उडणारे मासे : एक्झॉसीटिडी आणि डॅक्टिलॉप्टेरिडी या मत्स्यकुलांतील मासे उडणारे आहेत. यांशिवाय गोड्या पाण्यात राहणारे दक्षिण अमेरिकेतील गॅस्टरोपेलेसिडी कुलातले काही आणि आफ्रिकेच्या उष्ण प्रदेशात आढळणारे पँटोडोटिडी कुलातले काही मासे उडणारे आहेत. एक्झॉसीटिडी कुलातले सु. ५० जातींचे मासे उडणारे आहेत.

उडणारे मासे (एक्झॉसीटस)

एक्झॉसीटिडी कुलातले मासे उष्णकटिबंधातील समुद्रांत राहणारे असून १५–४५ सेंमी. लांब असतात. हे वेलापवर्ती (किनाऱ्यापासून दूर उघड्या समुद्रात राहणारे) असून समुद्रपृष्ठाजवळ यांचे थवे असतात. झिंगे, माशांची अंडी, लहान मासे आणि प्राणिप्लवक (समुद्रपृष्ठाजवळ तरंगणारे प्राणी) हे यांचे भक्ष्य होय. या माशांची पाठ निळीकाळी किंवा हिरवट रंगाची आणि खालची बाजू रुपेरी असते. मुख वर वळलेले असते डोळे फार मोठे असतात; ⇨ वाताशय  मोठा असतो आणि पुच्छ-पक्षाचा खालचा खंड वरच्या खंडापेक्षा मोठा व लांब असतो. एक्झॉसीटस  वंशाच्या जातीत फक्त अंस-पक्षच (छातीच्या भागावर असलेले पर म्हणजे त्वचेच्या स्‍नायुमय घड्या) उडण्याकरिता मोठे व पारदर्शक झालेले असतात, पण सिप्सिल्यूरस वंशाच्या जातीत अंस-पक्ष आणि श्रोणि-पक्ष (ढुंगणावरील पर) हे दोन्हीही मोठे असल्यामुळे उडण्याच्या बाबतीत त्या जास्त कार्यक्षम असतात. सिप्सिल्यूरस वंशातील त्याचप्रमाणे इतर वंशांतील काही जाती आपली अंडी (ही पाण्यापेक्षा जड असतात) घरट्यात घालतात, हे घरटे तरंगणार्‍या समुद्रवेली पांढर्‍या चिकट धाग्यांनी एके ठिकाणी बांधून बनविलेले असते. सरगॅसो समुद्र हे या माशांचे आवडते जनन-क्षेत्र आहे.

या माशांना उडावयाचे असले म्हणजे ते पोहण्याचा वेग अतिशय वाढवितात आणि उसळी घेऊन शरीर पाण्याच्या पृष्ठाबाहेर काढतात आणि अंस-पक्ष पसरतात; पुच्छ-पक्षाचा खालचा खंड पाण्यात असतो आणि त्याने दोन्ही बाजूंना पाण्यात जोराचे फटकारे मारून नागमोडी मार्गाने ते वेगाने पुढे जातात आणि पुरेसा जोर मिळाल्यावर ते पूर्णपणे हवेत शिरतात. काही जातींचे उडणारे मासे समुद्रपृष्ठाशी स्पष्ट कोन करून अतिशय वेगाने पोहत जाऊन लाटेच्या माथ्यावरून उसळी मारून हवेत शिरतात आणि आपले अंस-पक्ष व श्रोणि-पक्ष पसरतात. हवेत शिरून पक्ष पसरल्यावर हवेतील प्रवाहांचा फायदा घेऊन विसर्पणाने (हवेतून घसरत जाऊन) ते सु. ४०० मी. दूर जाऊ शकतात. पंख (पक्ष) खालीवर हालविण्याची जरूर नसते. माशांचे उडणे पक्षांच्या उड्डाणासारखे नसते. ते विसर्पण किंवा विडयन (हवेत झेपावणे) यांच्या स्वरूपाचे असते. मोठ्या हिंस्र प्राण्यांच्या तावडीतून सुटणे हा या माशांच्या उडण्याचा उद्देश असावा असे दिसते.

एक्झॉसीटस आणि सिप्सिल्यूरस यांच्या काही जाती भारताच्या पूर्व किनाऱ्याजवळ आढळतात. यांचे मांस रुचकर असल्यामुळे तेथे पुष्कळ ठिकाणी ते पकडतात.

कर्वे, ज. नी.