सिलिओफोरा : प्रोटोझोआ (आदिजीव) प्राणिसंघातील ⇨ पक्ष्माभिकां च्या साहाय्याने हालचाल करणाऱ्या प्राण्यांचा एक वर्ग. नवीन वर्गीकरणात यास उपसंघाचा दर्जा देण्यात आला आहे. या उपसंघात सु. ८,००० जातींचा समावेश केलेला आहे. हे प्राणी खाऱ्या, गोड्या आणि खाडीच्या पाण्यात राहतात. यातील पॅरामिशियम व व्हॉर्टिसेला हे प्राणी प्रसिद्घ आहेत.

सिलिओफोरा प्राण्यांची वैशिष्ट्ये : या प्राण्यांची शरीरे एका कोशिकेपासून बनलेली असतात, त्यांना विशिष्ट आकार असतो. शरीराच्या बाह्य आवरणास तनुच्छद म्हणतात. तनुच्छद लवचिक असून त्यावर पक्ष्माभिका असतात. पक्ष्माभिकांची संख्या व स्थान निरनिराळ्या जातींत वेगवेगळे असते. ते बहिर्द्रव्यापासून तयार झालेले असतात. पॅरामिशियमामध्ये १०,०००—१४,००० तर प्रोटोडॉनामध्ये सु.११,६०० पक्ष्माभिका असतात. पक्ष्माभिकांमुळे या प्राण्यांच्या चलनवलनास मदत होते. त्यांच्या गोलाकार हालचालींमुळे हे प्राणी मागे-पुढे असे पोहत असतात. कोशिका-मुखाभोवती असणाऱ्या पक्ष्माभिका अन्नकण मुखाकडे पाठवितात. पॅरामिशियमामध्ये कोशिका-मुख कायमस्वरुपी उघडे असते. लहान अन्नकण कोशिका-मुखातून कोशिका-ग्रसनीत जाताना त्याचे रुपांतर अन्नाच्या छोट्या गोळ्यांमध्ये होते व शेवटी अन्नरिक्तिका तयार होतात. डिडिनियम कोलेप्स या प्राण्यांमध्ये अन्न ग्रहण करण्याच्या वेळी कोशिकामुख उघडते. पाण्यातील सूक्ष्मजीव व सूक्ष्मकण हे या प्राण्यांचे अन्न आहे. अन्नरिक्तिकेतील अन्नाचे पचन पचनस्रावाच्या साहाय्याने होते. गुदद्वार कायमस्वरुपी किंवा तात्पुरते छिद्र असते. पचन न झालेले अन्न व टाकाऊ पदार्थ गुदद्वारातून शरीराबाहेर टाकले जातात. कोशिकाद्रव्यात लघुकेंद्रक व बृहत्-केंद्रक अशी दोन केंद्रके असतात. बृहत्-केंद्रक शरीरांतर्गत क्रियांचे तर लघुकेंद्रक प्रजोत्पादन क्रियेचे नियंत्रण करते. कोशिकाद्रव्यात अन्नरिक्तिका व कोशिकेच्या एका बाजूस एक मोठी संकोचशील रिक्तिका असते. एक किंवा अनेक संकोचशील रिक्तिका विशेषतः गोड्या पाण्यातील प्राण्यांत असतात. सिलिओफोरा प्राण्यांमध्ये अलैंगिक प्रजनन मुकुलनाने (शरीरावर अंकुरासारखे बारीक उंचवटे येऊन त्यांपासून नवीन प्राणी तयार होण्याच्या क्रियेने) व अनुदैर्घ्य (लांबीच्या दिशेतील) द्विभाजन पद्घतींनी होते. मुकुलन पद्घतीत कोशिका-ग्रसनीपासून मुकुलनाने एक नवीन ग्रसनी तयार होते आणि नंतर एका संकोचनाने प्राण्याच्या शरीराचे दोन आडवे तुकडे पडतात. अनुदैर्घ्य द्विभाजन पद्घतीत प्राण्याच्या शरीराचे वरील भागापासून शेवटच्या टोकापर्यंत लांबीच्या दिशेत विभाजन होते. लघुकेंद्रक व बृहत्-केंद्रकाचे विभाजन होऊन दोन जीव तयार होतात. लैंगिक प्रजनन संयुग्मन व स्वयंयुग्मन पद्घतींनी होते. संयुग्मन पद्घतीमध्ये दोन प्राण्यांतील केंद्रकांचे एकत्रीकरण होते व त्यापासून पुन्हा लघुकेंद्रक व बृहत्-केंद्रक तयार होतात. स्वयंयुग्मन पद्घतीमध्ये प्राण्यातील लघुकेंद्रक व बृहत्-केंद्रकातील द्रव्याचे एकत्रीकरण होते. त्यापासून पुन्हा लघुकेंद्रक व बृहत्-केंद्रक तयार होतात. पॅरामिशियमामध्ये लैंगिक प्रजनन संयुग्मन व स्वयंयुग्मन या दोन्ही पद्घतींनी होते.

पॅरामिशियम हे पादत्राणाच्या तळव्याच्या आकाराचे, ०·२-०·३ मिमी. लांबीचे व मुक्त संचार करणारे गोड्या पाण्यातील प्राणी आहेत. त्यांच्या सु. १० प्रजाती आढळतात. या वर्गातील प्राण्यांची लक्षणे व वसतिस्थाने वेगवेगळी असतात. व्हॉर्टिसेला या प्राण्याला देठासारखा भाग असून त्याच्या साहाय्याने ते पाण्यातील पाने, दगड इत्यादींना चिकटून राहतात. हे प्राणी एकेकटे अगर समूहाने राहतात.

बॅलँटिडियम कोलाय हा परजीवी प्राणी माकड, डुक्कर व मानवाच्या आतड्यांत आढळतो. बऱ्याच वेळा पुटीद्वारे तो मानवाच्या शरीरात प्रवेश करतो. या परजीवीमुळे मानवास आतड्याचा व्रण (अल्सर) व हगवण (डिसेंट्री) यांसारखे आजार होतात. इक्थिओफ्थिरियस मल्टीफिलीस या परजीवी प्राण्यामुळे माशांना कातडीचे रोग होतात. या प्राण्यांमुळे विशेषतः गोड्या पाण्यातील माशांना क्लोमाबाबतचे रोग होतात.

सिलिओफोरा प्राण्यांच्या कोशिकेवरील असंख्य पक्ष्माभिका, त्यांच्या साहाय्याने चलनाची पात्रता, कोशिकेतील लघु व बृहत्-केंद्रके, संकोचशील रिक्तिका व अपूर्ण अन्ननलिका या लक्षणांमुळे या प्राण्यांना प्रोटोझोआ प्राणिसंघात उच्च स्थान मिळाले आहे.

पहा : पॅरामिशियम प्रोटोझोआ व्हॉर्टिसेला सिलिएटा.

जाधव, संदीप ह. पाटील, चंद्रकांत प.