ससाणा : हा एक शिकारी पक्षी असून त्याचा फॅल्कॉनिडी या पक्षिकुलात समावेश केलेला आहे. याच्या काही जाती आपल्याकडे आढळतात, त्यांपैकी ‘ लग्गड ससाणा ’ ही एक होय. हिचे शास्त्रीय नाव फॅल्को बायआर्मिकस जुग्गर असे आहे. हिमालयाच्या ७६५ मी. उंचीपासून खाली चेन्नईपर्यंत आणि पश्चिमेस बलुचिस्तानापासून पूर्वेस मणिपूरपर्यंत आढळणारा हा पक्षी असून येथील कायमचा रहिवाशी आहे. चेन्नईच्या दक्षिणेस हा तुरळक आढळतो.

लग्गड ससाणा साधारणपणे डोमकावळ्याएवढा असतो. मादी नरापेक्षा मोठी असते. शरीराची वरची बाजू तपकिरी व तिच्यात करडया रंगाची छटा असते खालची बाजू पांढरी छातीवर तपकिरी रेषा व पोटावर तपकिरी ठिपके असतात, चेहऱ्याच्या दोन्ही बाजूंना मिशांसारखे तपकिरी पट्टे असतात पंख लांब व टोकदार चोच आकडेदार निळसर करड्या रंगाची पाय पिवळे असतात. नर आणि मादी दिसायला सारखीच असतात. यांची नेहमी जोडपी असतात.

ससाणा (फॅल्को बायआर्मिकस )खुरटी झाडे किंवा झुडपे असणाऱ्या रानात, विरळ जंगलात, माळरानात किंवा शेतीच्या आसपास हा नेहमी राहतो.

या पक्ष्यांची जोडपी एकमेकांच्या मदतीने शिकार करतात. एखादया उंच ठिकाणी बसून सारखी टेहळणी करीत रहावयाचे आणि एखादा लहान पक्षी दिसला की वेगाने त्याचा पाठलाग करून त्याला पकडावयाचे अशी यांची भक्ष्य पकडण्याची रीत आहे. पण पक्ष्यांखेरीज शेतातील उंदीर, सरडे, टोळ, चतुर वगैरेदेखील ते खातात. कावळे, कोतवाल वगैरे पक्षी जमावाने यांचा पाठलाग करून त्यांना हाकलून देतात. पूर्वी श्रीमंत व शौकीन लोक ससाणे बाळगीत व त्यांना शिकारीकरिता शिकवून तयार करीत. शिकवून तयार केलेले असे ससाणे तितर, बगळे वगैरे मोठया पक्ष्यांचीही शिकार करीत.

जानेवारीपासून एप्रिलपर्यंत यांचा प्रजोत्पादनाचा काळ असतो. घरटे कावळ्याच्या घरटयासारखेच काटक्याकुटक्यांचे बनविलेले असून त्याला आतून गवत, पाने वगैरेचे अस्तर असते. ते वृक्षावर किंवा कडयावर उंच जागी असते. मादी ३-५ अंडी घालते. ती फिक्कट गुलाबी असून त्यांच्यावर विटकरी रंगाचे दाट ठिपके असतात.

यूरोप खंडात सामान्यत: आढळणारी ससाण्याची एक जात असून तिचे शास्त्रीय नाव फॅल्को पेरिगिनस असे आहे. हा पक्षी स्थलांतर करणारा असून हिवाळ्यात भारतात येतो व उन्हाळ्यात परत जातो. यास शाही ससाणा असे म्हणतात. तो डोमकावळ्याच्या आकाराचा, रूंद खांदयाचा, सुडौल आकार असणारा पक्षी आहे. त्याचे डोके काळे, शरीर काळपट असते. पोटाकडील भाग गुलाबी-पांढरा किंवा तांबडा असतो.

भारतात कायमची राहणारी ससाण्याची आणखी एक जात आहे, तिचे शास्त्रीय नाव फॅल्को चिकेरा असे आहे. उत्तर भारतात या जातीच्यानराला ‘ चेटवा ’ आणि मादीला ‘ तुरूपती ’ म्हणतात. त्याच्या शरीराचा रंग निळसर राखी असून खालच्या बाजूस पांढऱ्या रंगावर काळपट आडवे पट्टे असतात. मान व डोके काळसर-तांबडया रंगाचे असते. डोळ्याच्या खालच्या व वरच्या बाजूस काळसर तांबडया रंगाच्या रेषा असतात.

कर्वे, ज. नी.