ॲनोनेसी : (सीताफल कुल). फुलझाडांपैकी द्विदलिकित वर्गातील ⇨ रॅनेलीझ या प्रारंभिक गणात या वनस्पति-कुलाचा समावेश केला आहे ⇨ मॅग्नोलिएसी कुलाशी याचे बरेच साम्य असून ⇨ निंफिएसी, ⇨ लॉरेसी वगैरे त्याच गणातील इतर कुलांशी आप्तभाव आहे. यातील सर्व वनस्पती क्षुपे (झुडपे), वृक्ष किंवा महालता असून एकूण वंश ८० व जाती सु. ८०० आहेत त्यांचा प्रसार उष्णकटिबंधात विशेषेकरून आहे. यातील वनस्पतींची पाने एकाआड एक, साधी, अखंड व अनुपपर्ण (उपपर्णे नसलेली) असतात [→पान]. फुले नियमित, अवकिंज, द्विलिंगी क्वचित एकलिंगी, एकटी किंवा कधी खोडावर अथवा फांद्यांवर झुबक्यांनी येतात. परिदलांची बहुधा तीन मंडले असून प्रत्येकात तीन-तीन सुटी दले असतात. पुष्पस्थली फुगीर व किंचित उभट असून त्यावर अनेक केसरदले व किंजदले सर्पिल पद्धतीने रचलेली असतात. केसरतंतू आखूड असून लांबट परागकोशांवर संधानी बरीच वाढलेली दिसते [→फूल]. किंजदले बहुधा सुटी, बीजक एक किंवा अधिक असून बियांतील पुष्क रेषाभेदित असते. फळ अनेक मृदुफळांचा किंवा शुष्क पेटिकाफळांचा घोस असतो [→फळ] कधी ती सर्वच एकत्र जुळलेली असतात. खोडात व पानांत तैलकोश व खोडातील द्वितीयक मध्यत्वचेत परिकाष्ठ (मुख्यत्वे अन्नाची ने-आण करणारा पेशीसमूह) व दृढसूत्रे (लांबट, बारीक व भित्ती जाड असलेल्या पेशींनी तयार झालेले धागे) एकाआड एक बनलेली आढळतात. ह्या कुलात अनेक उपयुक्त वनस्पती समाविष्ट आहेत : सीताफळ, रामफळ ही खाद्य फळे आहेत. हिरव्या चाफ्यास सुवासिक फुले येतात. हिरवा अशोक शोभेकरिता लावतात. उनोना पॅनोजा, मामफळ, कॉर्कवुड, साजेरी इत्यादींचे विविध उपयोग आहेत.

पहा :  वर्गीकरण वनस्पतींचे शारीर, वनस्पतींचे.

वैद्य, प्र. भ.