पेकारी : हा लहान डुकरासारखा सस्तन प्राणी मूळचा अमेरिका खंडातील आहे. जॅव्हेलिना व कस्तुरी डुक्कर अशीही त्याला नावे आहेत. त्याचा समावेश समखुरी (आर्टिओडॅक्टिला) गणातील टायास्सुइडी कुलात होतो. त्याची खांद्याजवळ उंची ५०-७५ सेंमी., लांबी सु. १०० सेंमी. असून वजन सु. ३० किग्रॅ. असते. त्याचा प्रसार टेक्सस व ॲरिझोना ते पॅटागोनिया व समुद्रसपाटीपासून २४० मी. उंचीपर्यंत पर्वतांवर आहे. आखूड मान, मोठे पाचरीसारखे डोके, लहान कान व डोळे, बारीक पाय व राठ लांब केस याबाबतींत त्याचे डुकराशी साम्य असते. नाकाच्या टोकावर उपास्थीची (कूर्चेची) गोल पसरट संरचना असून तिचा उपयोग अन्न शोधताना जमीन उकरण्यासाठी होतो. पेकारी सर्वभक्षक असून तो मुळे, कंद, किडे, कृमी, साप (विषारी सापसुद्धा), बेडकासारखे उभयचर (जमिनीवर व पाण्यातही राहणारे) प्राणी, कृंतक (कुरतडून खाणारे प्राणी), पक्ष्यांची अंडी, फळे, निवडुंग इ. खातो. तो भुंकल्यासारखा आवाज काढतो. त्याच्या वरच्या जबड्यातील सुळे अतिशय तीक्ष्ण व खाली वळलेले असतात. मागच्या पायाला चवथा खूर नसतो व पाठीच्या मागील बाजूवर मोठी ग्रंथी असते, हे त्याच्यातील व डुकरातील भेद आहेत. पेकारीवर हल्ला झाल्यास तो वरील ग्रंथीतून घाणेरड्या वासाचा पदार्थ बाहेर टाकतो. 

कॉलरवाला पेकारी (टायास्सू टाजाकू)

कॉलरवाला पेकारी (टायास्सू टाजाकू) व पांढऱ्या ओठाचा पेकारी (टायास्सू पेकारी) अशा त्याच्या दोन जाती आहेत. कॉलरवाला पेकारी गर्द करडा असून त्याच्या मानेभोवती पांढरा पट्टा असतो. पांढऱ्या ओठाचा पेकारी कॉलरवाल्या पेकारीपेक्षा काहीसा मोठा, जास्त गर्द रंगाचा असून तोंडाभोवतालचा भाग फिकट असतो. दोन्ही जाती द. अमेरिकेत सर्वत्र आढळतात. पेकारीचे १०-१०० आणि क्वचित २०० प्राण्यांचे कळप असतात. दर खेपेला मादी सरासरीने दोन पिलांना जन्म देते.मात्र कधीकधी फक्त एकच पिलू, तर केव्हा तीन पिले जन्मतात. जन्माच्या वेळी पिलू लहान सशासारखे असते. झाडांच्या ढोलीत, जमिनीतील बिळात किंवा दाट झुडपात ते जन्माला येते. पिलू तांबूस तपकिरी असून पाठीवर गर्द तपकिरी लांब पट्टा असतो. जन्मानंतर काही मिनिटांत उभे राहते व पिऊ लागते. मादीला दोनच स्तन असतात. विणीचा हंगाम निश्चित नसून उष्ण कटिबंधात मादी केव्हाही विते. गर्भावधी १२०-१२५ दिवसांचा असतो. पिलू दोन वर्षांचे झाल्यावर प्रजोत्पादनक्षम होते व चौथ्या-पाचव्या वर्षी त्याची पूर्ण वाढ होते. पेकारी १५-२० वर्षे जगतो.

जॅगुआर, कूगर व अजगरासारखे मोठे साप पेकारीला खातात. ऑसेलॉट, बॉबकॅट व कायोट हे प्राणी त्याची पिले खातात. सहसा तो माणसाच्या वाटेला जात नाही पण शिकारीच्या वेळी पकडताना तो माणसावर हल्ला करतो व आपल्या पिलांचे रक्षण करतो. 

पेकारीच्या कातडीला फार मागणी असते. तिचा उपयोग हातमोजे बनविण्यासाठी होतो. पेकारीचे पिलू लहानपणापासून पाळल्यास तो कुतूहलजनक व प्रेमळ पाळीव प्राणी होतो. तो आपल्या मालकामागे जातो व कुत्र्यासारखा इमानी असतो.  

जमदाडे, ज. वि.

Close Menu
Skip to content