बिही : (क. सिमेदलिंबे सं. अमृतफल इं कॉमन क्विन्स लॅ. सिडोनिया ऑब्लाँगा, सि. व्हल्गॅरिस कुल-रोझेसी). बिही ह्या हिंदी नावाने ओळखला जाणारा हा लहान (४.५ ते ६ मी. क्वचित ७.५ मी. उंच), पानझडी वृक्ष मुळचा कॉकेशस व भुमध्यसामुद्रिक प्रदेशातील असून सु. ४००० वर्षांपासून लागवडीत असावा. ‘मदनविनोदनिघंटु’मध्ये अमृतफल वनस्पतीचा उल्लेख अनेक खाद्य फळांच्या वृक्षांत आलेला आढळतो. सिडोनिया या वंशात ही एकच जाती असून तिचे काही प्रकार लागवडीत आहेत. युरोप, अफगाणिस्तान, अमेरिका, पश्चिम आशिया, वायव्य व उत्तर भारत (काश्मीर, पंजाब) व निलगिरी इ. प्रदेशांत बिहीची लागवड करतात. पाने साधी, एकाआड एक, आयत-अंडाकृती व सु. ६.५-१० सेंमी. लांब असून त्यांच्या खालच्या बाजूवर दाट लव असते. फुले द्विलिंगी, मोठी, सु. ५ सेंमी. व्यासाची, पांढरी किंवा लालसर व आकर्षक असून लहान फांद्यांच्या टोकांस एकेकटी येतात. मृदुफळे साधारणपणे सफरचंदासारखी किंवा नासपतीसारखी, अनेकबीजी, कोवळेपणी लवदार, पिवळट व दीर्घस्थायी संवर्तयुक्त [⟶ फुल] आणि पिकल्यावर सोनेरी दिसतात फळातील मगज रसाळ, सुगंधी व आंबूस असतो. बिया ६-७ मिमी. लांब, दोन रांगांत फळातील पाच कप्प्यांत असतात याची इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨रोझेलीझमधे (गुलाब गणात) वर्णिल्याप्रमाणे असतात.
बिहीची पाने, साल आणि कळ्या स्तंभक (आकुंचन करणाऱ्या) फळे क्वचित कच्ची, पण बहुधा शिजवून किंवा भाजून खातात त्यांचा मुरंबा करतात फळ स्तंभक, कफोत्सारक (कफ पाडून टाकणारे) व हृदयास पौष्टिक असते. बियांवरचे बुळबुळीत आवरण पोळल्यावर व जखमांवर लावतात बी शामक (दाह कमी करणारे), कडवट असून घसा धरणे, ताप, अतिसार, आमांश इ. विकारांवर उपयुक्त असते. बियांवरील बुळबुळीत गरम पाण्याने अलग करून प्रसाधन द्रव्यात वापरतात. चीनमध्ये ‘चिनी क्विन्स’ ह्या दुसऱ्या जातीची (कीनोमेलिस सायनेन्सिस, सि. सायनेन्सिस) लागवड असून तिची फळे मोठी असतात ती घरात सुगंध दरवळण्याकरिता काच पात्रांतून ठेवतात. काही लोक ती फळे मिठाईत घालतात. इराणातील व काही इतर देशांतील प्रकारांना गोड फळे असून ती कच्ची खातात.
फळातील मगजात प्रतिशत ८५.७ जलांश, ०.३ प्रथिन, ०.१ मेद, ११.९ कार्बोहायड्रेटे, १.७ तंतू व ०.३ खनिजे असतात. तसेच प्रतिशत ग्रॅममध्ये १० मिग्रॅ. क जीवनसत्व असते. बियांतील मगजात ॲमिग्डॅलीन, टॅनीन व श्लेष्मलद्रव्य (बुळबुळीत द्रव्य), राख रसायन व वसाम्ल असते. वृक्षाच्या सालीत आणि प्ररोहात (कोंबात) हायड्रोसायानिक अम्ल असते. या वृक्षाची लागवड कोणत्याही प्रकारच्या जमिनीत होते. तथापि सकस, खोल, कोरडी व गरम राहणारी जमीन त्याला मानवते फळे नरम होतात. थंड व ओल्या जमिनीतील झाडांवरची फळे अधिक कठीण बनतात. बिया दाब कलमे, छाट कलमे, डोळा बांधून केलेली कलमे व रोपे लावून बिहीची लागवड करतात नासपती व सफरचंदाप्रमाणे खते देतात. लागवड केल्यापासून ४-५ वर्षांनी फुले येऊ लागतात. नासपतीच्या लागवडीत बिहीच्या खुंटावर त्याचे कलम करतात. ‘ऑरेंज, पाइन ॲपल, चँपियन व स्मर्ना’ हे बिहीचे प्रकार लागवडीत असून ‘ऑरेंज’ प्रकार सर्वाधिक लोकप्रिय आहे. बिहीच्या मूळ जातीवर प्रकारांची कलमे करतात. हिवाळ्यातील अतिथंड हवामान वाढीस अनुकूल नसते. बागेत किंवा परसात एकदोन झाडे असली, तरी त्याची भरपूर फळे येतात. बिही वृक्षांना फळमाशी, मावा इ. कीटक व तांबेरा आणि काळे ठिपके पाडणारे कवक (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पती) यांचा उपद्रव होतो त्यावर योग्य प्रकारची कीटकनाशके व कवकनाशके फवारून नियंत्रण करावे लागते. मधूनमधून फांद्यांची छाटणी करणे आवश्यक असते.
पहा : नासपती सफरचंद.
परांडेकर, शं. आ.
“