बेलाडोना : (हिं. अंगुरशफा, साग अंगुर इं. इंडियन ॲट्रोपा, इंडियन बेलाडोना लॅ. ॲट्रोपा ॲक्युमिनाटा   कुल – सोलॅनेसी ) . ह्या इंग्रजी  नावाने ओळखल्या जाणाऱ्य वनस्पतीच्यावंशात एकूण चार नाती असून त्यापैकी एक (ॲ. ॲक्युमिनाटा) भारतात जंगली अवस्थेत आढळते दुसरी (ॲ. बेलाडोना) मूळची मध्य व दक्षिण युरोप आणि आशिया मायनर येथील असून अमेरिकेची संयुक्त संस्थाने व भारत येथे लागवडीत आहे हिच्यापासून काढलेल्या औषधी द्रव्याबद्दल ती पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. मात्र भारतीय वैद्यकात हिचे महत्त्व आढळत नाही. दोन्ही जाती विषारी व औषधी दृष्ट्या महत्त्वाच्या असून त्यांच्यात बरेच साम्यही आहे.

इंडियन बेलाडोना

ॲट्रोपा ॲक्युमिमाटा : ही भारतीय जाती सु. ९०-१५० सेंमी. उंच, अनेक फांद्या असलेली व पुष्कळ वर्षे जगणारी ⇨औषधी  बलुचिस्तान, मुशफराबाद, कनवार (२,६३५ मी उंचीवर) आणि कश्मिरात इतरत्र (सु. २,०००-३,५०० मी. उंचीपर्यंत) आढळते शिवाय ही तेथे लागवडीतही आहे. हिचे प्रमुख मूळ व इतर उपमुळे जाडजूड व मांसल असून ती काष्ठमय, तपकिरी रंगाची, सु. १५ग१.५ सेंमी. असतात व त्यावर आडव्या बारीक खुणा असतात. शरद  ऋतूत भूमीवरील भाग वाळून गेल्यावर जमिनीतील भाग टिकून राहतो पुढे नवीन वनस्पती त्यापासून वाढते. खोडावर साधी, एकाआड एक, सु. ७-१५ग५-९ सें.मी आकाराची, पिंगट हिरवी व दोन्ही टोकांस निमुळती पाने असतात. फुले एकेकटी किंवा जोडीने पानांच्या बगलेत येतात ती सु. २.५ सें.मी. लांब, घंटेसारखी, पिवळट तपकिरी असतात. मृदुफळे लहान, १.५ सें.मी. व्यासाची, गोलसर, विषारी व गर्द जांभळी असतात.  फळे येण्यापूर्वी पाने व खोडाचा थोडा भाग खुडून घेतात व उरलेला भाग मुळासकट उपटून सुकवितात. विशेषत: पानांचा उपयोग करून मुख्यत: बेलाडोना आणि ॲट्रोपीन ही औषधी द्रव्ये मिळवितात. हिमालयातील जातीच्या मुळांत ०.८१% व पानांत ०.५% अल्कलॉइडे असतात. व्यापारी मालामध्ये पानांत सरासरी ०.४५% हायसायमानी हे अल्कलॉइड असते. मुळांमध्ये हायसायमीन सरासरी ०.४७% असते. खोडाचा तळभाग आणि भूमिगत मूलक्षोड यांपेक्षा [→खोड] मुळात ते अधिक असते. भारतीय जातीत मुळात बाष्पनशील (बाष्परूपात उडून जाणारा) भाग जास्त असतो परंतु त्यातील हायसायमिनाची क्रियाशीलता कमी असते म्हणून त्याचे मूल्यमापन काळजीपूर्वक करून उपयोगात आणावे लागते त्यात अपक्व मुळे व इतर भेसळ असणे शक्य असते. हल्ली भारतात स्थानिक जातीचा उपयोग टिंक्चरे, प्लॅस्टरे इत्यादींकरिता केला जातो. मुळांपासूनही ॲट्रोपीन मिळू शकते.

ॲट्रोपा बेलाडोना :  औषधाकरिता हिची लागवडही मध्य व दक्षिण युरोप, इंग्लंड व अमेरिकेत केली आहे. ही काश्मिरात कमी प्रमाणावर लावलेली आहे. हिला पिवळट जांभळी फुले येतात. इंग्लंडात उबदार ठिकाणी छायेत बियांपासून हिची लागवड मार्च ते एप्रिलमध्ये करतात. हलकी, चुनखडी असलेली, निचऱ्याची पण ओल धरून ठेवणारी जमीन हिला अधिक चांगली असते, असे आढळले आहे जुनी मुळे लावूनही हिची लागवड करतात. भारतात कुमाऊँ टेकड्यांत लागवड यशस्वी झाली परंतु कर्नाटकात अपयश आले. या वनस्पतीत मुख्यत: एल-हायसायमीन, थोडे ॲट्रोपीन व हायोसीन (स्कोपोलामीन) असते. याशिवाय हिच्यात बाष्पनशील पिरडीन व तत्सम पदार्थही कमी प्रमाणात आढळतात. पानांत सक्सिनिक अम्ल, स्कोपोलेटीन, ॲस्परजिन इ. द्रव्ये आढळतात.

बेलाडोनाचा औषधात दोन प्रकारांनी वापर करतात : बेलाडोनी फोलियम व बेलाडोनी रॅडिक्स. पहिले शरीरात घेण्यास व दुसरे बाहेरून लावावयाच्या औषधांत वापरतात. काही टिंक्चरे, अर्क, मलमे इ. अधिकृत ब्रिटिश औषधिकोशात अंतर्भूत आहेत. बेलाडोनी फोलियम सुक्या पानांपासून व शेंड्यांपासून बनवितात व बेलाडोनी रॅडिक्स मुळांपासून काढतात. बेलाडोनी फोलियमाकरिता झाडे एक वर्षाच्या वाढीनंतर उपयोगात आणतात परंतु मुळांकरिता ३-४ वर्षे वाढल्यानंतर झाडांचा उपयोग करतात. इंग्लंडात बेलाडोनी फोलियमाकरिता लावलेल्या नवीन पिकाचे उत्पादन हेक्टरी १२-१५ टन असते व प्रत्येक उन्हाळ्यात दोनदा पीक काढतात. पाने लागलीच सुकवून (त्यांचे वजन १८% कमी करून) त्यांचे काळजीपूर्वक जतन करतात. त्यात सरासरी ०.४०% हायसायमीन असते. बेलाडोनी रॅडिक्समध्ये ०.६३% हायसायमीन असून त्याकरिता शरद ऋतूत पीक काढतात एक वर्ष वाढलेल्या पिकात जास्तीत जास्त ०.७२% हायसायमीन असते परंतु त्यांच्या लहान आकारामुळे ते फायद्याचे नसते. मुळे काढल्यानंतर ती धुतात, त्यांचे तुकडे करतात व त्वरित सुकवितात.

श्वसन व रक्ताभिसरण यांवर बेलाडोनाचा उत्तेजक परिणाम होतो यामुळे स्रावक ग्रंथींचे कार्य, तसेच जठर, आंत्र (आतडे), गर्भाशय, मूत्राशय इत्यादींची क्रियाशीलता मंदावते. बाहेरून लावल्यास अनैच्छिक स्नायूंच्या आकुंचनाची क्षमता कमी होते. डोळ्यांतील बाहुल्यांचा विस्तार होतो व वेदना कमी होतात. ते उत्तेवक, शामक (दाह व संवेदना कमी करणारे), अंग्ग्रहरोधक (अनैच्छिक स्नायूंचा ताण कमी करणारे) अशा अनेक प्रकारे औषधांत उपयोगात आहे. अफू, मस्कॅरीन, क्लोरल हायड्रेट इत्यादींच्या अतिमांद्यकारक (फार मंदपणा आणणाऱ्या परिमाणावर बेलाडोना उतारा म्हणून वापरतात. बेलाडोना अतिविषारी औषध आहे. टिंक्चर बेलाडोनात फक्त ०.०३% अल्कलाईड असून मात्रा फक्त ५-३० मिनिम (१ मिनिम = ०.०६२ मिलि.) आहे त्यापेक्षा अधिक वापर विषारी ठरतो. त्यामुळे घशाला व तोंडाला कोरड पडते कातडी कोरडी होते डोळ्यांच्या बाहुल्या मोठ्या होतात व भोवळ येते पुढे श्वसनक्रिया मंदावत जाऊन थांबते व मृत्यू येतो. यावर उतारा म्हणून ओकारी करवून पोट साफ करतात व मॉर्फिनाची सौम्य मात्रा देतात कृत्रिम श्वासोच्छ्‌वातही उपयुक्त ठरतो. आचके, आंत्रशूल (पोटदुखी), दमा व डांग्या खोकला यांवर बेलाडोना गुणकारी आहे. ॲट्रोपीन नेत्रचिकित्सा व नेत्रोपचार यांत वापरतात. मुळांचा अर्कही विषारी असून संधिवात, तंत्रिकाशूल [थांबून थांबून होणाऱ्या मज्जातंतूंच्या वेदना  à  तंत्रिका तंत्र] व दाह (आग होणे) यांवर याचा बाह्योपचार गुणकारी असतो.

पहा : नाईटशेड वनस्पति, विषारी.

संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. I. Delhi, 1948.

           2. Jain S. K. Medicinal Plants. New Delhi, 1968.

           3. North, P. Poisomus Plants and Fungi in Colour, London, 1967.

           4. देसाई, वा.गो. औषधी संग्रह , मुंबई, १९७५.

परांडेकर, शं.आ.