हिकरी : (रोमशवल्क लॅ. कार्या कुल-जुग्लँडेसी) . फुलझाडांपैकी एका प्रजातीचे नाव. या प्रजातीत सु. १८ जातींचा समावेश असून यातील सर्व वनस्पती पानझडी वृक्ष असतात. काही वनस्पतींच्या सालींच्या केसाळपणामुळे या प्रजातीचे नाव ‘रोमशवल्क’ असेही आहे. प्रदेशनिहाय साधारण १५ जाती मूळच्या पूर्व-उत्तर अमेरिकेतील असून तीन जातींचा आढळ पूर्व आशियात आहे. उत्तर अमेरिका, ग्रीनलंड, आइसलँड व यूरोपात या वनस्पतींचे जीवाश्म आढळलेले आहेत. 

 

हिकरी (कार्या ओव्हाटा) : (१) पाने व कळ्यांसहित फांदी, (२) कलिका, (३) पक्व फळ, (४) कपाली मांसल चोड्यांनी वेढलेले फळ.
 

 हिकरी वनस्पतीचे वर्गीकरण तिच्या कवच-फळाच्या आवरणावरून देखील केले जाते. जाड आवरण (कवच) असणाऱ्या जातींत शॅगबार्क हिकरी (का. ओव्हाटा), शेलबार्क हिकरी (का. लॅसिनिओसा) व पिगनट हिकरी (का. ग्लॅब्रा) इत्यादींचा समावेश होतो तर पातळ कवच असणाऱ्या जातींत बिटरनट हिकरी (का. कॉर्डिफॉर्मिस), पीकान हिकरी (का. इलिनोएन्सिस) व वॉटर हिकरी (का. ॲक्वॅटिका) या जातींचा समावेश होतो. 

 

हिकरी वनस्पती साधारणपणे ३० मी.पर्यंत उंच वाढते. तिच्यामध्ये लांब सोटमूळ असते. पाने संयुक्त व लांब (३०.५–५०.८ सेंमी.) असून प्रत्येकी ३–१७ दातेरी पर्णकांनी बनलेली असतात. काही जातींची पाने वसंत ऋतूत चकचकीत (तेजस्वी) पिवळ्या रंगाची असतात. फुलेसच्छद, एकलिंगी, लहान, अप्रदल, हिरवट पांढरी पुं-पुष्पे बारीक व लोंबत्या नतकणिशावर आणि स्त्री-पुष्पे २–१०, सरळ व अग्रस्थ कणिशावर किंवा झुबक्यांनी एकाच वृक्षावर येतात. फळ गोलाकार किंवा अंडाकृती असून कपाली मांसल चोड्यांनी वेढलेले असते. पक्व झाल्यावर फळाची फुटून चार शकले होतात. काही जातींच्या फळात मोठ्या व मधुर चवीच्या खाद्य बिया असतात. 

 

हिकरी वनस्पतीच्या मुख्य खाद्य जातींमध्ये शॅगबार्क हिकरी, शेलबार्क हिकरी, पीकान हिकरी आणि मॉकरनट हिकरी (का. टोमँटोसा) यांचा समावेश होतो. बिटरनट हिकरी आणि वॉटर हिकरी यांच्या बिया कडू व खाण्यास अयोग्य असतात. कारण त्यांच्या मगजाच्या आवरणावर टॅनीन असते. इतर जातींतील फळे खाद्य असली तरी त्यांचा आकार खूप लहान असल्याने व्यापारी दृष्ट्या त्या उपयुक्त नसतात. 

 

पीकान हिकरी आर्थिक दृष्ट्या सर्वांत महत्त्वाची जाती आहे. तिची लागवड भारतात उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश व पंजाबमध्ये शोभेसाठी, तसेच चवदार फळे व फिकट रंगाचे लाकूड यांसाठी केली जाते. तिला खवड्या व पर्ण ठिपके हे रोग होतात. पर्ण ठिपके हा रोग बुरशीमुळेहोतो. पानांच्या वरील भागावर मोठे लालसर-तपकिरी ठिपके आणि खालील बाजूवर तपकिरी रंगांचे ठिपके पडतात. त्यामुळे वनस्पतीची पानगळ होते. इतर हिकरी वृक्षांचे लाकूड जड, कठीण व बळकट असल्यामुळे ते हातोड्या, कुर्‍हाडी, फर्निचर, खेळ साहित्य, फरश्या आदी बनविण्यासाठी वापरतात.

 

पहा : जुग्लँडेलीझ. 

जमदाडे, ज. वि. 

 

शॅगबार्क हिकरी
शॅगबार्क हिकरी