ब्रह्मदंडी : (मोटा चोर, डाहान गु. तालाकांटो सं. अजदंडी, कंटपत्रफला लॅ. ट्रायकोलेपिस ग्लॅबेरिम कुल-कंपॉझिटी). ही भारतात सर्वत्र (राजस्थान, मध्य प्रदेश व द्वीपकल्पीय भाग) आढळणारी, एक वर्षभार जगणारी, सरळ उंच वाढणारी, मजबूत, केशहीन औषधी आहे. फांद्या कोनयुक्त व रेषांकित पाने साधी, बिनदेठाची, भाल्यसारखी (२.५-६.५ सेंमी. ३-६ मिमी.) व तीक्ष्ण दातेरी कडांची असून प्रत्येक पेऱ्यावर ६-८ मिमी. लांबीचे लांबट वाटोळे फुलोरे (स्तबके) डिसेंबरात येतात त्यावर द्विलिंगी, फलनक्षम व (१.२५-१.४ सेंमी. लांब) जांभळी फुले येतात. फळे लहान, शुष्क (कृत्स्नफळे), पुसट रेषांकित, आयत असून त्यांवर पिवळट तपकिरी केसांचा झुबका असतो. छदे टोकदार व काहीशी बाहेर वाकलेली [फूल]. या उष्ण व कडू वनस्पतीचा पांढरे कोड व चर्मरोग यांवर उपयोग करतात ती वाजीकर (कामोत्तेजक), तंत्रिका (मज्जातंतू) पोषक असून शुक्र दौर्बाल्यावर गुणकारी असते. मुळांची साल मूत्रविकार व कफविकार यांवर देतात.

ट्रा. अंगुस्तिफोलिया ही ब्रह्मदंडीच्या वंशातील दुसरी जाती केरळ व कर्नाटकाच्या किनाऱ्यावर आढळते. ही मूत्रल (लघवी साफ करणारी) व पौष्टिक असून कफविकारावर वापरतात. ट्रायकोलेपिस वंशातील एकूण सु. १५ जातींपैकी भारतात ११ आढळतात. ट्रा. अँप्लेक्सिकॉलिस व ट्रा. रॅडिकँन्स ह्या दोन्ही जातींना ‘डाहान’ म्हणतात व त्याही महाराष्ट्रात सापडतात.

पराडकर, सिंधु अ.