वनस्पतींचे वर्गीकरण : वनस्पतिविज्ञानाच्या या शाखेचा उद्देश विविध वनस्पतींतील साम्ये व भेद साकल्याने प्रतिबिंबित करणारी उत्तम वर्गीकरण पद्धती तयार करणे हा आहे. ही पद्धती श्रेणीरूप असूनतीत मुलभूत एकेक अधिकाधिक मोठ्या व अधिक समावेशक एककांत एकत्रित करण्यात येतात.  

आपल्या आसमंतातील वनस्पतीत विविधता आढळते, त्याचबरोबर विषमताही आढळते. शास्त्रज्ञांनी आतापर्यंत सु.४०लक्ष वनस्पतींची नोंद केलेली आहे. यांत सूक्ष्मजंतूंपासून महाकाय वृक्षापर्यंतच्या सर्व प्रकारच्या वनस्पतींचा समावेश होतो. एवढी प्रचंडसंख्या व अनेक प्रकार असलेल्या या सर्व वनस्पतींची समग्र माहिती असणे अशक्यप्राय असल्याने वनस्पतिवैज्ञानिकांनी या सर्व वनस्पतींची गटवारी केलेली आहे. या गटवार विभागणीलाच वनस्पतींचे वर्गीकरणविज्ञान म्हणतात. प्रत्येक वनस्पतीचा अभ्यास करण्यापेक्षा प्रत्येक गटाचा अभ्यास करणे सुलभ असते.

प्रारंभीच्या काळातील वर्गीकरण वनस्पतींच्या उपयुक्ततेवर आधारीत होते. अन्न, वस्त्र व निवारा या प्राथमिक गरजांसाठी मानव मुख्यत्वे वनस्पतींवरच अवलंबून आहे. प्राचीन काळापासून तो त्याच्या सभोवताली उगवणाऱ्या वनस्पतींचे न कळतच एक प्रकारे वर्गीकरण करीत आलेला आहे. दैनंदिन जीवनात उपयोगी पडणाऱ्या वनस्पतींच्या संख्येत जशी हळुहळू वाढ होत गेली, तशी त्यांना नावे देण्यात आली. स्वानुभवावरून मानवाने खाद्य, विषारी, औषधी, गुंगी आणणारी, शेतीच्या हत्यारांकरिता व बांधकामाकरिता टणक व टिकाऊ लाकूड देणारी, ऊर्जानिर्मितीसाठी इंधन (सरपण) देणारी अशा भिन्न प्रकारे उपयुक्त वनस्पतींचे वर्गीकरण केले. अशाप्रकारे प्राचीन काळापासून वनस्पतींच्या वर्गीकरणाचा प्रयत्न करण्यात आला होता.  

पुढे अधिकाधिक वनस्पतींचा परिचय झाला व त्यांतील अनेक दैनंदिन गरजेच्या नव्हत्या. त्यामुळे व्यावहारिक वर्गीकरणाचे कल्पना मागे पडली व वनस्पतींतील ठळक साभ्यभेदावर आधारित वर्गीकरणविज्ञान अस्तित्वात आले. आजच्या प्रचलित वर्गीकरण पद्धतीसर्वस्वी परिपूर्ण नाहीत. याचे कारण जगाच्या विविध भागांतून नवनवीनवनस्पतींची विपुल माहिती उपलब्ध होत आहे, तसेच जैव क्रमविकास (उत्क्रांती) व कृत्रिम संकरण यांमुळे नवनवीन प्रकारांची निर्मिती होत आहे. यामुळे वर्गीकरणाचे हे कार्य अविरत चालणारे आहे. आजच्या वर्गीकरण पद्धतीत वनस्पतींतील बाह्य साम्यभेदाखेरीज इतर गोष्टींचाही आधार घेतला जातो. जसजसे वनस्पतीविषयीचे ज्ञान सखोल होत जाईल तसतसे वर्गीकरण अधिकाधिक परिपूर्ण होत जाईल. 

वनस्पतींचे वर्गीकरण सर्वसाधारणपणे तीन प्रमुख अवस्थांत करण्यात येते. प्रथम सर्व प्रकारच्या वनस्पती गोळा करून त्यांचे तपशीलवार वर्णन करून नावे देणे [⟶वनस्पति नामपद्धति], त्यानंतर त्यांच्यातील समान लक्षणांची नोंद करून त्याप्रमाणे वनस्पतीचे गट बनविणे आणि शेवटी या गटांतील परस्पर संबंध वनस्पतिविज्ञानातील इतर शाखांच्या साहाय्याने पडताळून पहाणे. या दृष्टीने पाहिल्यास वर्गीकरण हा वनस्पतिविज्ञानाचा पाया असून त्याचा मूळ उद्देश भिन्न स्तरांवर केलेल्या वनस्पतींच्या गटांतील साम्यभेद व आप्तभाव दर्शविणेहा आहे.  

वर्गीकरणातील पायऱ्या : वर्गीकरणात वापरले जाणारे जाती, प्रजाती, कुल, गण, वर्ग व विभाग हे सर्व गट आपापल्या परीने जाणारे जाती प्रजाती, कुल, गण, वर्ग व विभाग हे सर्व गट आपापल्या परीनेएकच धरले जातात. क्रमाक्रमाने एकके एकत्र येऊन मोठी एकके बनतात व परिणामी श्रेणीरूप पायऱ्या पायऱ्यांची रचना तयार होते. 

जाती : वर्गीकरणाची ही सर्वांत तळाची पायरी असून एका जातीत समाविष्ट केलेल्या सर्व वनस्पतींच्या बाह्य रूपात साम्य असते. त्यांच्या कोशिकेतील (पेशीतील) गुणसूत्रांची (आनुवंशिक लक्षणे एका पिढीतून पुढील पिढीत नेणाऱ्या सुतासारख्या सूक्ष्म घटकांची) संख्या व रचना एकच असते आणि या वनस्पतीत मुक्त आंतरप्रजनन घडून येते. प्रजननातून निर्माण झालेली संतती प्रजोत्पादनक्षम असते. [⟶ जाती]  

प्रजाती : (मराठी विश्वकोशातील काही वनस्पतिविषयक नोंदीत या गटांचा वंश असाही निर्देश केला आहे.) वेगवेगळ्या जातींचा हा एकत्रित गट असून यातील जाती काही बाह्य लक्षणांच्या बाबतीत भिन्न असतात पण त्याचबरोबर त्यांमध्ये काही बाबतींत साम्यही असते. या साम्यांवर आधारित असा त्यांचा गट बनतो. प्रजाती ही जातीच्या वरची पायरी आहे. उदा., भेंडी (हिबिस्कस एस्क्युलेंटस), अंबाडी (हिबिस्कस कॅनाबिनस) व जास्वंद (हिबिस्कस रोझा-सायनेन्सिस) यातीन वेगवेगळ्या जाती निश्चितच आहेत पण त्याचबरोबर या तीनही वनस्पतींत काही समान लक्षणे आहेत म्हणून त्या हिबिस्कस या एकाचप्रजातीत समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत.  

कुल: प्रजातीच्या वरची पायरी म्हणजे कुल, वेगवेगळ्या प्रजातींच्या लक्षणांत फरक असतात पण त्याचबरोबर काही समान गुणधर्म असतात म्हणून अशा प्रजातींचे कुल बनते. उदा., गॉसिपियम(कापूस), ॲब्युटिलॉ (मुद्रा), हिबिस्कस या वेगवेगळ्या प्रजातींचेएक कुल (माल्व्हेसी) बनते. 

यावरून प्रत्येक जाती ही एखाद्या प्रजातीची घटक असते व प्रत्येक प्रजाती एखाद्या कुलाची घटक असते. अशी अनेक कुले मिळून गण तयार होतो, अनेक गण मिळून वर्ग बनतो व अनेक वर्गापासून विभाग तयार होतो. वर्गीकरणातील या पायऱ्या खालीलप्रमाणे दर्शविता येतात.

क्वचित एखाद्या पायरीची व्याप्ती मोठी असल्यास तिची उपगटांत विभागणी करतात (उदा., उपकुल, उपवर्ग इत्यादी).

  

या पद्धतीनुसार ‘सूर्यफूल’ या वनस्पतीचे वर्गीकरण खालीलप्रमाणे करता येईल. 

       विभाग : स्पर्‌ मॅटोफायटा (बीजी वनस्पती विभाग)  

       उपविभाग : अँजिओस्पर्मी (आवृतबीज वनस्पती उपविभाग)  

       वर्ग : डायकॉटिलेडॉनी (द्विदलिकित वनस्पती वर्ग)  

       उपवर्ग : गॅमोपेटॅली (युक्तप्रदली)  

       गण:ॲस्टेरेलीझ  

       कुल : ॲस्टरेसी  

       प्रजाती : हेलिअँथस  

       जाती : ॲनस  

वर्गीकरणाच्या पद्धती : वनस्पतींच्या वर्गीकरणाच्या बऱ्याच पद्धती सुचविण्यात आलेल्या असून त्या पुढीलपैकी एका प्रकारात मोडतात : (१) कृत्रिम, (२) नैसर्गिक व (३) जातिविकसित (किंवा क्रमविकास सिद्धांतावर आधारित)  


 कृत्रिम पद्धतीत वर्गीकरण हे मुख्यत्वे वनस्पती ओळखण्यास मदत करते हे वनस्पतींच्या एका वा काही थोड्याच लक्षणांवर आधारलेले असल्याने सदोष होते. या पद्धती आज प्रचलित नाहीत. नैसर्गिक वर्गीकरणात वनस्पतींची सर्व लक्षणे लक्षात घेण्यात येत असल्याने त्यात वनस्पतीला तिचे नैसर्गिक स्थान मिळते. जातिविकिसित वर्गीकरण वनस्पतींच्या भिन्न स्तरांवरील गटांचे परस्परसंबंध व क्रमविकासातील परंपरा लक्षात घेऊन केले जातअसल्यामुळे त्यामध्ये त्यांचे आप्तभाव कळून येतात आणि एकादृष्टिक्षेपात त्यांचे पूर्वज व वारस यांचा बोध होतो परंतु परस्परसंबंधाविषयी प्रत्येक बाबतीत आजही निश्चित माहिती मिळतेचअसे नाही. यामुळे नैसर्गिक व जातिविकसित या दोन्ही पद्धतींना उपयुक्त ठरलेल्या माहीतीवर आधारलेले संमिश्र वर्गीकरण जास्त प्रचलित आहे.  

कृत्रिम वर्गीकरण : हे केवळ एखाद्याच लक्षणावर आधारलेले असते. मात्र अशा वर्गीकरणामुळे परस्परांशी कोणताही संबंध नसलेल्या वनस्पती एकत्र येतात. उदा., फूल हे लक्षण धरून वनस्पतीचे सपुष्प वनस्पती व अपुष्प वनस्पती असे दोन गट होतात. अपुष्प वनस्पतींतशैवले, कवके, नेचे यांसारख्या सर्वच वनस्पतींचा समावेश होतो.  

प्रारंभीच्या काळातील वर्गीकरणाच्या सर्व पद्धती अशा एकाच लक्षणावर आधारलेल्या होत्या. शास्त्रीय दृष्ट्या वनस्पतींच्या वर्गीकरणाची सुरूवात ॲरिस्टॉटल यांचे शिष्य व वनस्पतिविज्ञानाचेपितामह म्हणून मानले जाणारे⇨थीओफ्रॅस्टस (इ.स.पू.३७२−२८७) यांनी केली. त्यांनी आकारमानावरून सर्व वनस्पतींचे ⇨वृक्ष, ⇨क्षुपे आणि ⇨औषधी असे वर्गीकरण करून पुढे आयुःकालाला अनुसरून त्यांमध्ये वर्षायू (एक वर्ष किंवा हंगाम जगणारे), द्विवर्षायू व बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारे) असे भेद केले. त्याचबरोबर त्यांनी पुष्पबंधाचे (फुलोऱ्याचे) कुंठीत व अकुंठीत प्रकार, फुलातील किंजपुटाचे (स्त्री-केसराच्या तळाचे) स्थान, पुष्पमुकुटातील मुक्तप्रदल (सुट्या पाकळ्या) व युक्तप्रदल (जुळलेल्या पाकळ्या) इ. भेदही ओळखले होते. तथापि या गटांतीलनात्यांची ओळख अस्पष्टच असल्याने त्या गटांना कृत्रिम स्वरूप आलेहोते. कळीळर झश्ररपींर्री या आपल्या ग्रंथात त्यांनी सु. ५००वनस्पतींची नावे व वर्णने दिली आहेत आणि त्यांतील काही प्रजातिवाचक नावे आधुनिक वर्गीकरणविज्ञानातही वापरली जात आहेत. 

यानंतरच्या १,५००वर्षात वनस्पतीवैज्ञानिक ज्ञानात फारच अल्प भर पडली. डायस्कॉरिडीझ (इ.स.सु. ४०−९०) या ग्रीक वैद्यांनी औषधी वनस्पतींची वर्णने आपल्या Materia medica या ग्रंथात दिलेली आहेत. आल्बर्ट्स मॅग्नस (१९९३−१२८०) यांनी खोडांच्या छेदांचे साध्या भिंगातून निरीक्षण करून त्यांचा उपयोग करूनपहिल्यांदाच एकदलिकित (बीजात एकच दलिका असलेल्या) व द्विदलिकित (बीजात दोन दलिका असलेल्या) वनस्पतींच्या अंतर्गत संरचनेतील भेद स्पष्ट केला. ओटो ब्रुनफेल्स (सु. १४८८−१५३४) यांनी सपुष्प व अपुष्प असे वनस्पतींचे गट प्रथम निश्चित केले, तसेचघरगुती उपयोगाच्या व औषधी वनस्पतींची वर्णने लिहून प्रसिद्ध केली. जेरोम बोक (१४९८−१५५४) यांनी थीओफ्रॅस्टस यांचेच वृक्ष, क्षुपे व औषधी हे गट मानले पण कित्येक ठिकाणी केवळ आकारमानाला महत्त्व न देता इतर सम्य-भेदही विचारात घेतले तसेच वनस्पतींच्या गुणावगुणांसबंधीच्या दंतकथा व धर्मभोळ्या समजुती यांना महत्त्व दिले नाही.  

अद्रिआ चेझालपीनो (१५१९−१६०) या इटालियन वनस्पतिवैज्ञानिकांना काही शास्त्रज्ञ पहिले वर्गीकरणविज्ञ समजतात. त्यांनी सु. १,५००वनस्पतींची वर्णने व त्यांचे वर्गीकरण करून De Plantis हा ग्रंथ प्रसिद्ध केला. त्यामध्ये त्यांनी क्षुपे व वृक्ष असे दोन गट पाहिल्याने करून नंतर फळे व बीजे यांचे प्रकार, ऊर्ध्वस व अधःस्थकिंजपुट [⟶फूल], कंदयुक्त व कंदरहित वनस्पती, किंजपुटातील कप्पे वगैरे लक्षणांवरून त्यापुढील वर्गीकरण केले होते.  

गास्पार बौहीन (वोअँ) (१५६०−१६२४) या स्वीस वनस्पति वैज्ञानिकांनी Pinax theatric batanici(१६२३)या आपल्या ग्रंथात सु. ६,०००वनस्पतींची नाले व त्यांचे पर्याय दिलेले आहेत. प्रजातिनाम व जातिनाम असलेल्या द्विपद नामपद्धतीचा पाया याच ग्रंथात आढळतो. ही पद्धतीच पुढे एक शतकानंतर कार्ल लिनीअस यांनी नियम म्हणून प्रस्थापित केली. जे.पी.द दुर्नफॉर (१६५६-१७०८) याफ्रेंच वनस्पतिवैज्ञानिकांनी फुलझाडांचे वृक्ष व औषधी असे दोन गट करून नंतर प्रत्येक गटाचे प्रदले (पाकळ्या) असलेली व नसलेली, मुक्तप्रदल व युक्तप्रदल, नियमित व अनियमित पुष्प इ. लक्षणांवरून सूक्ष्म भेद करून वर्गीकरण केले. याशिवाय बौहीद यांच्यानंतर त्यांनीच प्रजातिनामाच्या कल्पनेला आधार देऊन प्रजाती हे वर्गीकरणातील सर्वांत लहान असे व्यावहारिक एकक आहे असे प्रस्थापित केले. जॉन रे (१६२७−१७०५) या इंग्लिश वनस्पति वैज्ञानिकांनी सु. १८,०००एकदलिकित व द्विदलिकीत वनस्पतीचे काष्ठयुक्त व औषधीय (नरम घटक असलेल्या) असे दोन प्रमुख गट करून पुढे प्रत्येकाचे वर्गीकरण फळांचे प्रकार, पानांची व फुलांची लक्षणे इत्यादींच्या आधारे केले.

वर दिलेल्या प्रमुख वर्गीकरण पद्धतीत वनस्पतींचे स्वरूप व त्यांची संरचना यांवर आवास्तव भर दिल्याचे आढळते परंतु पुढे ⇨कार्ल लिनीअस (१७०७−७८) या स्विडीश शास्त्रज्ञांनी वर्गीकरणाची एक कृत्रिम पण क्रांतिकारक पद्धत Genera Plantarum (१७३७) या ग्रंथाद्वारे मांडली. त्यांनी या पद्धतीत फुलातील केसरदलांची संख्या व लांबी, परस्परांतील व फुलातील इतर मंडळांशी संलग्नता, लिंगभेद इ. लक्षणांच्या आधारावर एकूण २४वर्ग केले. यांतील पहिले २३वर्ग फुलातील केसरदलांच्या संख्येवर आधारित आहेत. पहिले १०वर्ग केसरदलांच्या संख्येनुसार (१ते १०) केलेले असून त्यापुढील वर्ग केसरदलांच्या दव्योन्नत, चतुरोन्नत, एकसंघ, युक्त इ. लक्षणांनुसार केलेले आहेत [⟶ फूल]. प्रत्येक वर्गाची गणांमध्ये विभागणी किंजलांच्या संख्येनुसार केलेली आहे. चोविसावा वर्ग अपुष्प वनस्पतींचा (शैवले, कवके, शेवाळी व नेचे) आहे.  

 

केसरदल या एकाच अवयवाची लक्षणे विचारात घेऊन केलेले हे वर्गीकरण त्यावेळी अत्यंत सोयीचे वाटले आणि इंग्लंडात व जर्मनीत त्याचे फार मोठे स्वागत झाले परंतु यातील काही दोष पाहता कृत्रिम पद्धतीच्या वर्गीकरणाला कशा मर्यादा पडतात, हे दिसून येते. उदा., एकविसाव्या वर्गात (मोनेशिया) एकदलिकित व द्विदलिकित अशा दोन्ही प्रकारच्या वनस्पती आहेत, तर बावीसाव्या वर्गात (डायेशिया) प्रकटबीजी व आवृतबीजी अशा दोन्ही प्रकारच्या वनस्पती आहेत. केसरदलांची व किंजदलांची संख्या ही मुलभूत लक्षणे धरून ही पद्धती तयार केलेली असल्याने तिला ‘लैगिक पद्धती’ असेही म्हणतात परंतु हे तितकेसे बरोबर नाही कारण तीत केसरदलांच्या संख्येवरच अधिक भर दिलेला आहे. तसेच ही पद्धती वनस्पतींतील साम्यांपेक्षा भेदच जास्त दाखविते. ती इतकी कृत्रिम आहे की, अगदी निकटवर्ती अशा काही वनस्पतींची जणू त्यांचा काहीच संबंध नसल्याप्रमाणे मांडणी केलेली आहे. अशा कित्येक उणिवांची लिनीअस यांना कल्पना होती परंतु त्या काळात अनेक शास्त्रज्ञांनी संग्रह केलेल्या वनस्पतींची संख्याइतकी मोठी होती की, त्यांच्या वर्गीकरणाची तात्पुरती तरी सोय एखाद्या सोप्या पद्धतीने होणे आवश्यक होते. या दृष्टीने ही पद्धत सर्व थरात स्वीकारली गेली. यानंतर मात्र लिनीअस यांनी Genra Plantarum यात्यांच्या ग्रंथाच्या सहाव्या आवृत्तीत वनस्पतींचे ५८,तर Philosophia botanica या ग्रंथात ६८नैसर्गिक गण केले असून त्यांपैकी बरेचसे आजही मान्यता पावलेले आहेत. गास्पार बौहीन व त्यांच्यानंतर वनस्पतींच्या द्विपद नामपद्धतीस सुरुवात झाली पण कधी कधी तीन वा चार भाग असलेली नावेही वापरली जात. लिनीअस यांनी द्विपदनामपद्धतीत सुधारणा करून ती प्रस्थापित केली व ती आजही प्रचलित आहे. नैसर्गिक वर्गीकरणाच्या पद्धतीची आवश्यकता लिनीअस यांना पटली होती व तशी पद्धती निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्नही सुरू झाला होता परंतु त्यांच्या हयातीत तो पूर्ण झाला नाही.  


 नैसर्गिक वर्गीकरण : फ्रान्समधील बेर्नार द झ्यूस्य (१६९९−१७७७) व त्यांचे पुतणे आंत्वान लॉराँ झ्यूस्य (१७४८−१८३६) या दोघांनी वनस्पतींच्या भिन्न लक्षणांचा अतिशय बारकाईने अभ्यास करूनमांडलेली वर्गीकरण पद्धती खऱ्या अर्थाने नैसर्गिक म्हणता येईल. तीमध्ये वनस्पतींचे अदलिकित (बीजात दलिका नसलेले), एकदलिकिती व द्विदलिकित असे तीन प्रमुख गट केले असून द्विदलिकितांचे अप्रदल, प्रदलयुक्त, युक्तप्रदल, मुक्तप्रदल व एकलिंगी-अनियमित्त असे पाच विभाग पाडलेले आहेत. अदलिकितांत शैवले, शेवाळी, भूछत्रे व नेचे यांचा समावेश केलेला आहे. त्यानंतर फुलांतील केसरदले व किंजपुट यांच्या सापेक्ष स्थानांवरून फुलझाडांचे त्यांनी १५वर्ग केले आहेत. पुढे अधिक सूक्ष्म लक्षणांच्या आधारे त्यांची १००कुले (मूळ वर्गीकरणात ‘गण’) करून त्यांची वर्णने Gebera plantarum secundum ordines naturals disposita (१७८९) या ग्रंथात दिली आहेत. या पद्धतीचा वापर जवळजवळ १५०वर्षे बऱ्याच शास्त्रज्ञांनी केला असून वरील ग्रंथातील कुलांचा उपयोग आजही त्याच स्वरूपात केला जातो. या पद्धतीत केसरदले व किंजपुट यांच्या स्थानांचा धोपटमार्गाने सरसकट उपयोग केला होता आणि काही गटांत जरी ही लक्षणे महत्त्वाची वाटत असली, तरी ती तशीच इतरांमध्येही तितक्याच काटेकोरपणे लागू पडतील या चुकीच्यासमजुतीने हे वर्गीकरण सदोष झालेले आढळते. अप्रदल व एकलिंगी-अनियमित ही विभागणी अनैसर्गिक झाली आहे. कारण त्यात दूरचासंबंध असलेल्या वनस्पती एकत्र आणल्या गेलेल्या आहेत. उदा., शंकुमंतांना (शंकूच्या आकाराचे प्रजोत्पादक इंद्रिय असलेल्या वन्सतीना) द्विदलिकितांत घातले आहे, तसेच अबीजी वनस्पतींना एकदलिकीत व द्विदलिकित यांच्या बरोबरीचे स्थान दिले आहे, तेहीचुकीचे आहे.  

त्यानंतर दे कांदॉल या फ्रेंच घराण्यातील दोन पिढ्यांनी वर्गीकरणात्मक वनस्पतिविज्ञानात बहुमोल भर टाकली. पहिल्यापिढीतील ⇨ऑगस्टीनपीराम दे कांदॉल (१७७८−१८४१) यांनी झ्यूस्य यांच्या वर्गीकरण पद्धतीत काही बदल करून स्वतःची एक पद्धती अवलंबिली. तीमध्ये वनस्पतींच्या शारीराचे (शरीरचनेचे) महत्त्व वर्गीकरणाच्या दृष्टीने शरीरक्रियाविज्ञानांपेक्षा अधिक असल्याचे प्रतिपादन केले आहे परंतु प्रत्यक्षात याकडे दुर्लक्ष करून त्यांनी वाहिन्या असलेल्या व नसलेल्या असे वनस्पतीचे दोन गट केले (वाहिन्यांचा वनस्पतींच्या पोषणात पुष्कळच उपयोग होतो, असे त्यांचे मत होते) वाहिनीवंत या लक्षणाबरोबर दलिकायुक्त व दलिकाहीन या लक्षणांना वैकल्पिक महत्त्व दिले आहे, ते चुकीचे आहे. दलिकांच्या संख्येवरून द्विदलिकित व एकदलिकित असा भेद करून दोन नैसर्गिक गट केलेले आहेत परंतु त्याचबरोबर त्यांमध्ये नसलेला खोडातील स्थूलता-वृद्धीच्या प्रकारातील शरीरक्रियावैज्ञानिक फरक दर्शविला आहे. वाहिनीवंत अबीजी वनस्पतींचा व सायकॅडेसींचा अंतर्भाव त्यांनी एकदलिकितांत केला आहे. हेही चुकीचे आहे. झ्यूस्य यांच्या एकलिंग-अनियमित गटाचा समावेश द्विदलिकितांच्या अप्रदल गटात केला आहे. (परंतु त्यांत शुंकमंतांचाही अंतर्भाव आहे) मात्र तसे करताना शारीरविषयक लक्षणाला प्रथम महत्त्व दिले आहे. द्विदलिकितांचे वर्गीकरण कांदॉल यांच्या पद्धतीप्रमाणे नैसर्गिक आप्तभावदर्शकअसल्याचे आढळते. त्यामध्ये द्व्यावृत (फुलात संवर्त व पुष्पमुकुट असलेल्या) व एकावृत (फुलात परिदलांचे एकच मंडल असलेल्या) असे दोन प्रमुख गट असून पुढील वर्गवारी प्रथम युक्त व मुक्त प्रदल आणि नंतर किंजपुटाचे स्थान यांवर आधारले आहे. द्व्यावृतातील पुष्पासनाच्या (फुलातील अवयवांच्या आधारभूत बैठकीच्या) संबंधावर आधारलेले भेद (थॅलॅमिफ्लोरल, कॅलिसिफ्लोरल व कॉरोलिफ्लोरल) आजही मान्य आहेत. क्रिप्टोगॅमी व फॅनिरोगॅमी (म्हणजे अपुष्प व सपुष्प वनस्पती) या संज्ञाही कांदॉल यांच्या Prodomus systematis naturalis regni vegetabilis (१८१९) या ग्रंथापासूनच रूढ झाल्या. अपुष्प वनस्पतींत फक्त नेचांचा समावेश केलेला आहे. याप्रमाणे कांदॉल यांनी प्रथम वनस्पतींची १६१कुले केली परंतु पुढे त्यांचे पुत्र आल्फोन्स दे कांदॉल (१८०६−९३) यांनी काही अधिक लक्षणे विचारात घेऊन १८४४मध्ये २१२कुलांत वर्गीकरण केले.  

 

रॉबर्ट ब्राऊन (१७७३−१८५८) या इंग्लिश शास्त्रज्ञांनी शंकुमंत [⟶कॉनिफेरेलीझ] व ⇨सायकॅचेलीझ या वनस्पतींच्या बीजकांना आवरण नसून ती उघडीच असतात, असे निदर्शनास आणून बीजी वनस्पतींतील प्रकटबीज व आवृतबीज यांतील फरक स्पष्ट केला. याखेरीज त्यांनी बीजकाच्या फलनोत्तर विकासाची माहिती मिळवून बीजातील द्विदलिकित, एकदलिकित व इतर लक्षणांचा वर्गीकरणात उपयोग केला. ⇨ॲस्कलेपीएडेसी व ⇨ऑर्किडेसी या कुलांतील पुष्प-संरचना व परागण (पराग स्त्री-केसरावर पडण्याची वा नेले जाण्याची क्रिया) यासंबंधीची माहीती त्यांनी पहिल्याने नमूद केली तसेच कित्येक वनस्पतींच्या पुष्प-संरचना त्यांनी विशद केल्याने संबंधित जातीचे नैसर्गिक आप्तभाव ठरविणे व त्यांचे योग्य वर्गीकरण करणे सुलभ झाले. [⟶ब्राऊन, रॉबर्ट] 

निरनिराळ्या शास्त्रज्ञांनी १८२५−४५या काळात सु. २४वेगवेगळ्या वर्गीकरण पद्धती सुचविल्या. यांपैकी बहुतेक कांदॉल यांच्या पद्धतीवर आधारित असून त्यांत क्वचित काही बदल केलेले आढळतात. एस्.एल्.एंटलिकर (१८०५−४९) यांनी वनस्पतींचे⇨कायक वनस्पती (थॅलोफाइट्‌स) व स्कंधवत वनस्पती (कार्मोफाइट्‌स) असे गट पाडून पहिल्यात शैवले, कवके व शैवाक यांचा आणि दुसऱ्यात शेवाळी, नेचे व बीजी वनस्पती यांचा समावेश केला. ही पद्धती फक्त युरोपात स्वीकारली गेली. याखेरीज त्यांनी एकदलिकितांचे अपुष्क (अन्नसाठायुक्त भाग नसलेल्या) व सपुष्क असे बीजांचे प्रकार लक्षात घेऊन दोन गट केले. आदॉल्फ ब्रॉन्यार (१७७०−१८४७) यांनी बीजी (फॅनिरोगॅमी), अबीजी (क्रिप्टोगॅमी) असे भेद दर्शविणारे गट करून दुसऱ्यात लिनीअस यांनी ठरविलेले लहान गट समाविष्ट केले. इंग्लंडमध्ये जॉन लिंडली (१७९९−१८६५) यांनी पूर्वी प्रसिद्ध झालेल्यापद्धतींतील चांगले मुद्दे एकत्रित करून प्रथमतःच इंग्रजीत झ्यूस्य पद्धतीवर आधारलेली बहुव्यापक नैसर्गिक वर्गीकरण पद्धती आपल्या व्हेजिटेबल किंग्डम (१८४६) या ग्रंथात प्रसिद्ध केली. ब्रिटनमध्ये व अमेरिकेत लिनीअस पद्धतीनंतर मोठ्या प्रमाणावर स्वीकाली गेलेली अशी लिंडली पद्धती ही पहिलीच पद्धती होती. १८५०पूर्वी प्रसिद्ध झालेल्या पद्धतीत अबीजी वनस्पतींचे वर्गीकरण योग्य प्रकारे झाले नव्हते. चांगल्या सूक्ष्मदर्शकाचा वापर रूढ झाल्यावर व्हिल्हेल्म होफमाइस्टर (१८२४−७७) या जर्मन वनस्पतिवैज्ञानिकांनी या वनस्पतींचे गर्भविज्ञान, जीवनचक्रे, पिढ्यांचे एकांतरण (एकांतरण, पिढ्यांचे) इत्यादींच्या अभ्यासाने परस्परांतील व बीजी वनस्पतींशी असलेले संबंध स्पष्ट केले आणि त्यावरून एकूण वनस्पतींचे थॅलोफायटा (कायक वनस्पती), ब्रायोफायटा (शेवाळी), टेरिडोफायटा (वाहिनीवंत अबीजी वनस्पती), जिम्नोत्सर्मी (प्रकटबीज वनस्पती) आणि अँजिओस्पर्मी (आवृतबीज वनस्पती) असे पाच गट बनविले.  


 नैसर्गिक वर्गीकरण पद्धतींचा अखेरचा व महत्त्वाचा टप्पा म्हणजे ⇨जॉर्ज बेंथॅम (१८००−८४) व ⇨सर जोसेफ डाल्टन हूकर (१८१७−१९११) या इंग्लिश वनस्पतिवैज्ञानिकांनी प्रतिपादिलेल्या बीजी वनस्पतींच्या वर्गीकरण पद्धतींचा होय. मूलतः ही पद्धती कांदॉल यांच्या पद्धतीवर आधारलेली होती आणि ती Genera Plantarum या ग्रंथरूपाने १८६२−८३या काळात प्रसिद्ध झाली. या पद्धतीचा वापर आजही मोठ्या प्रमाणावर होत आहे. तीत प्रदलांची सलगता व अलगता यांवर भर देऊन द्विदलिकितांचे मुक्तप्रदल (पॉलिपेटॅली) युक्तप्रदल (गॅमोपेटॅली) व एकावृत (मोनोक्लॅमिडी) वनस्पती असे तीन गट केले आहेत. मुक्तप्रदल गटात तीन लहान गटांचा (थॅलॅमिफ्लोरी, डिस्किफ्लोरी व कॅलिसिफ्लोरी) समावेश केलेला आहे. युक्तप्रदल गटात अधःस्थ किंजपुट (इन्फिरी), द्विकिंज (बायकार्पेलेटी) व ऊर्ध्वस्थ किंजपुट आणि दोन वा अधिक किंजदले (हेटेरोमेरी) अशी लक्षणे असलेले तीन उपगट (श्रेणी) केले आहेत. एकावृत्तांचे वर्गीकरण तितकेसे समाधानकारक नाही (यात आठ श्रेणी आहेत) प्रकटबीज वनस्पतींचे स्थान द्विदलिकित व एकदलिकित यांच्यामध्ये केवळ सोयीस्कर म्हणून ठेवले आहे. एकदलिकिती यांच्यामध्ये केवळ सोयीस्कर म्हणून ठेवले आहे. एकदलिकितांचे सात गट (श्रेणी) असून अपिकिंज वनस्पतींपासून (ऑर्किडेसी व सिटॅमिनी यांपासून) सुरुवात करून क्रमाने प्रदलसमअपिकिंज (लिलिएसी), हरित परिदल (जुंकेसी, पामेसी), ऱ्हासित परिदल (पॅंडनेसी, ॲरेसी), मुक्तकिंज (ऑलिस्मेसी) व शेवटी ऱ्हासित फुलांच्या (गवते, लव्हाळे इ.) वनस्पती अशी मांडणी केली आहे. अशाप्रकारे एकूण बीजी वनस्पतींचे २०२कुले ७,५६९प्रजाती व ९७,२०५जाती असे वर्गीकरण केले आहे. या पद्धतीत काही दोष असूनही क्यू येथील सुप्रसिद्ध वनस्पतिसंग्रहालयातील वर्गीकरण या पद्धतीनेच केले आहे.  

 

जातिविकसित (किंवा क्रमविकास सिद्धांतावर आधारित) वर्गीकरण पद्धती : वनस्पतींच्या (व प्राण्यांच्या) जातीत हळूहळू क्रमाने होणाऱ्या कायमस्वरूपी बदलांमुळे त्यांचा विकास होतो व एका जातीचे दुसऱ्या जातीत परिवर्तन होऊन नवीन जातीची निर्मिती होते, हा ⇨चार्‌सडार्बिन यांनी १८५९मध्ये ओरिजिन ऑफ स्पीशीज या ग्रंथाद्वारे मांडलेला सिद्धांत सर्वमान्य झाल्यावर नैसर्गिक वर्गीकरण पद्धतीच्या निर्मितीला प्रोत्साहन मिळाले. वनस्पतींच्या भिन्न गटांचे क्रमवार संबंध जोडणे शक्य होऊन वर्गीकरणाला एक नवीन दिशा मिळाली. [⟶ क्रमविकास].  

याच सुमारास ⇨हाइन्सिक गुस्ताफ आडोल्फ एंग्लर (१८४४−१९३०) या जर्मन वनस्पतिवैज्ञानिकांनी मांडलेली वर्गीकरण पद्धती यूरोपात व अमेरिकेत सत्वर स्वीकारण्यात आली. तीमध्ये आवृतबीजी वनस्पतींची (फुलझाडांची) साध्या फुलाच्या वनस्पतींपासून जटिल फुलांच्या वनस्पतींपर्यंत चढत्या क्रमाने मांडणी केली आहे. या पद्धतीला ए. डब्ल्यू, आइख्लर (१८३९−८७) यांच्या सर्व वनस्पतींच्या वर्गीकरण पद्धतीचा आधार असून दोन्हींतील फरक काही तपशीलाबाबत व प्रमुखगटांच्या नावांबद्दल आहे त्यांतील मूलभूत संकल्पना व तत्त्व याबाबतीत नाही. या पद्धतीत आरंभीच्या श्रेणीत छदांचा (किंवापरिदलांचा) पूर्ण अभाव किंवा एकावृत (छंदासारख्या परिदलांचे एकच आवरण असलेल्या) फुलांच्या वनस्पती असून त्यानंतर द्‌व्यावृत्त (पुष्पदलांची दोन बाह्यवरणे असलेल्या) वनस्पती घेतलेल्या आहेत. त्यापुढे दोन अवस्थांतून विकास झाल्याचे गृहीत धरून प्रथम छदासारख्या परिदलांच्या आणि नंतर संवर्त व रंगीत पुष्पमुकुट असलेल्या वनस्पती घेतलेल्या आहेत. मुक्तप्रदलापेक्षा युक्तप्रदल वनस्पतींना वरच्या पातळीत ठेवले असून त्यानंतर चढत्या क्रमाने अवकिंज,परिकिंज व अपिकिंज[⟶फूल] या अवस्थांना प्राधान्य दिले आहे. याप्रमाणे सर्व ज्ञात फुलझाडांचे वर्गीकरण क्रमविकासच्या तत्त्वानुसार केलेले आढळते. या पद्धतीनुसार वनस्पति कोटीचे १४प्रमुख गट असून पहिल्या १३मध्ये शैवले, कवके, शेवाळी व वाहिनीवंत अबीजी वनस्पती आणि १४व्या गटात बीजी वनस्पती अंतर्भूत आहेत. बीजी वनस्पतीत ७प्रकट बीजींचे वर्ग, ११एकदलिकितांचे गण व ४४द्विदलिकितांचे गण दिले आहेत.द्विदलिकित वर्गाचे आर्किक्लॅमिडी (३३गण) व मेटॅक्लॅमिडी (११गण) असे दोन उपवर्ग मानले आहेत. येथे प्रकटबीजी वनस्पती या आवृतबीजी वनस्पतींच्या पूर्वज समजण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रकटबीजी वनस्पतींप्रमाणेच ज्यांची फुले एकलिंगी, अनाकर्षक ववायूमार्फत परागण होणारी आहेत. अशा कुलांपासून आवृतबीजी वनस्पतींच्या विकासाला प्रारंभ झाला, ही या पद्धतीतील महत्त्वाची धारणा आहे. एंग्लर यांनी कार्ल फोन प्रांट्‌ल (१८४९−९३) यांच्या व इतर तज्ञांच्या सहकार्याने वनस्पतींच्या ⇨आकारविज्ञान, गर्भविज्ञान, शारीर, भौगोलिक विस्तार इ. शाखांतील निष्कर्षांसह या वर्गीकरणाप्रमाणे सर्व कुलांची व प्रजातींची वर्णने आणि संदर्भ ग्रंथांचीयादी असलेला सचित्र ग्रंथ Due Natiirlichen Pflanzenfamilien (२३) खंड, १८८७−१९१५) संपादित केला. यातील वर्गीकरण पद्धतीला एंग्लर-प्रांटल पद्धती म्हणतात व त्यांनी ती क्रमविकास सिद्धांताच्या जास्तीत जास्त जवळ नेण्याचा प्रयत्न केल्यामुळे ती आजही जगातील बऱ्याच वनस्पतिसंग्रहालयांत वापरली जाते.  

चार्ल्स एडविन बेसी (१८४५−१९१५) या अमेरिकन वनस्पति-वैज्ञानिकांनी एंग्लर व प्रांटल आणि बेंथॅम व हूकर यांच्या वर्गीकरण पद्धतीतील दोष वगळून पण बेंथॅम व हूकर यांच्या पद्धतीवर आधारलेली आणि क्रमविकास सिद्धांताशी सुसंगत अशी एक जातिविकसित पद्धती १९१५मध्ये मांडली. ही पद्धतीदेखील आकारविज्ञान, शारीर व पुरावनस्पतीचे अवशेष या सर्वांपासून उपलब्धझालेल्या पुराव्यावर आधारलेली आहे. त्यांनी वनस्पतींच्या प्राचीन व विकसित अशा २८लक्षणांची एक यादी केली असून त्यांचे परस्पर आप्तसंबंध व त्यांचा क्रमविकास स्पष्ट केले आहेत. त्यांनी गण व कुलेयांची काही नावे बददली, पूर्वीच्या काही गणांची कुले बनविली व गणांना त्यावरचा दर्जा दिला. आवृत्तबीजांचा उगम सायकॅडांपासून [⟶सायकॅडेलीझ] झाला असून शंकूसारखी सर्पिल मांडणीची फुले प्रारंभिक व ॲपिकिंज फुले प्रगत, तसेच मुक्तप्रदलांपेक्षा युक्तप्रदल फुले प्रगत असून युक्त प्रदलांपैकी अपिकिंज फुले ही सर्वांत प्रगत आहेत. अशी बेसी यांची धारणा होती. त्यांनी आवृतबीजी वनस्पतींचे केलेले दोन प्रमुख गट म्हणजे आल्टर्नेफोली (एकदलिकित) व ॲपोझिटिफोली (द्विदलिकित) हे होत. यांची क्रमविकासानुसार त्यांनी प्रतिपादिलेल्या रचनेला बेसी (निवडुंग) असे संबोधिले जाते. या पद्धतीचा प्रारंभ म्हणजे मॅग्नोलिया कुल होय. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील वनस्पतिसंग्रहालयांत ही पद्धती वापरण्यात येते पण तिला इतर देशांत फारशी मान्यता मिळालेली नाही.  

 

जॉन हचिन्सनया ब्रिटिश शास्त्रज्ञांनी १९२६−३४या काळात मांडलेली पद्धती बेसी यांच्या पद्धतीशी मिळतीजुळती असून तीत सर्व आवृतबीजी वनस्पतींचा उगम काल्पनिक व प्रारंभिक आवृतबीजीपासून एकस्त्रोतोद्‌भव (मूळच्या एका गटापासून) झालेला असावा, असे मानले आहे. या आवृतबीजींचे त्यांनी लिग्नोसी (काष्ठयुक्त) व हर्बेसी (ओषधीय) असे दोन मुख्य गट करून २२लक्षणांच्या यादीच्या साहाय्याने त्यांचा क्रमविकास ठरविला आहे. युक्तप्रदल कुलांचा उगम स्वतंत्रपणे झाला असून त्या सर्वांची एकच प्रगत पातळी नसावी, असे त्यांचे मत होते. त्यांच्या द्विदलिकितांच्या वर्गीकरणापेक्षा एकदलिकितांचे वर्गीकरण अधिक समर्पक व म्हणून ग्राह्य समजले जात असून अमेरिकेत ते अधिक लोकप्रिय आहे.  

इलिनॉय विद्यापीठातील ओस्वाड टिप्पो यांनी १९४२मध्ये आकारविज्ञान व शारीर यांच्यावर आधारलेली अशी जातिविकसित वर्गीकरणाची स्थूल रूपरेषा मांडली आणि ती अमेरिकेत प्रसिद्ध व स्वीकृत आहे. पुरावनस्पतिविज्ञान व विद्यमान वनस्पतींची माहिती यांच्या तौलनिक अभ्यासाने त्यांचे परस्परांशी असलेले आप्तसंबंध समजून घेऊन त्यांच्या आधारावर टिप्पो यांनी आपली पद्धती बनविली आहे. वाहिनीवंत वनस्पतींचे त्यांनी सायलोप्सिडा, स्फेनोप्सिडा, लायकोप्सिडा व टेरोप्सिडा (यात फिलिसीनी अथवा नेचे, आवृतबीजी व प्रकटबीजी यांचा समावेश आहे) असे चार विभाग केले आहेत.  


 हचिन्सन यांच्यानंतरचे ए.तख्तजान (१९६७) व. ए. क्रॉन्क्विस्ट (१९६८) हे दोन महत्त्वाचे वनस्पतिवर्गीकरणविज्ञ मानले जातात. तख्तजान यांनी आपले बीजी वनस्पतींचे वर्गीकरण फ्लोरा आर्मेनिया या ग्रंथात विशद केले आहे. या वर्गीकरणाचे दोन प्रमुख गट म्हणजे मॅग्नोलिएटी (द्विदलिकित) व लिलिएटी (एकदलिकित) हे होत. ही पद्धती म्हणजे बेंथॅम व हूकर यांची सुधारलेली पद्धती आहे. अशाच तऱ्हेची पद्धती क्रॉन्क्विस्ट यांनी प्रतिपादिली आहे. तीत त्यांनी बेसी यांच्या निवडुंगाप्रमाणेच फुग्याच्या आकृतीनुसार क्रमविकास दर्शविला आहे.  

वरील सर्व वर्गीकरण प्रामुख्याने बीजी वनस्पतींचे आहे.  

अशा तऱ्हेने वनस्पतींच्या वर्गीकरण पद्धतीत सारखे बदल होत गेलेले दिसून येतात. आता वर्गीकरणाकरिता आकारविज्ञानाबरोबरच शारीर, गुणसूत्रविचार, गर्भविज्ञान वगैरे वनस्पतिवैज्ञानिक शाखांचा आधार घेतला जातो. आज जगातील भिन्न देशांत भिन्न वर्गीकरण पद्धतींचा वापर होत असून सर्वसाधारणपणे एंग्लर-प्रांट्‌ल आवश्यक त्या फरकांसह वापरण्यात येते. वनस्पतिविज्ञानाच्या विविध शाखांत होत असलेल्या प्रगतीनुसार वर्गीकरण पद्धतीत सुधारणा होत आहेत आणि त्यामुळे नवीन माहितीच्या आधारे अधिक नैसर्गिक वर्गीकरण पद्धती उदयास येण्याची शक्यता आहे.  

वनस्पतिकोटीचे स्थूल वर्गीकरण : वनस्पतींच्या व वनस्पतिकोटीच्या वर्गीकरणात सतत फेरबदल होत गेलेले आहेत.एकोणिसाव्या शतकाच्या मध्य काळात वनस्पतिवैज्ञानिक सर्व वनस्पती क्रिप्टोगॅम्स (प्रजोत्पादक भाग अदृश्य असलेल्या) व फॅनिरोगॅम्स (प्रजोत्पादक भाग अदृश्य असलेल्या) अशा दोन मुख्य गटांत विभागात असत. क्रिप्टोगॅम्समध्ये फुले वा बीजे यांसारख्या स्पष्ट प्रजोत्पादक संरचना नसलेल्या नेचे, शेवाळी, शैवले व कवके या वनस्पतींचा समावेश होता. तथापि या विभागणीचा पाया कृत्रिम व खरे परस्पर आप्तसंबंध न दर्शविणारा होता, असे दाखवून देण्यात आले.  

विसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या दशकांत वनस्पतींच्या आप्तसंबंधाविषयीचे ज्ञान वाढत गेल्यावर अनेक वनस्पतिवैज्ञानिकांनी वनस्पतींचे थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा व स्पर्‌मॅटोफायटा असे चार प्रमुख गट ओळखण्यास मान्यता दिली. थॅलोफायटामध्ये सूक्ष्मजंतू, शैवले व कवके या कायक शरीररचना असलेल्या म्हणजे ज्यांना खरी मुळे, खोडे व पाने नाहीत अशा जीवांचा समावेश करण्यात आला. ब्रायोफायटामध्ये शेवाळी व ⇨यकृतकायांचा अंतर्भाव होतो यांतही खऱ्या मुळांचा, खोडांचा व पानांचा अभाव असतो पण थॅलोफायटांपेक्षा त्यांत अनेक बाबतींत फरक असतो. एक महत्त्वाचा फरक म्हणजे ब्रायोफायटाच्या फलित स्त्री-गंतुकापासून (प्रजोत्पादक कोशिकेपासून) विकसित झालेला गर्भ वनस्पतीबाहेर न आढळतातिच्या स्त्री-लिंगी संरचनेत आढळणे, हा होय. टेरिडोफायटामध्ये नेचे व संबंधित स्वरूपाच्या वनस्पती अंतर्भुत होतात. टेरिडोफायटा वनस्पतींचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांत खरी मुळे, खोडे व पाने असण्याबरोबरच द्रव पदार्थ वाहून नेणारी विशेषित प्रकाष्ठ व परिकाष्ठ वाहिन्यांची बनलेली प्रणाली असते, हे होय मात्र टेरिडोफायटांचा क्रमविकास बीजोत्पादनाच्या पातळीपर्यंत झालेला नाही. स्पर्मॅटोफायटांमध्ये खरी मुळे, खोडे व पाने, तसेच विशेषित वाहिनीवंत ऊतक (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांचा समूह) असलेल्याशंकुमंत व सपुष्प वनस्पतींचा समावेश करण्यात आलेला होता .

वरील चार-विभागयुक्त पद्धती शेवटी असमाधानकारक ठरली आणि काही वनस्पतिवैज्ञानिकांनी यावर उपाय म्हणून नवीन दोनीविभागयुक्त पद्धती सुचविली. त्यांनी अंतर्गत गर्भ विकसित होणाऱ्या वनस्पतींचा (शेवाळी, नेचे व बीजी वनस्पती यांचा) अंतर्भाव एंब्रिओफायटा या विभागात, तर अंतर्गत गर्भ तयार होणाऱ्या सूक्ष्मजंतू, शैवले व कवके यांचा समावेश थॅलोफायटा या दुसऱ्या प्रमुख विभागात केला. आणखी काही वनस्पतिवैज्ञानिकांनी एक तीन-विभागयुक्तपद्धती मांडली आणि तीत वाहिनीवंत वनस्पती (नेचे व बीजी वनस्पती) ट्रॅकिओफायटा या विभागात समाविष्ट केल्या, तर अवाहिनीवंत वनस्पतींची विभागणी थॅलोफायटा (सूक्ष्मजंतू, शैवले व कवके) व ब्रायोफायटा (शेवाळी व यकृतका) या विभागांत केली. या पद्धतीही असमाधानकारक ठरल्या.

आजमितीस जीवसृष्टीची वनस्पती व प्राणी या दोन परंपरागत कोटींत विभागणी करण्याऐवजी पाच कोटीत विभागणी करणाऱ्या पद्धतीत सूक्ष्मजंतू काही शैवलीय प्रकार व कवके यांना आता वनस्पती समजण्यात येत नाही. त्यांची आता स्वतंत्र कोटीत गणना करण्यात येते. या वर्गीकरणानुसार मोनेरा या कोटीत सूक्ष्मजूंत व नील-हरित शैवले (यांना सायानोबॅक्टिरिया असेही आता म्हणतात) यांचा प्रोटिस्टा या कोटीत यूरलीमासदृश शैवले, पीत-हरित शैवले, सोनेरी, तपकिरी शैवले, डायाटम व द्विकशाभिकायुक्त [⟶कशामिका] शैवले यांचा आणि फंजाय या कोटीत सर्व कवकांचा समावेश होतो. राहिलेली सर्व वनस्पतिकोटी निरनिराळ्या तज्ञांनी ५ते १८प्रमुख गटांत विभागलेली आहे. गटांची ही मोठी संख्या अंशतः वाहिनीवंत वनस्पती (ट्रॅफिओफायटा) हा परस्पर आप्तसंबंध दर्शविणारा नैसर्गिक समूह असल्याच्या संकल्पनेचा सकृतदर्शनी त्याग केल्यामुळे असून त्यामुळे वाहिनीवंत वनस्पतींचा प्रत्येक प्रधान गट हा मुख्य विभाग गणला गेला आहे.  

सर्वसामान्यतः फक्त सहा मुख्य विभाग मानण्यात येतात व ही प्रायः तात्पुरती कार्यकारी व्यवस्था असून तीत तत्परतेने सुधारणा करण्यात येतात (विविध तज्ञांनी अशा निरनिराळ्या व्यवस्था सुचविलेल्या आहेत, उदा., सिबिल पी. पार्कर यांनी संपादित केलेल्या सिमाप्सिस अँड क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑरगॅनिझम्स या १९८२मध्ये प्रसिद्ध झालेल्या ग्रंथात दिलेली वर्गीकरण व्यवस्था). खाली हे सहा विभाग, तसेच ट्रॅकिओफायटा विभागातील व स्पर्मोप्सिडा उपविभागातील अंतर्गत विभागणीही दिलेली आहे.  

        विभाग−क्वोरोफायटा (हरित शैवले)  

        विभाग −कॅरोफायटा (स्टोनवर्ट्‌स  ही शैवले असून त्यांतील बहुतेकजातींवर चुन्याचा थर असतो काही वेळा हा क्लोरोफायटाचा भाग मानण्यात येतो). 

        विभाग −फीओफायटा (तपकिरी शैवले)  

        विभाग −ऱ्हाडेोफायटा (लाल शैवले)  

        विभाग −ब्रायोफायटा (शेवाळी, यकृतका, शृंगी यकृतका)  

        विभाग −ट्रॅकिओफायटा (वाहिनीवंत वनस्पती काही वर्गीकरणांत याला विभाग म्हणून मान्यता नाही, त्यांत खालील उपविभाग पूर्ण विभाग म्हणून मानतात.)  

        उपविभाग− सायलोप्सिडा (झुबकेदार नेचे)  

        उपविभाग − लायकोप्सिडा (क्लब मॉसेस लायकोपोडिअलीझ) 

        उपविभाग − स्फेनोप्सिडा [हॉर्सटेल्स ⟶एक्विसीटम]  

        उपविभाग − टेरोप्सिडा (हॉर्सटेल्स-एक्विसीटम)  

         उपविभाग−टेरोप्सिडा (नेचे) 

         उपविभाग − स्पर्मोप्सिडा (बीजी वनस्पती ज्या वर्गीकरणात बीजी वनस्पतींचा पूर्ण विभागात−स्पर्‌मॅटोफायटा−समावेश केलेला आहे त्यांत  

                            खाली दिलेले वर्ग उपविभाग म्हणून मानतात ज्या वर्गीकरणात बीजी वनस्पती हा वेगळा प्रकार म्हणून ग्राह्य धरला जात नाही

                            त्यांत खालील वर्ग पूर्ण विभाग मानण्यांत येतात.)  


       वर्ग − टेरिोस्पर्मी (बीजी नेचे विलुप्त)  

       वर्ग−सायकॅडी (सायकॅड्‌स)  

       वर्ग−गिंकोई [गिंकोज ⟶गिंकोएलीझ]  

       वर्ग − कॅनिफेरी [कॉनिफर वृक्ष ⟶कॉनिफेरेलीझ]  

       वर्ग − नीटी [नीटम्‌स ⟶नीटलीझ]  

       वर्ग−अँजिआस्पर्मी [सपुष्प वनस्पती किंवा फुलझाडे ⟶वनस्पती, आवृतबीज उपविभाग]  

मराठी विश्वकोशात ज्या आधारभूत वर्गीकरण पद्धतीचा प्रायः वापर केलेला आहे तिची स्थूल रूपरेखा खाली दिली आहे. आवृतबीजींचे वर्गीकरण एंग्लर−प्रांट्‌ल पद्धतीने केलेले आहे. सर्व मोठ्या गटांचे तपशीलवार वर्गीकरण मराठी विश्वकोशात त्या त्या नावाच्या शीर्षकाच्या स्वतंत्र नोंदीत दिलेले आहे.  

                            वनस्पतिकोटी 

(अ) विभाग − अबीजी वनस्पती (क्रिप्टोगॅम्स)  

        (१) उपविभाग − कायक वनस्पती (थॅलोफायटा)  

                        वर्ग − शैवले  

                        वर्ग − कवके  

                        वर्ग − शैवाक  

        (२) उपविभाग − शेवाळी (ब्रायोफायटा) 

                       वर्ग − यकृतका 

                       वर्ग − हरिता 

         (३) उपविभाग−वाहिनीवंत अबीजी वनस्पती (टेरिडोफायटा)  

                       वर्ग − सायलोफायटिनी  

                       वर्ग − लायकोपोष्ठिनी  

                      वर्ग – एक्विसीटीनी  

                      वर्ग – नेचे (फिलिसीनी)  

(आ) विभाग−बिजी वनस्पती (फॅनिरोगॅम्स) 

            (१) उपविभाग − प्रकटबीज वनस्पती (जिम्नोसपर्म्स) : ७गण  

            (२) उपविभाग − आवृतबीज वनस्पती (ॲजिआर्स्मस) 

                     वर्ग − अकदलिकित : एकूण ११गण वप्रमुख कुले २७ 

                    वर्ग − द्विदलिकित : एकूण ४४गण वप्रमुख कुले ११५ 

कित्येक देशांत वापरात असलेल्या सुधारित नव्या वर्गीकरणाची स्थूल रूपरेखा खाली दिली आहे. सर्व मोठ्या गटांचे तपशीलवार वर्गीकरण मरठी विश्वकोशात त्या त्या नावाच्या शीर्षकाच्या स्वतंत्र नोंदीत दिले आहे. 

वनस्पतिकोटी                                                         जन्या संज्ञा 

(१) उपकोटी − थॅलोफायटा-कायक वनस्पती          शैवले (अल्गी)  

                       :७विभाग

                        थॅलोफायटा − कायक वनस्पती          कवके (फंजाय)  

                       : ३विभाग

 (२) उपकोटी−एंब्रिओफायटा  

      (अ) विभाग−ब्रायोफायटा                                  शेवाळी (मॉसेस)  

                वर्ग − हिपॅटिसी  

                वर्ग − मुस्सी  

पहा : कवक क्रमविकास नेचे फूल वनस्पति, अबीजी विभाग वनस्पती, आवृतबीज, बीजी विभाग वनस्पती, वाहिनीवंत अदीजी विभाग वर्गीकरण- विज्ञान शेवाळी शैवले शैवाक.

संदर्भ : 1. Benson, L. Plant Classification, Lexington, Mass., 1979.  

            2. Benson, L. Plant Taxonomy, New York, 1962.  

            3. Core, E. L. Plant Taxonomy, Englewood Cliffs, N.J., 1962.

            4. Cronquist, A. Evolution and Classfication of Flowering Plants, Boston, 1968.

            5. Cronquist, A. An integrated System of Classification of flowering Plants, 1981.  

            6. Hutchinson, J. Families of Flowering Plants, Oxford, 1960.  

            7. Lawrence, G. H. M. An Introduction to Plant Taxonomy, New York, 1958.  

            8. Lawrence, G. H. M. Taxonomy of Vascular Plants, New York, 1965.

            9. Mukerjee, H. Ganguli, A. K. Plant Groups, Calcutta, 1964.  

            10. Proter, C. L. Taxonomy of Flowering Plants, San Francisco, 1960.  

            11. Rendle, A. B. Classification of Flowering Plants, Cambridge, 1963.  

            12. Shukla, P. Mishra, S. P. An Introduction to Taxonomy of Anglesperms, New Delhi, 1979.

  

सप्रे, अ.ब. परांडेकर, हं. आ, साने, हेमलता द.