पुंगळी : (पुंगळवेल, पिवळी भोवरी, बोकडी गु. गुंबडवेल सं. वाचागंधा, वृषपत्रिका लॅ. आयपोमिया ऑब्स्क्यूरा कुल-कॉन्व्हाॅसुल्व्ह्युलेसी). ही बारीक, वर्षायू (एक वर्षापर्यंत जगणारी) वेल भारतात सु. ९३० मी. उंचीच्या प्रदेशापर्यंत गवताळ जमीन, कुंपण व ओसाड जागा इ. ठिकाणी सर्वत्र आढळते. शिवाय श्रीलंका, मलेशिया, आफ्रिका व मॅस्करीन बेटे यांमध्येही तिचा प्रसार झाला आहे. तिचे खोड बारीक व जांभळट असून पाने साधी, एकाआड एक, अंडाकृती-हृदयाकृती व काहीशी टोकदार (लघुकोनी) असतात. फुले लहान, २·५ सेमी. व्यासाची असून १–३ फुलांच्या वल्लऱ्या पानांच्या बगलेत सर्व ऋतूंत येतात. ती नसराळ्यासारखी, पिवळी किंवा पांढरी असून आत तळाशी जांभळा ठिपका व पाकळ्यांवर पिवळट पट्टे असतात. बोंड लहान, अंडाकृती, सु. ०·८ सेमी. उंच, गवती रंगाचे व गुळगुळीत असून त्यात २–४ गर्द तपकिरी व मखमली बिया असतात. इतर शारीरिक लक्षणे ⇨कॉन्व्हॉल्व्ह्युलेसी कुलात (हरिणपदी कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात.
ही वनस्पती कडू, धातुवर्धक, शीतकर (थंडावा देणारी), गर्भोत्पत्तिकारक, कफनाशक इ. गुणयुक्त असते. पाने बुळबुळीत व सुवासिक असून ती विस्तवावर भाजून त्यांचे चूर्ण तुपात कढवून ते तोंड आल्यास लावतात. पाला वाटून लावल्यास सूज फुटते पुळीवर तो लावल्यास आग कमी होऊन पुळी फुटते अगर बसते.
जमदाडे, ज. वि
“