सांधे : शरीराच्या अस्थींच्या सांगाड्यातील दोन किंवा अधिक हाडांचा एकमेकांशी रचनात्मक संपर्क साधणाऱ्या स्थानांना संधी किंवा सांधा म्हणतात. आधार देणे, नाजुक अवयवांचे संरक्षण करणे व शरीराची सुसंबद्घ हालचाल घडवून आणणे ही सांगाड्याची प्रमुख कार्ये सांध्यांच्या मदतीने पार पाडली जातात.

प्रकार : सांध्यांमुळे जी हाडे जोडली जातात त्यांच्या हालचालींच्या शक्यतेनुसार सांध्यांचे मुख्यतः तीन प्रकार असतात.  

 

 

पूर्णतः अचल किंवा स्थिर सांधे : कवटीच्या हाडांना एकमेकांशी जोडणाऱ्या सीवनी आणि जबड्याच्या हाडांमध्ये रोवलेली दातांची मुळे. अशा अचल सांध्यांमध्ये दोन हाडांमधील फटी तंतुमय (सूत्रल) ऊतकांनी भरलेल्या असल्यामुळे त्यांना तंतुमय सांधे असे म्हणतात.  

(अ) अचलसांधा : (१)कवटीची हाडे,(२)तंतुमय ऊतकाची जोडणी (आ) अंशतः चल असा दोन मणक्यांमधील सांधा : (१) मणक्यांची हाडे, (२) सूत्रल उपास्थीची गादी (आंतरकशेरुक गादी), (३) अस्थिबंध (संधिबंध) (इ)कोपराचा पूर्णतः चल सांधा : (१) दंडाच्या हाडाची टोके, (२) हाडाच्या टोकांवरील काचाभ उपास्थीचे आवरण, (३) प्रबाहु-बाह्यास्थीचे टोक, (४) प्रबाहु-अंतरास्थीचे टोक, (५) संधिकला, (६) संधिकोश.अंशतः चल किंवा उपास्थियुक्त सांधे : दोन मणक्यांमधील सांधे कंबरेच्या पुढच्या भागातील दोन्ही बाजूंच्या हाडांना (जघनास्थींना) जोडणारा प्रस्तरसंधी. अशा उपास्थियुक्त (कूर्चायुक्त) सांध्यांमध्ये दोन हाडांच्या दरम्यान सूत्रल उपास्थीची गादी असल्यामुळे थोडी हालचाल झाल्यास उपास्थी दाबली जाऊन नंतर ती पूर्ववत होऊ शकते. [⟶ उपास्थि].

पूर्णतः चल असणारे संधिकलायुक्त सांधे : गुडघा, कोपर, खांदा इत्यादी. अशा संधिकलायुक्त सांध्यांमध्ये उपास्थीने आच्छादित अशा हाडांच्या पृष्ठभागांवर आणि संपूर्ण सांध्याभोवती असलेल्या आवरणाच्या आतील बाजूस गुळगुळीत संधिकला असते. संधिजलाच्या स्रावामुळे हा पृष्ठभाग ओलसर राहून हालचालींमधील घर्षण कमी होते. हालचालींच्या विविधतेनुसार चल सांध्यांचे अनेक उपप्रकार आहेत.

 

 

रचना : सांध्यांच्या रचनेत एकमेकांच्या संपर्कात येणाऱ्या हाडांच्या पृष्ठभागाबरोबरच इतर ऊतकांचा (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकासमूहांचा) सहभागही महत्त्वाचा असतो. सांध्यांमध्ये जोडला जाणारा हाडाचा भाग इतर भागांपेक्षा किंचित पसरट आणि जाळीदार (छिद्रल) असतो. त्याच्या पृष्ठभागावर सांध्यांच्या प्रकारानुसार सूत्रल ऊतक, सूत्रल उपास्थी किंवा काचेसारखी कठीण काचाभ उपास्थी आढळते. सांध्यांच्या बाहेरच्या बाजूस दोन हाडांना जोडणारे पांढऱ्या सूत्रल ऊतकांचे मजबूत संधिबंध असतात. त्यांच्यामुळे सांध्यांच्या कोणत्याही हालचालीच्या वेळी त्याचे घटक (हाडे) एकमेकांपासून फार दूर जाऊ शकत नाहीत व सांध्याला स्थैर्य प्राप्त होते. अस्थिबंधाची टोके हाडांभोवतालच्या पर्यास्थिकलांशी एकजीव झालेली असतात. त्यांच्या मधला भाग सांध्याभोवती असलेल्या सूत्रल ऊतकाच्या आवरणावर (संधिकोशावर) घट्ट बसलेला असतो.

 

 

संधिकलायुक्त सांध्यांची रचना अधिक गुंतागुंतीची असते. एकमेकांच्या संपर्कात येणारे हाडांचे पृष्ठभाग परस्परांना अनुरूप अशा (अंतर्गोल-बहिर्गोल) आकाराचे असतात. त्यांच्यावरील काचाभ उपास्थीच्या आवरणात सफाईदार हालचालींसाठी आवश्यक असा गुळगुळीतपणा आढळतो. तरीही हे आवरण शरीराचा भार सहन करण्याइतके मजबूत असते. संपूर्ण सांध्याभोवती असलेला संधिकोश हालचालीला वाव देण्यासाठी सैलसर असतो. त्याच्या बाहेरच्या बाजूस अस्थिबंध घट्ट चिकटलेले असतात, तर स्नायुबंध (कंडरा) आणि स्नायू मुक्तपणे हालचाल करू शकतात. संधिकोशाचा आतील पृष्ठभाग गुळगुळीत संधिकलेने (पटलाने) आच्छादलेला असतो. हे पटल सांध्याच्या अंतर्भागातील काचाभ उपास्थी आणि प्रत्यक्ष भार सहन करणारे इतर ऊतक (असल्यास) सोडून इतर सर्व पृष्ठभागावर पसरलेले असते. त्यातून स्रवणारा स्निग्ध संधिरस पोषण आणि वंगण अशी दोन्ही कार्ये करतो. काही सांध्यांमध्ये (उदा., गुडघे) अंतःस्थित अस्थिबंध असतात. तसेच हाडामधील खोबणीचा उथळपणा कमी करण्यासाठी तिच्याभोवती उपास्थीची वर्तुळाकार चकती असते. या दोन्ही घटकांमुळे सांध्यांचे स्थैर्य वाढण्यास मदत होते.

सांध्यांच्या हालचाली : अंशतः चल सांध्यांमध्ये दोन हाडांच्या पृष्ठभागांचे किंचित जवळ येणे अथवा दूर जाणे अशी हालचाल घडू शकते. मणक्यांच्या पृष्ठभागांमधील अंतर अशा पद्घतीने पाठीच्या मागेपुढे किंवा बाजूला झुकण्याच्या हालचालींबरोबर बदलत असते. गर्भिणी अवस्थेत कंबरेच्या (कटिमेखला) अस्थिबंधांचे शिथिलीभवन झाल्यामुळे तेथील सांध्यांची हालचाल अधिक मुक्तपणे होऊन प्रसूतीस मदत होते.  

पूर्णतः चल सांध्यांमध्ये विविध अक्षांभोवती निरनिराळ्या हालचाली घडून येऊ शकतात. त्या हालचाली व त्यांनुसार सांध्यांचे उपवर्ग खालीलप्रमाणे होतात.  

आडव्या अक्षाभोवती उघडझाप केल्याप्रमाणे हालचाल : उदा., कोपर, गुडघा, बोटे इत्यादींसाठी बिजागरी सांधा असतो. अशाच प्रकारची डोक्याची हालचाल (होकार दर्शविणे) कवटीच्या तळाचा भाग आणि मानेतील पहिला मणका (ॲटलास) यांच्यात होत असते.

सांध्याच्या पलीकडील भाग शरीराच्या मध्यरेषेकडे आणणे (अभिवर्तन) किंवा उलट दिशेने दूर नेणे (अपवर्तन) : बिजागरी सांध्यात थोड्या प्रमाणात अशा प्रकारची हालचाल होऊ शकते (उदा., बोटे) परंतु खांदा किंवा खुबा (श्रोणिसंधि-कंबर व मांडीचे हाड यांतील सांधा) यांमध्ये असणाऱ्या उखळी सांध्यात ती अधिक परिणामकारक रीत्या होते.

 

 

वरील दोन्ही प्रकार मिळून होणारी वर्तुळाकारातील हालचाल (पर्यावर्तन) : ही हालचाल उखळी सांध्यात होऊ शकते. तसेच मनगट, जबडा, तळहात व तळपायांना बोटांशी जोडणारे सांधे यांमध्येही दोन अक्षांभोवती हालचाल होऊ शकते. खोगीर सांधे आणि स्थूलक सांधे असे प्रकार येथे आढळतात.

 

 

हाडाच्या उभ्या अक्षाभोवती होणारी हालचाल (घूर्णन) : यासाठी आवश्यक खुंटी सांधा (कीलकसंधी) मानेतील पहिला व दुसरा मणका (ॲटलास व ॲक्सिस शिरोधर व अक्ष कशेरुक)यांच्या दरम्यान असतो. डोक्याची नकारदर्शक हालचाल तेथे घडून येते. कोपराच्या खालील हाताचा भाग (प्रबाहू) ज्या दोन हाडांनी बनलेला असतो त्यांच्या दरम्यान दोन्ही टोकांना असेच सांधे असतात. त्यामुळे अंतरास्थी (अल्ना) हे हाड स्थिर राहून बाह्यास्थी (रेडिअस) हे हाड स्वतःभोवती फिरते आणि तळहात पालथा किंवा उताणा होणे अशा हालचाली घडून येतात.


सरकण्याची हालचाल : खांद्याच्या पुढच्या बाजूस असलेले जत्रू (कॉलर बोन) तसेच तळहात व तळपायांची हाडे यांचे एकमेकांना जोडणारे सांधे यांमध्ये हाडांचे पृष्ठभाग एकमेकांवर थोडेसे सरकत असतात. त्यांना सरकते सांधे म्हणतात.

सांध्यांचे विकार : अपघातामुळे होणाऱ्या दुखापती, व्यवसायजन्य ताण, व्यायाम करताना किंवा खेळताना झालेल्या अतिरिक्त हालचाली, संक्रामणजन्य शोथ (दाहयुक्त सूज), वयोवर्धनामुळे होणारे बदल, चयापचयी (शरीरात सतत घडणाऱ्या भौतिक व रासायनिक घडामोडींशी निगडित) विकार यांसारख्या अनेक कारणांनी सांध्यांच्या कार्यक्षमतेत बाधा येऊ शकते. यांतील काही कारणांची माहिती मराठी  विश्वकोशातील ‘संधिवात’ आणि ‘संधिशोथ’ या नोंदींमध्ये आलेली आहे.

 

 

अपघातामुळे किंवा खेळताना झालेल्या दुखापतींमध्ये सांधा मुरगळणे किंवा लचकणे ही स्थिती बऱ्याच वेळा उद्‌भवते. त्यांत झालेली दुखापत संधिबंध स्नायू, स्नायुबंध किंवा संधिकोश यांच्यावर पडलेल्या ताणामुळे झालेली असते. गंभीर दुखापतीमुळे यातील एखादे ऊतक फाटणे किंवा तुटणेही शक्य असते. आघात अधिक प्रबळ असल्यास हाडाचा सांध्यामध्ये असलेला भाग अंशतः किंवा पूर्णपणे मोडू शकतो. अशा वेळी सांध्याच्या आतील भागातील उपास्थी, अस्थिबंध किंवा संधिकला यांना इजा पोहचते आणि तीव्र संधिशोथाची लक्षणे (वेदना, सांधा आखडणे, सूज, स्पर्श असह्यता इ.) दिसून येतात.एखादी रक्तवाहिनी तुटल्यामुळे सांध्यांत रक्त साठू लागते. काही अन्य प्रकारच्या दुखापतींमध्ये सांध्यातील हाडाचे विस्थापन होऊन त्याची नेहमीची हालचाल अशक्य होते. पाठीच्या कण्यामधील आंतरकशेरुक उपास्थी विस्थापित झाल्यास तिचा दाब मेरुरज्जूवर पडून गंभीर लक्षणे निर्माण होऊ शकतात.

 

 

संक्रामणजन्य विकारांत लहान मुलांमध्ये होणारा संधिज्वर गंभीर परिणाम घडवू शकतो. प्रत्यक्ष सांध्यामधील विकृती (सूज, वेदना इ.) अल्पकाळ टिकते परंतु त्यापासून हृदयाच्या झडपांवर आणि स्नायूंवर होणारे घातक परिणाम दीर्घकाळ टिकू शकतात. दीर्घकालिक संक्रामणात सांध्याचा क्षयरोग आणि संधिवाताभ हे महत्त्वाचे आहेत. चयापचयी विकारांपैकी ⇨गाऊट मध्ये सांध्यात यूरिक अम्लाचे स्फटिक आढळतात. मधुमेहात सांध्याच्या तंत्रिकांची (मज्जापेशींची) कार्यक्षमता कमी होऊन संवेदनक्षमता कमी होऊ शकते. परिणामतः एखाद्या सांध्यामधील इजा किंवा विकार वाढत जाऊन ‘शार्कट विकार’ या नावाने ओळखली जाणारी स्थिती आढळू लागते. सुजलेला, द्रवाने भरलेला सांधा व त्यातील घटकांचे विघटन अथवा हाडांची अतिरिक्त वाढ आणि वेदनाहीनता असे या विकाराचे स्वरूप असते.

 

 

उतारवयातील अस्थिसंधिशोथ हा विकार प्रामुख्याने भार पेलणाऱ्या गुडघ्यांसारख्या सांध्यांत आढळतो. उपास्थी पातळ होणे, तिला तडे जाणे आणि तिच्या भोवताली अतिरिक्त अस्थि-ऊतक वाढणे ही प्रमुख परिवर्तने येथे आढळतात. हालचाल मर्यादित झाल्यामुळे कार्यक्षमता बऱ्याच प्रमाणात घटते. वृद्घ व्यक्तींमध्ये कर्करोगाचे प्रमाण अधिक आढळते. त्यामुळे शरीरात अन्यत्र असलेल्या कर्करोगाची उपवृद्घी (अप्रधान कर्क) सांध्यांमध्ये सापडण्याची शक्यता नेहमी लक्षात घ्यावी लागते.

 

 

रोगनिदानाच्या पद्घती : सांध्यांच्या दुखापती किंवा विकारांच्या निश्चित निदानासाठी काही प्राथमिक स्वरूपाची माहिती रुग्णाच्या तक्रारींमधून मिळू शकते. कोणत्या प्रकारचे व किती सांधे बाधित आहेत, दैनंदिन कार्यक्रमात कोणत्या वेळी सांध्यांचा आखडलेपणा जाणवतो, हालचाल करताना सांध्यांमध्ये कर्‌कर् किंवा खट्खट् आवाज होतो का? इ. माहिती उपयुक्त ठरते. रुग्ण परीक्षणात वेदनेचे नक्की स्थान, स्पर्श असह्यता, सूज, उष्णता, सांध्यांचा बदललेला आकार आणि हालचालींवर पडलेली मर्यादा यांवरून संधिशोथाची तीव्रता व अल्प-वा दीर्घ-कालावधी आणि बाधित ऊतकाचे स्थान यांबद्दल कल्पना करता येते.

 

 

सांध्यांचे प्रतिमादर्शन करण्यासाठी दोन अक्षांमधून (मागे-पुढे व डाव्या-उजव्या बाजूंनी) घेतलेली क्ष-किरण चित्रे सामान्यतः उपयुक्त ठरतात. गुंतागुंतीच्या दुखापतींसाठी आणि स्नायू व अस्थिबंधांच्या विकारग्रस्ततेची माहिती मिळण्यासाठी संगणकीकृत अक्षीय छेददर्शन (कॉम्प्युटेड ॲक्सियल टोमोग्राफी सीएटी) आणि चुंबकीय अनुस्पंदन प्रतिमादर्शन (मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग एम आर आय) या अधिक खर्चाच्या तंत्रांचा अवलंब करावा लागतो. संधिकोशाच्या आत उपकरण घालून अंतर्भागाचे संधिदर्शन आता शक्य झाले आहे. त्याचा उपयोग शस्त्रक्रियेसाठीही केला जातो.

 

 

सांध्यांत साचलेला द्रव, सांध्यांभोवती किंवा आतमध्ये वाढलेल्या गाठी यांचे सूक्ष्मदर्शकीय निरीक्षण, ऊतक परीक्षण व सूक्ष्मजीवशास्त्रीय परीक्षण यांचा उपयोग संक्रामणाच्या कारणाचा शोध घेण्यासाठी केला जातो. रक्तातील सूक्ष्मजीवांचे परीक्षण व संवर्धन आणि कोशिकांचे (पेशींचे)गणन ही तंत्रेही निदानासाठी साह्यभूत ठरतात. संधिवातासारख्या विकाराच्या निदानात प्रतिरक्षावैज्ञानिक चाचण्या (प्रतिपिंडाच्या मापनासाठी) केल्या जातात. रक्तातील शर्करा व यूरिक अम्ल यांच्या मापनातून मधुमेह आणि संधिवात यांचे निदान होऊ शकते.

 

 

सांध्यांच्या विकारांवरील उपचार त्यांच्यामागील कारणांप्रमाणे आणि प्रमुख लक्षणांपासून आराम मिळण्याच्या उद्देशाने केले जातात परंतु सर्व विकारांमध्ये सांध्यांना विश्रांती मिळविण्यासाठी दक्षता घ्यावी लागते. आधारदायक कापडी किंवा लवचिक पट्ट्या बांधणे, प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे साचे बसविणे, भार कमी करणाऱ्या कुबड्या किंवा धातूच्या कॅलिपर्स (आधारदायी चौकटी) वापरणे, चाकाच्या खुर्चीचा काही काळ उपयोग करणे इ. मार्गांनी अशी विश्रांती मिळू शकते. दीर्घकालिक विकारांमुळे झालेली अपरूपता (विरूपता) कमी करण्यासाठी शस्त्रक्रियेचा अवलंब करणे भाग पडते. आधुनिक शस्त्रक्रियेच्या तंत्रात एखाद्या उपास्थीऐवजी कृत्रिम पृष्ठभाग बसविण्यापासून पूर्णपणे कृत्रिम सांध्यांचे आरोपण करण्यापर्यंत विविध प्रकारचे उपचार यशस्वीपणे प्रचारात येत आहेत.

 

 

अशा रीतीने पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेल्या) प्राण्यांमध्ये दोन किंवा अधिक अस्थी किंवा उपास्थी अनेक ठिकाणी एकमेकींना जोडलेल्या आढळतात. त्या जोडाला सांधे म्हणतात. त्यांच्या तीन प्रकारांचे वर्णन थोडक्यात वर आले आहे. अपृष्ठवंशी म्हणजे पाठीचा कणा नसलेल्या प्राण्यांमध्ये असे सांधे नसले, तरी सांध्यांसारखी क्रिया असणारे जोड असतात. अनेक आर्थ्रोपोड (संधिपाद) प्राण्यांतील कायटिनाच्या तबकड्यांच्या जोडांत किंवा मॉलस्का (मृदुकाय) प्राण्यांच्या कवचांमधील जोडांत (उदा., शिंपले) सांध्याप्रमाणे क्रिया घडताना दिसते. अनेक संधिपाद प्राण्यांत दोन टणक तबकड्यांच्या जोडात मृदू कायटिनाचे संधिपटल असते आणि स्नायूंच्या पूर्ततेमुळे या दोन टणक तबकड्या सांध्यांच्या ठिकाणी होणाऱ्या हालचालींसारखी हालचाल करू शकतात. [⟶ आर्थ्रोपोडा मॉलस्का].

पहा : कणा व मणका पाऊल पाय मनगट विकलांग चिकित्सा हात.

संदर्भ : 1. Berkow, R. Ed. Merck Manual of Medical Information, New jersey, 1997.

            2. Wilson, K. J. W. Anatomy and Physiology in Health and Illness, Edinburgh, 1987.

श्रोत्री, दि. शं.