टिलिएसी : (परुषक कुल). फुलझाडांपैकी (आवृतबीज, द्विदलिकित) माल्व्हेलीझ गणातील (एंग्लर यांच्या पद्धतीप्रमाणे) सहा कुलांपैकी हे एक कुल असून हचिन्सन यांनी याचा अंतर्भाव टिलिएलीझ गणात केला आहे. एलिओकार्पेसी, ⇨माल्व्हेसी, ⇨स्टर्क्युलिएसी, बॉम्बेकेसी इ. कुलांशी याचे लक्षणांत साम्य आहे. एलिओकार्पेसीचा अंतर्भाव बेंथॅम व हूकर यांनी टिलिएसीत केला आहे. येथे तसे न करता टिलिएसीचा स्वतंत्रपणे विचार केला आहे, कारण एलिओकार्पेसीमध्ये श्लेष्मल (बुळबुळीत) पदार्थयुक्त घटक नसतात पण इतरांत असतात. तसेच परागकोशांना छिद्रे पडून पराग बाहेर पडतात. विलिस यांनी दोन्हीचे स्वतंत्रपणे वर्णन केले आहे.

टिलिएसी कुलात एकूण सु. पस्तीत वंश व तीनशे ऐंशी जाती (विलिस यांच्या मते ५० वंश व ४५० जाती) असून त्यांचा प्रसार मुख्यतः उष्ण कटिबंधात आहे. पाने साधी, उपपर्णयुक्त, एकाआड एक, अखंड किंवा खंडित व दातेरी असतात. फुले द्विलिंगी, क्वचित एकलिंगी, अरसमात्र, अवकिंज असून फुलोरा वल्लरी किंवा कुंठित परिमंजरी असतो. संदले पाच, सुटी किंवा जुळलेली, धारास्पर्शी प्रदले पाच, सुटी परिहित पण क्वचित नसतात. केसरदले बहुधा अनेक, कधी पाच किंवा दहा, सुटी किंवा फक्त तळाशी जुळलेली, कधी पाच ते दहा संघांत असातात कधी ती केसरधरावर असून परागकोश दोन असतात. किंजदले पाच ते दहा व किंजपुट ऊर्ध्वस्थ, दोन ते दहा कप्प्यांचा असून प्रत्येकात दोन वा अधिक अक्षलग्न बीजके असतात [⟶ फूल]. मृदुफळ किंवा शुष्कफळ (बोंडासारखे) असते. ताग, कडूचिंच, असोलीण, धामण, निचर्डी, गौळी, लिंडेन, फालसा इ. उपयुक्त वनस्पती याच कुलातील आहेत.

जमदाडे, ज. वि.