वृक्ष : ही संज्ञा मोठे झाड ह्या अर्थी सामान्यपणे वापरली जाते. बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारे), काष्ठमय, बहुधा बीजनिर्मिती करणारे, पूर्ण वाढीनंतर सु. सहा मी. अगर त्यापेक्षा कमी-जास्त उंच असणारे झाड अशी याची व्याख्या विज्ञानात केलेली आढळते. त्याला जमिनीत वाढणारी अनेक शाखायुक्त मुळे असतात जमिनीवर एक सरळ उभे वाढणारे जाडजूड⇨खोड असून त्यावर बहुधा अनेक फांद्या, त्यांवर लहानमोठी पाने, फुलोरे व फळे किंवा बीजे धारण करणारे शंकूसारखे अवयव असतात. काही वृक्षांचे खोड सरळ, बरेच उंच व जाड असते त्यामानाने त्यांच्या फांद्या लहान व जमिनीला समांतर असतात खालील (बुंध्याकडील) फांदी ही सर्वांत लांब असते आणि त्यानंतरच्या वरील फांद्या क्रमाक्रमाने खोडाच्या शेंड्याकडे लहान होत जातात त्यामुळे वृक्षाला त्रिकोणी, शंकू किंवा पिरॅमिडसारखा आकार येतो. काही झाडांच्या फांद्या खोडाच्या टोकापासून फुटतात सर्व बाजूंनी पसरतात आणि पूर्ण वाढीनंतर खोडाइतक्याच जाड बनतात त्यांवर त्यांच्यापेक्षा लहान (द्वितीयक) फांद्या, द्वितीयक फांद्यांवर त्यांच्यापेक्षा लहान (तृतीयक) फांद्या अशा क्रमाने फांद्या येतात. अशा काही वृक्षांचा आकार घुमटासारखा (उदा., आंबा, चिंच), तर कधी पसरट छत्रीसारखा (उदा., बाभूळ, गुलमोहर) दिसतो. काहींची खोडे शाखाहीन असून त्यांवर फक्त टोकास अनेक मोठ्या पानांचा झुबका असतो [उदा., नारळ, सुपारी→सायकस]. यांशिवाय आकार, आकारमान, वृद्धिरुप इ. लक्षणांच्या मिश्रणाने वृक्षांना विविध स्वरुपे प्राप्त झालेली आढळतात. अनेक वर्षे एकाच दिशेने वाहणाऱ्या वाऱ्याच्या दीर्घकालीन माऱ्याने वृक्षाला विद्रूप आकार येतो उदा., दिवि-दिवी. केळीला लहान वृक्षाचे रुप असले, तरी काष्ठाचा अभाव व अल्पायुष्य (फळे येऊन गेल्यावर केळ मरुन जाते) यामुळे तिला मोठी ⇨ओषधी  म्हणतात. परिस्थितीप्रमाणे उंची, पर्जन्य, वायू, प्रकाश इत्यादींतील मोठ्या फरकामुळे एकच वनस्पती प्रतिकूलतेमुळे मोठ्या झुडपाप्रमाणे वाढते व अनुकूलतेमुळे वृक्षरुप घेते. यामुळे झुडपे व वृक्ष यांमधील काटेकोर फरक नमूद करणे कठीण जाते. अशा वेळी वनस्पतीचे स्वरुप हे आकारमानापेक्षा अधिक महत्त्वाचे मानतात [→बॉनसाई].

वृक्षविज्ञान : भारतात वृक्ष ह्या संज्ञेचा उल्लेख अनेक प्राचीन ग्रंथात आला आहे. झाडे व मोठी झुडपे अशा अर्थी वैदिक वाड्‌मयात तिचा वापर केलेला आहे. ‘एकशुंगा’ (फांद्या नसलेल्या) व ‘विशाखा’ (फांद्या असणाऱ्या) अशी विशेषणे वनस्पतींना तेथे दिली आहेत. पाणिनीच्या अष्टाध्यायीत वृक्षेतर वनस्पतींना ओषधी म्हटले असून वृक्षांच्या यादीत अनेक विद्यमान परिचीत वृक्षांचा निर्देश केला आहे. पातंजल महाभाष्यात वृक्षांच्या भिन्न अंगांचा उल्लेख आढळतो. महाभारतात वनस्पतींच्या सहा प्रकारांत एक वृक्ष आहे. ‘यज्ञिय’ व ‘अयज्ञिय’ असे दोन उपप्रकार आणि ‘वन्य’ व ‘ग्राम्य’ असे स्थलवाचक उपप्रकारही वर्णिले आहेत. झाडे लावणे आणि उद्याने निर्माण करणे हे पुण्यकृत्य असल्याच्या निर्वाळा दिला आहे. बृहत्संहितेत पंचावन्नाव्या अध्यायाला वृक्षायुर्वेद ही संज्ञा असून त्यामध्ये कोणते वृक्ष कोठे लावावेत व घरबांधणीकरिता कोणत्या वृक्षाचे लाकूड वापरावे व न वापरावे, काही वृक्ष फांद्या लावून वाढवावे तर काहींचे कलम करावे वृक्षांचे स्थलांतर व पुनरारोपण इ. विविध माहिती आलेली आहे. शाड्‌र्गधर पद्धति (मध्ययुगीन) ह्या ग्रंथातील ‘वृक्षायुर्वेद’ (उपवनविनोद) या प्रकरणात उद्याननिर्मिती व वृक्षारोपणाचे महत्त्व सांगितले आहे, शिवाय वृक्ष चिकित्सेचे (रोग व उपचार यांचेही) वर्णन दिले आहे.

वृक्षांचे काही सामान्य आकार : (१) बाभूळ (छत्रीसारखे), (२) ॲश (घुमटी), (३) दिवी-दिवी (विद्रूप), (४) क्वेकिंग ॲस्पेन (त्रिकोणी).जगातील वृक्षांचा विचार केल्यास त्यांच्या प्रचंड विविधतेची कल्पना येते. त्यांच्या वाढीची पद्धत, प्रसार, उपयुक्तता आणि एकत्र वाढीमुळे बनलेली वने यांचा बराच अभ्यास झाला असून अधिक संशोधन चालू आहे. त्यांचे संवर्धन, अभिवृद्धी व देखभाल हा एक स्वतंत्र विषय असून त्याला ‘वृक्षसंवर्धन’ (आर्बोरिकल्चर) म्हणतात. वनस्पती या दृष्टीने सामान्य माहिती व शरीररचनेतील ऊतकांसंबंधीचा तपशील सैध्दांतिक वनस्पतिविज्ञानात येतो [ऊतक म्हणजे समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांचा समूह होय→ऊतके, वनस्पतींतील शारीर, वनस्पतींचे]. वनांचे व्यवस्थापन व तेथील उत्पादने हा विषय ⇨वनविद्या  यांत अंतर्भूत आहे.⇨फळबागेतील  फळझाडांच्या उपयोगाची माहिती फलकृषीत असते. मोठ्या उद्यानातील व घरासभोवती लावलेल्या वृक्षांची माहिती उद्यानविज्ञानाचा [→उद्याने व उपवने] विषय असून ⇨वृक्षोद्यानात  वृक्ष व क्षुपे (झुडपे) यांची शोभा व संशोधन यांसंबंधी कार्य चालू असते. 

शोभेकरिता व संरक्षणाकरिता अनेक ठिकाणी वृक्ष लावतात. जगभर पसरलेल्या जंगलांतून त्यांची निवड केली जाते. तथापि त्यांपैकी कित्येक विशिष्ट परिस्थितींतच वाढू शकतात. पिके, शेते आणि पाळीव प्राणी यांच्या संरक्षणाच्या दृष्टीनेही वृक्षारोपण केले जाते. काटेरी किंवा विषारी झाडे प्राण्यांपासून उपद्रव टाळण्यास लावतात. शेंड, विलायती शेर, विलायती चिंच, वनजाई संरक्षणाच्या दृष्टीने उपयुक्त असून योग्य त्या उंचीपर्यंत कापून त्यांचे कुंपण केलेले आढळते. वाऱ्यापासून कित्येक पिकांना संरक्षण देण्यास लहानमोठे वृक्ष लावतात. उन्हाच्या तापापासून संरक्षण देण्यास रस्त्यांच्या दुतर्फा लावण्यात येणारे वृक्ष शक्य तो सदापर्णी असणे आवश्यक असते. पक्षी, खारी, माकडे इत्यादींना अन्न व आसरा देण्यास व वन्यजीवन समृद्ध राखण्यास वृक्ष व वने उपकारक आहेत.

वृक्ष संप्रदाय : वृक्षांमध्ये अलौकिक किंवा अतिभौतिक शक्तीचा वास असून ते तिचे प्रतीक असतात, अशी समजूत असलेल्या लोकांत काही धार्मिक प्रथा आहेत, त्यांना वृक्ष संप्रदाय म्हणतात. वृक्षाची उभी सरळ वाढ, ठराविक वेळी होणारे त्यांचे पुनर्जनन आणि त्यांच्या शरीरांतील रसप्रवाह यांवरुन वृक्षांत गुप्त, पवित्र व वैश्विक प्रेरणा असाव्यात अशी समजूत आढळते. अनेक वृक्षांत चित्‌शक्ती असते ही समजूत जगभर आढळते. त्यामुळे काही वृक्षांची पूजा करणे, त्यांचा अवमान न होईल अशी काळजी घेणे, त्यांना चुकूनही इजा न होईल असा प्रघात ठेवणे हा प्रकार सर्वत्र आढळतो. भूतपिशाच्याने झपाटलेला निदान एखादा वृक्ष अनेक गांवात असतोच. हा संप्रदाय मोडण्याचे प्रयत्नही झालेले आहेत. [→वृक्षपूजा].

काही आदिवासी जमातींत वृक्षांना पूर्वज मानण्याची प्रथा आढळते. तसेच ते वृक्ष काही आत्म्यांचे किंवा चित्‌शक्तींचे अधिष्ठान असून ते आत्मे पुढे गर्भाशयात शिरुन भावी पिढीच्या स्वरुपात पुन्हा जन्म घेत असावेत, असेही मानतात. एखाद्या नवीन लावलेल्या वृक्षाच्या जीवनाचा संबंध घरात नव्याने जन्माला आलेल्या बालकाच्या जीवनाशी जोडला जातो. वाड्‌निश्चय, विवाह, राज्यारोहण यांसारख्या समारंभांच्या वेळी ज्या वृक्षावर त्या व्यक्तीचे जीवन अवलंबून असते असे मानतात, तो लावतात. चिंबलेल्या वृक्षाच्या भोकातून किंवा एकत्र बांधलेल्या दोन वृक्षामधून रुग्णाला आरपार नेतात. अशा सोपस्कारांमुळे रुग्णाचा आजार वृक्षात जातो किंवा वृक्षातील जैवशक्ती रुग्णात येते, असा समज आहे [→आदिवासी जडप्राणवाद]. भारतात कोठेकोठे दोन वृक्षांचा प्रतीकात्मक विवाह साजरा करतात आणि त्यामुळे वंध्यत्व संपून वंशवृद्धी होईल, अशी श्रद्धा बाळगली जाते. छोटा नागपूर व बंगाल येथील मुंडा जमातीतील लोक विवाहप्रसंगी वधुवरांस मोहाच्या किंवा आंब्याच्या वृक्षास दोऱ्याने बांधतात. कर्नाटकात द्राविड लोकांत विवाहमंडपाला लावलेला एक खांब मामाने ⇨उंबराच्या  वृक्षापासून तोडून आणलेल्या फांदीचा असतो. पंजाबातील विवाहविधीला ⇨शमी  वृक्षाची फांदी आवश्यक असते. काही जमातींत विधवेशी विवाह करण्यापूर्वी अविवाहित पुरुषाला वृक्षाशी विवाह करुन तो तोडून टाकावा लागतो, कारण त्यामुळे तो विधुर ठरतो अशी समजूत आहे. हिंदू समाजात विधुराने तिसरा विवाह तुळशीबरोबर करुन मग अन्य वधूशी करण्याची पद्धत आहे. विवाहसमारंभाच्या वेळी घराच्या दरवाजांना केळीचे खुंट बांधण्याची पद्धत हिंदू लोकांत आहे. गुढी पाडव्याच्या दिवशी कडू निंबाची पाने गुढीला बांधण्यासाठी व खाण्यासाठी वापरतात.⇨बेलाची  पाने श्रीमहादेवाच्या पूजेत वापरण्यास काढण्यापूर्वी त्या वृक्षास वंदन करुन मग झाडावर चढतात. 

वृक्षांचे महत्त्व ध्यानात घेऊन त्यांचे संरक्षण करण्यास व सातत्य राखण्यास हल्ली वृक्षमित्र मंडळे स्थापन झालेली असून शासनाकडूनही आवश्यक ते वृक्षसंरक्षक कायदे करण्यात आलेले आहेत. शक्यतो सार्वजनिक जागेतील वृक्ष व त्यांचे भाग परवानगीवाचून तोडू नयेत असा दंडक आहे. इतकेही करुन एखादा वृक्ष किंवा अनेक वृक्ष आवश्यक वाटल्यास मुळांसकट पूर्णपणे काढून अन्यत्र व्यवस्थित लागवड करण्याचे तंत्रही उपलब्ध झाले आहे. वृक्षांचे स्थानांतर व पुनरारोपण हल्ली यशस्वी रीत्या केले जाते. बहुतेक अविकासित देशांत दरवर्षी नूतन वृक्षारोपण दिवसही पाळण्यात येतो. वृक्षांमुळे प्रदूषण कमी होते व पर्जन्यमान चांगले राहते.

पहा : कॉनिफेरेलीझ खोड चंदन बाल्सा मॅहॉगनी लिग्नम व्हिटी वड शोला वनविद्या साग साल-२.

संदर्भ : 1. Bailey, L. H. The Standard Cyclopedia of Horticulture, Vol. III, New York, 1961.

           2. Hill, A. F. The Economic Botany, Tokyo, 1952.

           3. McCann, C. 100 Beautiful Trees in India, Bombay, 1959.

           4. Santapau, H. Common Trees, New Delhi, 1966.

           5. Zim, H. S. Martin, A. C. Trees,     New York, 1956.

           ६. काशीकर, चिं. ग. भारतीय वनस्पतींचा इतिहास, नागपूर,१९७४.                                                   

परांडेकर, शं. आ.

शरद ऋतुतील जपानी वृक्ष. हे उंच सरळ वाढणारे शंकुधारी वृक्ष 'जपानी सिडार ' आहेत वड वृक्ष. याच्या काही वायवी मुळांमुळे (पारंव्यांमुळे) द्वितीय खोडे बनली आहेत
खाऱ्या पाण्यात साधारण भरती - ओहोटीच्या पट्टयात वाढनाऱ्या कच्छ वनस्पती. बाल्ड सायप्रस वृक्ष. दलदली या वृक्षाची काही मुळे खालून वर हवेकडे वाढतात व खालील भागाला हवेचा पुरवठा करतात
उन्हाळ्यातील ॲश वृक्ष शरद ऋतूमधील ॲश वृक्ष
बहरलेले निळे गुलमोहर वृक्ष (अफ्रीका) लॅबर्डी पॉप्लर वृक्षांची रांग (काश्मीर). हे वृक्ष रस्त्यांच्या दुतर्फा, व मैदानाच्या कडेने लावतात
फांद्या पसरलेला व मोठ्या बुंध्याच्या शाल्मली (कपोक) वृक्ष (जमेका) बॉटल वृक्ष (ऑस्ट्रेलिया)
प्रचंड व्यापाचे व सर्वात जुने 'बिग ट्री' (जायंट सेक्वोया) म्हणून प्रसिद्ध असलेले वृक्ष (कॅलिफोर्निया). यांपैकी काही वृक्ष हजारो वर्षापूर्वीचे आणी ६० मीटरपेक्षा अधिक उंचीचे आहेत