नागरी : (नागनी क. बोब्बी, पान्ने, सुर्व्हन्ने इं. मलबार पून, पून ट्री, सिरपून ट्री लॅ. कॅलोफायलम टोमँटोजम, कॅ. एलेटम कुल-गटिफेरी). ⇨ उंडणीच्या वंशातील हा सु. ४५ मी. उंच व ४·५ मी. घेर असलेला सदापर्णी वृक्ष त्रावणकोर, तिनेवेल्ली, निलगिरी व उ. कारवार येथे आणि कोकणपट्टीपासून दक्षिणेकडे व श्रीलंकेत आढळतो. याची साल पिवळट असून तीवर लांब नागमोडी उभ्या भेगा असतात. कोवळ्या भागांवर तांबूस लव असते लॅटिन नावातील जातिवाचक शब्द त्यावरून आला आहे. फांद्या चौधारी असतात. पाने साधी, संमुख (समोरासमोर), मोठी (पण उंडणीपेक्षा लहान), चिवट, लांबट व चकचकीत असतात. फुले पांढरी, लहान, कक्षास्थ (बगलेत) किंवा अग्रस्थ (टोकाच्या) मंजरीवर किंवा परिमंजरीवर मार्च-मेमध्ये येतात. फुलांची संरचना व इतर सामान्य लक्षणे ⇨ गटिफेरी कुलात (कोकम कुलात) व उंडण यांत वर्णिल्याप्रमाणे. केसरदले अनेक व तळाशी जुळलेली [→ फूल] फळे उंडणीपेक्षा लहान, टोकदार, गुळगुळीत, अश्मगर्भी (आठळी फळे) व पावसाळ्याच्या शेवटी येतात बी एकच असते. लाकूड लालसर, मध्यम कठीण असून त्याला चांगली झिलई होते. घरबांधणी, पूलबांधणी, पिंपे, डोलकाठ्या, रेल्वे डब्यातील सजावटी सामान इत्यादींसाठी ते उपयुक्त असून व्यापारी भाषेत त्याला ‘पून’ म्हणतात. बियांचे तेल दिव्याकरिता उपयुक्त असते.

महाजन, मु. का.