सार्कोडिना : प्रोटोझोआ (आदिजीव) प्राणिसंघातील एक वर्ग. यामध्ये अमीबा, एंटामीबा, एल्फिडियम, फोरॅमिनीफेरा, रेडिओलॅरिया व हीलिओझोआ यांसारख्या प्राण्यांचा समावेश होतो. या वर्गातील काही प्राणी परजीवी असून ते अन्नासाठी वनस्पती व प्राणी यांवर अवलंबून असतात, तर काही स्वतंत्रपणे जीवन जगणारे असून सूक्ष्मजंतू, शैवले, इतर आदिजीव व सेंद्रिय पदार्थ हे त्यांचे अन्न आहे. या प्राण्यांची प्रमुख लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत : सार्कोडिना वर्गातील प्राण्यांच्या शरीराचा आकार गोल किंवा अनियमित
असतो. त्यांच्या शरीराभोवती जीवद्रव्यापासून बनलेले पातळ व लवचिक आवरण असते, त्यासकोशिकावरण (पेशी आवरण) असे म्हणतात. या प्राण्यांचे चलनवलन पादाभांच्या [ अमीबीय कोशिकांच्या (पेशींच्या) प्राकलांच्या तात्पुरत्या प्रवर्धकांना पादाभ म्हणतात व त्यांच्यातील कोशिकाद्रव्याच्या प्रवाहांमुळे त्यांच्यातील हालचाल होते ⟶ कोशिका] साहाय्याने होते. तसेच बहुतेक प्राण्यांना तोंड नसल्यामुळे अन्न मिळविण्यासाठी पादाभांचा उपयोग होतो. जीवद्रव्यातील संकोचशील रिक्तिकेमुळे [ संकोच पावणाऱ्या लहान पोकळीमुळे ⟶ संकोचशील →रिक्तिका] पाण्याचे नियमन होते. समुद्रात आढळणाऱ्या प्राण्यांत ही संकोचशील रिक्तिका नसते. बहिर्द्रव्य व अंतर्द्रव्य हे त्यांच्या जीवद्रव्याचे दोन प्रकार आहेत.
सार्कोडिना वर्गात सु. ८०० जातींचा समावेश होतो. या वर्गाचे ऱ्हायझोपोडा व ॲक्टिनोपोडा हे दोन उपवर्ग असून त्यांची माहिती पुढे दिलेली आहे.
ऱ्हायझोपोडा: या उपवर्गात अमीबीना, टेस्ट्रॅशिया, ग्रोमिना, फोरॅमिनीफेरा व मायसेटोझोआ या गणांचा समावेश होतो. ऱ्हायझोपोडा उपवर्गातील अमीबासारख्या प्राण्यांत पादाभ लहान व जाड असतात. फोरॅमिनीफेरा प्राण्यांत ते तंतूसारखे बारीक व लांब असतात. त्यांना ‘रेटिक्युलोपोडा’ म्हणतात. या प्राण्यांच्या सर्पिल आकाराच्या कवचाला असणाऱ्या असंख्य छिद्रांतून रेटिक्युलोपोडा बाहेर पडतात. एल्फिडियम प्राण्याचे कवच अनेक कप्प्यांचे बनलेले असते. पादाभांच्या साहाय्याने तो सागरी वनस्पती व समुद्रतळावर सरपटत हालचाल करतो. इतर आदिजीव, डायाटम व क्रस्टेशिया हे त्याचे अन्न आहे. अलैंगिक प्रजोत्पादन बहुविभाजन पद्घतीने होते. लैंगिक प्रजोत्पादनात भाग घेणाऱ्या प्राण्यांना ‘मॅक्रोस्फेरिक’ म्हणतात. एल्फिडियमामध्ये अलैंगिक व लैंगिक प्रजनन आलटून-पालटून होते, त्यास पिढ्यांचे एकांतरण [⟶ एकांतरण, पिढ्यांचे] असे म्हणतात. [ ⟶ ऱ्हायझोपोडा].
ॲक्टिनोपोडा : या उपवर्गात हीलिओझोआ, रेडिओलॅरिया, अकँथेरिया व प्रोटिओमिक्सा या गणांचा समावेश होतो. ॲक्टिनोपोडा उपवर्गातील प्राण्यांचे पादाभ अतिशय नाजूक असून ते गोलाकार शरीरापासून किरणांप्रमाणे बाहेर पडतात. त्यास ‘ॲक्झोपोडिया’ असे म्हणतात. यांचे अलैंगिक प्रजोत्पादन द्विभाजन पद्घतीने होते. काही प्राण्यांत ते बहुविभाजन पद्घतीने होते. हे प्राणी लैंगिक प्रजोत्पादन संयुग्मनाने करतात.
सार्कोडिना वर्गातील काही प्राणी उपद्रवी असतात. एंटामीबासारखे प्राणी माणसात आमांशाचा विकार उत्पन्न करतात.
पहा : अमीबा; कोशिका; प्रोटोझोआ; फोरॅमिनीफेरा; रेडिओलॅरिया; हीलिओझोआ.
संदर्भ : 1. Bhamrah, H. S. Juneja, Kavita, An Introduction to Protozoa, New Delhi, 1999.
2. Kotpal, R. L. Protozoa, Meerut, 1991.
पाटील, चंद्रकांत प.