शिंपर, आंड्रेआस फ्रांट्स व्हिल्हेल्म : (१२ मे १८५६ – ९ सप्टेंबर १९०१). जर्मन वनस्पतिपरिस्थितिवैज्ञानिक. खंडांची विभागणी पादपजातीय प्रदेशांत करण्यात पहिला मान त्यांना देण्यात येतो. उष्ण-कटिबंधीय वनस्पतींच्या परिस्थितिविज्ञानासंबंधीच्या संशोधनकार्याबद्दलही ते विशेष प्रसिद्ध आहेत.

शिंपर यांचा जन्म व शिक्षण स्ट्रॅसबर्ग येथे झाले. वडील प्रसिद्ध पुराजीववैज्ञानिक होते. १८७८ मध्ये शिंपर यांनी स्ट्रॅसबर्ग विद्यापीठाची पीएच्.डी. पदवी संपादन केली. त्यासाठी त्यांना ⇨ हाइंरिख अँताँ द बारी यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी अमेरिका, जर्मनी व स्वित्झर्लंड येथील विद्यापीठांत प्राध्यापक म्हणून कार्य केले (१८८०– १९०१).

शिंपर यांनी ब्राझील, वेस्ट इंडीज, जावा, पूर्व आफ्रिका, कानेरी बेटे आदी भागांचा अभ्यासदौरा करून उष्णकटिबंधीय वनस्पतींचे अन्वेषण केले. त्यांचा प्लॅंट जिऑग्राफी अपॉन अ फिजिऑलॉजिकल बेसिस (इं. शी., १९०३) हा ग्रंथ प्रसिद्ध असून त्याची वनस्पतिपरिस्थितिविज्ञानविषयक मूलभूत ग्रंथांत गणना होते. त्यामध्ये जगातील वनश्रींचा जलवायुवैज्ञानिक व वनस्पतिक्रियावैज्ञानिक आढावा घेण्यात आला आहे.

स्टार्च हा वनस्पतीतील ऊर्जासंचय असून प्रकाशसंश्लेषण क्रियेमध्ये तो निर्माण होतो, हे शिंपर यांनी १८८० मध्ये दाखवून दिले. वनस्पतिकोशिकेतील विशिष्ट पिंडांमध्ये स्टार्च कण तयार होतात हेही त्यांनी दाखविले (१८८१). त्या पिंडांना त्यांनी क्लोरोप्लास्ट (हरितकणू) हे नाव दिले. कोशिकेत आधीच असलेल्या हरितकणूंच्या विभाजनाने नवीन हरितकणू निर्माण होतात असा त्यांचा निष्कर्ष होता. ⇨ अपिवनस्पती, वेलातट वनश्री, पिपीली-परागित वनस्पती इत्यादींवरही त्यांनी संशोधन केले.

बाझेल येथे त्यांचे निधन झाले.

जमदाडे, ज. वि.