जांब, मलाकाजांब, मलाका : (मलाखी जांब हिं. मलाया जाम गु. कांदा, सफेत जांबू इं.मौंटन ॲपल, मले ॲपल लॅ. यूजेनिया मलाकेन्सिस, सायझिजियम मलाकेन्सिस कुल-मिर्टेसी). शोभेचे झाड म्हणून हा सु. ९–१५ मी. उंचीचा लहान सदापर्णी वृक्ष मलायात ‘कविका’ या नावाने प्रसिद्ध आहे. हल्ली ब्रह्मदेशात, भारतात (विशेषतः बंगालमध्ये) व इतरत्रही मुख्यतः बागेत लावतात. ⇨जांभूळ  व गुलाबी जांब हे याच्याच वंशातील असून ते सर्व जंबुल कुलात [⟶ मिर्टेसी] समाविष्ट आहेत व त्यांच्या सामान्य शारीरिक लक्षणांत साम्य आहे. भारतात हा वृक्ष दोन ते अडीच मीटरांपेक्षा उंच वाढत नाही. पाने गर्द हिरवी, २० ते ३० सेंमी., चिवट व अंडाकृती किंवा कुंतसम (भाल्यासारखी) व टोकदार असतात. याला एप्रिल-मेमध्ये सुरेख मंजिऱ्या येतात व त्यांवर किरमिजी वा जांभळ्या रंगाची फुले येतात. फुलातील असंख्य व मोठी केसरदले गळून पडल्यावर त्यांचा झाडाखाली सडा पडतो. मृदुफळे लंबगोल, नासपती अगर पेरूच्या आकाराची, फिकट पिवळसर अथवा लालसर असून मगज (गर) फारसा चवदार नसतो ती मे-जूनच्या सुमारास येतात. मगज पांढरा, रवाळ व खाद्य असतो. पुरपुरिया  प्रकारात फळे जांभळी असतात.

दोंदे, वि. प.; चौधरी, रा. मो.