सॅपोटेसी : (मधुक कुल, मोह कुल). बकुळ, मोह, चिकू इ. परिचित व उपयुक्त वनस्पतींचा समावेश असणाऱ्या फुलझाडांच्या [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] एका कुलाचा समावेश एबेनेलीझ (टेंबुर्णी) या गणात करतात. ⇨ जॉन हचिन्सन यांनी एबेनेलीझमध्ये ⇨एबेनेसी व सॅपोटेसी या कुलांचा समावेश केला आहे. ए. बी. रेंडेल यांनी (आडोल्फ एंग्लर यांच्याप्रमाणे) ह्या गणात दोन उपगण (सॅपोटिनी व डायॉस्पिरिनी) आणि एबेनेसी, सॅपोटेसी, स्टायरॅकेसी (सिंहल कुल) वसिंप्लोकेसी (लोध्र कुल) ही चार कुले घातली आहेत. सॅपोटेसीला ‘झॅपोटेसी’ असेही नाव आहे परंतु ते सर्वमान्य नाव नाही. एबेनेलीझ गणाचा उगम व विकास बहुधा ⇨जिरॅनिएलीझ (भांड गण ) किंवा ⇨एरिकेलीझ (संतानक गण) यांच्याबरोबर ⇨प्रिम्युलेलीझ गणापासूनझाला असावा असे मानतात. एच्. एफ्. कोपलँड यांच्या मते थीएलीझपासून [चहा गण थीएसी कुल ⟶ चहा] याचा उगम झाला असावा परंतु याबाबत मतैक्य नाही.

सॅपोटेसी कुलात सु. ४० प्रजाती व ६०० जाती (जे. सी. विलिसयांच्या मते ३५ – ७५ प्रजाती व सु. ८०० जाती ) असून त्या बहुतेक बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी) झुडपे [⟶ क्षुप] व वृक्ष आहेत.त्यांच्या खोडांत, पानांत व फुलाफळांत पांढरा ⇨ चीक भरलेल्या संधियुक्त नलिका किंवा वाहिन्या असतात. उष्णकटिबंधात त्यांचा प्रसार सामान्य असून भारतात सु. ८ प्रजाती व ३० जाती आढळतात. यांच्या पानांवर व खोडांवर द्विखंड व एककोशिक (एकपेशीय) केस असतात.पाने एकाआड एक, क्वचित समोरासमोर, जाडसर, गर्द हिरवी व साधी फुलोरा [गुलुच्छ किंवा वल्ल्रीसारखा ⟶ पुष्पबंध] पानांच्या बगलेतून किंवा जून खोडावर व फांद्यांवर असून फुले लहान, द्विलिंगी, अरसमात्र व अवकिंज [⟶ फूल] प्रदले (पाकळ्या) ४ -१२, जुळलेली, एक किंवा दोन मंडलांत, शिवाय कधीकधी [⟶ बकुळ] त्यांवर उपांगे असतात पाकळ्यांच्या खालच्या मंडलात (संवर्तात) संदले पाकळ्यांइतकी सुटी, क्वचित तळास जुळलेली व कधी दोन समभागी मंडलात असतात. केसरदले (पुं-केसर) सुटी, अपिप्रदल संलग्न (पाकळ्यांस चिकटलेली), ४ ते ५ च्या गटाने, २ ते ३ मंडलांत असून क्वचित वंध्य केसरदलेही असतात यांचे ⇨परागण (परागसिंचन) कीटकांमार्फत होते. किंजदले (स्त्री-केसर) ४-५ जुळलेली किंजपुट ऊर्ध्वस्थ व त्यात दलांइतके कप्पे असून प्रत्येकात एकच अधोमुख एकावरणी बीजक (अपक्व बीज) अक्षाला चिकटून असते. फळ मृदू अथवा कठीण (आठळी फळासारखे) परंतु एकबीजी बी सपुष्क (गर्भाबाहेर अन्नांश असलेले) असते. या कुलातील आरंभी उल्लेख केलेल्या वनस्पतींपैकी चिकू, मोह, पल्ल, ताराफळ इ. उपयुक्त वनस्पतींपासून गटापर्चा, चघळण्याचा गोंद (च्युईंग गम), खाद्य फळे, मद्य, इमारती लाकूड इत्यादींचे उत्पादन होते. त्यांपैकी काही झाडे उद्यानांत शोभेकरिता व रस्त्यांच्या दुतर्फा सावलीकरिता लावतात. बकुळीच्या नावावरून या कुलाला ‘ बकुल कुल’ असे म्हटलेले आढळते.

पहा : ऊद टेंबुर्णी बिशकोप्रा.

संदर्भ : 1. Lawrence, G. H. M. Taxonomy of Vascular Plants, New York, 1965.

2. Mitra, J. N. An Introduction to Systematic Botany and Ecology, Calcutta, 1964.

3. Rendle, A. B. The Classification of Flowering Plants, Vol. II, Cambridge, 1963.

परांडेकर, शं. आ. पाटील, शा. दा.