एरंड, जंगली : (हिं. जंगली एरंडी, उंदरबिबी सं. निकुंभ क. तोट्टागिड लॅ. जट्रोफा  ग्‍लँड्युलीफेरा कुल-यूफोर्बिएसी). या लहान सदापर्णी वृक्षाचा प्रसार आफ्रिकेतील उष्ण प्रदेश, श्रीलंका व भारत (बंगाल व महाराष्ट्र) इ. प्रदेशांत आहे. यात फिकट पिवळा रस असतो. खोडात अनेकदा द्विशाखाक्रम (दोन फांद्या फुटणे) दिसतो. पाने लांब देठाची, एकांतरित (एकाआड एक), लांबी-रूंदीला सारखी, ३­­­– ­­­५ खंडी, हस्ताकृती, दंतुर उपपर्णे लांब केसासारखी व विभागलेली. गुलुच्छासारख्या वल्लरीवर [→ पुष्पबंध], एकाच झाडावर, एकलिंगी, हिरवट पिवळी फुले छदांच्या बगलेत येतात. पाने, उपपर्णे, छदे व फुलोरे या सर्वांवर प्रपिंडयुक्त (ग्रंथियुक्त) केस असल्याने लॅटिन नावातील जातिवाचक शब्द बनला आहे. पुं-पुष्पात आठ खाली जुळलेली केसरदले तळास प्रपिंडयुक्त बिंब असते संदले व प्रदले लहान स्त्री-पुष्पात फक्त पाच संदले किंजपुट ऊर्ध्वस्थ, २­­­–४ कप्प्यांचा व प्रत्येक कप्प्यात एकच बीजक [→ फूल] बोंड लहान त्रिखंडी, बिया काळ्या व चकचकीत. बियांतील तेल रेचक संधिवात, जुनाट व्रण, जखमा, नायटे, पक्षाघात इत्यादींवर गुणकारी झाडातील रस डोळ्यातील पटल दूर करण्यास वापरतात मुळांचा फांट (काढा) रेचक व शरीरातील प्रपिंडाची सूज कमी करण्यास उपयुक्त.

मोगली एरंड : (हिं. जंगली-पहाडी एरंड गु. जंगली एरंडी क. अडालू दोड्डा सं. आखुपर्णिका इं. बार्बेडोस फिझिक नट लॅ. जट्रोफा कुर्कास कुल-यूफोर्बिएसी). जट्रोफा  या वंशातीलच हे एक मोठे पानझडी क्षुप (झुडूप) असून याचे मूलस्थान अमेरिकेतील उष्ण प्रदेशात आहे. भारतात ते सर्वत्र आढळते. शेताच्या कडेने कुंपणाकरिता लागवड करतात. पाने साधी, एकांतरित (एकाआड एक), हृदयाकृती, ३­­­–५ खंडित. फुले एकलिंगी, पिवळसर हिरवी, कक्षास्थ (बगलेत), कुंठित परिमंजरीवर येतात [→ पुष्पबंध यूफोर्बिएसी]. बोंड अंडाकृती काळे व तडकून तीन शकले होतात. बिया गर्द पिंगट, कृमिनाशक व रेचक. चीक खरूज, इसब व नायट्यावर गुणकारी. हिरड्या सुजल्यावर कोवळ्या फांद्यांनी दात घासतात. पानांचा काढा व लेप दुग्धवर्धनाकरिता स्तनास लावतात. बियांत ‘कुर्सीन’ हे विष असते. झाड मत्स्यविष आहे. 

पहा : यूफोर्बिएसी वनस्पति, विषारी.

 मोगली एरंड : (१) फुले व फलांसह फांदी, (२) फुलेरा, (३) फल, (४) बी.

जमदाडे, ज. वि.