ससा : स्तनी वर्गाच्या लॅगोमॉर्फा गणाच्या लेपोरिडी कुलात सशाचा समावेश होतो. सशामध्ये रॅबिट व हेअर अशा दोन प्रमुख जाती आढळतात.

रॅबिट : हे प्रामुख्याने यूरोप, आशिया, आफ्रिका येथे आढळतात. त्यांच्या अनेक प्रजाती आहेत. यांमध्ये ओरिक्टोलॅगससिल्व्हिलॅगस या महत्त्वाच्या प्रजाती आहेत. रॅबिट भारतात आढळत नाहीत.

रॅबिट हे आकाराने हेअरपेक्षा लहान असतात. ते समुहाने व बिळात राहतात. ते माणसाळता येतात. रॅबिटच्या पिलांना जन्मत: केस नसतात व डोळे बंद असतात. सु. आठ दिवसांनंतर त्यांचे डोळे उघडतात व अंगावर थोडे केस येतात. पिले जन्मानंतर लगेच हालचाल करीत नाहीत. काही दिवसानंतर ती हालचाल करतात. यूरोपियन रॅबिट (ओरिक्टोलॅगस क्यूनिक्यूलस ) व कॉटनटेल रॅबिट यांची लांबी सु. २४-२५ सेंमी. असते. कॉटनटेल रॅबिटचे (सिल्व्हिलॅगस ) वजन ०.५ ते २ किग्रॅ. असते. पाळलेले कॉटनटेल रॅबिट व यूरोपियन रॅबिट हे अनुकमे ८-१० वर्षे व १३ वर्षे जगतात. रॅबिट हे लांब कानाचे, आखूड शेपटी ( सु. ५ सेंमी. लांब), पाठीमागचे पाय लांब, करडया किंवा तपकिरी रंगाचे असतात.

यूरोपियन रॅबिट हे माणसाळलेल्या जातीचे पूर्वज समजले जातात. ते सुरूवातीस नैऋत्य यूरोप, उत्तर आफ्रिका येथे आढळत. नंतर या जातीने ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अमेरिका येथे प्रवेश केला. ही लवकर प्रसारित होणारी जाती असून तिचे प्रजनन वर्षभर कोणत्याही काळात होऊ शकते. मादी आठ महिन्यांची झाल्यावर वयात येते. मादी पिलांना जन्म देण्यापूर्वी जमिनीत छोटे बीळ तयार करते, त्यात पालापाचोळा व स्वत:ची लोकर यांचा वापर करून घरटे तयार करते. तिचा गर्भावधी काळ सु. ३० दिवसांचा असतो. ती एका वीणीत ( वेतात ) ५ ते ८ पिलांना जन्म देते. वर्षातून अनेक वेळा तिची वीण होते.

यूरोपियन रॅबिट हा वैशिष्टयपूर्ण ससा आहे. त्यांची असंख्य बिळे एकमेकांस जोडलेली असतात. बाहेर जाण्याच्या मार्गाव्दारे ते रात्री बाहेर पडतात. ते गवत व वनस्पतिज अन्न खातात. ते शांत व भित्र्या स्वभावाचे असतात.

कॉटनटेल रॅबिट (सिल्व्हिलॅगस ) हे उत्तर अमेरिकेत आढळणारे रॅबिट आहेत. त्यांची शेपटी खालच्या बाजूने पांढऱ्या रंगाची असते. ते सर्वसामान्य जंगली रॅबिट आहेत. ते खेळ व खाद्यासाठी प्रसिद्घ प्राणी आहेत. ते बिळात राहतात व अन्नाच्या शोधासाठी मोकळ्या जागेत जातात. त्यांच्या सु. १३ जाती असून त्यांपैकी सिल्व्हिलॅगस फ्लोरिडॅनस ही जाती अमेरिकेत सर्वत्र आढळते.

रॅबिट हे मांसभक्षी प्राण्यांचे अन्न आहे. त्यांची मानवाकडूनही शिकार केली जाते. रॅबिट फिव्हर किंवा ट्युलॅरिमिया हा रोग या प्राण्यांमुळे मानवाला होतो. काही वेळा ते पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान करतात.

स्थानिक संकरातून रॅबिटच्या अनेक जाती निर्माण झाल्या आहेत. यांपैकी अंगोरा रॅबिट आणि न्यूझीलंड रॅबिट या जाती लोकर व मांसासाठी पाळल्या जातात. फ्लेमिश जायंट, सिल्व्हर गे, ⇨ चिंचिल्ल, हवाना व अमेरिकन ब्ल्यू या याच्या इतर जाती आहेत.

हेअर : हे आकारमानाने रॅबिटपेक्षा मोठे असतात. ते एकएकटे राहतात. ते माणसाळता येत नाहीत. ते बिळात राहत नाहीत. पिले जन्मत:च अंगावर केस असलेली व त्यांचे डोळे उघडे असतात. जन्मानंतर लगेच ती हालचाल करतात. यांचे कान व मागचे पाय लांब असतात. मागच्या पायावर बसून आजूबाजूला पाहून ते कानोसा घेतात.

लेपस यूरोपियस ही जाती मध्य व दक्षिण यूरोप आणि आफ्रिकेत आढळते. उत्तर अमेरिकेत लेपस अमेरिकन्स, ले. टाऊनसेंडी, ले. कॅलिफोर्निकस या जाती आढळतात. बेल्जियम हेअर ही स्थानिक जाती आहे. ऑस्ट्रेलियात एकोणिसाव्या शतकात बाहेरून हेअर आणण्यात आले.

भारतात इंडियन हेअर ( ले. निगिकोलीस ) हा ससा प्रामुख्याने आढळतो. याशिवाय केप हेअर काश्मीरमध्ये व वायव्य सरहद्द प्रांतात आणि अरेबियन हेअर सिक्किमच्या पठारावर, नेपाळ व लडाखमध्ये आढळतात. हिस्पिड हेअर ही जाती आसाम रॅबिट या नावाने प्रसिद्ध आहे.

इंडियन हेअर जातीत रेड किंवा पाटल हेअर या सशाची डोक्यासह लांबी ४० ते ५० सेंमी. व वजन १.८ ते २.३ किगॅ. असते. त्याची मान, तोंडाची मागची बाजू, छाती आणि पाय तपकिरी असतात. हनुवटी, गळ्याचा वरचा भाग आणि शरीराचे खालचे भाग पांढरे असतात. शेपटी तांबडी तपकिरी रंगाची असते. ब्लॅकनेक्ड ( काळमान्या ) हेअर हा आकारमानाने मोठा असतो. त्याचे वजन २.२-३.६ किगॅ. असते. हा रंगाने काळसर तपकिरी असतो. याच्या मानेच्या वरील भागावर काळसर पट्टा असतो. शेपटी काळसर रंगाची असते. डेझर्ट हेअर ( रणससा ) या जातीत पिवळी व वाळूसारखा रंग असलेली लव त्याच्या शरीरावर असते. पाटल हेअरच्या तुलनेत याच्या शरीराचे रंग फिकट असतात. मानेवर काळसर पट्टा नसतो. शेपटी काळसर तपकिरी असते.

ब्लॅकनेक्ड हेअर दक्षिण भारतात पूर्वेला गोदावरीपर्यंत आणि पश्चिमेला खानदेश, विदर्भ, मध्य प्रदेशापर्यंत आढळतात. रेड हेअर हिमालयापासून दक्षिणेस गोदावरीपर्यंत आढळतात. रणससे वाळवंटी प्रदेश, नैऋत्य प्रदेश, पंजाब, सिंध, कच्छ, राजस्थान व सौराष्ट्र या भागांत आणि ले. निगिकोलीस सिमकॉक्सीले. निगिकोलीस महादेवा या जाती मध्य प्रदेशात आढळतात.

अनुकूल हवामानात ते विपुल प्रमाणावर आढळतात. झुडपांच्या भागात व मधेमधे जंगल असलेल्या जागा त्यांच्या वाढीसाठी योग्य असतात. जंगलात त्यांची संख्या कमी असते. हे प्राणी उंच पर्वतावरही आढळतात. कुमाऊँच्या टेकडयांवर स.स.पासून २,४०० मी. उंचीवर ते आढळतात. निलगिरी पर्वत व दक्षिण भारतातील डोंगर रांगांवरही ते आढळतात.

पुष्कळदा हेअर गावाजवळच्या जागा व शेती, लागवडीच्या भागात राहतात. काही वेळा ते पिकांची नासाडी करतात. दिवसा हा प्राणी गवतात जागा करून त्यात पडून राहतो. रात्री तो अन्नाच्या शोधासाठी बाहेर पडतो. हा स्वस्थ पहुडलेला असताना त्याच्या शत्रूला तो सहज ओळखता येत नाही. हा प्राणी फार भित्रा आहे. तो वनस्पतिज अन्न खातो. गवत, पालापाचोळा, झाडाचे कोवळे अंकुर हे याचे मुख्य अन्न आहे.

सर्व मांसभक्षक प्राणी हेअरचे शत्रू आहेत. कोल्हा, मुंगूस, रानमांजरे, कुत्री त्याची शिकार करतात. तो थोड्या अंतरापर्यंत वेगाने पळतो व थांबून कानोसा घेतो. तो शत्रूपासून सुटका करून घेण्यासाठी कोणत्याही बिळात घुसतो.

रेड हेअरला एकावेळी एक ते दोन पिले होतात. पिले होण्याचा काळ ऑक्टोबर ते फेबुवारी हा आहे. त्याचा गर्भधारणेचा कालावधी सु. एक महिन्याचा असतो. हेअरच्या पिलांचे डोळे जन्मत:च उघडलेले असतात.

ससापालन : येथे ससा हे सामान्य नाम रॅबिट व हेअर या दोन्हींसाठी वापरलेले आहे. प्राचीन काळी ससा हा दिखाऊ व शोभेचा प्राणी समजला जात होता. आधुनिक काळात मात्र अन्न, वस्त्र, संशोधन, छंद व पाळीव प्राणी ह्या दृष्टीने ससे पाळले व जोपासले जातात. सशाच्या मांसात २०.८% प्रथिने असतात व त्याचे मांस पचनास हलके असते. अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, दक्षिण आफ्रिका इ. देशांत सशांची मोठमोठाली पैदासगृहे आहेत.

सशांच्या एकूण ३८ प्रमुख जाती व ८७ उपजाती आहेत. या जातींचे रंग, आकारमान व लोकरीचे प्रकार वेगवेगळे असतात. सशांच्या प्रमुख जाती : (१) मोठी जात – पोलिश जायंट, फ्लेमिश चिंचिल्ल, (२) मध्यम आकारमान – न्यूझीलंड व्हाइट, (३) लहान आकारमान – अंगोरा, पोलिश.

लोकर व मांस देणाऱ्या सशांच्या जातींचे व्यवसायीकरण झाले असून त्यांचे प्रजनन, संवर्धन व विक्रीचा धंदा पाश्चात्त्य देशांत व उष्णकटिबंधातील काही देशांत मोठया प्रमाणावर सुरू आहे.


लोकरीसाठी ससेपालन : सशाची अंगोरा ही मूळ जर्मनीतील जात लोकर उत्पादनासाठी प्रसिद्घ असून हिच्यापासून मिळणारी लोकर तलम, मुलायम व लवचिक असते. अंगोरा जातीचे इंग्लिश अंगोरा व फ्रेंच अंगोरा असे दोन प्रकार आहेत. पूर्ण वाढलेल्या दोन्ही प्रकारांतील सशाचे वजन २.५ ते ३.५ किग्रॅ. असून लोकरीचे दरडोई उत्पादन दरवर्षी सु. ४००-१,००० ग्रॅ. असते. लोकर वर्षातून चार वेळेस म्हणजे प्रत्येक तीन महिन्यांनंतर मिळते.

अंगोरा धाग्याचा व्यास १५ मायकॉनइतका असतो, तंतूची लांबी ६ सेंमी. असून व्यास सर्व धाग्यात सर्व ठिकाणी सारखाच असतो. या लोकरीच्या एका किलोग्रॅमची किंमत सु. ५००-६०० रू. आहे. लोकरीचे जागतिक उत्पादन दरवर्षी सु. २,००० टन असून त्यांपैकी १,५०० टन उत्पादन चीनमध्ये होते. अंगोरा सशांना थंड हवामान लागते. भारतात हिमाचल प्रदेशात त्यांची पैदासगृहे आहेत.

मांसासाठी ससेपालन : शीतकटिबंधातील प्रगत राष्ट्रांत मांसाकरिता सशाचे व्यावसायिक दृष्टया पालन करण्यात येते. सशाचे मांस चविष्ट असून त्यामधून अल्प प्रमाणात स्निग्ध पदार्थ व कमी कॅलरीज मिळत असल्याने त्याची मागणी वाढत आहे. सशाच्या न्यूझीलंड व्हाइट, कॅलिफोर्निया, चिंचिल्ल, गे जायंट, व्हाइट जायंट या जाती मांसोत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. सशाचे २.५ किगॅ. वजन सु. ८ ते १० आठवडयांनंतर मिळते व असा ससा विक्रीस योग्य मानला जातो. हिरव्या पालेभाज्या, स्वयंपाकघरातील उरलेले अन्न, शेतातील बाटुक, भूसा इत्यादींवर शेतकरी सशाची जोपासना करू शकतो. या प्रकारचे प्रयोग अनेक देशांत चालू आहेत. भारतात मात्र मांसाहारासाठी सशाचा उपयोग करण्याचा प्रयोग फारसा यशस्वी नाही. भारतात सशांचा उपयोग प्रायोगिक प्राणी म्हणून केला जातो.

संगोपन : सशाच्या संगोपनाच्या पद्धती देश, काल, परिस्थिती व उपलब्ध चारा यांवर अवलंबून असतात. हिरवे व वाळलेले गवत, अन्नधान्ये यांवर ते आपली उपजीविका करू शकतात. त्यांच्या खादयात १२ ते १६% प्रथिने व १२ ते १५% तंतुमय पदार्थांचा समावेश असावा. हिरवे गवत, गाजर, पालक, बरसीम (घास) इ. सशासाठी पौष्टिक आहार आहे. सशांना खादय दिल्यावर दिवसातून एक वेळ हिरवे गवत किंवा घास दयावा. गोळी खादय किंवा कांडयांच्या रूपातील तयार खादय ४ ते ६ आठवडयांच्या पिलांना २०-४० ग्रॅ., ६ ते १२ आठवडयांच्या पिलांना ५०-६० ग्रॅ., १२ ते १४ आठवडयांच्या पिलांना ८०-१०० ग्रॅ. व पूर्ण वाढ झालेल्या सशांना १००-१५० ग्रॅ. देतात. गाभण मादीला याव्यतिरिक्त २००-२५० ग्रॅ. गवत देतात. त्यांच्या पाण्यासाठी स्वतंत्र भांडी वापरतात. सशांना पाणी कमी पडले, तर त्यांची भूक मंदावते. थंडीच्या दिवसांत त्यांना दिवसातून दोन वेळेस कोमट पाणी देतात, तर उन्हाळ्यात थंड व ताजे पाणी देतात.

पिले सुरूवातीचे तीन आठवडे आईचे दूध पितात. दूध बंद करताना त्यांना स्वतंत्र पिंजऱ्यात ठेवतात. पिलांना पुरेशी ऊब मिळेल आणि अति-थंडी व अतिउष्णतेचा त्रास होणार नाही, याची काळजी घेतात. दिवसातून एक वेळा सशाला स्वच्छ करतात. त्यामुळे लोकर मुलायम राहते.

प्रजनन : सशाच्या लहान जाती चार महिन्यांत तर मोठया जातीच्या फ्लेमिश मादया ९ ते १२ महिन्यांत प्रजोत्पादनास योग्य ठरतात. वयाच्या ६ ते ६.५ वर्षांपर्यंत त्या पैदाशीसाठी योग्य असतात. मादीचे ऋतुचक १५ ते १६ दिवसांचे असून गर्भावधी सु. ३१ दिवसांचा असतो. मादीला प्रत्येक वेतात सु. ८-१० पिले होतात. विण्यापूर्वी एक-दोन दिवस मादी बेचैन असते, ती खाणे-पिणे बंद करते, अंगावरील केस उपटून पिलांसाठी मऊ गादी तयार करते. विण्याच्या वेळी मादीला पिण्यास पाणी कमी पडले, तर ती पिले खाऊन टाकते.

सशापासून मिळणारे उत्पन्न : सशापासून लोकर, मांस, कातडी व खत हे पदार्थ मुख्यत्वे मिळतात. अंगोरा लोकरीपासून बनविलेले मोजे व रग संधिवाताच्या रूग्णांसाठी वापरतात. सशाच्या कातडीचा उपयोग स्त्रियांच्या पर्सेस, हातमोजे, खेळणी, मुलांचे कपडे, कातडी पिशव्या यांसाठी केला जातो. सशाचे लेंडीखत घोडयाच्या लिदीपेक्षा व गायीच्या शेणापेक्षा अनुकमे दुप्पट व तिप्पट गुणकारी असल्याचे निदर्शनास आले आहे. जमिनीचा कस सुधारण्यासाठी त्याचा उपयोग होतो.

मुक्त ससे एक समस्या : ससे बंधनात वाढविल्यास उपयुक्त ठरतात. बंधनमुक्त ससे विध्वंसक ठरतात. ऑस्ट्रेलियात एकोणिसाव्या शतकात सशांची संख्या एवढी वाढली की, ससे नष्ट करण्याची मोहीम सरकारला हाती घ्यावी लागली. तेथील चराऊ कुरणे, शेती व जंगलाचा मोठया प्रमाणावर सशांनी नाश केला. शेवटी एका लशीव्दारे त्यांचे प्रजोत्पादन थांबविले. अशीच समस्या टाँगा बेटसमूहावर, अलास्कामधील मिडलटन बेटसमूहावर, हवाई सान इ. अनेक बेटांवर निर्माण झाली. त्यावेळी गोळ्या घालून, विषारी वायू व लशीचा वापर करून सशाची संख्या नियंत्रित करावी लागली.

रोग : सशांना होणाऱ्या काही महत्त्वाच्या रोगांची माहिती पुढे  दिली आहे.

रक्ती हगवण : एककोशिकीय प्राण्यांमुळे सशांना होणारा रोग. यामध्ये रक्ताची पातळ हगवण, अशक्तपणा, भूक मंदावणे ही प्रमुख लक्षणे होत. या रोगाचे जंतू सशाच्या विष्ठेत आढळतात. रोगी प्राण्यांना कॉड्नीनाल, बायफुरान, ॲम्बेझीन ही औषधे देतात.

हगवण : एककोशिकीय प्राण्यांमुळे होणारा रोग. रोजच्यापेक्षा अधिक विष्ठा होणे व ती पातळ असणे, भूक मंदावणे, मागील पाय नेहमीपेक्षा पुढे घेऊन बसणे ही लक्षणे दिसतात. अशा रोगी प्राण्यांना ताजे गोळीखादय देतात व हिरवा चारा बंद करून वाळलेले उत्कृष्ट प्रतीचे गवत देतात, तसेच पाण्यातून प्रतिजैव म्हणजे अँटिबायॉटिक्स (होस्टासायक्लीन, स्टेक्लीन पावडर ) देतात.

न्यूमोनिया : ससे फार दाटीवाटीने ठेवले असतील, हवा खेळती नसेल, कोंदट वातावरणात, हवेत बाष्प अधिक झाल्यास किंवा गोळीखादयाची पावडर श्वासावाटे फुप्फुसांत जाऊन न्यूमोनिया होतो. खाणे बंद होणे, सतत तहान लागणे, श्वासोच्छ्‌वासास त्रास होणे, ताप येणे ही लक्षणे आढळतात. पिंजऱ्यात मोकळी व स्वच्छ हवा राहील याची काळजी घेतात. गोळीखादयाच्या भांडयातील पावडर, धूळ स्वच्छ करतात. रोगी प्राणी काढून टाकतात. गोळीपेंडीऐवजी हिरवे गवत देतात. रोगी प्राण्यांना पेनिसिलिनाचे इंजेक्शन देतात.

सर्दी : धूळयुक्त खादय, पिंजऱ्यातील ओलसरपणा, विषाणूमुळे हा रोग होतो. प्राण्यांना सतत शिंका येणे, नाकातून चिकट स्राव वाहणे, पुढील पायाने नाकपुडी सतत घासणे ही लक्षणे दिसतात. प्राण्यांना धूळयुक्त खादय देत नाहीत. पिंजऱ्यात मोकळी हवा ठेवतात. प्राण्यांची गर्दी होणार नाही, हे पाहतात. नाकात सोडण्याचे थेंबाचे औषध देतात.

मिक्झोमॅटोसिस : विषाणूंमुळे होणारा संसर्गजन्य रोग. माश्या किंवा डासांच्या माध्यमातून या रोगाचे जंतू प्राण्याच्या शरीरात प्रवेश करतात. नाक, डोळे, तोंड, कान, गुदद्वार व लैंगिक अवयवांना सूज येते. प्राणी मलूल होतात, हालचाल मंद होते ही लक्षणे दिसतात. माश्या व डास होऊ नयेत यासाठी प्रतिबंधक औषधांची फवारणी करतात. रोगी प्राणी काढून टाकतात.परदेशात रोगप्रतिबंधक लस उपलब्ध आहे.

संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Supplement LiveStock, Vol. VI, New Delhi, 1970.

             २. कुलकर्णी, अनिलकुमार, ससापालन, पुणे, १९८७.

पाटील, चंद्रकांत प. घाणेकर, वसंत मु.