५·८१

अफगाणिस्तान

१५,९४७

१०·६६

अमेरिका (संयुक्त संस्थाने)

९,०४६

६·९८

आयरिश प्रजासत्ताक

५,४६९

४·४१

ऑस्ट्रेलिया

३,०६२

२·१०

कॅनडा

३,८४५

२·८२

एकूण सर्व देश

२,०७,२७४

१५५·३४


ब्रिटनला निर्यात होणाऱ्या चहाचे प्रमाण १९४० नंतरच्या ३० वर्षांत बरेच कमी झाले आहे. १९४०-४१ मध्ये भारताने ब्रिटनला १५·७ कोटी किग्रॅ. चहा निर्यात केला १९४८-४९ मध्ये १४·०६, १९७० मध्ये ९·६६, १९७१ मध्ये ७·१४ आणि १९७२ मध्ये (अंदाजे) ५·७२ कोटी किग्रॅ. चहा निर्यात केला. रशियाला १९४५-४६ पर्यंत दर वर्षी १० लक्ष किग्रॅ. च्या खाली निर्यात होती, तर १९४८-४९ मध्ये १·४८, १९७० मध्ये २·८७, १९७१ मध्ये ४·१२ आणि १९७२ मध्ये (अंदाजे) ४·१५ कोटी किग्रॅ. चहाची निर्यात झाली.

चहा निर्यात करणाऱ्या देशांच्या एकूण निर्यातीशी प्रत्येक देशाच्या निर्यातीचे शेकडा प्रमाण कोष्टक क्र. ३ मध्ये दिले आहे.

कोष्टक क्र. ३. चहा निर्यात करणाऱ्या प्रत्येक देशांच्या निर्यातीचे एकूण निर्यातीशी शेकडा प्रमाण

देशाचे नाव

एकूण निर्यातीशी शेकडा प्रमाण

१९६९

१९७०

१९७१ (अंदाजे)

भारत

२९·१

३१·८

३२·०

श्रीलंका

३४·७

३२·८

३१·२

इंडोनिशा

४·७

५·७

६·१

पूर्व आफ्रिका

१२·९

११·९

११·८

उर्वरित आफ्रिका

३·८

४·०

४·२

चीन

५·३

४·७

४·७

तैवान

३·६

३·२

३·५

जपान

०·३

०·२

०·२

मलेशिया

०·२

०·२

०·१

इतर देश

५·३

५·५

६·२

एकूण

१००·०

१००·०

१००·० 

भारताने १९५६ साली २३·७४ कोटी किग्रॅ. चहा निर्यात केला. त्यानंतर १९७२ सालापर्यंत चहाची एकूण निर्यात १९५६ सालच्या निर्यातीपेक्षा कमीच होती. निर्यातीच्या बाबतीत भारताशी श्रीलंका स्पर्धा करीत आहे, असे कोष्टक क्र. ३ मधील आकड्यावरून दिसून येईल.

भारत आणि श्रीलंका या देशांतील चहाच्या लागवडीखालील क्षेत्र १९६१ ते १९७१ या काळात फारसे वाढले नाही परंतु केन्या, युगांडा आणि टांझानियामध्ये ते याच काळात सु. दुप्पट अगर तिप्पट झाले. त्यामुळे चहाच्या निर्यातीमध्ये श्रीलंकेबरोबरच पूर्व आफ्रिकेच्या देशांशी भारताला स्पर्धा करावी लागणार आहे.

इतर सर्व वस्तूंच्या किंमती सर्व जगात वाढत असता भारतातील चहाची किंमत लंडन येथील बाजारात १९६२ साली ५२·३ (नवे) पेन्स होती, ती १९७१ मध्ये ४२ (नवे) पेन्सपर्यंत खाली आली.

या उद्योगात १९७०-७१ मध्ये ५६९ कंपन्यांचे हितसंबंध होते, तसेच या उद्योगात सु. १० लक्ष लोक काम करतात.

चहाच्या किंमती १९३२ साली अतिशय खाली आल्या होत्या आणि त्यामुळे चहाच्या लागवडीखालील क्षेत्रावर व निर्यातीवर मर्यादा घालण्याच्या दृष्टीने चहा तयार करणाऱ्या प्रमुख देशांमध्ये एक आंतरराष्ट्रीय करार झाला. यामुळे लागवडीखालील क्षेत्र वाढण्याचा वेग कमी झाला, पण उत्पादनात पुष्कळच वाढ झाली. १९६० मध्ये इंटरनॅशनल टी कमिटी रद्द करण्यात येऊन चहाच्या निर्यातीवर नियंत्रण ठेवण्याचे काम संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व शेती संघटनेकडे सोपविण्यात आले.

भारतीय चहा मंडळ : (इंडियन टी बोर्ड). भारतातील चहा उद्योग पुष्कळ अंशी खाजगी क्षेत्रात आहे. या उद्योगाच्या निरनिराळ्या प्रश्नांकडे लक्ष देण्यासाठी आणि देशात व देशाबाहेरील चहाचा व्यापार वाढविण्यासाठी १९५४ मध्ये या मंडळाची स्थापना झाली. चहासंबंधी संशोधन करणाऱ्या संस्थांना या मंडळामार्फत आर्थिक साहाय्य दिले जाते. तसेच निरनिराळ्या तांत्रिक संस्था आणि विद्यापीठांतील चहा संशोधन संस्थांच्या कार्याला पूरक अशा संशोधन कार्यालाही आर्थिक साहाय्य दिले जाते.

आसाम चहा निगम : आसामातील पुष्कळसे नुकसानीत आलेले मळे ताब्यात घेऊन त्यांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी करण्याच्या हेतूने आसाम राज्य सरकारने या निगमाची १९७१ मध्ये स्थापना केली.

संशोधन संस्था : चहाची लागवड, पानांवर करण्यात येणाऱ्या विविध प्रक्रिया, प्रत, यंत्रसामग्री इत्यादींमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने भारतातील व भारताबाहेरील काही संस्था संशोधन करीत आहेत. त्यांपैकी प्रमुख संस्थांची माहिती खाली दिली आहे.

टोक्लाई संशोधन केंद्र : आसाममधील जोरहाटपासून चार किमी. अंतरावर हे केंद्र आहे. हे जगातील सर्वांत मोठे चहा संशोधन केंद्र मानले जाते. इंडियन टी ॲसोसिएशन या मळेवाल्यांच्या सर्वांत मोठ्या संघटनेने १९११ साली हे केंद्र सुरू केले. आशियातील सर्वांत जुनी वैज्ञानिक संस्था म्हणूनही या केंद्राला महत्त्व आहे. प्रारंभी सु. ५० वर्षे या केंद्राचा कारभार इंडियन टी ॲसोसिएशनकडे होता. १९६६ मध्ये त्याचे व्यवस्थापन टी रिसर्च ॲसोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेच्या नियंत्रणाखाली आले. भारत सरकारचे कौन्सिल ऑफ सायंटीफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च, भारतीय चहा मंडळ व काही चहा उत्पादक यांच्या भागीदारीने ही संस्था स्थापन झाली आहे. टोक्लाई केंद्रामध्ये दहा विभाग आहेत. त्यांतील कृषी विभाग हा महत्त्वाचा विभाग आहे. चहाच्या पानांचे जास्तीत जास्त उत्पन्न मिळविण्याच्या दृष्टीने लागवडीच्या सुधारलेल्या पद्धती, खतांचा वापर, खत देण्याच्या पद्धती, सावलीसाठी योग्य झाडांची निवड, छाटणी आणि खुडणी इ. बाबतींत या विभागात संशोधन होते. कलमे लावून चांगले गुणधर्म असलेल्या चहाच्या झुडपाची अभिवृद्धी करण्याची पद्धत अलीकडे रूढ झाली आहे त्याचे श्रेय या केंद्राला आहे. चहाच्या झाडाला अम्लधर्मीय जमीन लागते, जमिनीत चुना घालणे घातक ठरते, खोल अंतर मशागतीची आवश्यकता नाही, चहाच्या झाडांना नायट्रोजनाचा पुरवठा करणे आवश्यक आहे व तो अमोनियम सल्फेटाच्या रूपात दिल्यास फायदेशीर असते, पोटॅशमुळे चहाच्या लहान झाडांची वाढ झपाट्याने होते, छाटणी व खुडणी योग्य उंचीवर केल्यास जास्त उत्पन्न मिळते, हे चहाच्या लागवडीच्या तंत्रातील महत्त्वाचे शोध आहेत. या केंद्रातील वनस्पतिशास्त्र विभागात सूर्यप्रकाशाचा, अम्लधर्मीय जमिनीचा आणि हवेतील आर्द्रतेचा झुडपाच्या वाढीवर होणार परिणाम इ. बाबींवर संशोधन होते. भूवैज्ञानिक विभागामध्ये चहाच्या मळ्यांतील मातीची तपासणी केली जाते. चहावरील रोग व किडीसंबंधीच्या संशोधनासाठी दोन स्वतंत्र विभाग आहेत. किडी व रोगकारक यांच्या जीवनचक्राचा अभ्यास करून त्यावर आधारित अशा नियंत्रणाच्या पद्धती शोधून काढण्यात आल्या आहेत. जीवरसायनशास्त्र विभागात चहाच्या रासायनिक घटकांचा अभ्यास, चहाच्या निर्मितीमध्ये होणारे रासायनिक फरक आणि त्यांचे तयार चहावर होणारे परिणाम इ. बाबी हाताळल्या जातात. १९२०–३० च्या दरम्यान तयार चहाचे दर हेक्टरी सरासरी उत्पन्न ५०० किग्रॅ. होते ते पुढील तीस वर्षांत दुप्पट झाले व काही मळ्यांत १,६०० किग्रॅ. पर्यंत उत्पन्न मिळते, याचे पुष्कळसे श्रेय टोक्लाई केंद्रात ६०–६५ वर्षांत झालेल्या संशोधनाला आहे. परंतु या केंद्राचे खास वैशिष्ट्य म्हणजे तेथील अभियांत्रिकी विभागाने चहाच्या निर्मितीसाठी (प्रक्रियेसाठी) शोधून काढलेली यंत्रसामग्री. मॅक्टीअर नावाच्या तंत्रज्ञांनी तयार केलेले ‘रोटरव्हेन’ नावाचे यंत्र पाने वळविण्याच्या क्रियेसाठी फार उपयुक्त ठरले आहे. हे आणि दुसरे चहा वाळविण्याचे यंत्र या दोन यंत्रांना परदेशातही मागणी आहे. नऊशेच्या वर रोटरव्हेन यंत्रे जगात उपयोगात आहेत. याशिवाय चहा उद्योगासाठी इतर यंत्रसामग्रीही या विभागाने तयार केली आहे.


भारतातील इतर चहा संशोधन केंद्रे : दक्षिण भारतात युनायटेड प्लॅंटर्स ॲसोसिएशन ऑफ साऊथ इंडियाच्या व्यवस्थापनाखाली देवरशोला येथे चहावर संशोधन सुरू आहे. याशिवाय अन्नमलई मध्यवर्ती प्रयोगशाळा आणि तिला जोडून असलेल्या प्रयोग क्षेत्रात, तसेच केरळमधील उपकेंद्रात चहाच्या संशोधनासाठी सोई उपलब्ध आहेत. कांग्रा खोऱ्यातील चहासंबंधीचे शास्त्रीय प्रश्न पंजाब कृषी विद्यापीठाच्या अखत्यारीतील पालमपूर येथील चहा प्रयोग क्षेत्रात हाताळले जातात.

भारताबाहेरील संशोधन केंद्रे : इंडोनेशियातील बोगोर येथील संशोधन केंद्र आणि श्रीलंकेतील टी रिसर्च इन्स्टिट्यूट ही जुनी केंद्र आहेत. टी रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ ईस्ट आफ्रिका ही पूर्व आफ्रिकेतील चहा संशोधन संस्था असून केन्या, युगांडा आणि टांझानिया ह्या देशांच्या चहा मंडळांकडून या संस्थेला आर्थिक साहाय्य होते. न्यासालॅंड आणि ऱ्होडेशियासाठीही चहा संशोधन केंद्र आहे. 

संदर्भ : 1. Aiyer, Yegna Narayan A. K. Field Crops of India, Bangalore, 1958. 

           2. Bald, C. Indian Tea, Calcutta, 1957. 

           3. CSIR, The Wealth of India, Raw Materials, Vol. II, New Delhi, 1950. 

           4. Griffiths, P. The History of The Indian Tea Industry, London, 1967. 

           5. Watt, G. Commercial Products of India, New Delhi, 1966.

बर्वे, द. बा. जमदाडे, ज. वि. पाटील, ह. चिं., रुईकर, स. के.


चहाच्या मळ्याचे सर्वसाधारण दृश्य (सावलीची झाडे अल्बिझिया ओडोरॅटिसिमा व अल्बिझिया चायनेन्सीस). पानांची हाताने करण्यात येणारी खुडणीपानांची सुवाह्य कर्तन यंत्राने खुडणी, शिझुओका (जपान).  पानांची यांत्रिक खुडणी, इंगिर्‌स्की स्टेट फार्म, जॉर्जिया (रशिया). कोमेजविण्यासाठी तागाच्या कापडावर पसरलेली पाने.


कोमेजविलेली पाने वळविणारी यंत्रे पानांवर किण्वन क्रिया करण्याचा विभाग. किण्वन केलेली पाने वाळविण्याचे यंत्र. चहाचे प्रतवार प्रकारीकरण करणारे यंत्र. स्वयंचलित आवेष्टन यंत्र.