कासनी : (इं.चिकोरी, सकोरी लॅ. सिकोरियम इंटीबस कुल-कंपॉझिटी). ही बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी) वनस्पती भारतात पंजाब, वायव्य सरहद्द व हैदराबाद येथे जंगली अवस्थेत सापडते व गुजरातधील जामनगर, तमिळनाडूतील कोईमतूर व निलगिरी आणि केरळमधील मुन्नर व वट्टवडा या जिल्हयांत लागवडीत आहे. ही मूळची यूरोपीय असून अमेरिकेतही भरपूर आढळते. ग्रीक व रोमन काही हिची लागवड करून खाण्यासाठी वापरीत असत. खोड कानीय, एक ते दोन मी. उंच, बहुशाखित प्रधानमूळ लांब व मांसल पाने साधी एकाआड एक, केसाळ, दीर्घवर्तुळाकृती पुष्पबंध (स्तबक) अग्रस्थ व कक्षास्थ, ३⋅८ सेंमी. [→पुष्पबंध] सामान्य शरीरिक लक्षणे ⇨कंपॉझिटी  कुलात वर्णिल्याप्रमाणे. पुष्पके निळी, पूर्ण व जिव्हिकाकृती छदे प्रपिंडयुक्त [→फूल]. प्रधानमुळाचे चकत्यांसारखे तुकडे करून ते भट्‌टीत सुकवून नंतर तुपावर भाजून व दळून पीठ करतात आणि कॉफीला रंग व कडवटपणा आणण्यासाठी, तीत मिसळतात किंवा अन्य प्रकारे (उदा., पेय बनविण्यासाठी) वापरतात. पानांचा काही भाग कच्चा खाण्यास (उदा., सॅलड करण्यासाठी) उपयुक्त. सुके मूळ मूत्रल (लघवी साफ करणारे), पौष्टिक आणि दीपक (भूक) वाढविणारे) इतर भाग पौष्टिक, ज्वरनाशी असून अमांश, प्लीहावृध्दी (पानथरीचा विकार) व वांतीवर गुणकारी. एंडाइव्ह (सिकोरियम एंडिव्हिया ) ही दुसरी जाती बागेत लावतात ती औषधी आहे. ब्रिटनमध्ये भाजीप्रमाणे खाण्याकरिता विशेष पद्धतीने तिची लागवड करतात व तिच्या पानांना शुभ्रपणा आणतात. कासनी गुरांना चाऱ्याप्रमाणे खाऊ घालतात.

भारतामध्ये कासनीच्या मुळांचे दरवर्षी ६,००० — ७,००० टन उत्पादन होते व त्यांपासून कॉफीमध्ये मिसळण्याची ४,००० — ४,५०० टन पूड तयार करण्यात येते. तीपैकी भारतात ६०० — ७०० टन पूड वापरण्यात येते.

आफळे, पुष्पलता द.

कासनी