साळ : स्तनी वर्गाच्या कृंतक गणात या प्राण्याचा समावेश होतो. यास सायाळ, साळू किंवा साळींदर अशीही नावे आहेत. कृंतक (कुरतडणाऱ्या प्राण्यांच्या) गणात एरेथीझोंटिडी व हिस्ट्रिसिडी ही साळींची दोन कुले आहेत. दोन्ही कुलांतील साळींचे पूर्वज कदाचित एकच असले, तरी त्यांच्यात कोणतेही साम्य आढळत नाही. त्या अनेक वर्षे विभक्त झाल्याने व निरनिराळ्या वातावरणांत वाढल्याने त्यांच्या कवटीत व दाताच्या ठेवणीत फरक झालेला आढळतो. सर्व साळींना काटे असतात असे नाही. काहींच्या अंगावर राठ केस असतात.

साळ हे वजनदार व आखूड पायाचे प्राणी असून ते निशाचर व शाकाहारी आहेत. उत्तर, दक्षिण व मध्य अमेरिका या नवीन जगातील साळी (एरेथीझोंटिडी कुलातील) झाडावर राहतात तर आशिया, आफ्रिका व यूरोप या जुन्या जगातील साळी (हिस्ट्रिसिडी कुलातील) जमिनीत बिळे करुन राहतात.

उत्तर अमेरिकन साळी (एरेथीझोन डॉर्‌सॅटम ) कॅनडापासून मेक्सिकोपर्यंत आढळतात. त्यांची लांबी सु. ७५ सेंमी. असून शेपटीची लांबी सु. २० सेंमी. असते. अंगावर सु. ७·५ सेंमी. लांबीचे काटे असतात. एरेथीझोंटिडी कुलात लांब शेपटी असणारी वृक्षवासी साळ मेक्सिको व दक्षिण अमेरिकेतील जंगलांत आढळते. लहान शेपटी असणारी साळ (एकायनोप्रोक्टा रेफसेन्स ) कोलंबियात आणि अंगावर कमी जाडीचे काटे असणारी साळ (कीटोमिस सबस्पायनोसस) ब्राझीलमध्ये आढळते. यांखेरीज लांब शेपटीची इंडोनेशियन साळ आशियात आढळते तर ब्रशटेल्ड साळ आफ्रिका व आशिया खंडांत आढळते.

भारतीय साळ (हिस्ट्रिक्स इंडिका)भारतीय साळ : (हिस्ट्रिक्स इंडिका ). भारतात साळी सर्वत्र आढळतात. त्या कोणत्याही हवामानात राहू शकतात. कुमाऊँ तसेच पश्चिम हिमालयात सस.पासून सु. २,५०० मी. उंचीपर्यंत त्या आढळतात. पूर्ण वाढलेल्या साळीची लांबी ७०–९० सेंमी. व शेपूट ८-९ सेंमी. लांब असते. वजन ११–१८ किग्रॅ. असते. संपूर्ण शरीर काटेरी केसांनी आच्छादिलेले असते. पाठीवरील काटे मोठे, टणक व फार दाट असतात. काट्यांची लांबी १८–२० सेंमी. असते. प्रत्येक काट्यांवर गडद तपकिरी व पिवळसर पांढरा या रंगांचे पट्टे असतात.

साळी दिवसभर जमिनीत स्वत: खोदलेल्या बिळांमध्ये अथवा खडकांच्या कपारीमध्ये राहतात. बिळे खोदून झाल्यावर बिळांच्या तोंडाजवळ त्या खूप माती आणून टाकतात, तसेच प्राण्यांच्या हाडाचे तुकडे व हरणांची शिंगे ठेवतात. त्या आपल्या अंगावरील काट्यांची व्यवस्थित वाढ व्हावी यासाठी हाडे व हरणांची शिंगे खाऊन कॅल्शियम मिळवितात. त्यांची बिळे विशिष्ट पद्घतीने खोदलेली असतात. बिळास मुख्य तोंडाखेरीज वेळप्रसंगी झटकन बाहेर पडता यावे म्हणून दोन-तीन तोंडे असतात. बिळे तोंडापासून खूप खोलपर्यंत खोदलेली असतात आणि आतमध्ये ती खूप मोठी व प्रशस्त असतात.

साळी संध्याकाळी वा रात्री बिळातून बाहेर पडतात. त्यांचे गंधज्ञान अतिशय तीव्र असते. सर्व प्रकारच्या भाज्या, धान्ये, फळे तसेच झाडांची मुळे हे त्यांचे अन्न आहे. यामुळे त्या बागायती पिके व शेतीचे फार नुकसान करतात. त्यांना धोक्याची सूचना मिळाली की, त्या आपले शरीर फुगवून अंगावरील काट्यांची सळसळ करुन काटे ताठ उभे करतात. त्या शत्रूवर हल्ला करण्याच्या वेळी आपली पाठ शत्रूकडे करतात व पाठीमागे जाऊन जोरात आपले तीक्ष्ण काटे शत्रूच्या शरीरावर सोडतात. कित्येक वेळा एकेकट्या साळीने वाघ व बिबटे मारल्याची उदाहरणे आहेत. हे काटे शत्रूच्या शरीरात घुसल्यावर फक्त त्यांची टोके मोडतात व ती शरीरात अडकून राहतात. काटे साळीच्या शरीरापासून अलग झाल्यास नवीन काटे येतात. साळीच्या मागच्या पायांवर व कमरेखाली सफेद रंगाचे काटे असतात. त्या एकेकट्या निर्धास्तपणे भटकत असतात. त्यांचे मांस अत्यंत रुचकर असते.

भारतात हिस्ट्रिक्स इंडिका या जातीशिवाय पुढील दोन जाती आढळतात : (१) हॉगसन्स पॉर्क्युपाइन साळी मध्य व पूर्व हिमालय, आसाम, प. बंगाल या ठिकाणी सस.पासून सु. १,५०० मी. उंचीवर आढळतात. या साळींचा डोक्याचा भाग १५ सेंमी. पेक्षा लहान असतो. (२) ब्रशटेल्ड पॉर्क्युपाइन साळी भारतात प. बंगाल व आसाममध्ये तसेच मलेशिया या देशात आढळतात. त्यांची शेपटी लांब असून तिच्यावर ब्रशसारखे दाट केस असतात. त्यांच्या सवयींबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही.

साधारणपणे मार्च महिन्यात त्यांना पिले होतात. गर्भावधी सु. दोन महिन्यांचा असतो. एकावेळी दोन ते चार पिले जन्मास येतात. नर-मादी दोघेही बिळामध्ये पिलांची काळजी घेतात. पिलांचे डोळे जन्माला येताना उघडे असतात. त्यांच्या शरीरावर मऊ व छोटे काटे असतात.

संदर्भ : 1. Prater, S. H. The Book of Indian Animals, Bombay, 1988.

२. ग्रब, शैलजा, महाराष्ट्रातील वन्यप्राणी, मुंबई, १९७८.

दातार, म. चिं.; पाटील, चंद्रक्रांत प.