पाषाणभेद : (हिं., गु. पाखानभेद सं. अश्मभेदक, शैलभेद लॅ. सॅक्सिसफ्रागा लिग्युलॅटा कुल-सॅक्सिफ्रागेसी). सु. 30 सेंमी. उंचीची ही जाडजूड  ⇨ ओषधी समशीतोष्ण हिमालयात (काश्मीर ते भूतान, २,१७० – ३,१०० मी. उंचीमध्ये) व खासी टेकड्यांत १,२४० मी. उंचीपर्यंत आढळते.

पाषाणभेद: (१) संपूर्ण वनस्पती (२) फुलाचा उभा छेद (३) अपक्व फळ (४) बी.

ही ओषधीय वनस्पती फुलझाडांच्या ज्या वंशात सॅक्सिफ्रागा अंतर्भूत आहे त्यामध्ये एकूण सु. ४०० जाती असून त्यांचा प्रसार उ. समशीतोष्ण व उ. ध्रुवाजवळचा प्रदेश, अँडीज पर्वत, मुख्यतः आल्पीय प्रदेश येथे आहे. भारतात सु. ५० जाती आहेत. त्या सर्व लहान, बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणाऱ्या) ओषधी आहेत. काही शास्त्रज्ञांनी बर्गेनिया वंशात दहा जाती अंतर्भूत केल्या आहेत व त्यांपैकी भारतात तीन आहेत. सॅक्सिफ्रागा हे वंशनाम त्यांच्या खडकांच्या भेगांत वाढण्याच्या प्रवृत्तीवरून दिले असावे तसेच मुतखडानाशक हा गुण त्यांच्यात असल्यामुळेही ते नाव पडले असावे. मराठीतील पाषाणभेद व संस्कृतातील शैलभेद, अश्मभेदक इ. नावांचा उगम वरीलप्रमाणेच आहे. खडकाळ जागी बहुतेक जाती वाढत असल्याने त्यांची काही शारीरिक लक्षणे  ⇨ मरुवनस्पतीप्रमाणे आहेत. पाषाणभेद ही वनस्पती खडकास चिकटून वाढते हिचे जाडजूड खोड (मूलक्षोड) जमिनीत असते व त्यापासून जमिनीवर उपपर्णहीन साधी, मूलज (मुळातून आल्यासारखी), मोठी (५ – ३० सेंमी. व्यासाची), गोलसर व तळाशी काहीशी हृदयाकृती आणि केसाळ किनारीची पाने येतात. शरद ऋतूत ती मोठी व लालबुंद होतात. जून पानांवर फार कमी लव असते. देठाचा तळ आवरक (खोडाला वेढणारा) असतो पानांतून चुन्याचा द्रव (कॅल्शियम हायड्रॉक्साइड) लवणाऱ्या ग्रंथी [→प्रपिंडे] असतात. मार्च ते मेमध्ये पांढरी, लालसर किंवा जांभळट, पंचभागी, द्विलिंगी व घंटाकृती फुले पानांच्या झुबक्यातून वर येणाऱ्या दांड्यावर लोंबत्या मंजरीत येतात. फळे (बोंडे) काहीशी गोलसर व लोंबती असून सपुष्क (गर्भाबाहेर अन्नांश असलेल्या) बिया अनेक असतात. ह्या वनस्पतीची सुकलेली मुळे किंवा मुळांचे तुकडे बाजारात ‘पाषाणभेद’ या नावाने मिळतात. ते कठीण, उदी, खरबरीत व सुरकुतलेले असून त्यांवर उपमुळांच्या खाचा असतात ते तुकडे तुरट व सुगंधी असतात. मुतखड्यावर हे तुकडे दिल्यास लघवीच्या वाटे खडे शरीराबाहेर निघून जातात. मुलांना खर पडते त्यावर दुधात तुकडा उगाळून देतात. मूळ पौष्टिक असून ज्वर, अतिसार, कफ व फुप्फुविकार यांवर गुणकारी असते. गळवे व नेत्रशोथ (डोळ्यांची दाहयुक्त सूज) यांवर मुळाचा लेप करतात. पाषाणभेदामुळे आव कमी होऊन आतड्यास जोम येतो परंतु मलावरोध होतो. सिंधमध्ये मुलांना दात येताना लाळ गळते व तोंड येते, त्यावरही हे मूळ उगाळून मधाबरोबर देतात. इंडोचायनात पाने खलात कुटून त्यांचा रस काढून तो कानदुखीवर वापरतात. हिच्या मुळात गॅलिक अम्ल, टॅनिक अम्ल (१४.२%), ग्लुकोज (५.६%), श्लेष्मल (बुळबुळीत) द्रव्य, मेण इ. पदार्थ असतात. सॅक्सिफ्रागा ओडोंटोफायला ही जाती हिमालयात व सॅ. सार्मेटोजा ही जाती आसामात आढळते तिच्या पानांच्या व फुलांच्या सौंदर्यामुळे तिला बागेत लोंबत्या कुंड्यात स्थान मिळाले आहे. बर्गेनिया सिलिएटा ही समशीतोष्ण हिमालयातील जाती पाखानभेद या हिंदी नावाने प्रसिद्ध आहे. सॅ. डायव्हर्सिफोलिया (काश्मीर ते भूतानमध्ये कुमाऊँत ३,०० -५,००० मी. उंचीमध्ये आढळणाऱ्या) या जातीत टार्टारिक व मॅलिक अम्ले असून तिचा औषधी उपयोग करतात.पहा : सॅक्सिफ्रागेसी. जमदाडे, ज.वि. परांडेकर, शं.आ.           “