बाभूळ : (हिं. बभूल गु. बावळ क. जाली सं. बब्बूल, अतिबीज, अजभक्षा इं. इंडियन गम अरेबिक ट्री लॅ. ॲकेशिया अरेबिका कुल-लेग्युमिनोजी). हा मध्यम आकारमानाचा काटेरी वृक्ष सिंध व महाराष्ट्र येथील आणि आफ्रिकेच्या उष्ण भागातील असून भारतात त्याचे इतरत्र स्वाभाविकीकरण झाले आहे (नैसर्गिक रीत्या वाढ होऊ लागली आहे). शिवाय तो श्रीलंका, अरबस्तान, ईजिप्त, वझीरीस्तान, बलुचिस्तान येथेही आढळतो. उष्ण व रुक्ष प्रदेश आणि काळ्या जमिनीतली विरळ बने यांत तो विशेषेकरून वाढतो. याची साल काळी, भेगाळ, कठीण व आतून पिंगट असते फांद्या काटेरी उपपर्णी (पानांच्या तळातील उपांगांचे बनलेले) काटे पांढरे, लांब व सरळ पाने संयुक्त, द्विगुणपिच्छाकृती (दोनदा विभागलेली) कोवळे भाग लवदार मुख्य बारीक व वेड्यावाकड्या असून त्यांवर फिकट पिंगट किंवा करड्या रंगाचे ठिपके असतात. उपपर्ण फक्त काटेरी पाने साधारणत: बाभूळ व शिकेकाईप्रमाणे दले ४-८जोड्या दलके १॰-२॰जोड्या गोलाकार फुलोऱ्या वर सुगंधी व पिवळी जर्द फुले जानेवारी ते मार्चमध्ये येतात. फळ शिंबा, फुगीर, पिंगट, मांसल, सु. ५-९ सेंमी. लांब, दोन्ही टोकांस निमुळते व तडकणारे. फळांचा मोसम पावसाळ्यात असतो. फुलांपासून सुगंधी अर्क काढतात फ्रान्समध्ये त्याकरिता लागवड केली जाते. सालीपासून व शिंबांपासून रंग व टॅनीन मिळते डिंक बाभळीपेक्ष चांगला असतो. पक्व झालेल्या शेंगांत २३% टॅनीन असते.
भारतात बाभळीच्या सालीचा तिच्यातील टॅनीनाकरिता मोठ्या प्रमाणावर उपयोग करण्यात येतो. शेंगापासूनही १२- २० % टॅनीन मिळते. कातडी कमावण्यास हे फार उपयोगात आहे. शेंगेतील टॅनीनामुळे कातडे मऊ होते व त्याला चांगला रंग येतो; परंतु सालीतील टॅनीनामुळे कातडे कडक पण टिकाऊ होते व त्याला गडद रंग येतो. कोळसा व राख यांचा दंतमंजनात उपयोग करतात.बारीक फांद्यांपासून निघणाऱ्या धाग्यापासून साधारण प्रकारच्या दोऱ्या बनवितात; कोवळ्या फांद्या दात घासण्यास वापरतात.,त्यामुळे हिरड्यांना व दातास बळकटी येते.
वेडी बाभूळ :(हिं. विलायती किंकर, विलायती बभूल गु. विलायती बावळ इं. जेरुसलेम थॉर्न लॅ. पार्किसोनिया ॲक्युलियाटा). मूलत: अमेरिकेच्या उष्ण कटिबंधातील हे लहान, शिंबावंत (शेंगा येणारे) काटेरी क्षुप (झुडूप) भारतात बहुधा सर्वत्र रुक्ष जागी स्वाभाविकपणे आढळते अनेकदा हे ओहोळाच्या काठाने आढळते. संकेश्वर, सागरगोटा (गजगा) व वाकेरी इत्यादींच्या लेग्युमिनोजी कुलातील सीसॅल्पिनिऑइडी उपकुलातील (संकेश्वर उपकुलातील) असल्याने अनेक लक्षणे त्यांच्यासारखी आहेत. याची उंची सु. ३ मी. काटे जाड, आखूड व दलांच्या तळाशी असून ते पर्णाक्षाच्या (संयुक्त पानाच्या मध्यशिरेच्या) रूपांतराने बनलेलेले असतात. दले १-३जोड्या (१५ – ३॰ सेंमी.) असून प्रत्येक दलाची मध्यशीर चापट, पसरट व हिरवी असते. दलके फार लहान व पुष्कळ असतात. मंजऱ्या कक्षस्थ व त्यांवर पिवळी फुले जानेवारी ते मार्चमध्ये येतात. शिंबा (७.५ – ९ x ॰.६ – ॰.९सेंमी.) साधारण सपाट पण गाठाळ, टोकदार आणि बिया गर्द पिंगट व ४ – ७ असतात. कुंपणाकरिता व शोभेकरिता ही झाडे लावतात. नवीन लागवड बिया व कलमे लावून करतात. कोवळ्या फांद्या शेळ्या-मेंढ्यांना खाऊ घालतात. वनस्पतीचे सर्व भाग ज्वरनाशक आणि पाने स्वेदकारी (घाम आणणारी) व गर्भपातक असतात. बिया खाद्य असून त्यांत अल्ब्युमीन व ग्लुटेलीन ही प्रथिने असतात. शिवाय त्यांस सु. २८% श्लेष्मल (बुळबुळीत) द्रव्य असते बियांपासून १.६५% सोनेरी रंगाचे स्थिर तेल मिळते. लाकूड पांढरट ते जांभळट तपकिरी, कठीण व जड असते. ते जळणासाठी व कोळसा बनविण्यासाठी वापरतात. सालीपासून पांढरा, आखूड पण ठिसूळ धागा मिळतो त्याचा उपयोग कागदनिर्मितीसाठी करतात. ल्युसीना वंशातील बऱ्याच जातींना सुबाभूळ अथवा कुबाभूळ म्हटले जाते परंतु त्यांचा वरील बाभळीशी वनस्पतिविज्ञानाच्या दृष्टीने जवळचा नातेसंबंध नाही. [⟶ सुबाभूळ].
पहा : लेग्युमिनोजी.
संदर्भ : 1. Cooke, T. Flora of the Presidensy of Bombay, Vol. I, Calcutta, 1958,
2. C.S.I.R. The Wealth of India, Raw Materials, Vol VII, New Delhi. 1966.
परांडेकर, शं. आ.