बोरू : (हिं. गु. बरू लॅ. अँड्रोपोगॉन हॅलेपेंसिस, सोर्घम हॅलेपेंस कुल-ग्रॅमिनी). हे सु. ४.६५ मी.पर्यंत उंच, सरळ वाढणारे बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारे), थोडे फार शाखायुक्त, गुळगुळीत गवत भारतात सर्वत्र पसरलेले आहे. शिवाय श्रीलंका व इतर उष्ण देशांतही हे आढळते. बोरूच्या अँड्रोपोगॉन वंशात एकूण सु १०० जाती असून त्यांपैकी भारतात ८ आहेत. कुंपणाच्या कडेने व पाण्याच्या प्रवाहाच्या कडेने बोरू लावतात. हे झाड खाऱ्या पाण्याजवळही वाढते. अनेक झाडांचे संघही (बेटे) आढळतात. पेरी लवदार पाने साधी, रेषाकृती भाल्यासारखी, टोकदार, गुळगळीत (०.३-०.६ मी. X १.८-५ सेंमी.) जिव्हीका [⟶ पान] आखूड, पातळ व केसाळ फुले शाखित परिमंजरीवर डिसेंबरात येतात. सामान्य संरचना व मांडणी ⇨ग्रॅमिनी (तृण कुल) व ⇨ग्रॅमिनेलीझ (तृण गण) यांत वर्णिल्याप्रमाणे असते. याचे बी शामक (दाह कमी करणारे) व मूत्रल (लघवी साफ करणारे) असून मूलक्षोडात (जमिनीखाली आडव्या वाढणाऱ्या जाड खोडात) हायड्रोसायनिक अम्ल असते. ह्याचा चारा गुरांना चांगला असतो. याच्या जाड बळकट खोडाच्या पूर्वी लेखण्या करीत वा सामान्यपणे त्या शाईने लिहिण्याकरिता वापरीत.

बोरूच्या वंशातील अँड्रोपोगॉन प्युमिलस ही गवताची जाती सर्व भारतभर कोरड्या प्रदेशात आढळते ते सुके किंवा ओले असताना गुरे आवडीने खातात ते ०.६ मी. उंच असून लागवडीत अधिक उंच व पालवीदार होते. पूर्वी अँड्रोपोगॉन या वंशात अंतर्भूत केलेल्या कित्येक वनस्पतींच्या जाती हल्ली सिंबोपोगॉन ह्या वंशात समाविष्ट केल्या आहेत उदा., गुच्छ, रोशा गवत, रोहिश, गवती चहा इत्यादी.

परांडेकर, शं. आ.