टॅरँट्युला : टॅरँट्युल हा एका मोठ्या आकाराचा, काळा आणि केसाळ कोळी आहे. जगातील सर्व उष्ण प्रदेशांत हे कोळी आढळतात. त्यांची लांबी ६·५ सेंमी.पर्यंत असते व पाय १८—२० सेंमी पर्यंत पसरलेले असतात. गिनीमध्ये सर्वात मोठा टॅरँट्युला सापडतो. त्याची लांबी ९ सेंमी. पर्यंत असते. टॅरँट्युला हे नाव दक्षिण इटलीतील टॅरँटो बंदराच्या नावावरून आलेले आहे. पुष्कळदा काही मोठ्या कोळ्यांना हे नाव देतात, परंतु सामान्यतः  थेरॅफोसिडी कुलातील कोळ्यानाच हे नाव दिले जाते.

टॅरँट्युला

टॅरँट्युला जमिनीत बिळे करून, दगडांच्या किंवा ओंडक्यांच्या खाली, झाडांच्या पोकळीत किंवा खडकांत कपारीत राहतात. ते निशाचर असल्यामुळे दिवसा क्वचितच दिसतात. इतर कोळ्याप्रमाणे ते जाळी विणीत नाहीत. भक्ष्याचा पाठलाग करून त्याला पकडतात. कीटक यांचे मुख्य भक्ष्य असते परंतु बेडूक, उंदीर किंवा लहान पक्ष्यांवरही ते उपजीविका करतात.

टॅरँट्युला विषारी आहे. तो दंश करतो, पण या दंशामुळे होणाऱ्या वेदना गांधील माशीच्या दंशापेक्षा जास्त पीडाकारक नसतात. असे असूनही बहुतेक लोक याच्या दंशाला घाबरतात. अगदी लहान प्राणी यांच्या दंशामुळे बेशुद्ध होतात किंवा मरतात. परंतु मोठ्या नियततापी (ज्यांच्या शरीराचे तापमान परिसराच्या तापमानापेक्षा स्पष्टपणे उच्च असून स्थिर असते अशा) प्राण्यांवर याच्या विषाचा परिणाम होत नाही. टॅरँट्युलाच्या विषबाधेने नाचण्याचे वेड लागते व त्यावर उतारा म्हणून टॅरँटेला हा विशिष्ट प्रकारचा नाच करावयाचा, असा दक्षिण इटलीत समज होता.

भुंगा हा टॅरँट्युलाचा शत्रू म्हणावयास हरकत नाही. तो त्याच्यापेक्षा लहान असला, तरी दंश करून तो टॅरँट्युलाला बेशुद्ध करतो व आपल्या घरट्यात नेऊन ठेवतो व पिलांसाठी भक्ष्य म्हणून त्याचा उपयोग करतो.

हिवाळ्यात हा कोळी आपल्या बिळाचे तोंड रेशमी धाग्यांनी बंद करून शीतसुप्ती घेतो. तो सु. वीस वर्षे जगतो.

गर्दे, वा. रा.