जरबिल : कृंतक गणातील (कुरतडणाऱ्या प्राण्यांच्या गणातील) क्रिसेटिडी कुलातील जरबिलीनी या उपकुलातला हा प्राणी आहे. जरबिलीनी या उपकुलात १२ वंश असून त्यांतील सर्व प्राण्यांना जरबिल म्हणतात. जरबिलांच्या सु. १०६ जाती आहेत. आशिया व आफ्रिका खंडांच्या उष्ण व शुष्क प्रदेशांत जरबिल आढळतात. वालुकामय जमिनीत राहणे त्यांना जास्त आवडते. उघडा सपाट प्रदेश, गवताळ राने व अतिशय निर्जल वाळवंटे यांतही ते राहतात. त्यांचे मागचे पाय पुढच्या पायांपेक्षा जास्त लांब असल्यामुळे ते उड्या मारतात. ते झाडांवर किंवा इतर उंच जागी केव्हाही चढत नाहीत. त्यांच्या शरीरावर फिक्कट रंगाचे मऊ रेशमी केस असतात. बहुतेक जातींच्या शेपटीवर केस असून तिच्या टोकावर लहान किंवा मोठा केसांचा गोंडा असतो. यांच्यात संघवृत्ती असल्यामुळे यांची बिळे जवळजवळ असतात.

भारतात जरबिलांच्या कित्येक जाती आहेत त्या बहुधा वाळवंटी प्रदेशात आढळतात. यांपैकी दोन-भारतीय जरबिल व भारतीय वाळवंटी जरबिल-सार्वत्रिक आहेत. भारतीय जरबिल टॅटेरा वंशाचा असून त्याचे शास्त्रीय नाव टॅटेरा इंडिका आहे. भारतीय वाळवंटी जरबिल मेरिओनीस वंशाचा असून त्याचे शास्त्रीय नाव मेरिओनीस हुरिॲनी आहे. दोहोंपैकी भारतीय जरबिल मोठा आहे.

आ. १. भारतीय जरबिल (टॅटेरा इंडिका)

भारतीय जरबिल (टॅ. इंडिका ) हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत सर्वत्र आढळतो. तो पाकिस्तान, तुर्कस्तान, इराण, इराक, सिरिया, अरबस्तान व श्रीलंका या देशांतही आढळतो. मैदानी प्रदेश, गवताळ राने व जंगले यांखेरीज बागा व लागवडीखालील शेते यांतही तो राहतो.

डोक्यासकट शरीराची लांबी ९–१९ सेंमी. व शेपटीची १२–२४ सेंमी असते. मागचे पाय २·८–४·५ सेंमी. लांब असतात. प्रौढ प्राण्याचे वजन ३०–१०० ग्रॅम असते. अंगावरचे केस मऊ असतात. पाठीकडचा रंग रेतट करडा, फिक्कट पिवळसर करडा किंवा रेतट तपकिरी असतो शरीराचा खालचा भाग पांढरा किंवा पांढरट असतो. हात व पाय फिक्कट रंगाचे असतात. बहुतेक प्रकारांत शेपटीची वरची व खालची बाजू जास्त काळसर असते. शेपटीच्या टोकाच्या भागावर काळ्या केसांचा गोंडा असतो. सामान्यतः डोळे व कान मोठे असून त्यांच्या वर आणि मागे आणि नाकाच्या दोन्ही बाजूंवर पांढरे ठिपके असतात. मादीला सहा किंवा आठ स्तन असतात.

हे प्राणी रात्रिंचर आहेत. यांची बिळे झुडपांच्या जाळ्यांजवळ किंवा कुंपणाजवळ असतात अथवा झुडपांच्या खाली असतात पण कधीकधी ती अगदी उघड्यावर असतात. नर व मादी थोडी भिन्न रचना असलेल्या वेगवेगळ्या बिळांत राहतात. बिळे एक मी. किंवा त्यापेक्षाही जास्त खोल गेलेली असतात. आत जाण्याच्या व बाहेर पडण्याच्या मार्गांचा एक प्रकारे व्यूह बनलेला असतो आणि त्याच्या मध्यभागी घर असते. याशिवाय शत्रुपासून बचाव करण्याकरिता पळत येऊन लपून बसण्याकरिता बिळे असतात, पण ती फार खोल नसून जमिनीखाली ३० सेंमी. असतात. घराकडे जाणारे मार्ग भुसभुशीत मातीने बंद केलेले असतात.

आ. २. भारतीय वाळवंटी जरबिल (मेरिओनीस हुरिॲनी)

जरबिल चारही पाय टेकून चालतात, पण भीती वाटल्याबरोबर लांब उड्या मारीत ते पळतात. एका उडीत ते सु. ३·५ मी. अंतर तोडतात. मुळे, कंद, धान्य, हिरव्या वनस्पतींचे भाग व कीटक हे त्यांचे अन्न होय. अंडी व पक्षांची पिल्लेदेखील हे प्राणी खातात.

काही जातींत प्रजोत्पादन वर्षभर चालू असते, पण काहींत ते ठराविक काळीच होते. टॅटेरा आफ्रा या जातीत गर्भावधी २२ दिवसांचा असून मादीला एका वेळी ४–८ पिल्ले होतात. पिल्ले ३–४ आठवडे घरट्यात (बिळात) राहतात.

वाळवंटी जरबिलाच्या (मेरिओनीस हुरिॲनी ) सवयी भारतीय जरबिलाच्या सवयींसारख्याच असतात. हा जरबिल जास्त संघवृत्तीचा असल्यामुळे त्यांचे लहान निवह (वसाहती) असतात. वाळवंटी व निमवाळवंटी प्रदेशांत हा मुबलक आढळतो. वाळवंटी जरबिल दिनचर असून सगळ्या ऋतूंत दिवसभर याचे उद्योग चालू असतात. ग्रंथिल (गाठाळ) मुळे, गवत, धान्य, पाने व फुले यांवर हे उदरनिर्वाह करतात. मिरजोळीच्या (पीलू) झाडाची फळेदेखील हे खातात. कित्येकदा अन्न बिळात साठविलेले असते. हिवाळ्यात ते शीतसुप्तीत (अंशतः किंवा पूर्ण गुंगीत) जातात असे म्हणतात. माद्यांना एप्रिल ते सप्टेंबरपर्यंत पिल्ले होतात. गर्भावधी २५–२९ दिवसांचा असून मादीला सामान्यतः ३–४ पिल्ले होतात. ती एका वर्षात कित्येकदा विते. तीन-चार आठवड्यानंतर पिल्ले स्वतंत्रपणे राहू लागतात.

यार्दी, ह. व्यं.