हत्ती : हा जमिनीवर राहणारा सर्वांत मोठा व शक्तिमान प्राणी आहे. एकूण प्राणिसृष्टीत फक्त काही देवमासे हत्तीपेक्षा मोठे आहेत. तसेच तो प्राणिसृष्टीमधील जिराफानंतरचा सर्वांत उंच प्राणी आहे. लांब सोंड हे त्याचे आगळे वेगळे वैशिष्ट्य असून तो तिचा हातासारखा उपयोग करतो, म्हणून त्याला संस्कृतमध्ये हस्तिन् असे म्हणतात. वरचा ओठ व नाक पुष्कळ लांब होऊन सोंड बनली आहे. त्याचे सुपासारखे सपाट कान सर्व प्राण्यांत मोठे आहेत. त्याचे सुळे सर्व प्राण्यांच्या दातांच्या तुलनेत सर्वाधिक लांब आहेत. शरीराचे प्रचंड वजन पेलणारे त्याचेे पाय जाड खांबांसारखे असतात. त्याचे डोके प्रचंड मोठे असून शरीराच्यामानाने त्याचा मेंदू लहान असतो. त्याचा रंग करडा, तपकिरी व काळपट असून शरीरावरील केस विरळ व राठ असतात. थायलंड व म्यानमार येथे क्वचित पांढरे हत्ती आढळतात. या हत्तींचा रंग भुरकट पांढरा असूनकान व त्वचा फिकट गुलाबी असते. हत्ती पुष्कळ वेळा वने, गवताळप्रदेश व रुक्षवने (सॅव्हाना) येथे आढळतात. मात्र त्यांचे अधिवास (स्वाभाविक निवास) वाळवंटे, दलदली तसेच आशिया आणि आफ्रिका खंडांमधील उष्ण व उपोष्ण प्रदेशांतील डोंगराळ प्रदेश अशा विविध प्रकारचे आहेत.

आ. १. (अ) आफ्रिकी हत्ती (लोक्झोडोंटा आफ्रिकाना) : (१) मध्यभागी उतरती पाठ, (२) खांदे आच्छादणारे कान, (३) बाकदार कपाळ, (४) सोंडेच्या टोकावरील बोटांसारख्या दोन मांसल संरचना, (५) चार किंवा पाच बोटे, (६) तीन बोटे, (७) त्वचेची सैलसर घडी (आ) आशियाई हत्ती (एलिफस मॅक्झिमस) : (१) कपाळावरील दोन उंचवटे, (२) कान खांदे झाकत नाहीत, (३) कमानदार पाठ, (४) चार बोटे, (५) पाच बोटे, (६) सोंडेच्या टोकावरील बोटासारखी एकच मांसल संरचना.

प्रोबॉसिडिया गणाच्या एलिफंटिडी कुलामधील तीन जातींतील प्राण्यांना हत्ती हे सामान्य नाव आहे. या गणातील उरलेल्या कुलांमध्ये निर्वंश झालेले प्राणी येतात; उदा., मॅमथ. लोक्झोडोंटा आफ्रिकाना आणि लो. सायक्लॉटिस या दोन जिवंत जाती मूळच्या आफ्रिकेतील असून एलिफस मॅक्झिमस ही हत्तींची तिसरी जाती  आग्नेय आशियात सर्वत्र आढळते. आफ्रिकी हत्ती फक्त आफ्रिकेत सहारा  वाळवंटाच्या दक्षिणेस आढळतात, तर आशियाई किंवा भारतीय हत्ती (ए. मॅक्झिमस) भारताच्या काही भागांत आणि आग्नेय आशियात आढळतात. आफ्रिकी झुडपी (बुश) हत्ती (लो. आफ्रिकाना आफ्रिकाना) व आफ्रिकी वन्य ( वाइल्ड) हत्ती (लो. आफ्रिकाना सायक्लॉटिस) या उपजाती मानतात.

आफ्रिकी हत्ती : हे आशियाई हत्तींपेक्षा मोठे असून या दोन्हींची खांदा व ढुंगण येथील उंची जवळजवळ सारखी असते. आफ्रिकी हत्तीची पाठ मध्यभागी किंचित उतरती असते. प्रौढ आफ्रिकी नराची खांद्याजवळ उंची सु. ३.४ मी. असून वजन सु. ५,४०० किग्रॅ. असते, तर मादीची खांद्याजवळ उंची सु. २.८ मी. व वजन सु. ३,६०० किग्रॅ. असते. १९५५ मध्ये अंगोला येथे मारलेल्या एका आफ्रिकी वन्य हत्तीची खांद्याजवळ उंची ३.९० मी. व वजन ६,६०० किग्रॅ. होते. त्याचे ⇨ चर्मपूरण करून तो अमेरिकेतील स्मिथसोनियन इन्स्टिट्यूटमध्ये ठेवण्यात आला आहे.

बहुतेक आफ्रिकी हत्तींचा रंग गडद करडा व कपाळ बाकदार असते. त्यांचे कान सु. १.२ मी. रुंद असून ते खांदे झाकण्याइतपत मोठे असतात. नर आणि मादी दोघांनाही सुळे असतात. नराचे सुळे १.८–२.४ मी. लांब असून त्यांचे वजन प्रत्येकी २३–४५ किग्रॅ. असते. बहुतेक माद्यांच्या सुळ्यांचे वजन प्रत्येकी ७–९ किग्रॅ. असते. सर्वांत लांब सुळा ३.५ मी. आणि सर्वांत वजनदार सुळा ३३ किग्रॅ. वजनाचा होता.

सोंडेच्या टोकावर बोटांसारख्या दोन मांसल संरचना असून त्यांच्या मदतीने हत्ती टाचणीसारख्या अगदी बारीक वस्तूही उचलू शकतो. सोंडेच्या त्वचेवर खोलगट सुरकुत्या असतात. पुढील पायांवर ४ किंवा ५ बोटे असतात तर मागील प्रत्येक पायाला तीन बोटे असतात. त्वचेची सैलसर घडी मागील पायांशी व शरीराच्या बाजूंशी जुळलेली असते. आशियाई हत्तींत ही घडी नसते.

आफ्रिकी हत्ती फक्त सहाराच्या दक्षिणेस राहतात. त्यांचे वन्य व झुडपी (सॅव्हाना) हत्ती हे दोन प्रकार वा उपजाती आहेत. सहारा वाळवंटाच्या दक्षिणेकडील बहुतेक देशांत आढळणारे झुडपी हत्ती अधिक मोठे असून त्यांचे सुळे अधिक वजनदार असतात. कॅमेरून, काँगो (ब्राझव्हिले), काँगो (किन्शासा ), तसेच मध्य व पश्चिम आफ्रिकेतील इतर देशांत वन्य हत्ती आढळतात. या दोन्ही उपजाती वने, गवताळ प्रदेश, पर्वत, दलदली व झुडपांच्या प्रदेशांत राहतात. अनेक शास्त्रज्ञांच्या मते या दोन वेगळ्या जाती आहेत, तर काहींच्या मते पश्चिम आफ्रिकेतील वने व झुडपांचे प्रदेश येथे राहणारी पश्चिम आफ्रिकी ही तिसरी जाती आहे. लो. आफ्रिकाना सायक्लॉटिस ही स्वतंत्र उपजाती सन २००० मध्ये जाहीर झाली असून ती झुडपी हत्तींपेक्षा लहान, बारीक व सुळे खालील दिशेत असलेली आहे. त्यांची खांद्याजवळ उंची सु. २ मी. व वजन सु. १,३०० किग्रॅ. असते. त्यांचे सुळे सु. ३ मी.पर्यंत लांब असतात.

आफ्रिकी हत्ती मुख्यत्वे कोवळ्या फांद्या, झाडाची पाने व मुळ्या खातात ते क्वचितच गवत खातात. ते मुकेन झाडाची फळे खातात. त्यांतून त्यांना आवश्यक औषधी द्रव्ये मिळतात. बहुतेक वेळा ते उभ्याने झोप घेतात.


आशियाई हत्ती : हे दक्षिण व आग्नेय आशियातच आढळतात. ते भारत, चीन, कंबोडिया, इंडोनेशिया, मलेशिया, म्यानमार, श्रीलंका, थायलंड व व्हिएटनाम येथील वनांत राहतात. त्याची पाठ कमानदारम्हणजे खांदा व ढुंगण यांपेक्षा अधिक उंच असते. प्रौढ नराची खांद्याजवळ उंची २.७-३.२ मी. व वजन ३,६०० किग्रॅ.पर्यंत असते. सर्वांत उंच आढळलेला हत्ती ३.३ मी. उंचीचा होता. मादीची खांद्याजवळ उंची सु. २.४ मी., तर वजन सु. ३,००० किग्रॅ. असते. त्याचा रंग फिकट करडा असून त्यावर फिकट गुलाबी व पांढरे ठिपके असतात. कपाळावर कानाच्या अगदी वर दोन उंचवटे असतात. त्याचे कान आफ्रिकी हत्तींपेक्षा जवळ-जवळ निम्म्या आकारमानाचे असतात, त्यामुळे खांदे झाकले जात नाहीत.

बहुतेक नरांचे सुळे १.२–१.५ मी. लांब असतात. काही हत्तींना (उदा., श्रीलंकेतील हत्ती) सुळे नसतात, त्यांना ‘मकना’ म्हणतात. अनेक माद्यांना सुळे नसतात तर काही माद्यांचे सुळे आखूड असतात. हत्तीला प्रत्येक जबड्यात एकूण सहा दाढा येतात. एका वेळेस दोनच दाढा येतात. यांपैकी एक पूर्ण वाढलेली व दुसरी अर्धवट हिरडीवर आलेली असते. नवीन येणारी दाढ पहिल्या दाढेमागे व पहिलीपेक्षा आकारमानाने मोठी असते. दुधाच्या दाढा दुसऱ्या वर्षी पडतात. दुसऱ्या दाढांचा संच सहाव्या वर्षी, तिसरा संच नवव्या वर्षी, चवथा संच २०-२५ वर्षांदरम्यान म्हणजे हत्ती पूर्ण वयात येतो तेव्हा आणि पाचवा संच ६० व्या वर्षी येतो आणि सहावा संच शेवटपर्यंत राहतो. सहाव्यांदा येणाऱ्या दाढेला २७ पन्हळी असतात. आफ्रिकी हत्तीच्या दाढेला ११ पन्हळी असतात.

आशियाई हत्तींची सोंड आफ्रिकी हत्तींपेक्षा अधिक मऊ त्वचेची असून तिच्या टोकावर बोटासारखी एकच संरचना असते. बहुतेक हत्तीच्या पुढील पायांना प्रत्येकी पाच, तर मागील पायांना चार बोटे असतात.

आशियाई हत्तींच्या पुढील तीन उपजाती आहेत : भारतीय किंवामुख्य भूमीवरील हत्ती (ए. मॅ. इंडिकस ), सुमात्रन (ए. मॅ. सुमात्रन) आणि श्रीलंकन (ए. मॅ. मॅक्झिमस ).

शरीरवर्णन : हत्तीची डोके ते शेपूट (वा त्याच्या पाठीची) लांबीही जवळजवळ प्रौढ हत्तीच्या उंचीएवढी असते (शेपटीची लांबी त्याच्या लांबीत धरीत नाहीत). त्याची मान आखूड व स्नायुमय असते. त्याचे डोके प्रचंड मोठे असून कान मोठे व त्रिकोणी असतात. सोंड वरील जबड्यापासून पुढे आलेली असून तिच्या तळापासून जबड्याच्या प्रत्येक बाजूला एकेक सुळा वाढलेला असू शकतो. त्याच्या अवजड शरीराला चार जाडजूड पायांचा आधार असतो. शरीराच्या तुलनेत शेपटी लहान असून ती सु. १ मी. लांब असते.

हत्तीला सहसा कुठला रोग होत नाही, मात्र संपर्कातून त्याला इतर पाळीव प्राण्यांचे वा मनुष्यांचे रोग होऊ शकतात. वन्य हत्तीची जखम व आजार लवकर बरे होतात. त्याच्या त्वचेत सोंड खुपसून रक्त शोषणाऱ्या जंगलातील हॉर्स फ्लाय माश्या, बारीक पिसवा व अन्य कीटक यांचा हत्तीला फार त्रास होतो. हा त्रास चुकविण्यासाठी तो सोंडेने माती अंगावर वरचेवर फवारतो. बगळ्यासारखे पक्षी हे कीटक खाऊन त्याचा हा त्रास पुष्कळ कमी करतात. तो पोटातील पाणी सोंडेने काढून ते अंगावर फवारूनही आपला त्रास कमी करतो, अशी योजना इतर कोणत्याही प्राण्यांत नाही.

आ. २. आफ्रिकी हत्तीचे काही अंतर्गत अवयव व सांगाडा : (१) मेंदू , (२) ग्रसिका, (३) फुप्फुस, (४) वृक्क, (५) अंडाशय, (६) मूत्राशय, (७) मलाशय, (८) जनन मार्ग, (९) आतडी, (१०) जठर, (११) हृदय, (१२) श्वासनाल. (हत्तीचे अवयव इतर सस्तन प्राण्यांच्या अवयवांसारखे असले, तरी अधिक मोठे असतात. उदा., हत्तीचे हृदय माणसाच्या हृदयाच्या पाचपट मोठे आणि पन्नासपटींहून अधिक जड असते ).

त्वचा व केस : हत्तीची त्वचा करडी, सुरकुत्या असलेली व सैलसर ठिकाणी लोंबत असते. प्रौढ हत्तीची त्वचा ३ सेंमी.पर्यंत जाड असू शकते. तिचे वजन सु. ९०० किग्रॅ. असते. जाड त्वचेमुळे हत्तीला ग्रीक शब्दांवरून ‘पॅचीडर्म’ असे नाव पडले आहे. विशेष म्हणजे त्याची त्वचा स्पर्शासह्य वा दुखण्याजोगी नाजुक असते. त्यामुळे माश्या, डास यांसारखे कीटक त्याला दंश करू शकतात.

हत्तीला स्वेद ग्रंथी नसतात. त्यामुळे त्याला इतर मार्गांनी शरीर थंड ठेवावे लागते. यासाठी तो कान फडफडवतो किंवा सोंडेने शरीरावरपाणी फवारून घेतो. शिवाय तो चिखलात लोळतो. चिखल शरीरावर सुकू देतो. त्यामुळे त्याचे उन्हापासून व त्रासदायक कीटकांपासून संरक्षण होते.

जन्मतः हत्तीच्या अंगावर विरळ, तपकिरी, काळे किंवा तांबूस तपकिरी केस असतात. वाढत्या वयाबरोबर केस हळूहळू कमी होतात. प्रौढ हत्ती जवळजवळ केशहीन दिसतो. मात्र कान, नाक, डोळे व तोंड यांच्याभोवती रोम असतात. तसेच सोंड, पाय व इतर भागांवर विरळ केस असतात. शेपटीच्या टोकाशी जाड केसांचा लांब झुपका असतो.


सोंड : वरचा ओठ व नाक यांच्या संयोगातून सोळा स्नायू असलेली सोंड तयार झालेली आहे. ती लवचिक, बळकट, अस्थिहीन मांसाची बनलेली असते. प्रौढ हत्तीची सोंड सु. १.५ मी. लांब असून तिचे वजन सु. १४० किग्रॅ. असते.

सोंडेचा उपयोग श्वसन, वास घेणे, खाणे व पिणे या कामांकरिताहोतो. तो सोंडेने जवळजवळ नेहमीच हवा व जमीन हुंगत असतो. तो सोंडेत पकडलेला झाडपाला प्रथम पायांवर आपटून त्यातील किडे व माती झटकून काढून टाकून नंतर मुखापर्यंत नेतो. सोंडेने शोषून घेतलेले पाणी त्याला फवाऱ्याप्रमाणे बाहेर सोडता येते. प्रौढ हत्तीच्या सोंडेत सु. ६ लि. पाणी मावते.

हत्ती सोंडेचा वापर हाताप्रमाणे करतो. वस्तू धरणे व पकडणे, सोंडेच्या टोकावरील झडपेसारख्या संरचनेमार्फत नाण्याएवढी लहान वस्तू उचलणे, सु. २७५ किग्रॅ.पर्यंत वजनाचे ओंडके उचलून वाहून नेणे, तसेच इतर हत्तींशी संपर्क साधणे, पिलांना थोपटणे या कामांतही त्याला सोंडेची मदत होते. दोन हत्ती परस्परांना शुभेच्छा देताना प्रत्येक हत्ती आपल्या सोंडेचे टोक दुसऱ्या हत्तीच्या मुखात ठेवतो. तरुण नर सोंडेद्वारे कुस्ती खेळून लुटुपुटूची लढाई करतात. खऱ्या भांडणाच्या वेळी मात्र सोंड बहुधा हनुवटीखाली गुंडाळून घेऊन तिचे रक्षण करतात. अशी बहुकामी सोंड हे प्रोबॉसिडिया गणाचे एकमेवाद्वितीय वैशिष्ट्य आहे. संवेदनशीलता व सहजपणे अनेक प्रकारे फिरणारी सोंड शरीरापासून जवळजवळ स्वतंत्र असल्यासारखी भासते.

सुळे व दात : वरचे लांब, बाकदार व कृंतक( कुरतडणारे) दात म्हणजे हत्तीचे सुळे होत. त्यापासून हस्तिदंत मिळतात [→ हस्तिदंत]. प्रत्येक सुळ्यांचा ⅔ भाग वरच्या जबड्याबाहेर आलेला असून उरलेला कवटीत असतो. हत्ती अन्न व पाणी खोदून काढणे, वृक्षाची साल सोलणे, संरक्षणआणि आक्रमण इ. कामांसाठी सुळे वापरतात. सुळ्यांच्या साहाय्यानेते सु. ९०० किग्रॅ.पर्यंत भार उचलून वाहून नेऊ शकतात. सुळ्यांमुळे सोंडेचे संरक्षण होते. हल्ला झाल्यावर सोंड दुमडून खोवली जाते.पाण्यासाठी कोरड्या पात्रात छिद्रे पाडताना त्याला सुळे, पाय व सोंडयांचा उपयोग होतो. भारतीय हत्तीचे सुळे १.७५–२.७ मी. लांब असून त्यांचे वजन २०–३५ किग्रॅ. असते. पुष्कळ आशियाई माद्यांना व काही नरांना सुळे नसतात.

हत्तीला चार दाढा (चर्वणक) सुद्धा असतात. प्रौढपणी दाढांची लांबीसु. ३० सेंमी. व वजन सु. ४ किग्रॅ. असते. दाढांच्या कडा दातेरी असल्याने अन्नाचे चर्वण चांगले होते. दोन्ही जबड्यांत प्रत्येक बाजूला एकेक दाढ असते व तोंडाच्या मागील भागात जादा दाढा असतात. पुढील दाढा हळूहळू झिजून नष्ट होतात. मागील दाढा पुढे रेटल्या जाऊन त्यांची जागा घेतात. आयुष्यात प्रत्येकी चार दाढा असलेले सहा संच वाढतात. दातांचा आकार व आकारमान आनुवंशिकतेनुसार ठरते. दाढांचा अखेरचा संच झिजल्यावर हत्तीची उपासमार होऊन तो मृत्युपंथाला लागतो.

पाय व पावले : हत्तीचे पाय खांबासारखे मजबूत असून त्याची पावले जवळजवळ वर्तुळाकार असतात. टाच अंशतः उंच व तिच्या खाली ऊतकांची (समान रचना आणि कार्य असणाऱ्या कोशिकांच्या — पेशींच्या — समूहांची) चरबीसदृश तंतुमय पाचर व तिच्यावर जाड त्वचेचे गिरदीसारखे संरक्षक कवच असते. जमिनीवर ठेवलेले पाऊल हत्तीच्या वजनाने प्रसरण पावते आणि पाय वर उचलल्यावर संकोच पावते. त्यामुळे तो चिखलात खोलपर्यंत जाऊ शकतो व पाय सहजपणे बाहेर काढू शकतो. कारण पाय उचलल्यावर पाऊल अधिक लहान होते. हत्तीला खाली पडून झोपणे व उठणे अवघड असते. रात्री तो खाली पडून तीन–चार तास झोपतो. उभ्या उभ्या तो लहान डुलक्या घेतो, परंतु गाढ झोपत नाही.

संवेदना : हत्तीचे घ्राणेंद्रिय तीक्ष्ण असते. वास घेण्यासाठी त्याला सोंडेची फार मदत होते. गंधाच्या संवेदनेवर तो इतर संवेदनांपेक्षा जास्त अवलंबून असतो. सोंड हवेत उंच धरून तो ती सतत हलवितो. याद्वारे त्याला अन्न आणि शत्रू यांचा गंध लक्षात येतो. सुमारे ६ किमी.हून अधिक दूर असलेल्या माणसाचा गंध त्याला कळू शकतो. आसपास वाघ आल्यास त्याच्या गंधाने तो अस्वस्थ होतो व त्याचा श्वासोच्छ्वास जोराने होऊ लागतो आणि तो सोंडेचे टोक एकसारखे जमिनीवर आपटतो.

हत्तीला चांगले ऐकू येते. माणसाला जाणवणाऱ्या ध्वनीच्या पल्ल्याखालील ध्वनी (अवश्राव्य ध्वनी) हत्ती काढू व ऐकू शकतो. हत्ती किमान ४ किमी. अंतरावरून एकमेकांशी संपर्क साधू शकतात आणि असा संपर्क याच्या दुप्पट अंतरावरून साधण्याची शक्यता वैज्ञानिक व्यक्त करतात.

हत्तीचे स्पर्शज्ञान सोंडेत सर्वांत तीव्र असते. विशेषतः सोंडेच्या टोकाने तो वस्तूचा आकार ओळखू शकतो. तसेच या रीतीने त्याला वस्तू मऊ किंवा खडबडीत आहे अथवा गरम वा थंड आहे, हेही कळू शकते.


हत्तीची दृष्टी काहीशी अधू असते. त्याच्या प्रचंड डोक्याच्या तुलनेत डोळे बारीक असतात. तो आपले डोके पूर्णपणे वळवू शकत नाही. त्याला समोरचे व आजूबाजूचे दृश्य तेवढे दिसू शकते. मागील बाजूची कोणतीही गोष्ट पाहण्यासाठी त्याला मागे वळावे लागते. थोड्याशा आवाजाने किंवा गडद रंगाने तो बुजतो.

बुद्धिमत्ता : हत्तीचा मेंदू मोठा असून बुद्धिमत्तेच्या बाबतीत इतर प्राण्यांच्या संदर्भात तो वरच्या पातळीवर आहे. वन्य स्थितीतील हत्तीचे सामाजिक जीवन गुंतागुंतीचे असल्याने त्याला वर्तन व संवेदन यांविषयीची अनेक कौशल्ये शिकून घ्यावी लागतात. आफ्रिकी हत्ती किमान २५ भिन्न प्रकारे साद घालू शकतात, असे अभ्यासावरून दिसून आले आहे. या प्रत्येक सादीला विशिष्ट अर्थ असतो. सामाजिक व्यवहारांत विस्तृत क्षेत्रातील भटकंतीमध्ये त्यांना या स्मृतींचा उपयोग होतो. कळपातील कुटुंबप्रमुख मादीला (सत्ताधारी मातेला) संपूर्ण कळपाची माहितीअसते. स्थलांतराचे मार्ग, फळझाडे असलेली ठिकाणे इ. गोष्टी तिलामाहीत असतात. ही माहिती ती कळपातील तरुण माद्यांना देते. पुढे यातील एक मादी तिच्यानंतर कुटुंबप्रमुख होते.

बंदिस्त अवस्थेतील हत्ती विविध प्रकारची कामे, खेळ, कसरती इ. करायला शिकतात. त्यांच्या प्रशिक्षणाच्या निरनिराळ्या पद्धती असून काही पद्धती निर्दय प्रकारच्या आहेत. त्यांमध्ये प्रशिक्षक धारदार साधनांनी हत्तीचे ताडन करतात व अखेरीस हत्तीची इच्छाशक्ती मोडून पडते. तथापि, बहुतेक प्रशिक्षक सौम्य पद्धती वापरतात व त्याचे परिणामही चांगले मिळतात. हत्ती जलदपणे शिकणारे प्राणी आहेत. चांगल्या प्रशिक्षित कर्तबगार हत्तीला आवाजाद्वारे दिल्या जाणाऱ्या चालीपर्यंत आज्ञा अवगत असतात.

हत्तीची जीवनपद्धती : प्रौढ नर व माद्या बहुतेक काळ वेगळ्या राहतात. कुटुंबात माद्या व पिले असून कुटुंब सरासरी दहा हत्तींचे असते. यात तीन–चार प्रकारचे नातेसंबंध असणाऱ्या माद्या व त्यांची संतती असते. यांमध्ये नवजात ते १२ वर्षांपर्यंतची पिले असतात. प्रत्येक कुटुंबाचे नेतृत्व सत्ताधारी मादी करते. नर प्रौढ झाल्यावर कुटुंबातून बाहेर पडतात. प्रौढ नरांचे इतर नरांशी घट्ट बंध नसतात. प्रौढ नर फक्त विशिष्ट प्रसंगी कुटुंबाला भेट देतात.

एका क्षेत्रात राहणारी कुटुंबे व स्वतंत्र प्रौढ नर यांचा अंतर्भाव हत्तींच्या समूहात असतो. त्यांच्या समूहात काहीशेपासून हजारो हत्ती असतात. प्रत्येक समूह अन्नाच्या शोधात विशिष्ट क्षेत्रात पसरलेला असतो. अर्धशुष्क क्षेत्रांत अन्नाच्या शोधार्थ त्यांना प्रचंड अंतरापर्यंत भटकंती करावी लागते. भरपूर पाऊस व विपुल वनश्री असलेल्या क्षेत्रांत सु. २५० चौ.किमी. इतक्या मऱ्यादित क्षेत्रात समूहाचे वास्तव्य असते.

हत्ती दिवसभरात १६ तासांपर्यंत अन्न खात असतात. ते सरोवरांत व नद्यांमध्ये आंघोळ करतात. त्यांना चिखल असलेल्या पाण्यात लोळायला आवडते. चिखलात लोळल्यावर हत्ती आपले अंग धुळीने माखून घेतो. या त्वचेवरील चिखलाच्या लेपामुळे ऊन व कीटक यांच्यापासून त्याच्या त्वचेचे संरक्षण होण्यास मदत होते.

हत्ती विविध प्रकारे एकमेकांशी संपर्क साधतात उदा., हावभाव, अंगविक्षेप, आविर्भाव, गंध (वास) व विशेषतः आवाज. ते अनेक प्रकारचे गुरगुरण्याचे आवाज काढतात व प्रत्येक आवाजाला एक वेगळा अर्थ असतो. उदा., घाबरलेले पिलू मोठा व घोगरा आवाज काढून गुरगुरते तर पिलाला शांत करण्यासाठी मादी गळ्यातल्या गळ्यात मंदपणे गुणगुणल्यासारखा आवाज काढून त्याला प्रतिसाद देते. हत्ती संपर्क साधण्यासाठी किंकाळीसारखा कर्कश आवाज, चीची (वा कुईकुई) आवाज, कण्हणे, विव्हळणे, आक्रोश इ. आवाजही काढतात.

अन्न : गवत, जलवनस्पती, वृक्षांची पाने, मुळे, साली, फांद्या वफळे, झुडपे इ. हत्तीचे खाद्य आहे. आफ्रिकेतील हत्ती क्वचितच गवत खातात. ते मुख्यत्वे कोवळ्या फांद्या, पाने, मुळ्या व मुकेन वृक्षाचीफळे खातात. डोक्याने धडका मारून सु. ९ मी. पर्यंत उंचीचा व सु. ६० सेंमी.पर्यंत घेराचा वृक्ष ते जमीनदोस्त करू शकतात. वृक्षाची सालसोलून काढण्यासाठी तसेच मुळे व झुडपे खणून बाहेर काढण्यासाठी ते सुळ्यांचा वापर करतात. विशेषतः बांबू , मृदुफळे, खजूर, मका, नारळ, अलुबुखार, ऊस इ. त्यांचे आवडते अन्न आहे. ते अन्य प्राण्यांचे मांसखात नाहीत. मोठा प्रौढ वन्य हत्ती दिवसभरात १४० किग्रॅ.पर्यंत खाद्य खातो व १५० लि.पर्यंत पाणी पितो. भुकेलेला हत्ती याहून बरेच अधिक खातो व पितो. तो पाण्याशिवाय सु. ३ दिवस राहू शकतो व ते शोधण्यासाठी ८० किमी.पर्यंत प्रवास करू शकतो. हत्तीच्या खाण्यापिण्याचा परिस्थिति वैज्ञानिक प्रणालीवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होऊ शकतो. अन्नपाण्याच्या उपलब्धतेनुसार ते हंगामी स्थलांतर करतात. या काळात ते स्मृतीचा चांगला वापर करतात. त्यांनी स्थलांतरणाच्या मार्गावरील पाण्याचे स्रोत लक्षात ठेवलेले असतात. अशा स्रोताच्या छिद्रात ते सालीच्या चोथ्याचा गोळा (चेंडू) ठेवून त्यावर वाळू पसरतात. गरजेच्या वेळीवाळू व हा गोळा काढून पाणी पितात.

दुष्काळात हत्तींना नाले, ओढे, नदी यांच्या पात्रांतील पाण्याच्या जागा कळतात. तेथे ते पायाने किंवा सोंडेने १ मी. पर्यंत जमीन उकरून पाणी मिळवितात. हे पाणी इतर प्राण्यांनाही उपलब्ध होते.


भटकंती : विशेष आवाज न करता हत्ती हळू व जलदपणे चालू शकतो. कारण त्याच्या पाऊलांवर गिरद्या असतात. सामान्यपणे ते ताशी ५–१० किमी. गतीने चालतात. दूरवरच्या प्रवासात हत्तीचे कुटुंब ताशी १६ किमी. गतीने चालते. चवताळलेला वा घाबरलेला हत्ती ताशी ४० किमी. पेक्षा अधिक गतीने थोड्याच अंतरापर्यंत झपझप चालू शकतो. तो लटपटत पाय टाकीत वा ओढत चालतो. वजन व पायांची रचना यांच्यामुळे त्याला उडी मारता येत नाही व खऱ्या अर्थानेपळता येत नाही. हत्ती उत्कृष्ट पोहणारे असून ते समुद्रातील वा सरोवरातील बेटांपर्यंत पोहून गेल्याची नोंद आहे. पोहताना त्यांची सोंडपाण्याच्या वर असते.

प्रजोत्पादन : नर हत्ती १०–१४ वर्षांपर्यंत प्रौढ झाल्यावर वयात येतो परंतु बहुतेक हत्ती ३० वर्षांहून अधिक मोठे होईपर्यंत समागम करीत नाहीत. कारण अधिक वयाचे नर तरुण नरांना समागमाला प्रतिबंध करतात. त्यासाठी ते तरुण नरांच्या मागे मागे जाऊन त्यांना हाकलून लावतात. शिवाय बहुधा माद्या तरुण नरांना समागमासाठी स्वीकारत नाहीत. माद्या कुटुंबात राहतात व सरासरी १२ वर्षांच्या झाल्यावर त्या समागमास सुरुवात करतात. त्यांना पहिले पिलू १३ किंवा १४ व्या वर्षी होऊ शकते आणि पन्नास वर्षांच्या होईपर्यंत त्या दर चार वा पाच वर्षांनी एक पिलू होऊ देतात. मादीचा गर्भावधी काल २२ महिन्यांचा म्हणजे सस्तन प्राण्यांत सर्वांत दीर्घ असून प्रत्येक वेळी बहुधा तिला एक पिलू होते. कधीकधी तिला जुळेही होऊ शकते.

आफ्रिकी हत्तीच्या पिलाचे जन्मतः वजन ११६–१४५ किग्रॅ. व उंची सु. ९५ सेंमी. असते. आशियाई हत्तीच्या पिलाचे वजन जन्मतः सु. १०० किग्रॅ. व उंची सु. ८५ सेंमी. असते. जन्मल्यावर सु. एका तासाने पिलू चालू लागते. माता त्याच्याजवळ राहते व अनेक वर्षे त्याचे संरक्षण करते. सुरुवातीला मुख्यतः ते आईच्या दुधावर राहते. आपली सोंड डोक्यावर वळवून ते दूध पिते. कारण त्यामुळे त्याचे तोंड आईच्या स्तनांपर्यंत पोहोचू शकते. तीन–चार महिन्यांचे झाल्यावर ते गवत व इतर वनस्पती खाऊ लागते. दूध तुटण्याचा कालावधी दीर्घ म्हणजे त्याचे सुळे आईला टोचू लागेपर्यंत असतो. नर पिलू १२–१४ वर्षांचे होईपर्यंत आईजवळ राहते, तर मादी पिलू आई मरेपर्यंत तिच्याजवळ राहते. संपूर्ण आयुष्यभर हत्तीचे शरीर वाढत असते. याचा अर्थ हत्ती जेवढा वयानेमोठा, तेवढा तो शरीराने मोठा असतो. नरांची वाढ मादीपेक्षा अधिक होते. म्हणजे चाळीस वर्षांचा नर तेवढ्याच वयाच्या मादीपेक्षा आकारमानाने जवळजवळ दुप्पट मोठा होऊ शकतो.

नर हत्तीच्या डोक्याच्या दोन्ही बाजूंना डोळा व कान यांच्या जवळजवळ मध्यभागी गंडस्थळात एकेक टेम्पोरल ग्रंथी असते. प्रौढ नरांच्या याग्रंथी वर्षातून एकदा सुजतात व त्यांतून गडद, तेलकट, उग्र वासाचेद्रव्य स्रवते. या द्रव्याचे डाग हत्तीच्या चेहऱ्यावर पडलेले दिसतात. याग्रंथी वर्षात २–३ महिने क्रियाशील असतात. या काळात हत्ती ज्या स्थितीत असतो तिला मस्ती वा माजावर आल्याचा काळ म्हणतात. वन्य स्थितीतील २५ वर्षांहून अधिक वयाच्या प्रौढ हत्तीत बहुधा अशी स्थिती आढळते. या स्थितीत त्याचे डोळे लालबुंद होतात मनःस्थिती अगदी चमत्कारिक होते. त्याला चांगले वाईट असे तारतम्य राहत नाही. त्याच्या कामभावना उत्तेजित होतात. तो खुनशी हल्ला चढवू शकतो. अंगात वारे शिरल्याप्रमाणे तो बेफाम होतो. त्याच्यात विलक्षण ताकद येते व तो क्रूर बनतो. बंदिस्त स्थितीतील अशा बेफाम हत्तीला क्षुब्ध केल्यास तो धोकादायक बनतो. जवळ असलेली माणसे व इतर प्राण्यांवर तो हल्ला करतो. म्हणून त्याला साखळदंडाने बांधतात किंवा पिंजऱ्यात कोंडून ठेवतात.

हत्तीच्या या मस्तीचे कोडे उलगडण्यास प्राणिवैज्ञानिकांनी सुरुवात केली असून ही नियतकालिक घटना असल्याचे त्यांच्या लक्षात आले आहे. जेव्हा हत्तीच्या शरीरात टेस्टोस्टेरॉन या ⇨ हॉर्मोनाची निर्मिती सामान्य प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात होते, तेव्हा ही परिस्थिती निर्माण होते. या स्थितीचे त्याला इतर नरांपेक्षा काही फायदे होतात. तो अधिक आक्रमक झालेला असल्याने तो मादीसाठी इतर नरांशी लढू शकतो व तिचे त्यांच्यापासून रक्षणही करू शकतो. यामुळे मादी त्याच्याबरोबर समागम करायला तयार होण्याची अधिक शक्यता असते. मादी माजावर येण्याच्या म्हणजे तिच्या लैंगिक उद्दीपनाच्या काळात समागमासाठी तयार असते आणि एकावेळी हा काळ सु. चार दिवसांचा असतो.

शत्रूंपासून संरक्षण : आकारमानामुळे हत्तींचे बहुतेक इतर प्राण्यांपासून स्वाभाविकपणे संरक्षण होते. आफ्रिकेत सिंह व आशियात वाघ हत्तीच्या पिलाला मारू शकतात. मात्र अशा घटना क्वचित घडतात. हल्ला झाल्यावर हत्तीचे कुटुंबीय पिलाभोवती गोल कडे करून त्याचे संरक्षण करते. आपले कान सरळ आडवे करून व हल्ला करून हत्ती शत्रूला घाबरवून पळवून लावतात. एखाद्या प्राण्याने हत्तीवर हल्ला केल्यास तो त्याला पायदळी तुडवून मारून टाकतो.

मनुष्य हा हत्तींचा सर्वांत मोठा शत्रू आहे. वन्य हत्ती पकडण्याच्यापाच पद्धतींचे वर्णन जुन्या संस्कृत ग्रंथांत आढळते. यांतील पहिली पद्धत आर्यांनी भारतात विकसित केली होती. द्रविड लोक खेडा पद्धत वापरीत. मेळा शिकार, नेपाळमधील पिथा व कंबोडियातील लोकांची पद्धत या इतर पद्धती होत. आधुनिक काळापर्यंत हत्ती आपले गट बनवून शिकाऱ्यांपासून वरचेवर स्वतःचे संरक्षण करीत असत. मात्र, नंतरच्या काळात मनुष्य शिकारी हत्तींचे संपूर्ण कुटुंब गोळ्या घालून मारून टाकू लागला. त्याला शिकारीच्या भागात हत्तींना सहजपणे घाबरवून सोडता येऊ लागले. बंदुकीच्या बारासारख्या आकस्मिक आवाजाने हत्तींचा कळप भयभीत होतो. तो आवाजाच्या स्रोतावर हल्ला करू शकतो किंवा त्यापासून दूरच्या दिशेत सैरावैरा पळून जाऊ शकतो. भयभीत वा क्षुब्ध झालेला हत्ती कधीकधी सोंडेने मोठा कर्णकटू आवाज काढून गर्जना करतो.


वन्य हत्ती पाहण्यासाठी जगभरातून लोक आफ्रिकेत व आशियात जातात. मात्र, हस्तिदंतासाठी त्यांची मोठ्या प्रमाणावर शिकार होत असल्याने येथील हत्तींची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. हत्तींच्या नैसर्गिक अधिवासावर माणसाने शेती, उद्योग, वसाहत इत्यादींसाठी आक्रमण केल्याने त्यांच्या अधिवासाचे क्षेत्र कमी झाले आहे. शिवाय अशा मानवी हस्तक्षेपामुळे हत्ती टिकून राहण्यासाठी आवश्यक असलेली नैसर्गिक साधनसंपत्तीही पुष्कळ प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे वन्य हत्तींची संख्या टिकून राहण्यामागे काहीशी अनिश्चितता आहे. लोकसंख्येतील वाढ व अधिवास नष्ट होणे यांच्यामुळे आशियाई वन्य हत्तींची संख्याही मोठ्या प्रमाणात घटली आहे. शास्त्रज्ञांच्या आकडे-वारीनुसार आशियात फक्त पन्नास हजार हत्ती राहिले आहेत. बेकायदा शिकारीमुळे मुख्यतः आफ्रिकेतील वन्य हत्तींची संख्या खूप कमी होत आहे. १९७९ मध्ये तेथे तेरा लाख वन्य हत्ती होते तर २०१२ च्या सुमारास ही संख्या पाच लाख इतकी कमी झाली होती.

आफ्रिकेतील वन्य हत्ती वाचविण्यासाठी १९८०–९० या दशकात सामाजिक जागृतीची मोहीम आखण्यात आली होती. हस्तिदंत मिळविण्यासाठी दरवर्षी हजारो हत्ती मारले जातात, असे जाहीर करून लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. विविध वस्तूंसाठी जपानमध्ये सर्वाधिक म्हणजे जगातील निम्मे हस्तिदंत वापरले जाते. अतोनात हत्या झाल्याने आफ्रिकी व आशियाई या हत्तींच्या दोन्ही जाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत की काय, अशी भीती वाटत होती. तथापि, त्यांच्या संरक्षणाचे प्रयत्न सुरू झाल्याने त्यांची संख्या हळूहळू वाढत आहे, असे काहींचे मत आहे.

हत्तीचा आयुःकाल : हत्ती सु. ६५ वर्षे जगू शकतो. बंदिवान स्थितीत हत्ती सु. ८० किंवा अधिक वर्षे जगतात. श्रीलंकेतील हत्ती १७० वर्षे जगल्याची नोंद सापडते. प्रिन्सेस ॲलिस या हत्तीणीचा मेलबर्न येथे एकशे बावनव्या वर्षी मृत्यू झाल्याचा उल्लेख आढळतो. अवर्षणात किंवा रोग होऊन हत्तीचा मृत्यू झाला नाही अथवा मनुष्याने त्याची शिकारकेली नाही, तर त्याच्या मृत्यूचे कारण बहुधा त्याच्या दाढांचा शेवटचा म्हणजे सहावा संच झिजून नष्ट होणे हे असते. कारण हा संच नष्ट झाला की, त्याची उपासमार व त्यामुळे कुपोषण होऊन तो मृत्युपंथाला लागतो. वयस्कर हत्ती मरण्यासाठी विशिष्ट ठिकाणी जातात, अशी एक श्रद्धा वा समज आहे. या ठिकाणाला ‘हत्तींचे स्मशान’ म्हणतात. अर्थात या श्रद्धेला कोणताही पुरावा वा आधार नाही. आजारी किंवा वयस्कर हत्ती आपल्या आवाक्यातील अंतराच्या पल्ल्यापर्यंत जाण्यास प्रवृत्त होतात. अशा ठिकाणी सावली, पाणी व मऊ वनश्री असते. अशा ठिकाणी अनेक हत्तींची हाडे आढळली आहेत. एका मतानुसार हत्तीला मरण जवळ आल्याचे समजते व तो ठराविक ठिकाणी जाऊन मरतो अशीही समजूत आहे; मात्र, ही खरी वस्तुस्थिती नाही. वयस्क वा आजारी असा दुर्बल हत्ती शक्यतो पाणथळ जागेजवळ राहू लागतो. तेथे मृत हत्तींची हाडे पावसाळ्यात पाण्याबरोबर वाहून जातात. तसेच हाडांना असलेल्या विशेष प्रकारच्या गोडीमुळे किडे ती खाऊन टाकतात, शिवाय शिल्लक राहीलेली हाडे तरस, गिधाडे, कोल्हे इ. पशू खाऊन टाकतात. यामुळे हत्तीची हाडे सापडत नाहीत. म्हणून हत्ती ठराविक व गुप्त ठिकाणी मरतात, अशी श्रद्धा निर्माण झाली असावी, असे मानतात.

हत्तीचे महत्त्व : वन्य हत्ती अनेक महत्त्वाची नैसर्गिक कामे करतात. वृक्ष व इतर वनस्पतींवर उदरनिर्वाह करून हत्ती घनदाट जंगलांच्या क्षेत्राचे कमी जंगल असलेल्या क्षेत्रात परिवर्तन करण्यास मदत करतात. अशा अधिवासांत अनेक प्रकारचे जीव (प्राणी) जगू शकतात. कोरड्या पडलेल्या पात्रांतील पाण्याच्या शोधासाठी हत्तींची मदत होते व हे पाणीइतर जीवांना उपलब्ध होते. हत्तींच्या वनक्षेत्रातील प्रवासामुळे हरिणे, झीब्रा इ. प्राण्यांसाठी वाटा तयार होतात.

हत्ती अतिशय शक्तिमान व बुद्धिमान प्राणी असून माणसाने त्यांना हजारो वर्षांपूर्वीपासून माणसाळविले आहे व प्रशिक्षण दिले आहे. आशिया खंडातील अनेक देशांतील लाकूड उद्योगात व अवजड सामानाच्या वाहतुकीसाठी हत्ती वापरतात. सर्कस, प्राणिसंग्रहालये येथील हत्ती पाहून माणसाचे मनोरंजन होते. सर्कशीमध्ये प्रशिक्षित हत्ती नाचणे, स्टुलावर बसणे व सायकल चालविणे यांसारख्या कसरती करून असे मनोरंजन करतात.

सत्ता व डामडौल यांचे प्रतीक म्हणून हत्ती पाळत असत. इ. स. पू. तिसऱ्या शतकात भारतात हत्ती माणसाळविले होते. मोहें-जो-दडो संस्कृतीच्या काळात झूल घातलेल्या हत्तींच्या संगमरवरी प्रतिमा होत्या. तेव्हाचे माहूत कुशल कर्मचारी होते. ते हत्तीच्या सर्व गरजा पुरवीत व काही हत्तींना प्रशिक्षण देत असत. भारतात सैन्यदलातही हत्तींचा पूर्वापार वापर केला जात होता. तसेच स्वतंत्र गजदलही असे.

इ. स. पू. ३३१ मध्ये अलेक्झांडर द ग्रेट यांच्या नेतृत्वाखालील मॅसिडोनियन सैन्याने हत्तीवर सवार झालेल्या सैन्याचा पाडाव केला होता. इ. स. पू. २१८ मध्ये कार्थेजचे सेनाधिकारी हॅनिबल यांनी आल्प्स पर्वत ओलांडून इटलीवर आक्रमण करताना हत्ती वापरले होते. एकोणिसाव्या शतकात बेल्जियमाचे राजे लिओपोल्ड दुसरे यांनी बेल्जियम काँगोत हत्तींना प्रशिक्षण देण्याचे कार्य सुरू केले होते. आफ्रिकेतील राष्ट्रीय उद्यानांत प्रवाशांना फिरवून आणण्यासाठी हत्ती वापरतात.

लंडन झू या प्राणिसंग्रहालयात जम्बो नावाचा हत्ती १७ वर्षे होता. त्याला पाहण्यासाठी जगभरातून लोक येत असत. बंदिवान स्थितीतील त्या काळातील तो सर्वांत मोठा हत्ती होता. त्यामुळे अतिशय मोठ्या वस्तूसाठी जम्बो हे विशेषण प्रचलित झाले. नंतर हा हत्ती एका अमेरिकन सर्कशीतील सर्वाधिक लक्षवेधक प्राणी ठरला.

हत्तीविषयी बऱ्याच आख्यायिका व दंतकथा आहेत. भारतीय संस्कृतीत हत्तीला महत्त्व दिले जाते. वैदिक काळापासून धार्मिक ग्रंथ व पुराणकथा यांत हत्तीचा उल्लेख आहे. हिंदू व बौद्ध धर्मांत हत्ती पवित्र मानतात. हिंदू धर्मातील प्रमुख देवता ‘गणपती ‘चे शीर्ष हत्तीच्या रूपातील आहे. ऋग्वेदात हत्तीसाठी हस्तिन् (हात असलेला) असा शब्द वापरला आहे. राजाचे वाहन म्हणून त्याला पूर्वी मान दिला जाई. महोत्सवी मिरवणुकींतही हत्तीला महत्त्वाचे स्थान असते.

हत्तीच्या अनेक जाती मानल्या जात असत. सर्वोत्तम हत्तीला कुमेरिया म्हणतात. मृग ही दुसरी जाती असून या दोन्हीमधील एका जातीचे नाव द्वासाला आहे. आसाममधील आहोत जातीच्या लोकांनी हत्तीपुथी या ग्रंथात मनुष्य व हत्ती यांच्या स्वभावांत तुलना करून जाती पाडल्या आहेत.

हत्तीच्या गंडस्थळात मोती असून ते ज्याला मिळतात तो अत्यंत भाग्यवान असतो, अशी दंतकथा आहे. जिभेवरील डाग, सोळापेक्षा कमी नखे, जमिनीवर लोळणारी वा अगदी आखूड शेपटी वा सोंड ही हत्तीची अशुभ लक्षणे मानली आहेत तर घड्या पडणारी व सहजहातात येणारी त्वचा, भव्य गंडस्थळ, डोक्यावरील केस ही त्याची शुभ लक्षणे मानतात. हत्तीची अशी लक्षणे पाहून हत्तीची विक्री होत असे.


क्रमविकास : हत्ती सु. सहा कोटी वर्षांपूर्वी प्रथम पृथ्वीवर हिंडू लागले असे मानतात. ईजिप्तमध्ये अगदी अलीकडे मोइरिथेरियम नावाच्या हत्तींचे सांगाडे सापडले आहेत. अस्तित्वात असणाऱ्या हत्तींशी या हत्तींचे कोणतेच साम्य नव्हते. तेव्हा मोइरिथेरियमाची उंची दोन फूट होती व त्याला सोंड नव्हतीच. त्याच्या कवटीच्या व दातांच्या ठेवणीवरून हत्ती त्याच्यापासून उत्क्रांत झाला असावा, असा तज्ञांचा तर्क आहे. अस्तित्वात असलेल्या व नष्ट झालेल्या हत्तींच्या एकूण ३५० जाती होत्या. मोइरिथेरियम हत्ती ऑलिगोसीन (सु. ३.५ ते २ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळातही होता. याच काळात त्यातील फिओमिया आणि पॅलिओमॅस्टेडॉन या दोन जाती ईजिप्तमध्ये अस्तित्वात होत्या. या दोन्ही जाती मोइरिथेरियमापेक्षा आकारमानाने बऱ्याच मोठ्या होत्या. त्यांच्या वरच्या व खालच्या जबड्यांत सुळे होते. विशेषतः फिओमिया जातीमध्ये खालचा ओठ जास्त लांब होता.

मायोसीन काळाच्या सुरुवातीस (सु. २.५ कोटी वर्षांपूर्वी) हत्तीचे वंशज आफ्रिकेतून यूरोप, आशिया व अमेरिकेत पसरले. हेच पुढे ⇨ मॅस्टोडॉन म्हणून प्रसिद्धीला आले. त्यांची उत्पत्ती फिओमिया पॅलिओमॅस्टोडॉन यांच्यापासून झाली असावी. डायनोथेरस ही मात्र वेगळी जाती होती. तिची उत्पत्ती केव्हा झाली, हे निश्चित सांगता येत नाही. ते आकारमानाने खूप मोठे व हत्तीशी त्यांचे बरेच साधर्म्य होते. मात्र, हत्तीच्या जातीतील प्रोबॉसिडियनांसारखी (शुंडाधारींसारखी) त्यांना सोंड नव्हती. डायनोथेरसाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे खालच्या जबड्यातील सुळे बाहेर येऊन त्यांची टोके मागे वळलेली असत. दोन कोटी वर्षे आकारमानात वाढ होण्याखेरीज त्यांच्यात कोणताच बदल झाला नव्हता.

मॅस्टोडॉनांच्या संख्येत मायोसीन, प्लायोसीन तसेच प्लाइस्टोसीन (सु. २ कोटी ते ६ लाख वर्षांपूर्वीच्या) काळातही चांगलीच वाढ झाली होती. यांची उत्पत्ती बहुधा फिओमिया सारख्या पूर्वजांपासून झाली असावी. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा खालचा ओठ फावड्यासारखा रुंद व लांब होता, म्हणून त्यांना इंग्रजीत शव्हेल् टस्कर म्हणत. त्यांच्या दोन्ही जबड्यांत सुळे असत. शरीराची ठेवण बरीचशी हत्तीसारखी होती. मॅस्टोडॉनाला सोंड बहुतेक मायोसीन काळात आली असावी. मॅस्टोडॉनाच्या दुसऱ्या एका प्रकारात (वा जातीत) व हत्तींत खूपच साधर्म्य होते. त्यांचा खालचा ओठ आखूड होता. त्यांची उत्पत्ती पॅलिओमॅस्टोडॉनापासून झाली असावी. अमेरिकेतील मॅस्टोडॉन काही हजार वर्षांपूर्वी नष्ट झाले तोपर्यंत कित्येक दशलक्ष वर्षे त्यांच्यात बदल झाला नाही.

खरे हत्ती (यात मॅमथही येतात) हे शुंडाधारींपैकी शेवटचे होत. अगदी पुराण महाकल्पकाळातील [→ पुराण महाकल्प व गण] हत्तींचे सांगाडे भारतात प्लायोसीन (सु. १.२ कोटी ते ६ लाख वर्षांपूर्वीच्या) काळातील खडकांत आढळले. ते सु. १ कोटी वर्षांपूर्वी होऊन गेल्याचे मानतात. हत्ती व मॅस्टोडॉन यांच्यामधील मुख्य फरक म्हणजे हत्तीचे डोके उंच, खालचा ओठ लहान, सुळे नसलेला जबडा व दातांची रचना हे होत. मॅस्टोडॉनांच्या दातांच्या रचनेत विविधता होती व प्रत्येक जबड्यात बरेच दात होते. तसेच मोठ्या दाढांवर एनॅमलाचे कठीण वेष्टन असे आणि प्रत्येक दाढेमध्ये सिमेंटसारखा कठीण पदार्थ असे. फार पूर्वीचे हत्ती सोडल्यास हत्तींच्या जबड्यांत वर दोन व खाली दोन असे फक्त चार दात आढळतात.

खरे हत्ती मॅस्टोडॉनापासून उत्पन्न झाले नाहीत. त्यांची उत्पत्ती कोणापासून झाली हे निश्चित समजलेले नाही. माहीत असलेल्या पूर्वीच्या हत्तीचे नाव स्टेगोडॉन असून त्याचे दोन प्रकार आहेत. त्यांपैकी एक आफ्रिकेत आहे, तर दुसरा आशियातील मॅमथ हा आहे.

मॅमथाच्या अनेक जातींचे आशियातील हत्तींशी बरेच साधर्म्य आहे. यांपैकी प्लाइस्टोसीन (सु. ६ लाख ते ११ हजार वर्षांपूर्वीच्या) हिमयुगातील केसाळ मॅमथांची बरीच माहिती उपलब्ध झाली आहे. जुन्या लेण्यांमध्ये केसाळ मॅमथांच्या आकृत्या कोरलेल्या आढळतात. त्यांची हाडे व संपूर्ण प्राणीच बर्फाच्या थरांखाली जसेच्या तसे सुरक्षित राहिलेले सायबीरियात सापडले आहेत.

केसाळ मॅमथांचे शरीर लांब केसांनी आच्छादिलेले असे. त्यामुळे तेथंड प्रदेशात राहू शकले. पूर्ण वयात आलेल्या मॅमथाचे सुळे अतिप्रचंड होते. टोकांशी ते एकत्र आल्याने सुळ्यांचे एक मोठे वर्तुळच तयार होई. बर्फ उकरण्याखेरीज सुळ्यांचा दुसरा कोणताही उपयोग होत नसावा. [→ मॅमथ; मॅस्टोडॉन]. (चित्रपत्र).

पहा : प्राणि; मॅमथ; मॅस्टोडॉन; सर्कस; स्तनी वर्ग; हस्तिदंत.

संदर्भ : 1. Ammann, K. Peterson, D. Elephant Reflections, 2009.

2. Denis-Huot, Christine and Michel, The Art of Being an  Elephant, 2003.

3. Joubert, Beverly and Dereck, Face to Face with Elephants, 2008.

4. Meredith, M. Elephant Destiny : Biography of an Endangered Species, 2003.

5. O’Connell, C. The Elephant’s Secret Sense : The Hidden Life of the Wild Herds of Africa, 2007.

6. Schlaepfer, G. G. Elephants, 2003.

ठाकूर, अ. ना.


आफ्रिकी हत्तीचे पिलू आशियाई हत्तीचे पिलू
आफ्रिकी हत्तीचे पिलासह जोडपे आशियाई हत्तीचे पिलासह जोडपे
आफ्रिकी हत्तींचा कळप आशियाई हत्तींचा कळप
आफ्रिकी हत्तीची भव्यता ( लोक्झोडोंटा आफ्रिकाना)  आशियाई हत्ती (एलिकस मॅक्झिमस)