अँजिलोनिया : या वनस्पति-वंशाचा समावेश फुलझाडांपैकी (द्विदलिकित वर्गातील) स्क्रोफ्यूलॅरिएसी या कुलात होतो. यात सु. २४ जाती असून त्यांचा प्रसार मुख्यतः अमेरिकेतील उष्ण प्रदेशात (मेक्सिको ते ब्राझील) आहे. यातील वनस्पती बहुधा बहुवर्षायू (पुष्कळ वर्ष जगणार्‍या) ओषधी व क्षुपे (झुडुपे) आहेत. पाने साधी, समोरासमोर (किंवा शेंड्याकडे एकाआड एक) फुले आकर्षक, अनियमित, द्व्योष्ठक वरच्या ओठास दोन व खालच्यास तीन खंड असतात. सामान्य पुष्प-लक्षणे स्क्रोफ्यूलॅरिएसी कुलात वर्णिल्याप्रमाणे. फुले लांबट व पर्णयुक्त मंजरीवर पानांच्या बगलेत येतात [→ फूल]. फळ (बोंड) गोलसर.

 

अँजिलोनिआ सॅलिकॅरिफोलिया ही मूळची द. अमेरिकेतील जाती महाराष्ट्रात डबक्यांच्या काठांवर वाढते ही बहुवर्षायू व सु. १ मी. उंच असून पाने भाल्यासारखी, बिनदेठाची, दातेरी व लवदार असतात. हिला गुलाबी निळी व सुवासिक फुले जवळजवळ वर्षभर येत असतात. बागेत शोभेकरिता लावतात नवीन लागवड छाट कलमांनी करतात. अँ. ग्रॅंडिफ्‍लोरा ही खुजी जातीही बागेत, कुंड्यांतून लावतात. हिच्या सर्वांगावर चिकट प्रपिंड (ग्रंथी) असून उंची सु. ६० सेंमी. असते. फुले जांभळी (पांढऱ्या फुलांचा एक भिन्न प्रकारही आहे), सुगंधी व तळाशी पिंगट असून सप्टेंबर-नोव्हेंबरमध्ये येतात नवीन लागवड वरच्याप्रमाणेच.

जमदाडे, ज. वि.