पेंटास कार्निया : [गु. मेयस लॅ. (दुसरे नाव) पेंटास लॅन्सिओलॅटा कुल-रूबिएसी]. ही एक लहान (३०—६० सेंमी. उंच) सरळ किंवा आडव्या पसरणाऱ्या फांद्यांनी वाढणारी, नाजूक झुडपासारखी वनस्पती असून मूळची आफ्रिकेचा उष्ण प्रदेश, मॅलॅगॅसी (मादागास्कर) व अरेबिया येथील आहे तथापि आता बागेतून शोभेकरिता सर्वत्र लावतात. फांद्या मऊ (ओषधीय) व लवदार पाने साधी, समोरासमोर, फार लहान देठाची, भाल्यासारखी, आयत (२.५—१५×५ सेंमी.) व टोकदार असून उपपर्णे अनेक केसासारख्या भागांची बनलेली असतात. फुलोरा मोठा (गुलुच्छ) व शेंड्यांकडे असून त्यावर बहुधा नेहमी फिकट जांभळट रंगाची २.५ सेंमी. लांब फुले येतात. संदले व प्रदले ४—६. पुष्पमुकुट-नलिका तोंडाशी फुगीर व केसाळ केसरदले ४—६ व आखूड ऊर्ध्वस्थ किंजपुट दोन कप्प्यांचा [→ फूल] इतर सामान्य लक्षणे

⇨रूबिएसी कुलात (कदंब कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात. फळात (बोंडात) अनेक बिया असतात. नवीन लागवड बी किंवा कलमे लावून करण्यात येते. या वनस्पतीचे पांढऱ्या, गुलाबी, अंजीरी इ. रंगांच्या फुलांचे प्रकार आहेत. या वनस्पती खतावलेली सकस दुमट व निचऱ्याची जमीन आवश्यक असते. (चित्रपत्र ५८).

हर्डीकर, कमला श्री.