ॲगुटी : हा कृंतक (भक्ष्य कुरतडणारा) प्राणी दक्षिण आणि मध्य अमेरिका आणि वेस्ट इंडीज या प्रदेशांतील अरण्यांत आढळतो. हा प्राणी अर्धवट दिनचर आहे. तो काहीसा सशासारखा दिसतो, परंतु ⇨गिनीपिग  आणि ⇨साळ हे याचे अगदी जवळचे नातेवाईक आहेत. याची लांबी सु. ४०–५० सेंमी. असते. पुढच्या पायांवर खुरांसारखे नखर (नख्या) असलेली पाच आणि मागच्या पायांवर तीन बोटे असतात. शेपूट जवळजवळ नसतेच.

ॲगुटी

शरीरावरील केस साधारण तपकिरी  रंगाचे असतात आणि विशेषत: ढुंगणावर ते लांब व विपुल असतात. हा प्राणी झाडाच्या ढोलीत किंवा पोकळ ओंडक्यात राहतो. हिरव्या वनस्पतींची मुळे, खोडे, पाने, फुले व फळे हे याचे खाद्य होय. हे प्राणी उसाचा फार नाश करतात. ॲगुटी अतिशय चपळ आहे. शत्रूंनी पाठलाग केला तर अतिशय वेगाने तो पळून जातो किंवा आपल्या ढोलीत लपून बसतो. मादी वर्षातून दोनदा विते आणि प्रत्येक खेपेला तिला दोन, कधीकधी तीन पिल्ले होतात.

ॲगुटीच्या निरनिराळ्या जातींमध्ये प्रामुख्याने शरीराचे दोन रंग आढळतात. काही तांबूस रंगाच्या तर काही करड्या रंगाच्या असतात.

                                कर्वे, ज. नी.