कॅसोवेरी : कॅझुॲरिडी पक्षिकुलातील कॅझुॲरियस वंशाचा एक मोठा पण एमू व शहामृगापेक्षा लहान, न उडणारा पक्षी. हा न्यू गिनी, आरु, सेराम या बेटांत आणि उत्तर क्वीन्सलॅंडमध्ये आढळतो. कॅझुॲरियस वंशात सहा जाती असून त्यांतील सामान्य जातीचे शास्त्रीय नाव कॅझुॲरियस कॅझुॲरियस हे आहे.

सामान्य कॅसोवेरी धडधाकट आणि मजबूत असून उंची सु. १५० सेंमी. असते. नरापेक्षा मादी मोठी असते.कॅसोवेरी शरीरावर केसांसारखी, लांब, काळी, दुहेरी पिसे असतात. मान आणि डोक्यावर पिसे नसतात. डोक्यावर उभे, चपटे, अस्थिमय शिरस्त्राण चोच आखूड व मजबूत मान गडद निळ्या रंगाची तिच्यावर नारिंगी रंगाचा मोठा ठिपका गळ्यावरून लाल रंगाच्या मांसल गलूली लोंबत असतात. पंख अल्पवर्धित (अगदी थोडी वाढ झालेले ) असून त्यांच्यावर काट्यांसारखे पोकळ पिच्छाक्ष ( पिसांचे अक्ष किंवा कणे) असतात. शिरस्त्राण आणि पिसारा यांच्या साहाय्याने काटेरी झुडपांच्या दाट जाळ्यांमधून हा सहज हालचाल करू शकतो. पाय अतिशय मजबूत असून त्यांवरील तीन बोटांपैकी आतल्या बोटावर लांब अणकुचीदार नखर (नखी) असतो. गळून पडलेली सर्व प्रकारची रानफळे, कीटक आणि लहान प्राणी हा खातो. ह्यांचा आवाज दुमदुमणारा असतो.

ह्यांच्या प्रजोत्पादनाचा काळ जुलै–सप्टेंबर असतो. मादी जंगलात जमिनीवर पानांचे घरटे बांधून त्यात हिरव्या रंगाची ३–६ अंडी घालते. अंडी उबविण्याचे व पिल्लांची जोपासना करण्याचे काम नर करतो.

हा पक्षी माणसाच्या अंगावर उडी घेऊन आपल्या नखरांनी त्याला भोसकून सहज ठार मारू शकतो.

जमदाडे, ज. वि.