सिफोझोआ : सीलेंटेरेटा (आंतरगुही) प्राणिसंघातील एक वर्ग. या वर्गात सर्व ⇨ जेलीफिशां चा समावेश केला आहे. यामध्ये सु. २०० जातींचा समावेश होतो. सिफोझोआचे अपूर्ण ठसे कँब्रियन, पर्मियन आणि जुरासिक खडकांत आढळतात. यावरुन सिफोझोआ प्राण्यांचा उगम कँब्रियन (सु. ६० कोटी वर्षांपासून ते ५० कोटी वर्षांपूर्वीपर्यंतच्या) वा क्रिटेशस (सु. १४ कोटी वर्षांपासून ते ९ कोटी वर्षांपूर्वीपर्यंतच्या) कालखंडात झाला असावा. सिफोझोआ वर्ग हा हायड्रोझोआ व ॲक्टिनोझोआ या दोन वर्गांमधील दुवा आहे, असे मानले जाते. काही सिफोझोआ प्राणी समुद्राच्या पाण्यावर तरंगणारे असतात, तर काही समुद्राच्या तळाशी राहणारे असतात. तरंगणाऱ्या प्राण्यांचा रंग करडा किंवा लाल असतो, तर समुद्रतळाशी राहणाऱ्या प्राण्यांचा रंग निळसर-हिरवट असतो. यांतील काही प्राण्यांच्या शरीरातून रात्रीच्या वेळी निळसर प्रकाशकिरण बाहेर टाकले जातात. उदा., पेलाजिया नॉक्टिल्युका.

सिफोझोआ प्राण्यांची लक्षणे :शरीर : या प्राण्यांची शरीरे छत्रीच्या, बशीच्या किंवा घंटेच्या आकाराची असतात. शरीराची वरची बाजू बहिर्गोल व खालची बाजू अंतर्गोल असते. या दोन बाजूंमध्ये एक जेलीसारखा पदार्थ असतो, त्यास मिसोग्लिया म्हणतात. शरीराच्या कडांवर (परिघावर) अगदी जवळजवळ संस्पर्शके असतात. कडांवर समान अंतराने आठ खाचा असतात. दोन खाचांमध्ये ज्ञानेंद्रिय असते. ज्ञानेंद्रिये दृक्-बिंदू , संतुलनपुटी आणि संवेदनशील खळगे यांनी बनलेली असतात. अधर बाजूस चार मुखबाहूंच्या मधे टोकावर मुख असते. मुखबाहूला लांबीभर एक खाच असून तिच्या कडांवर दंशकोशिका असतात. मुख पचन गुहेत उघडते. पचन गुहेपासून चार जठरकोष्ठ निघतात. जठरकोष्ठांत दंशकोशिकायुक्त जठरतंतू असतात.

हालचाल व अन्नग्रहण : हे प्राणी एकेकटे किंवा समूहाने समुद्राच्या पाण्यावर तरंगत असतात. सागरी प्रवाह किंवा लाटा यांच्याबरोबर ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. हे प्राणी मांसाहारी असून ते लहान अपृष्ठवंशी प्राणी, कृमी, अळ्या, डिंभ इत्यादींवर उपजीविका करतात. ते मुखबाहूंवरील दंशकोशिकांनी प्राणी अर्धमेले करुन गिळतात. जठरतंतूंवरील दंशकोशिकांमुळे प्राणी पूर्णपणे मारले जाऊन त्यांचे पचन गुहेत पचन होते. पचन झालेले अन्न शरीराच्या निरनिराळ्या भागांना पोहोचविण्याचे कार्य तंत्रिका जाल करते.

प्रजोत्पादन : नराचे शुक्राणू तोंडावाटे बाहेर पडून मादीच्या पचन गुहेत शिरतात. त्या ठिकाणी अंडाणूंचे निषेचन होते. निषेचित अंडाणू मुखबाहूंना चिकटतात व तेथेच त्यांचा विकास होतो. त्यांपासून पक्ष्माभिका असलेला प्लॅन्यूला डिंभ तयार होतो. मादीपासून प्लॅन्यूला वेगळा होऊन एखाद्या आधाराला चिकटतो. नंतर त्याचा विकास होऊन पक्ष्माभिका नसलेला स्किफिस्टोमा (पॉलिपासारखा) डिंभ तयार होतो. हिवाळ्यात या डिंभावस्थेचे अनेक आडवे तुकडे पडू लागतात. त्यामुळे ते एकावर एक बशी ठेवल्याप्रमाणे दिसतात. नंतर हे भाग वेगवेगळे होतात व त्यांपासून अनेक एफिरा (पॉलिप) डिंभ तयार होतात. एफिरा डिंभाचे रुपांतर सिफोमेड्यूसामध्ये होते. नंतर या मेड्यूसांची पूर्ण वाढ होऊन त्यांचे रुपांतर जेलीफिशांमध्ये होते.

वर्गीकरण : सिफोझोआ वर्गात पुढील गणांचा समावेश होतो :

स्टॉरोमेडूशी : (लूसरनॅरिडा). या गणातील प्राणी समुद्रातील खडकांना किंवा वनस्पतींना चिकटलेले असतात. शरीराचा आकार कलशाकृती पानपत्रासारखा तसेच श्लेष्मकोशिकेप्रमाणे असून त्याचे आठ भाग झालेले असतात. या आठ भागांच्या कडांवर आखूड संस्पर्शके असतात. हे प्राणी पॉलिप अवस्थेत समुद्रातील समशीतोष्ण पाण्यामध्ये सर्वत्र आढळतात. उदा., हेलिक्लिस्टसलूसरनॅरिया.

क्युबोमेडूशी : या प्राण्यांचे शरीर छत्री वा घंटेसारखे असून कडा आत वळलेल्या असतात. संस्पर्शके चार किंवा चारच्या गटाने आढळतात. जठरकोष्ठात स्नायूंचे पडदे असतात. उदा., सी वास्प किरोनेक्स.

कॉरोनेटी : हे प्राणी खोल सागरी पाण्यात आढळतात. मेड्यूसा स्वतंत्र असून त्यांचे शरीर छत्री वा गोल घुमटासारखे असते. शरीराच्या कडांवर खाचा असतात व १६ लांबट संस्पर्शके असतात. यांच्याही जठरकोष्ठात स्नायूंचे पडदे असतात. काही जातींत कायटिनमय स्किफिस्टोमाअवस्था असते. उदा., पेरिफायला, नॅसिथोई सिमॅओस्टोमी.

डिस्कोमेडूशी : यामध्ये जेलीफिशाचा समावेश होतो. पॉलिप आणि मेड्यूसामध्ये अवस्थांतर आढळते. शरीराचा आकार घंटेसारखा असून कडांवर ते आठ किंवा जास्त भागांत विभागलेले असते. तोंड चौकोनी असून त्याच्याजवळून चार लांब मुखबाहू निघालेले असतात. शरीराच्या कडा आतील बाजूस वळलेल्या असून त्यांवर संस्पर्शके असतात. जठरकोष्ठात स्नायूचे पडदे असतात. उदा., जेलीफिश, ऑरेलियाऱ्हायझोस्टोमा.

सिफोझोआ वर्गातील प्राण्यांना व्यापारी दृष्टिकोनातून फारसे महत्त्व नाही. काही जेलीफिशांचा चीन व जपान या देशांत अन्न म्हणून उपयोग केला जातो, तर काहींचा उपयोग मासे पकडण्यासाठी गळाला आमिष म्हणून केला जातो. जेलीफिशचा मानवी त्वचेशी संपर्क आल्यास जखमा होतात. सिफोझोआ प्राण्यांच्या दंशकोशिका मानवी शरीरात घुसल्यास खूप वेदना होतात. डॅक्टिलोमेट्राकिरोसामस या मोठ्या जेलीफिशांच्या दंशकोशिकांमुळे माणूस गंभीर रीत्या आजारी पडतो वा मृत्यू संभवतो. सायनिया कॅपिलॅटासी वास्प हे अटलांटिक आणि पॅसिफिक महासागरी किनाऱ्यांवर आढळणारे जेलीफिश ‘मॅन किलर’ म्हणून ओळखले जातात. किरोनेक्स फ्लेकरी या प्राण्यामुळे मानवाचा ३ ते २० मिनिटांत मृत्यू होऊ शकतो.

पहा : जेलीफिश सीलेंटेरेटा.

पाटील, चंद्रकांत प.