सहभोजिता : सहभोजिता याचा अर्थ एकाच पंक्तीत अन्न घेणारे असा आहे. यात सहभागी झालेल्या सजीवांना सहभोजी व या निसर्गघटनेस सहभोजिता असे म्हणतात.

सजीव प्राणी निरनिराळ्या वातावरणात वाढताना दिसतात. त्यांच्यापैकी काही स्वावलंबी जीवन जगत असतात. ते आपले अन्न स्वतः मिळवितात. हे अन्न नेहमीच तयार असते असे नाही. काही सजीवांमध्ये द्रव पदार्थ व क्षार शोषून घेऊन त्यापासून अन्न तयार करण्यात येते. या वर्गात प्रामुख्याने वनस्पतींचा समावेश होतो. प्राणिमात्रांच्या बाबतीत अशा प्रकारे अन्न तयार करण्याची क्रिया फार थोडया वर्गात दिसते. इतर प्राण्यांच्या बाबतीत वेगळाच अनुभव येतो तो म्हणजे एक प्राणी दुसऱ्या प्राण्यांचे किंवा वनस्पतीचे साहाय्य घेऊन अन्न मिळवितो आणि त्यामुळे एक प्राणी आणि दुसरी वनस्पती किंवा एक प्राणी आणि दुसरा प्राणी यांच्यात अभेद्य संबंध निर्माण होतात. त्यांपैकी पहिली अवस्था म्हणजे दोन प्राणी एकमेकांच्या आधाराने राहतात [⟶ सहजीवन]. दुसरीत एक जीव दुसऱ्याच्या शरीरावर राहतो, वाढतो व त्याचबरोबर आश्रयही मिळवितो (सहभोजिता). त्यांपैकी काही अन्न आपण खातो. तिसऱ्या अवस्थेत आश्रयार्थी, आश्रयीच्या शरीरात राहतो, त्याने गोळा केलेले अन्न खातो, इतकेच नव्हे तर त्याच्या शरीरात विकृती निर्माण करण्याइतपत मजल मारतो. [⟶जीवोपजीवन].

या एकापेक्षा एक वरचढ अशा अवस्थांना ‘ सहजीवन ’, ‘ सहभोजिता ’ आणि ‘ जीवोपजीवन ’ अशा संज्ञा आहेत.

सहभोजिता या अवस्थेत दोन प्राणी किंवा एक प्राणी व दुसरी वनस्पती, एकमेकांच्या सान्निध्यात वास्तव्य करतात. त्यांच्यापैकी एक बहुतांशी दुसऱ्यावर अवलंबून राहतो. त्याला त्यामुळेच इतरांपासून संरक्षण मिळते, त्याच्या अन्नातील वाटा हा स्वतःसाठी वापरतो. सहभोजितेचा मूळ उद्देश अन्न मिळविण्याचाच असतो. काही वेळा निवारा, आधार मिळविणे, हालचाल करणे हे उद्देश असतात. या अवस्थेत आश्रयीस कधीच नुकसान पोहोचत नाही. या प्रकारात एका भागीदाराचा फायदा होतो. पण दुसऱ्याचे नफा-नुकसान होत नाही.

सहजीवन किंवा जीवोपजीवन या अवस्थांचा विचार करता सहभोजितेची उदाहरणे कमी पहावयास मिळतात. वास्तविक पाहता एक अवस्था कोठे संपते व दुसरी कोठे सुरू होते याबद्दल स्वतः शास्त्रज्ञच साशंक आहेत.

सहभोजितेची उदाहरणे थोडयाफार प्रमाणात पण सर्व प्राणिवर्गांत दिसून येतात. उदा., वलयी प्राणी वर्गातील नीरीज हा प्राणी खेकड्याने बळकावलेल्या मृदुकाय वर्गातील प्राण्याच्या शंखाकृती कवचात दिसतो, यावेळी शंखातील प्राणी अगोदरच मरून गेलेला असतो. अनेक वेळा नीरीज त्या कवचातून हळूच बाहेर पडतो, खेकड्याने पकडलेल्या अन्नापैकी काही भाग खातो आणि परत शंखात शिरून बसतो. या पाहुण्याचा सहवास खेकड्याला चालतो, कारण त्याच्या वास्तव्यामुळे खेकड्याचे काही नुकसान होत नाही.

पी-क्रॅब हा खेकडा मायटिलस या शिंपल्याच्या आतील मृदू आवरणात निःशंकपणे राहताना आढळतो. कवची अपृष्ठवंशी आर्थोपोडा वर्गापैकी काही प्राणी व काही मासे छत्रमत्स्याच्या हवेने भरलेल्या घंटेसारख्या आकाराच्या शरीराच्या भागाखाली वावरत असतात. नोमियस मासा फायजेलिया प्राण्याच्या विषारी शुंडकांच्या वलयात राहतो. त्याच्याबरोबर समुद्रात संचार करतो, पण जर इतर मासे तेथे शिरले तर मात्र त्यांची धडगत नसते, कारण हा फायजेलिया त्यांना आपले विषारी गंथी असणाऱ्या शुंडकांच्या साहाय्याने स्पर्श करून मारून टाकतो.

सहभोजिता अवस्थेची अनेक उदाहरणे सागरी प्राण्यांत आढळतात. शंखवासी खेकडा व समुद्रपुष्प हे त्यापैकीच आहेत. समुद्रात रिकाम्या पडलेल्या शंखात हा खेकडा स्वसंरक्षणासाठी राहतो. शंखाच्या बाहेर या खेकड्याचे डोके व पाय अन्न घेण्यासाठी येतात. शंखावर समुद्रपुष्पाची स्थापना करतो. समुद्रपुष्पाच्या विषारी दंशामुळे इतर प्राण्यापासून या खेकड्यास संरक्षण मिळते. हा खेकडा शंखासह हालचाल करतो, त्यामुळे समुद्रपुष्पांना वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याची संधी मिळते. समुद्रपुष्पे स्वतः हालचाल करू शकत नाहीत. दोघांच्या सान्निध्यामुळे समुद्रपुष्पांना अन्न मिळण्याची शक्यता वाढते. अशाच प्रकारे समुद्रपुष्पाच्या सान्निध्यात राहणारा डॅमसेल मासा आणि सागरी काकडीच्या आतडयांत असणारा फायरॅस्फर मासा ही उदाहरणे दाखविता येतील.

सहभोजितेच्या बाबतीत अमीबासारखे एककोशिक प्राणी आणि बहुकोशिक पृष्ठवंशी सजीव यांच्यासंबंधीची अनेक उदाहरणे दिसतात. एककोशिक प्राण्यांपैकी कित्येक गाय, घोडा यांसारखी पाळीव जनावरे व इतर सस्तन प्राणी यांच्या अन्ननलिकेच्या निरनिराळ्या भागांत कायम वास्तव्य करतात. काही एककोशिक प्राणी बेडकासारख्या उभयचर प्राण्यांत आणि त्याचबरोबर इतर शीतरक्ताच्या पृष्ठवंशी व अपृष्ठवंशी प्राण्यांत सुद्धा असतात. रवंथ करणाऱ्या सस्तन प्राण्यांच्या अन्ननलिकेत असणारे एककोशिक प्राणी आपल्या अस्तित्वाने सहजासहजी न पचणारे सेल्युलोज अत्यंत सहजपणे पचण्यास मदत करतात किंवा वाळवीच्या अन्ननलिकेत राहणारे प्राणी वनस्पतिकोशिकांचे पचन सुलभतेने घडवून आणतात. त्यामुळे आश्रयी व आश्रयार्थी या दोघांचाही फायदा होतो.

पहा : जीवोपजीवन सहजीवन.

जोशी, मा. वि.