स्टर्जन मासा : एसिपेन्सरिफॉर्मीस गणाच्या एसिपेन्सरिडी या कुलातील कोणताही मासा. या कुलात सु. २५ जाती असून त्यांचा आढळ उत्तर गोलार्धातील समशीतोष्ण कटिबंधातील समुद्रात आहे. स्टर्जन माशाचे शरीर दोन्ही बाजूंनी चपटे असून आकार साधारणतः लांबट व दोन्ही टोकांस निमुळता असतो. शरीराचे डोके, धड व शेपटी असे तीन भाग पडतात. त्याच्या डोक्यावर व शरीरावर अस्थिपट्टाच्या पाच रांगा ( ओळी ) असतात. त्यांपैकी एक रांग शरीराच्या वरच्या बाजूवर, दोन दोन्ही बाजूंना व दोन खालच्या बाजूंना असतात. प्रौढ माशाच्या तोंडात दात नसून मुस्कटाच्या आतील बाजूस चार संवेदनक्षम व स्पर्शग्राही स्पृशा असतात. स्पृशांचा उपयोग त्याला समुद्राच्या तळातील अपृष्ठवंशीय ( पाठीचा कणा नसलेले ) मृदुकाय प्राणी, लहान मासे व इतर अन्न शोधण्यासाठी होतो. या माशाचा पुच्छपक्ष असममित असून वरील खंड ( पाली ) खालील खंडापेक्षा मोठा असतो. फुप्फुसासारखा वाताशय नसणे हे या अस्थिमत्स्याचे वैशिष्ट्य आहे. त्याचा सांगाडा मुख्यतः उपास्थींचा बनलेला असतो.

स्टर्जन मासा (एसिपेन्सर स्टुरिओ )

स्टर्जन मासे युक्रेन व दक्षिण रशियामधील नद्या आणि उत्तर अमेरिकेतील गोड्या पाण्यात पुष्कळ प्रमाणात आढळतात. काही जाती वगळता सर्व समुद्रात राहतात आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला त्या समुद्रातून नदी व गोड्या पाण्याच्या नद्यांकडे प्रजोत्पादनाकरिता ( काही अनेक वर्षांत एकदा ) स्थलांतरित होतात. काही जाती ताज्या पाण्यापुरत्याच सीमित राहतात. मादी गोड्या पाण्यात एकावेळी अनेक दशलक्ष अंडी घालते.

मांस, अंडी व वाताशय यांसाठी स्टर्जन मासे प्रसिद्ध आहेत. त्यांचे ताजे मांस विकतात. मादीने पाण्यात घातलेली ताजी अंडी व ताज्या कापलेल्या मादीपासून मिळालेल्या अंड्यांपासून लोणचे ( कॅव्हिअर ) तयार करतात. त्यांच्या पोटातील वाताशयाचा ( हवेच्या पिशव्यांचा ) उपयोग आयसिंग्लास ( जिलेटिनाचे अतिशय शुद्ध स्वरूप  ) तयार करण्यासाठी करतात. त्याचा वापर कारखान्यांत अनेक कामांसाठी होतो.

जुन्या जगातील ( आफ्रिका व आशिया खंड ) सामान्य स्टर्जन (एसिपेन्सर स्टुरिओ ) ही जाती उत्तर अटलांटिक समुद्राचे किनारे ( स्कँडिनेव्हिया ) व भूमध्य सामुद्रिक प्रदेश येथे आढळते. हिची लांबी सु. ३ मी. असून वजन सु. २२७ किग्रॅ.पर्यंत असते.  मोठ्या प्रमाणावर मासेमारी, अंड्यांचा वापर व प्रदूषण यांमुळे ही जाती दुर्मिळ होत चालली आहे.

ए. गुल्डेनस्टॅटी ही रशियातील नद्यांत व बैकल सरोवरात आढळणारी खूप महत्त्वाची जाती असून तिची लांबी सामान्य स्टर्जनाएवढीच असते. ती प्रामुख्याने काळा समुद्र व कॅस्पियन समुद्र यांत आणि त्यांना मिळणार्‍या नद्यांत आढळते.

ए. स्टेलॅटस या जातीमध्ये मुस्कट लांब व टोकदार असते. हिचा आढळ काळा समुद्र, कॅस्पियन समुद्र यांत आणि ॲझोव्ह समुद्रात आहे. ही जाती मांस, अंडी व वाताशय यांसाठी खूप महत्त्वाची आहे.

हूसो हूसो (ए. हूसो ) या जातीतील मासे इतर जातीतील स्टर्जन माशांपेक्षा आकारमानाने मोठे म्हणजेच सु. ७.५ मी. लांब असून वजन सु. १,३०० किग्रॅ.पर्यंत असते; परंतु त्यांचे मांस व अंडी इतर जातींपेक्षा कमी प्रतीची असतात. त्यांचा आढळ काळा समुद्र, कॅस्पियन समुद्र आणि ॲझोव्ह समुद्र यांत आहे. ते एड्रिॲटिक समुद्रात कमी प्रमाणात आढळतात.

ए. रुथेनस या जातीतील मासे इतर जातीतील स्टर्जन माशांपेक्षा आकारमानाने लहान असून लांबी सु. ०.९ मी. असते. त्याच्या मांसाचा उपयोग खाण्यासाठी करतात. हिचा आढळ काळा समुद्र व कॅस्पियन समुद्र यांत आहे. स्टर्जन माशाच्या इतर जाती रॉक किंवा लेक स्टर्जन (ए. फुलव्हेसेन्स, वजन सु. ९० किग्रॅ.), ओरेगॉन किंवा सॅक्रामेंटो (ए. ट्रान्समाँटॅनस , वजन सु. ८२० किग्रॅ.) या आहेत.

      जमदाडे, ज. वि.; मगर, सुरेखा अ.

स्टर्जन मासा (एसिपेन्सर स्टुरिओ)