डॉर्स्टेनिया : (कुल-मोरेसी). फुलझाडांपैकी (द्विदलिकित आवृतबीज) एका वंशाचे नाव. यामध्ये सु. १७० जाती असून त्या ⇨ओषधि आहेत व त्यांचा प्रसार उष्ण कटिबंधात आहे. मारबर्गमधील वैद्यकाचे प्राध्यापक थीओडोर डॉर्स्टेन यांचे नाव या वंशाला दिले आहे. थंड प्रदेशात यातील जाती बागेतील पादपगृहात (विशेष प्रकार संवर्धन करण्याच्या गृहात) लावतात. 

डॉस्टेंनिया कॉर्डिफोलिया : फुलोऱ्यासह वनस्पती.

या वनस्पतीत ⇨चीक असतो. मूलक्षोडावर [→ खोड] साधी पाने एकाआड एक व अखंड किंवा अल्पखंडित असतात. फुले एकलिंगी, परिदलहीन व एकाच झाडावर आणि विशिष्ट प्रकारच्या थाळीसारख्या कुंठित फुलोऱ्यावर [स्थालीकल्प → पुष्पबंध] येतात त्यामध्ये सपाट मांसल भागात (पुष्पासनात) ती अंशतः रुतलेली असतात. पुं-पुष्पापेक्षा स्त्री-पुष्पे अधिक खोलवर असतात. कधी एकाच फुलोऱ्यावर मध्ये स्त्री-पुष्पे व भोवती अनेक पुं-पुष्पे, तर कधी सर्वच, पुं-पुष्पे एका फुलोऱ्यावर येतात. फुलोऱ्याच्या कडेने लहान छदे असतात. पुं-पुष्पात केसरदले बहुधा दोन आणि स्त्री-पुष्पात किंजपुटात एकच कप्पा व किंजल्क विभागलेला असतो. कधी पुष्पासन पेल्यासारखे असते [→ फूल]. कृत्स्नफल (शुष्क एकबीजी फळ) पिकल्यावर पुष्पासनातून बाहेर फेकले जाते. इतर सर्वसामान्य लक्षणे ⇨मोरेसी अथवा वट कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात.

डॉ. काँट्राजर्व्हा, डॉ. कॅर्डिफोलिया या जाती सामान्यतः शोभेकरिता उद्यानांत लावलेल्या आढळतात. लांब देठावर (पुष्पबंधाक्षावर) येणारा छत्राकृती फुलोरा हे त्यांचे आणि इतर कित्येक जातींचे वैशिष्ट्य आहे. डॉ. ब्रासिलिएन्सिसच्या मूलक्षोडाचा उपयोग ब्राझीलमध्ये उत्तेजक, ज्वरनाशक, पौष्टिक, रेचक, मूत्रल (लघवी साफ करणारे), वांतिकारक (ओकारी करणारे) आणि आर्तवजनक (मासिक पाळी सुरू करणारे) म्हणून करतात. डॉ काँट्राजर्व्हाच्या सुक्या मूलक्षोडाचा उपयोग सिगरेटच्या तंबाखूला स्वाद आणण्यास करतात व मुळांचा फांट (थंड पाण्यात भिजवून काढलेला अर्क) कोस्टारीकामध्ये ज्वरावर देतात. डॉ. कॉव्हेक्सा ह्या काँगो येथील जातीचा उपयोग तेथील लोक जखमा बऱ्या होण्याकरिता करतात. मेक्सिको येथील डॉ. ड्रॉकेनाच्या पानांचा चहा माझटेक्स लोक अतिमद्यपानाचा परिणाम कमी करण्यास घेतात. डॉ. क्लेनी या आफ्रिकेच्या उष्ण भागातील ओषधीची लाल सुवासिक मुळे तेथील लोक अत्तराप्रमाणे वापरतात आणि पितरांच्या आत्म्यांना शांती लाभावी म्हणून अर्पण करतात. गुळण्यांकरिता, पोटात घेण्यास व बाहेरून लावण्याच्या मलमाकरिता मुळाचा उपयोग करतात. डॉ. इंडिका  या लहान भारतीय जातीची पाने भालाकृती, टोकदार व दातेरी असून तिला ऑगस्ट ते ऑक्टोबरात लांब दांड्यावर छत्राकृती, एकत्रलिंगी,सपाट आणि अंतर्गोल फुलोरा येतो पुष्पासनाला ५–१२ रेषाकृती दाते असतात.

परांडेकर, शं. आ.