मिरिकेसी : (कट्‌फल कुल). फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] द्विदलिकित (बियांत दोन दलिका असलेल्या) वनस्पतींच्या वर्गातील एक लहान कुल. याचा समावेश ए. एंग्लर, के. प्रांट्‌ल व जे. हचिन्सन यांच्या पद्धतीत मिरिकेलीझ गणात करतात तर काही शास्त्रज्ञ ⇨ जुग्लँडेलीझमध्ये (अक्रोड गणात) करतात. याचा प्रसार सर्वत्र असून यामध्ये तीन प्रजाती व सु. पन्नास जाती (ए. बी. रेंडेल यांच्या मते एक प्रजाती व साठ जाती) आहेत. ह्या वनस्पती सुगंधी वृक्ष किंवा झुडपे असून त्यांना एकाआड एक किंवा काहीशी समोरासमोर, साधी, अखंड किंवा दातेरी अथवा थोडीफार खंडयुक्त व ताठर पाने असतात पानांत पिवळट सुगंधी राळप्रपिंडे (ग्रंथी) आढळतात उपपर्णे (पानाच्या तळाशी असलेली उपांगे) कधी कधी असतात. फुलोरे विविध, लहान, पानांच्या बगलेत, साधे किंवा संयुक्त व लोंबत्या कणिश प्रकारचे असतात [⟶ पुष्पबंध]. फुले, एकलिंगी, एकाच किंवा विभक्त झाडांवर असून त्यांना छदे (तळाजवळची उपांगे) असतात पण परिदले नसतात पुं-पुष्पात कधी कधी छदाशिवाय किंवा त्याऐवजी दोन छदके बहुधा चार पण कधी २–२० केसरदले व त्यांचे तंतू कधी जुळलेले स्त्री-पुष्पांत २–४ छदके, दोन जुळलेली किंजदले, आखूड किंजल व दुभंगलेला किंजल्क इ. असतात. ऊर्ध्वस्थ किंजपुटात एक कप्पा व त्यात एकच सरळ ऊर्ध्वमुखी बीजक असते [⟶ फूल]. अश्मगर्भी (आठळीयुक्त) फळावर मेणचट उंचवटे आणि त्यात बी एकटे बियात तेल व प्रथिनयुक्त पुष्क (गर्भाबाहेरचा अन्नांश) असतो. मिरिका, गेल व कॉम्टोनिया ही या कुलातील प्रजातींची नावे असून मिरिका प्रजातीतील काही जातींचे जीवाश्म (शिळाभूत अवशेष) तृतीय (सु. ६·५ ते १·२ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळातील खडकांत उ. ध्रुवापर्यंतच्या प्रदेशात आढळले आहेत. कट्‌फल अथवा ⇨ कायफळ मिरिका नागी ही एकच उपयुक्त जाती भारतात आढळते. कॉम्टोनिया उ. अमेरिकेच्या पूर्व भागात आढळते आणि गेलच्या जाती उ. अमेरिका, वायव्य यूरोप व ईशान्य सायबीरिया येथे आढळतात. या दोन्ही प्रजातींचा अंतर्भाव काही शास्त्रज्ञ मिरिका प्रजातीतच करतात. बॉर्गमिर्टल (गेल बेल्जिका = मिरिका गेल) दलदलीत आढळते. 

पहा : जुग्लँडेलीझ.   

संदर्भ : 1. Lawerence, G. H. M. Taxonomy of Vascular Plants, New York, 1965.

             2. Rendle, A. B. The Classification of Flowering Plants, Vol. II, Cambridge, 1963.

परांडेकर, शं. आ.