एक्विसीटम अर्वेन्से : (१) बीजुकधारी मूलक्षोड, (२) ग्रंथिक्षोड, (३) वायवीय शाखा, (४) वंध्यशाखा (शाखामंडलासह), (५) जननक्षम शाखा, (६) शंकू, (७) बीजुककोशदंड (छत्राकृती), (८) बीजुककोश, (९) बीजुक, (१०) क्षेपक, (११) पुं-गंतुकधारी, (१२) स्त्री-गंतुकधारी, (१३) अंदुककलश, (रेतुकाशय, (१५) रेतुक, (१६) लहान बीजुकधारी, (१७) पर्णमंडल, (१८) खोडाचा आडवा छेद : (अ) केंद्रवर्ती पोकळी, (आ) वाहक वृंद, (इ) कटक, (ई) कटकनाली, (उ) सीता, (ऊ) सीतानाली, (ए) दृढोतक, (ऐ) हरित्कणोतक, (१९) वाहक वृंद.

एक्विसीटम : (इं. हॉर्सटेल). वाहिनीवंत (पाणी अथवा अन्नरस यांची ने-आण करणारे शरीर घटक असणाऱ्या) अबीजी वनस्पतींपैकी ह्या वंशाचा समावेश ð एक्विसीटेलीझ या गणातील एक्विसीटेसी कुलात केला जातो. या वंशात एकूण २५ जाती असून त्यांचा प्रसार न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया या देशांव्यतिरिक्त जगभर सर्वत्र आहे. काही जाती (उदा., . अर्वेन्से, . डेबाइल, . रॅमोसिसिमस ) भारतात तुरळकपणे सर्वत्र आढळतात. सामान्यत: पाणथळ जागी, क्वचित सापेक्षत: रूक्ष ठिकाणी, एक्विसीटमच्या सर्व जाती वाढतात. ह्या वंशाची उत्क्रांती उत्तर कार्‌बॉनिफेररस कल्पातील (सु. ३१ कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील) एक्विसीटाइट्स ह्या जीवाश्मरूप (अवशेषरूप) वंशापासून झाली असावी असे बहुतेक मानतात.

बीजुकधारी : या वनस्पतींची बीजुकधारी पिढी [लाक्षणिक प्रजोत्पादक भाग असणारी पिढी ,→ एकांतरण ,पिढ्यांचे] अधिक परिचित व ठळकपणे आढळणारी असून ती (पहा : आकृती) १०–१५ सेंमी. पासून ते एक मी. पर्यंत उंच वाढते. द. अमेरिकेतील एक मोठी जाती (. जायगँशियम) १२ मी. पर्यंत उंच असते, परंतु खोडाच्या नरमपणामुळे अन्य वनस्पतींवर आपला भार टाकते. यूरोपातील एक जाती (. टेल्मॅशिया) २–२.५ मी. उंच वाढते. या दोन्ही जातींची वायवी फांदी २ सेंमी. पेक्षा जाड नसते. या वंशातील वनस्पतींचे भूमिस्थित (जमिनीखालील) बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारे) खोड [मूलक्षोड, → खोड] सु. एक मी. खोलपर्यंत जमिनीत आडवे वाढते व त्यापासून काही शाखा जमिनीत व काही बहुधा वर्षायू (एक वर्ष जगणार्‍या) शाखा जमिनीवर वाढतात. या वनस्पतींची सर्व सामान्य लक्षणे एक्विसीटेलीझ गणाच्या वर्णनात दिल्याप्रमाणे असतात. मूलक्षोड भूमिस्थित व वायवी (जमिनीवर वाढणार्‍या) फांद्यांवर पेरी, ससीता (खाचा असलेली) कांडी व पर्णमंडले (पानांचे वेढे) ठळकपणे दिसतात. भूमिस्थित पेऱ्यापासून निघणाऱ्या एकाच कांड्याचे ग्रंथिक्षोडात (जमिनीखाली वाढणाऱ्या व अन्नसंचय करणाऱ्या खोडात) रूपांतर होते व हे अलग करून स्वतंत्रपणे लावल्यास नवीन वनस्पती येतात. पेऱ्यापासून निघणार्‍या फांद्यांच्या कळ्यांपासून आगंतुक मुळांची मंडले वाढतात. वायवी फांद्यांपैकी काही हिरव्या व वंध्य असून त्यांवर शाखांची मंडले येतात काही जातींत या दुय्यम फांद्यांवर पुन्हा तिय्यम शाखामंडले येतात यांशिवाय जननक्षम पण अल्पजीवी व हिरव्या नसलेल्या फांद्या असतात व त्यावर टोकास प्रजोत्पादक प्ररोह (कोंब), ‘शंकू’, येतो. काही जातींत मात्र फक्त हिरव्या, शाखित व शंकुधारी फांद्या येतात (. प्लुस्टर ).

शारीर : अंतर्रचनेचा विचार केला तर वायवी फांद्यांपैकी प्राथमिक फांद्यांत निकाष्ठामध्ये (भेंडामध्ये) केंद्रवर्ती पोकळी असते. संलग्न वाहक वृंदांचे (अन्नरसाची व पाण्याची ने-आण करणार्‍या जुडग्यांचे) वलय त्यासभोवार असून प्रत्येकाच्या आतील कोनास (आदिप्रकाष्ठात म्हणजे वहन व आधार देणे ही कार्ये करणार्‍या आद्य कोशिकांच्या म्हणजे पेशींच्या समूहात) एक लहान पोकळी असते. ती पृष्ठभागावरच्या कटकासमोर (कंगोर्‍यासमोर) येत असल्याने तिला ‘कटकनाली’ म्हणतात. या दोन्ही प्रकारच्या पोकळ्यांत पाणी असते. याशिवाय कटकनालींना एकांतरित (एकाआड एक) अशा खोबणीखालील (सीतेखालील) भागात ‘सीतानलींचे’ (वाहक नालींचे) वलय असते या नालीत फक्त हवा असते. लहान फांद्यांत व मूलक्षोडात मध्यवर्ती पोकळी नसते. फांदीच्या आडव्या छेदात सर्वांत बाहेर अपित्वचा नंतर मध्यत्वचा, अंतस्त्वचा, परिरंभ (वाहक नसलेल्या कोशिकांचा बनलेला थर), वाहक वृंद-वलय व शेवटी निकाष्ठाची पोकळी असा अनुक्रम आढळतो (पहा : आकृती). मध्यत्वचेचे सर्वांत बाहेरचे थर विशेषत्व दर्शवितात. कटकाखाली व सीतेखाली दृढोतक (मऊ भागांना आधार व संरक्षण देणारा कोशिका समूह) व कटकांतील दृढोतकाखाली हरित्कणोतकांचे (हरितद्रव्ययुक्त कण असलेल्या कोशिका समूहांचे) लहान समूह असतात. दृढोतकामुळे फांद्यांना थोडे काठिण्य येते. अपित्वचेच्या कोशिकावरणात सिलिका कण असतात त्यामुळे पृष्ठभाग खरबरीत होतो. खोबणींच्या भागातील अपित्वचेत त्वग्रंध्रे (सूक्ष्म छिद्रे) असतात. या वायवी फांद्यांत प्रकाशसंश्लेषणाची (सूर्यप्रकाशाच्या अस्तित्वात हरितद्रव्याच्या मदतीने अन्ननिर्मीती करण्याची) योजना असते. खरबरीतपणामुळे या वनस्पती पूर्वी भांड्यांना (विशेषत: काशाच्या) झिलई देण्यास घासण्याकरिता वापरीत. मोठ्या एक्विसीटमध्ये प्रत्येक वृंदाभोवती अंतस्त्वचा असते व दृढोतक अपित्वचेपासून अंतस्त्वचेपर्यंत पसरलेले असते. फांद्या, मुळे व खोड यांच्या टोकास एक विभाजी कोशिका असते. या वनस्पतींत द्वितीयक वाढ नसल्यामुळे जाडी वाढत नाही व बळकटपणा फार कमी असतो.


प्रजोत्पादन : सूक्ष्म व सारख्या बीजुकांच्या साहाय्याने अलिंग पद्धतीचे प्रजोत्पादन घडून येते. बीजुककोश ५–१० असून ते बीजुक कोशदंडाच्या चकतीसारख्या टोकाखाली वाढलेले असतात. यांना बीजुकपर्णे मानीत नाहीत. ते बीजुककोश धारण करणारे दंड होत. शंकूच्या अक्षावर अशा बीजुककोशदंडांची मंडले असतात. तळास असलेले वलय र्‍हसित (र्‍हास पावलेले) असते. बीजुककोशाची संरचना व विकास प्रारंभिक प्रकारचा असतो. या प्रकाराला युस्पोरँजिएट म्हणतात यामध्ये त्या अवयवांचा उगम पृष्ठावरच्या अनेक कोशिकांपासून होतो बीजुककोशाचे आवरण दोन थरांचे असून बीजुके अनेक असतात. प्रत्येक बीजुक हिरवे व धाग्यासारख्या दोन क्षेपकांनी वेढलेले असते. हे क्षेपक आर्द्रशोषी असल्याने रुक्ष हवेत त्यांच्या प्रसरणाने बीजुककोश फुटून बीजुकांचे विकिरण (प्रसार) होते. क्षेपकांमुळे ओलसर हवेत अनेक बीजुके एकत्र राहतात. ओलसर जागी बीजुके रुजतात व गंतुकधारी (प्रजोत्पादक कोशिका असलेली) वनस्पती प्रसवली जाते आणि सलिंग प्रजोत्पादनास सुरुवात होते.

गंतुकधारीच्या लिंगभेदाबद्दल एकसूत्रता नाही. कधी पुं- व स्त्री-गंतुकधारी स्वतंत्र तर काही जातींत तो द्विलिंगी तथापि केव्हा फक्त पुंल्लिंगी तर कधी स्त्रीलिंगी व फलन न झाले तरच पुल्लिंगी होतो. गंतुकधारी स्वतंत्र, अनेक थरांचा, दीर्घजीवी, सु. १-२ सेंमी व्यासाचा, तळाशी अनेक मूलकल्पयुक्त (मुळासारखे कार्य करणार्‍या तंतूंनी युक्त) व पृष्ठभागावर अनेक खंडयुक्त असतो. त्याच्या कडेभोवती विभाजी कोशिकांची रांग असते त्यांच्यापैकी काही कोशिका नवीन गंतुकाशये निर्माण करतात पूर्ण वाढ झाल्यावर ती पृष्ठावर पण कडेजवळ व खंडाजवळ वाढतात. त्यांचा विकास व संरचना सामान्यत: वाहिनीवंत अबीजी वनस्पती विभागाच्या वर्णनात दिल्याप्रमाणे असतात. सर्पिलाकृती, सकेसल रेतुक (चल पुं-जनन कोशिका) व अंदुक (अचल स्त्री-जनन कोशिका) यांच्या संयोगानंतर रंदुक (ज्यापासून वनस्पती विकास पावते असा भाग) बनते. एका गंतुकधारीवर अनेक रंदुकांपासून गर्भविकासानंतर अनेक बीजुकधारी तयार होतात. प्रत्येकाला पहिल्याने मर्यादित व कमी शल्कपर्णांच्या (खवल्यासारख्या पानांच्या) काही वायवी फांद्या येतात व नंतर कायम वाढणारा मूलक्षोड वाढीस लागतो दोन स्वतंत्र पिढ्यांचे (बीजुकधारी व गंतुकधारी) एकांतरण चालू राहते [→ एकांतरण, पिढ्यांचे].

. अर्वेन्से या वनस्पतीचा उपयोग पूर्वी जर्मनीत मूत्रल (लघवी साफ करणार्‍या) औषधाकरिता केला जात असे. हिमालयात ती बर्‍याच उंचीवर आढळते. ती रक्तस्तंभक (रक्तस्त्राव थांबविणारी) व रक्तवर्धक असून जलशोफ (द्रव साठल्यामुळे येणारी सूज), मुतखडा, मूत्रपिंडाचे विकार इत्यादींवर गुणकारी असते हिची राख अम्लपित्त, अग्निमांद्य इ. विकारांवर देतात. . प्लुस्टर ही विषारी आहे.

पहा : वनस्पति, वाहिनीवंत अबीजी विभाग.

संदर्भ : 1. Bell, P. Coombe, D. (Eng. Trans.), Strasburger’s  Textbook of Botany, London, 1965.

            2. Mukherji, H. Ganguly, A. K. Plant Groups, Calcutta, 1964,

            3. Smith, G. M. Cryptogamic Botany, Tokyo, 1955.

वैद्य, प्र. भ.