कोलानट : (कोरा, गोरा, कोलक लॅ. कोला ॲक्युमिनेटा कुल-स्टर्क्युलिएसी). कोला या इंग्रजी नावाचा वृक्ष मूळचा उष्ण आफ्रिकेतील असून प. आफ्रिका, जमेका, ब्राझील, भारत, वेस्ट इंडीज, मलाया व श्रीलंका इ. प्रदेशांत लागवडीत आहे. हा १२–२० मी. उंच असून सफरचंदाच्या झाडासारखा दिसतो.

कोला : (१) फुलांसह फांदी, (२) फळ, (३) बी.

खोड सरळ पाने एकाआड एक, साधी, तळाशी निमुळती, दीर्घवृत्ताकृती व चिवट फुले पानांच्या बगलेत किंवा फांद्यांच्या टोकास प्रत्येकी पंधराच्या परिमंजरीत येतात. संवर्तनलिका हिरवी पण संदले ५–६, सुटी, पिवळी [→ फूल]. तारकाकृती पेटिकाफळात ६–१२ लाल, जांभळट किंवा पांढऱ्या बिया असतात सुकल्यावर गर्द पिंगट दलिका (व्यापारी नाव : कोलानट) बाहेर पडतात. नवीन लागवड बियांपासून (किंवा छाट कलमांपासून) करतात. ५–६ वर्षांनी बहार येतो व वर्षांतून दोनदा याप्रमाणे ५० वर्षांपर्यंत पीक मिळते.

बिया (कोलानट) कडवट असून त्यात सु. दोन टक्के कॅफीन असते शिवाय बाष्पनशील (उडून जाणारे) तेल व एक ग्लुकोसाइड तसेच हृदयोत्तेजक कोलॅनीन असते. आफ्रिकेतील लोक बिया चघळतात. बिया खाल्ल्यास दम व सहनशक्ती वाढते, श्रम कमी वाटतात पण भूक मंदावते. चूर्णाचा उपयोग औषधे, पेये (कोला-पेय, कोला-चॉकोलेट) इत्यादींसाठी करतात. ⇨ कोकाच्या अर्काबरोबर त्याचे सौम्य उत्तेजक थंड पेय करतात. कोला नितिदा, कोला वेरा  या जातीही कोलानटप्रमाणे, पण कमी प्रमाणात, उपयुक्त आहेत.

पहा : स्टर्क्युलिएसी.

जमदाडे, ज. वि.