बिगोनिएसी : फुलझाडांपैकी द्विदलिकित वनस्पतींचे एक लहान कुल [⟶ वनस्पति, आवृत्तबीज उपविभाग]. यांचा अंतर्भाव ए. एंग्लर व के. प्रांट्‌ल यांनी परायटेलीझमध्ये व जे. हचिन्सन यांनी कुकर्बिटेलीझमध्ये [कुर्कटी गणात ⟶ कुकर्बिटेसी] केला आहे. यामध्ये फक्त पाच वंश परंतु सु. ९२० जाती (ए. बी. रेंडेल यांच्या मते ६०८ जाती) समाविष्ट असून त्या सर्व अनेक वर्षे जगणाऱ्या, मांसल ⇨ओषधी, बहुधा सरळ वाढणाऱ्या व काही मुळांच्या साह्याने वर चढणाऱ्या वेली किंवा जमिनीवर वाढणाऱ्या (प्रसर्पी) वनस्पती आहेत काहींना जमिनीत वाढणारा गड्डा (ग्रंथीक्षोड, मूलक्षोड) असतो व जमिनीवर खोड नसते [⟶ खोड]. सरळ खोड असल्यास पाने साधी, अखंड किंवा कमीजास्त विभागलेली, एकाआड एक, दोन रांगांत वाढणारी व असमात्र असून उपपर्णे मोठी, दोन व पापुद्र्यांसारखी असतात. फुलोरा कक्षास्थ (पानांच्या बगलेत) कुंठित, द्विशाखाक्रमी शुंडी [⟶ पुष्पबंध] फुले आकर्षक, एकलिंगी व सच्छद पहिल्या काही अक्षांवर शेवटी पुं-पुष्पे (नर-फुले) व फुलोऱ्याच्या शेवटच्या काही अक्षांवर स्त्री-पुष्पे (मादी-फुले) येतात. पुं-पुष्पात परिदले दोन किंवा चार परंतु पहिली दोन दुसऱ्या दोन्हींखाली काटकोनात असतात. केसरदले अनेक, जुळलेली किंवा मुक्त परागकोशांना जोडणारी संधानी लांब व परागकोश विविध आकारांचे स्त्री-पुष्पात दोन ते पाच परिदले व जुळलेली दोन ते तीन अधःस्थ किंजदले किंजपुटात दोन ते तीन कप्पे अक्षलग्न बीजके अनेक, अधोमुखी किंजपुट पंखयुक्त [⟶ फूल]. फळ काहीसे कठीण, कधी पापुद्र्यांसारखे, चिवट किंवा मांसल, बहुधा एक ते तीन (किंवा सहा) पंखांचे बोंड बिया अनेक, सूक्ष्म व अपुष्क (गर्भाबाहेर अन्नांश नसलेल्या). बिगोनिया, बिगोनिएला, हिलेब्रँडिया, सेमिबिगोनिएला, सिंबिगोनिया अशा पाच वंशांपैकी ⇨बिगोनियाच्या जाती सर्वत्र आढळतात त्या फक्त पॉलिनीशिया व ऑस्ट्रेलिया येथे आढळत नाहीत. इतरांचा प्रसार मात्र फारच मर्यादित आहे. अनेक जातींत पानांच्या बगलेत लहान गाठी (ग्रंथिक्षोड) असतात. बिगोनिया रेक्सच्या तुटून पडलेल्या पानांपासून किंवा तोडून टाकलेल्या पानांच्या तुकड्यांवर नवीन आगंतुक रोपे येतात. पूर्व हिमालयाच्या परिसरात व मलेशियात बिगोनियातील वनस्पतींची संख्या मोठी आहे. या कुलाचे कुकर्बिटेसीशी बरेच साम्य आहे तथापि डॅटिस्केसी व लोझेसी या कुलांशीही याचे आप्तभाव दिसून येतात.

पहा : कुकर्बिटेसी बिगोनिया

परांडेकर, शं. आ.