आपटा: (वनराज, कांचन हिं. अष्टा, गुरीयाल, कचनाल क. बण्णे लॅ. बौहीनिया रॅसिमोजा कुल-लेग्युमिनोजी). ð कांचन, ð रक्तकांचन इत्यादींच्या वंशातील व ð अशोक, ð अंजन व ð बाहवा यांच्या उपकुलातील (सीसॅल्पिनिऑइडी) हे शिंबावंत (शेंगा येणारे), भरपूर व लोंबत्या फांद्यांचे वेडेवाकडे वाढणारे, लहान झाड श्रीलंका, चीन, भारत इ. देशांत सर्वत्र पानझडी जंगलात आढळते बागेत शोभेकरिता लावतात. याची अर्धवट विभागलेली साधी पाने रूंदीला अधिक (१·५.५ x २·२·६·५) वरून हिरवी पण खालून पांढरट असतात. बौहीन नावाच्या दोन वनस्पतिवैज्ञानिक बंधूंच्या (झां व गास्पार) नावावरून बौहीनिया हे प्रस्तुत वनस्पतीचे वंशवाचक लॅटिन नामाभिधान झाले आहे. याची फुले लहान, पांढरी किंवा पिवळसर असून मार्च ते जूनमध्ये येतात. संवर्त महाछदासारखा दिसतो पाकळ्या पाच व सुट्या असून केसरदले दहा असतात [→ फूल] शिंबा लांब (१५·२५ x १·५ – २·२ सेंमी.), साधारण चपटी व वाकडी बिया १२-२० चपट्या व लंबगोल असतात.
‘दसऱ्याचे सोने’ म्हणून हिंदू लोक याला पवित्र मानतात. कांचनाच्या वंशातील अनेक जातींच्या झाडांची पाने त्यांच्या सारखेपणामुळे सोनेच मानतात. हे झाड औषधी आहे. नाळगुद रोगावर सालीचा रस गाळून दोन चमचे पोटात देतात, अथवा पाला, खरवतीची पाने वा माका एकत्र वाटून काढलेल्या रसात कुड्याचे मूळ उगाळून देतात. मुलांच्या आगपैणीवर आपट्याचा पाला दह्यात वाटून लावतात. आपट्याच्या सालीपासून टॅनीन, धागे व गोंद मिळतात.
आपटा याच नावाची कांचनाची एक जाती (बौहीनिया टीमेंटोजा) जंगलात व बागेत दिसते तिला ‘पिवळा कांचन’ म्हणतात.
पहा : लैग्युमिनोजी कांचन
परांडेकर, शं. आ.