डायलेनिएसी : (करंबळ कुल). फुलझाडांपैकी (आवृत्तबीज, द्विदलिकित) गटिफेरेलीझ गणात (एंग्लर पद्धतीत परायटेलीझ) अंतर्भूत केलेले एक कुल. वंश सु. ११ व जाती २७५ (विलिस : १० वंश व ४०० जाती). याचा प्रसार सर्व उष्ण कटिबंधीय देश व विशेषतः इंडोमलाया व ऑस्ट्रेलिया प्रदेशांत असून बहुतेक वनस्पती वृक्ष किंवा क्षुपे (झुडपे), काही ⇨ महालता, क्वचित उपक्षुप (लहान झुडूप) किंवा बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणाऱ्या) ⇨ ओषधी  आहेत. पाने साधी, अखंड, कधी दातेरी, क्वचित कमीजास्त विभागलेली, एकाआड एक, क्वचित समोरासमोर, चिवट, कधीकधी केसाळ व खरबरीत असतात. फुले द्विलिंगी, क्वचित बहुयुतिक (एकलिंगी व द्विलिंगी एकत्र), एकलिंगी (विभक्त झाडांवर) अवकिंज असतात फुलोरा कुंठित किंवा परिमंजरीय वल्लरी [⟶ पुष्पबंध], क्वचित फूल एकटे व कक्षास्थ (बगलेत) असते. संदले पाच, सुटी, क्वचित तीन किंवा चार किंवा अधिक, सर्पिल व फुलाबरोबर वाढून सतत राहणारी प्रदले सुटी, पाच, क्वचित दोन ते सात व बहुधा लवकर गळून पडणारी केसरदले असंख्य सुटी किंवा तळाशी जुळलेली, किंजदले एक किंवा अनेक, सुटी किंवा कमीजास्त प्रमाणात जुळलेली [⟶ फूल] बीजके एक किंवा अनेक असून पेटिकाफळे किंवा मृदुफळे असतात. बीजे सपुष्क (गर्भाबाहेर अन्नांश असणारी) बहुधा अध्यावरणयुक्त असतात. या कुलातील सामान्य उपयुक्त वनस्पती करंबळ व करमळ आहेत. इमारती लाकूड व टॅनीन यांकरिता महत्त्वाच्या अनेक वनस्पती या कुलात समाविष्ट आहेत.

जमदाडे, ज. वि.