खवल्या मांजर : स्तनिवर्गातील फोलिडोटा गणाच्या मॅनिडी कुलातील हा प्राणी आहे. या कुलात मॅनिस  हा एकच वंश असून त्यात सात जाती आहेत. त्यांपैकी काही आफ्रिकेत व काही आशियात आढळतात. खवल्या मांजराच्या दोन जाती भारतात आढळतात. एक भारतीय खवल्या मांजर (मॅनिस क्रॅसिकॉडेटा ) आणि दुसरी चिनी खवल्या मांजर (मॅनिस पेटॅडॅक्टिला ). भारतीय जाती हिमालयाच्या दक्षिणेस मैदानी प्रदेशात व डोंगरांच्या उतरणीवर आणि श्रीलंकेत आढळते. चिनी जाती हिमालय, आसाम, नेपाळ, ब्रह्मदेश, दक्षिण चीन, हैनान आणि फॉर्मोसात आढळते.

खवल्या मांजर

भारतीय खवल्या मांजराची लांबी (डोके व धड) ६०–७५ सेंमी. असते.  शेपूट ४५ सेंमी. लांब असते. डोके लहान, मुस्कट लांबट व पुढे निमुळते असते. डोळे बारीक व कान फार लहान असतात, पण घ्राणेंद्रिय तीक्ष्ण असते. तोंडात दात मुळीच नसतात. जीभ सु. ३० सेंमी. लांब, बारीक व चिकट असते. पाय आखूड असतात. प्रत्येक पायाला पाच बोटे असून त्यांच्यावर मोठ्या पण बोथट नख्या असतात. पुढच्या पायांवरील नख्या जास्त मोठ्या, लांब व वाकड्या असतात.

शरीरावरचे संरक्षक शृंगमय (केराटीन नावाच्या प्रथिनाने युक्त असलेले) खवले हे या प्राण्यांचे खास वैशिष्ट्य होय. डोके, पाठ, अंगाच्या दोन्ही बाजू, पाय व शेपटी मोठ्या खवल्यांनी झाकलेले असतात. खवल्यांची मांडणी घराच्या छपरावरील कौलांसारखी असते. खवल्यांच्या मधूनमधून केस बाहेर आलेले असतात. काही शास्त्रज्ञांच्या मताने केसांचे झुबके अतिशय कठीण आणि चापट होऊन खवले बनलेले असावेत. शरीराच्या खालच्या बाजूवर खवले नसतात, पण जाड व ताठ केस असतात. गुदद्वाराजवळ गुद-ग्रंथींची एक जोडी असून त्यांच्या स्रावाला अतिशय घाणेरडा वास येतो.

खवल्या मांजर रात्रिंचर आहे. दिवसा ते आपल्या खोल बिळात झोपलेले असते. शरीराचे वेटोळे करुन ते झोपते. बिळात शिरल्यावर ते बीळ बंद करून घेते. हे प्राणी आपल्या पुढच्या पायांवरील मोठ्या नख्यांनी खोल बिळे उकरतात. मुग्यांची व वाळवीची वारूळे उकरून त्यांतील मुंग्या व वाळव्या ते आपल्या चिकट जिभेने टिपून खाते. जिभेने चाटून पाणी पितात. चालताना पुढच्या पायांवरील बोटे वाकून तळव्याखाली आलेली असतात. मागच्या पायांचे तळवे पूर्णपणे जमिनीवर टेकलेले असतात. हे प्राणी हळूहळू व जमिनीचा वास घेत चालतात चालताना पाठीची कमान होते व शेपूट जमिनीपासून वर उचललेले असते कधीकधी आजूबाजूला नीट पाहता यावे म्हणून ते मागच्या पायांवर उभे राहतात. यांना झाडांवर चढता येते. या कामी आपल्या नख्या आणि परिग्राही (पकड घेणारी) शेपटी यांचा ते उपयोग करतात.

संकटाच्या वेळी डोके पोटात खुपसून, शरीर वाकवून आणि त्याचा खालचा भाग शेपटीने झाकून घेऊन ते अंगाची चेंडूसारखी घट्ट गुंडाळी करून स्वस्थ पडून राहतात.

नर व मादी एकत्र राहतात. प्रजोत्पादनाचा काळ जानेवारी-मार्च असतो. मादीला दर खेपेला एकच (क्वचित दोन) पिल्लू होते. पिल्लांचे खवले जन्मत: मऊ असतात व नंतर ते कठीण होतात. मादी हिंडत असताना पिल्लू तिच्या शेपटीवर आडवे चिकटून बसते. संकटाच्या वेळी मादी पिल्लाला पोटाखाली झाकून घेऊन अंगाची गुंडाळी करते.

दातार, म. चिं.