रुद्राक्ष : (हिं, रुद्रक सं. क.गु.रुद्राक्ष इं. युट्रॅसम बीड ट्री लॅ. एलिओकार्पस गॉनिट्रस, ए. स्फेरिकस कुल-एलॉओकार्पेसी). फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] सु. १८ मी. उंच वृक्ष ब्रह्मदेश, रुद्राक्ष : एलिओकार्पस गॉनिट्रस : (१) फुलोऱ्यासह फांदी, (२) फूल, (३) विभागलेली पोकळी, (४) आठळ (ए. ट्युबरक्युलेटस), (५) आठळी (ए. रोबस्टस).थायलंड, मलाक्का, मलाया, नेपाळ व भारत (प. बंगाल, बिहार, आसाम,म. प्रदेश, गुजरात, कर्नाटक व महाराष्ट्र) इ. प्रदेशांत याचां प्रसार आहे. कोकणातील जंगलात हा सामान्यपणे आढळतो. याच्या एलिओकार्पस या प्रजातीत सु. २०० जाती असून भारतात त्यांपैकी २६ आढळतात. त्यांपैकी रुद्राक्ष एक आहे. याची साल गडद करडी, तीवर बारीक छिद्रे व अरूंद, आडव्या, बारीक चिरा असतात. कोवळे भाग लवदार असून पाने साधी, एकाआड एक मध्यम आकाराची (१०−१५×२.४−४.५ सेंमी) आयत−कुंतसम (भाल्यासारखी) दातेरी असतात. उपपर्णे (पानाच्या तळाशी असलेली उपांगे) फार लहान व लवकर गळणारी असून फांद्यांच्या टोकांस पानांची गर्दी असते. थंडीच्या मोसमात खोडावर जुन्या पानांच्या बगलेत अनेक लोंबत्या मंजऱ्यावर [फुलोऱ्यांवर ⟶ पुष्पबंध] लहान पांढरी फुले येतात. संदले व प्रदले सुटी व प्रत्येकी पाच असून फुलात प्रपिंडयुक्त [⟶ प्रपिंडे] बिंब असते, केसरदले सु. ४० व ती गटागटाने पाकळ्यांसमोर पण पुष्पस्थलीवर असतात किंजपुट लवदार, ऊर्ध्वस्थ (इतर पुष्पदलांच्या वरच्या पातळीत), काहीसा अंडाकृती, पंचखंडी व पाच कप्प्यांचा असतो [⟶ फूल]. फळ अश्मगर्भी [आठळीयुक्त ⟶ फळ], गोलसर, करवंदाएवढे (१.३−२.५ सेंमी. व्यासाचे), गुळगुळीत व जांभळे आणि आठळी एक, कठीण, गोलसर असून फळावर जाड उंचवटे (पुटकुळ्या) व पाच खाचा असतात तसेच त्यात पाच कप्पे व पाच बिया असतात. उन्हाळा व पावसाळा हे फळांचे मोसम आहेत. पाचांपेक्षा कमी किंवा जास्त खाचा असलेल्या आठळ्या (रुद्राक्ष) क्वचित आढळतात त्यांतील गुणधर्म भिन्न असतात, या समजुतीमुळे त्यांना बाजारात अधिक किंमत येते.

रुद्राक्षाच्या फळातील मगज (गर) आंबट व खाद्य असून तो मेंदूचे विकार व अपस्माराचे झटके यांवर उपयुक्त आहे. आटळ्या साफसूफ करून व त्यांना झिलई करून त्यांच्या माळा करतात व त्या फकीर लोक आणि हिंदू लोक गळ्यात व हातात घालतात. रुद्राक्षाचे लाकूड पांढरट करडे, बळकट व चिवट असून ते किरकोळ उपयोगाचे असते.

रुद्राक्ष याच नावाने दुसरी एक जातीही (क. भूतल लॅ. ए. ट्युबरक्युलेस) ओळखली जाते. हा एक मोठा सु. २४ मी. उंच व २ मी घेर असलेला वृक्ष सदापर्णी असून त्याला पानांखाली खोडावर पांढऱ्या. फुलांच्या मंजऱ्या नोव्हेंबरात येतात. आठळी फळे मे नंतर पिरतात ती लंबगोल, गुळगुळीत, ४−५.२ सेंमी. लांब असतात. आठळीत १−२ बिया असतात. आठळी दोन्ही बाजूंस काहीशी दबलेली असून सपाट बाजूवर उंचवटे असतात व सभोवती कंगोरा असतो. त्यांचाही उपयोग वर सांगितल्याप्रमाणे माळांकरिता करतात संधिवात विषमज्वर व अपस्मार यांवर आठळी वापरतात. खोडावरच्या सालीचा काढा अपचन, पित्तविकार व रक्तवांत्यावर देतात. फुले व पालवी आलेला वृक्ष सुंदर दिसतो उद्यानातून शोभेकरिता तो लावतात. सह्याद्री व कारवारपासून दक्षिणेकडे कुर्ग, निलगिरी, पळणी. अन्नमलई, त्रावणकोर इ. ठिकाणी याचा प्रसार आढळतो. याचे लाकूड घट्ट, चकचकीत व गुळगुळीक असून खोके, फळ्या इ. किरकोळ कामांस वापरतात.

जमदाडे, ज. वि. परांडेकर, शं. आ.